Final Order / Judgement | निकालपत्र (पारित दिनांक 15 मे 2017) (मा. सदस्या, श्रीमती स्मिता एन. चांदेकर यांच्या आदेशान्वये) तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे. - तक्रारकर्त्यांच्या तक्रारीचा आशय थोडक्यात असा की, त.क. क्रं. 1 ही घनश्याम पुरुषोत्तम नाखले यांची विधवा पत्नी आहे. त.क. 2 हा त.क. 1 व मय्यत घनश्याम यांचा मुलगा असून तो अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत आहे. वि.प. हे व्हेस्पा स्कुटरचे अधिकृत विक्रेते असून मनिष ऑटो मोटर नावांने व्यवसाय करतात. त.क. 1 ने दि.12.10.2013 रोजी रुपये 40,000/- व दि. 13.10.2013 रोजी रसिद क्रं. 1127 नुसार 38,473/- असे एकूण 78,473/-रुपये वि.प. 1 यांना नगदी देऊन व्हेस्पा स्कुटर त.क. 2 च्या नांवे खरेदी केली. सदर व्हेस्पा स्कुटरचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.
नोंदणी क्रमांक- नविन इंजिन नंबर - 3054371 चेसिस नंबर - 53342 विमा कालावधी - 15/10/2013 ते 14/10/2014 18/03/2015 ते 17/03/2016 न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनी. - वरील प्रमाणे व्हेस्पा स्कुटर खरेदी करतांना त.क.ने गाडीचे नोंदणी पुस्तक, पासींग व स्मार्ट कार्ड कागदपत्रांची मागणी केली. वि.प. 1 ने 8 दिवसात सर्व आवश्यक कागदपत्र देण्याचे आश्वासन दिले. परंतु 8 दिवसानंतर कागदपत्रांची मागणी केली असता वि.प. 1 यांनी सदर स्कुटर नागपूर येथील वि.प. 2 उन्नती मोटर्स यांच्याकडून विकण्याकरिता आणली असून त्यांच्या सोबत झालेल्या व्यवहारात काही समस्या असल्याचे त.क.ला सांगितले. तरी देखील गाडीची सर्व आवश्यक कागदपत्रे लवकरात लवकर देण्याचे आश्वासन वि.प. 1 यांनी त.क.ला दिले.
- त.क. ने पुढे असे ही नमूद केले की, त्यांनी दि.05.01.2015 रोजी वि.प. 1 यांना लेखी पत्र दिले. त्यानुसार वि.प. यांनी त.क.ला सदर पत्राचे दि. 19.01.2015 रोजी उत्तर पाठवून वि.प. यांचे प्रकरण प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर यांच्याकडे प्रलंबित असल्याचे कळविले. त.क. ने पुढे असे ही कथन केले आहे की, त्यांनी सदर व्हेस्पा स्कुटरची संपूर्ण रक्कम वि.प. 1 यांना दिलेली असल्यामुळे उपरोक्त वाहनाचे संपूर्ण कागदपत्रे देण्याची जबाबदारी वि.प. 1 ची आहे. सदर वाहन खरेदी करुन दिड ते दोन वर्षाचा कालावधी उलटून ही वि.प. 1 यांनी त.क.च्या वाहनाची आवश्यक कागदपत्रे त.क.ला न दिल्यामुळे त.क. क्रं. 2 हा कायदेशीररित्या सदर गाडीचा लाभ घेऊ शकत नाही. वि.प. यांच्या सेवेतील त्रुटीमुळे त.क. 2 हा सदर गाडीचा उपभोग घेऊ शकत नाही तसेच कोणालाही वाहन विकू शकत नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यांना होणा-या आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासाकरिता वि.प. 1 व 2 जबाबदार ठरतात असे त.क. चे म्हणणे आहे. त्यामुळे त.क. 1 ने दि.20.03.2015 रोजी अॅड. व्ही.एन.देशमुख यांचे मार्फत कायदेशीर नोटीस पाठवून वि.प. 1 यांनी सात दिवसात कागदपत्रे पुरविण्याबाबत कळविले अथवा ते शक्य नसल्यास विवादीत वाहन परत घेऊन वि.प. यांनी मोबदल्या दाखल स्विकारलेली संपूर्ण रक्कम रुपये 78,473/- 12 टक्के व्याजाने परत करण्याची मागणी केली. सदर नोटीस वि.प. 1 यांना प्राप्त होऊन ही वि.प. 1 यांनी त.क.च्या तक्रारीची दखल घेतली नाही व आजतागायत वाहनाचे कागदपत्रे दिले नाही. त्यामुळे त.क.ने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली असून विवादीत व्हेस्पा स्कुटरची आर.टी.ओ.पासिंग, नोंदणी पुस्तक व स्मार्ट कार्ड इत्यादी कायदेशीर कागदपत्रांची मागणी केली आहे. ते शक्य नसल्यास वाहन परत घेऊन त्याची संपूर्ण रक्कम रुपये 78,473/- व त्यावर 18 टक्के व्याज, तसेच शारीरिक , मानसिक त्रासाकरिता रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- मिळावे अशी विनंती त.क.ने केली आहे.
- वि.प. 1 यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं. 11 वर दाखल केला असून त्यांनी तक्रारीस सक्त विरोध केला आहे. वि.प. 1 ने त्यांच्या विशेष कथनात नमूद केले की, त्यांनी व्हेस्पा दुचाकी वाहन त.क. 2 तर्फे प्रत्यक्ष रक्कम देऊन वि.प. 2 उन्नती व्हेईकल्स यांच्याकडून मागवून दिले. वि.प. 2 कडून सी.आर.टी.एम. बनवून आले, त्यानंतर त्यांनी वर्धा आर.टी.ओ. ला प्रत्यक्ष वाहन दाखवून व रुपये 210/-भरुन गाडीचे पासींग केले. परंतु टॅक्स भरण्यासाठी वर्धा आर.टी.ओ.येथे सी.आर.टी.एम., सेल लेटर व इनव्हॉईसची तपासणी दरम्यान सेल लेटर आणि इनव्हॉईसची प्रत अर्धवट असल्याने आर.टी.ओ. वर्धा यांनी त्याची दुसरी प्रत प्रस्तुत करण्याचे आदेश चेंच प्रिंट असे लिहून दिले. सेल लेटर व इनव्हॉईस बनविण्याचा अधिकार फक्त वि.प. 2 उन्नती व्हेईकल्स, व्हेस्पा, नागपूर यांनाच असल्यामुळे त्यांनी सी.आर.टी.एम.सह संपूर्ण कागदपत्रे वि.प. 2 उन्नती व्हेईकल्स, नागपूर यांच्याकडे दुरुस्ती करण्यासाठी पाठविले. वि.प. 2 उन्नती व्हेईकल्स व्हेस्पा, नागपूर यांच्याकडून कोणतेही कारण न सांगता वि.प. 1 यांची वर्धा येथून सब-डिलरशीप समाप्त केली व दुस-याला सब डिलर बनविले. त्यामुळे वि.प. 1 चे रुपये 30,000/-चे नुकसान झाले.
- वि.प. 1 यांनी पुढे असे कथन केले की, वि.प. 2 यांनी त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी दिलेले कागदपत्र वि.प. 1 यांना परत केले नाही. वि.प. 1 ने वि.प. 2 विरुध्द पोलीस खात्यात तक्रार केली आहे. सदर वि.प. 1 हा फक्त सब डिलर असून मुख्य डिलर वि.प. 2 कडून सी.आर.टी.एम., सेल लेटर व इनव्हाईस मिळाल्याशिवाय ते आर.टी.ओ.कडे पुढील कार्यवाही करु शकत नाही. त्यामुळे वि.प. 1 ने सेवेत कुठलीही त्रुटी केलेली नसून वि.प. 2 यांच्याकडून सेवेत त्रुटी करण्यात आली आहे असे लेखी उत्तरात नमूद केलेले आहे.
- वि.प. 2 हे मंचासमक्ष हजर झाले, अनेक वेळ संधी देऊन ही वि.प. 2 ने आपला लेखी जबाब दाखल न केल्यामुळे त्यांच्या विरुध्द विना लेखी जबाब प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
- त.क. ने त्यांच्या तक्रारीच्या पृष्ठयर्थ वर्णनयादी नि.क्रं. 2 नुसार एकूण 8 कागदपत्र दाखल केलेले आहे. त.क.ने नि.क्रं. 21 वर त.क. 2 चे शपथपत्र दाखल केले असून नि.क्रं. 27 वर लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. वि.प. 1 यांनी नि.क्रं. 26 वर शपथपत्र दाखल केले असून वर्णनयादी नि.क्रं. 31 वर एकूण 10 कागदपत्र दाखल केलेले आहे. तसेच वर्णनयादी नि.क्रं. 33 वर एकूण 2 कागदपत्र दाखल केले असून नि.क्रं. 28 वर त्यांचा लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. त.क. व वि.प. क्रं 1 चा युक्तिवाद ऐकण्यात आला. वि.प.क्रं. 2 युक्तिवादाच्या वेळी गैरहजर.
- वरीलप्रमाणे त.क. व वि.प. यांचे परस्पर विरोधी विधानावरुन खालील मुद्दे मंचासमोर विचारार्थ काढून त्यावरील कारणमिमांसा पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्रं. | मुद्दे | उत्तर | 1 | त.क. 1 व 2 वि.प.चे ग्राहक आहेत काय? | होय | 2 | वि.प.1 व 2 ने त.क. ला व्हेस्पा दुचाकी वाहनाचे कागदपत्र न देऊन सेवेत त्रुटी केली काय ? | होय, वि.प. 2 ने | 3 | तक्रारकर्ते मागणीप्रमाणे लाभ मिळण्यास पात्र आहे काय ? | होय, अंशतः | 4 | अंतिम आदेश काय ? | आदेशानुसार |
-: कारणमिमांसा :- - मुद्दा क्रं.1 बाबत- त.क. 1 ने त.क. 2 च्या नांवे वि.प.कडून रुपये 78,473/- नगदी देऊन लाल रंगाची व्हेस्पा दुचाकी वाहन खरेदी केले हे अभिलेखावरील कागदपत्र नि.क्रं. 2(1) व (2) वरुन स्पष्ट होते. परंतु वि.प. 1 यांनी वाहन त.क. 2 ला विकले म्हणून त.क. 1 ही त्यांची ग्राहक होत नसल्यामुळे सदर तक्रार मंचासमक्ष चालू शकत नाही असा युक्तिवाद केला. त.क.ने तक्रार अर्जात असे नमूद केले आहे की, त.क. 2 हा त.क. 1 चा मुलगा आहे व तो शिक्षण घेत असल्यामुळे त्याच्या सोयीकरिता त.क. 1 ने त.क. 2 ला व्हेस्पा स्कुटर हे दुचाकी वाहन घेऊन दिले. त.क. 2 हा शिकत असल्यामुळे साहजिकच स्कुटर घेण्याकरिता लागणारी रक्कम ही त.क. 1 यांनी अदा केलेली असावी त्यामुळे त.क. 1 व 2 हे वि.प. चे ग्राहक आहे असे मंचाचे मत आहे.
- मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबत ः- तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी व्हेस्पा स्कुटर हया दुचाकी वाहनाची संपूर्ण मोबदल्याची रक्कम देऊन वि.प. 1 कडून वाहन खरेदी केले. परंतु वि.प.1 ने आजपर्यंत त.क.ला गाडीचे नोंदणी पुस्तक, स्मार्ट कार्ड तसेच आर.टी.ओ.पासिंग कागदपत्राची वेळोवेळी मागणी करुन देखील कागदपत्र पुरविलेले नाही. त्यामुळे त.क.ला सदर गाडीचा उपयोग करता येत नाही. तसेच सदर वाहन कुणालाही विकता ही येत नाही. वि.प. 1 ने गाडीचे आवश्यक कागदपत्र न पुरवून सेवेत त्रृटी केली आहे.
- या उलट वि.प. 1 ने असे प्रतिपादन केले आहे की, ते वर्धा जिल्हयाकरिता वि.प. 2 चे सब डिलर म्हणून काम करीत होते. त्यामुळे त.क.कडून मिळालेली व्हेस्पा स्कुटरची रक्कम वि.प. 2 ला देऊन वि.प. 2 कडून वाहन त.क.ला दिलेले आहे. तसेच वि.प. 2 कडून सी.आर.टी.एम. मिळताच त.क.च्या गाडीच्या पासिंगसाठी त्यानी आर.टी.ओ.ला वाहन दाखवून रुपये 210/- भरुन गाडीचे पासींग केले. परंतु वर्धा आर.टी.ओ.ने सी.आर.टी.एम. सेल लेटर व इनव्हाईसची प्रत अर्धवट असल्याने दुसरी प्रत सादर करण्याकरिता चेंज प्रिंट या शे-यासह कागदपत्र परत केले. त्यामुळे वि.प. 1 यांनी सी.आर.टी.एम.सह संपूर्ण कागदपत्र वि.प. 2,उन्नती व्हेईकल, नागपूर यांच्याकडे दुरुस्तीकरिता पाठविले. दरम्यानच्या काळात वि.प. 2 यांनी वि.प. 1 ची वर्धा जिल्हयातील सब डिलरशीप समाप्त केली. तसेच त.क.च्या गाडीचे कागदपत्र परत केले नाही. सी.आर.टी.एम. व इनव्हॉईस लेटर तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी वि.प. 2 ची असल्यामुळे वि.प. 1 हे सदर कागदपत्रांअभावी त.क.च्या गाडीचे आर.टी.ओ.पासींग करुन देण्यास असमर्थ आहे. त्यामुळे त्यांनी सेवेत त्रुटी केली नसून वि.प. 2 यांनी सेवेत त्रुटी केली असे वि.प. 1 चे म्हणणे आहे.
वि.प. क्रं. 1 ने ही बाब मान्य केली आहे की, तक्रारकर्त्यांना आजपर्यंत गाडीचे कागदपत्र मिळाले नाही. वि.प. क्रं. 2 ने आपले म्हणणे मंचासमक्ष मांडले नाही. गाडीचा संपूर्ण मोबदला प्राप्त होऊन ही त.क.ला आजपर्यंत त्यांच्या गाडीचे कागदपत्र न देणे ही निश्चितपणे वि.प. यांची सेवेतील त्रुटी आहे. वि.प. 1 यांनी वर्णनयादी नि.क्रं. 31 नुसार पान क्रं. 79 वर दाखल केलेले कागदपत्राचे अवलोकन केले असता त.क.च्या गाडीच्या पासींगचे कागदपत्र चेंज प्रिंट या शे-यासह आर.टी.ओ. कार्यालयाने दिल्याचे दिसून येते. सदर फॉर्म 20 वर व्हेस्पा स्कुटर ही त.क. ने उन्नती व्हेईकल प्रा.लि. नागपूर यांच्याकडून खरेदी केली असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. यावरुन वि.प. 1 ने त.क. कडून वि.प. 2 करिता स्कुटरचे पैसे स्वीकारले ही बाब स्पष्ट होते. - वि.प. 1 ने वर्णनयादी नि.क्रं. 31 नुसार कागदपत्र क्रं. 7 अभिलेखावरील पान.क्रं. 84-85 वर सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर यांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी वर्धा यांना लिहिलेल्या पत्राची प्रत दाखल केलेली आहे. त्यामध्ये वि.प. 1 ने त.क. 2 व इतर 2 व्यक्तीनां दुचाकी वाहन विकले.परंतु आर.टी.ओ.वर्धा कार्यालयाकडे नोंदणीकरिता दिलेले कागदपत्रांच्या नविन प्रती दाखल करण्यास कळविले असता सदर कागदपत्रांची पूर्तता न केल्याबाबत वि.प. 1 ने त्यांच्याकडे केलेल्या तक्रारीचा सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर यांनी अहवाल मागितल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे वि.प. 1 यांनी वि.प. 2 विरुध्द पोलिस खात्यात केलेल्या तक्रारीची प्रतिलिपी अभिलेखावर दाखल केली. त्यामध्ये देखील वि.प. 2 ने त.क.च्या गाडीचे कागदपत्राची पूर्तता न केल्याबाबतचा उल्लेख आहे.
- वरील सर्व कागदपत्रावरुन हे स्पष्ट होते की, वि.प. 1 हे वि.प. 2 करिता वाहन विकण्याचा व्यवसाय करीत होते. वि.प. 1 व 2 यांच्यात आपसी व्यावसायिक वाद होता. परंतु त्यामुळे ग्राहकांची विनाकारण गैरसोय न होऊ देणे व ग्राहकास योग्य ती सेवा देणे ही वि.प. 1 व 2 यांची जबाबदारी आहे. वि.प.1 यानां वि.प.2 कडून त.क.च्या गाडीच्या पासिंगकरिता लागणारे सदर कागदपत्र प्राप्त झाल्यास वि.प. 1 यांनी आर.टी.ओ. कार्यालय वर्धा येथून सदर वाहनाची पासिंग करुन देण्याची तयारी मंचासमक्ष दर्शविली आहे.
- वि.प. 2 प्रकरणात हजर होऊन ही त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला नाही व आपली बाजू देखील मांडली नाही. अभिलेखावर दाखल फॉर्म 20 जो की, गाडीचे नोंदणीकरिता भरावयाचा असतो त्यात वाहन विकत घेतले त्या डिलरचे नांव या सदरात वि.प. 2 चे नांव नमूद केले असून त्यावर त्यांची सही व शिक्का आहे. यावरुन वादातीत वाहन हे वि.प. 2 यांनी त.क.ला विकत दिले व त्याचा मोबदला वि.प.क्रं. 2 ला मिळाला हे सिध्द होते. तसे जर नसते तर वि.प.क्रं. 2 यांनी त्याबाबत मंचासमक्ष खुलासा केला असता, त्यामुळे वादातीत वाहन हे वि.प.क्रं. 2 ने वि.प.क्रं. 1 मार्फत विकले असल्यामुळे सदर वाहनाचे इनव्हाईस सेल लेटर व इतर कागदपत्र तयार करुन देणे ही वि.प. क्रं. 2 ची जबाबदारी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. विरुध्द पक्ष 2 यांनी त.क.च्या गाडीची रक्कम स्वीकारुन देखील त.क.ला गाडीचा उपभोग घेण्याकरिता आवश्यक असलेली कागदपत्रे, सी.आर.टी.एम., सेल लेटर, व इनव्हाईस दुरुस्त करुन दिलेले नाही हे तक्रारीतील त.क. व वि.प. 1 चे कथन व अभिलेखावरील कागदपत्रावरुन स्पष्ट होते. त्यामुळे त.क. हा त्याच्या गाडीचा कायदेशीर उपयोग करु शकत नाही, याकरिता विरुध्द पक्ष 2 जबाबदार आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. वि.प. 2 यांनी त.क.कडून व्हेस्पा स्कुटर या दुचाकी वाहनाची संपूर्ण रक्कम स्वीकारुन ही त.क. ला गाडीचे कागदपत्र न पुरविणे ही वि.प.2 च्या सेवेतील त्रुटी असून त्यांनी अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्याचे स्पष्ट होते.
- त.क.ने त्याच्या लेखी युक्तिवादात वि.प.1 ने त.क.च्या तक्रारीचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले असे नमूद केले आहे. वि.प. 1 हे वि.प.2 उन्नती मोटर्सकरिता वर्धा शहरात काम करीत होते व त्यांना कागदपत्र तयार करण्याचा अधिकार नव्हता हे अभिलेखावरुन स्पष्ट होते. सदर बाब वि.प.1 ने त.क.ला त्याच्या पत्राच्या उत्तरात कळविल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत त.क.ने वि.प. 2 कडून गाडीचे कागदपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न केले असल्याबाबतचा कुठलाही पुरावा अभिलेखावर दिसून येत नाही. वि.प. 1 यांनी त.क.च्या गाडीचे कागदपत्र मिळण्याकरिता प्रयत्न केले हे अभिलेखावरुन दिसून येते. त्यामुळे वि.प. 1 यांनी सेवेत त्रुटी केली असे म्हणता येणार नाही. म्हणून वि.प.1 यांना त.क.ला नुकसान भरपाई देण्याच्या दायित्वातून मुक्त करण्यात येते. वि.प. 2 यांनी त.क. कडून वाहनाची संपूर्ण रक्कम स्वीकारुन ही त.क.ला गाडीचे आवश्यक कागदपत्र न पुरवून सेवेत त्रुटी केली आहे. त्यामुळे त.क. हे वि.प. 2 कडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.त्याचप्रमाणे संपूर्ण मोबदला देऊन ही वाहनाचा उपयोग न करता येत असल्यामुळे त.क.ला शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान सहन करावा लागला. त्यामुळे त.क. शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाकरिता रुपये 8,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 3,000/-वि.प. 2 कडून मिळण्यास पात्र आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. आदेश 1 तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2 विरुध्द पक्ष 2 यांनी स्वखर्चाने त.क.च्या व्हेस्पा स्कुटर वाहनाचे आवश्यक असणारे सर्व कागदपत्र आर.टी.ओ. कार्यालय वर्धा येथे सादर करुन त.क.च्या वाहनाचे आर.टी.ओ.कडून पासिंग करवून नोंदणी पुस्तक व स्मार्ट कार्ड, इनव्हाईस व गाडीच्या इन्श्युरन्ससह त.क. ला आदेश पारित दिनांकापासून 30 दिवसाचे आत द्यावे. तसे न केल्यास विरुध्द पक्ष 2 हे तक्रारकर्त्या कडून व्हेस्पा स्कुटर करिता घेतलेली रक्कम रुपये 78,473/- व त्यावर दि.13.10.2013 पासून प्रत्यक्ष रक्कम अदायगी पर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने त.क.ला देऊन वादातीत वाहन परत घेऊन जावे. 3 विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रुपये 8,000/- तक्रारीचा खर्च म्हणून रु.3,000/- द्यावेत. 4 विरुध्द पक्ष क्रं. 1 यानां त.क.ला नुकसान भरपाई देण्याच्या दायित्वातून मुक्त करण्यात येते. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत वि.प. 2 यांनी करावी. 5 मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात. 6 निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाही करिता पाठविण्यात याव्यात. | |