-ः न्यायनिर्णय ः-
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या यानी पारित केला)
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986च्या कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
2. जाबदार क्र.1 ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 अन्वये नोंदणीकृत संस्था असून तिचे मुख्य कार्यालय वर नमूद केलेल्या ठिकाणी आहे. जाबदार क्र.1 हे सदर जाबदार संस्थेचे चेअरमन आहेत. जाबदार क्र.2 हे जाबदार क्र.1 संस्थेचे सचिव आहेत. जाबदार क्र.1 व क्र.2 संस्थेचे सचिव श्री.संतोष सीताराम पवार यांचेतर्फ जाबदार क्र.1 संस्थेचा कारभार चालतो. जाबदार क्र.1 संस्थेचा मुख्य उद्देश सभासद व त्रयस्थ व्यक्तींकडून मुदतठेवीच्या स्वरुपात ठेवी स्विकारणे त्याचे बचत खात्यावर पैसे देणे घेणेचे व्यवहार करणे, सभासदांना कर्जाऊ रकमा देणे असा आहे. जाबदार क्र.1 व 2 हे वर नमूद केलेप्रमाणे सदर पतसंस्थेचे चेअरमन व सचिव असलेने सदर पतसंस्थेचे काम पहातात व सर्व आर्थिक व्यवहारावर त्यांचे नियंत्रण असते. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असल्याने व जाबदारानी सेवेत त्रुटी केली असल्याने सदर तक्रार तक्रारदारानी मे.मंचात दाखल केली आहे. तक्रारदारानी सन 2009 मध्ये नोकरीतून व शेतीच्या उत्पन्नातून मिळालेले पैसे मुलीच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी, भविष्यातील तरतुदीसाठी जाबदार पतसंस्थेत मुदत ठेवीच्या रुपाने ठेवले होते. तक्रारदारानी दि.19-5-09 रोजी मुदत ठेव पावती क्र.5021 ते 5035 अशा 15 मुदतठेव पावत्या प्रत्येकी रक्कम रु.19,000/- द.सा.द.शे. 8 टक्के व्याजदराने व मुदतठेव पावती क्र.5036 रक्कम रु.6,145/- द.सा.द.शे.8 टक्के व्याजदराने अशा एकूण 16 मुदत ठेवपावत्यांच्या स्वरुपात जाबदार पतसंस्थेत तक्रारदारानी रकमा ठेवलेल्या होत्या. सदर ठेवपावत्यांची मुदत दि.19-5-2012 रोजी संपल्याने तक्रारदारांनी जाबदार क्र.1 व 2 यांची समक्ष भेट घेऊन मुदतठेव पावत्यांवरील सर्व ठेवी व्याजासह परत दयाव्यात अशी मागणी व विनंती केली, त्यावेळी तुम्हाला चेकने ठेवपावत्यांचे पैसे देतो, सदर चेकचे पैसे तुम्हाला नक्की मिळतील असा भरवसा व विश्वास जाबदारानी तक्रारदाराना दिला. त्याप्रमाणे जाबदारानी तक्रारदाराना दि.26-5-2012 रोजी तक्रारदारानी पतसंस्थेत ठेवलेल्या मुदत ठेवपावती क्र.5021 ते 5036 या मुदतठेव पावत्यांची रक्कम रु.2,91,145/- व त्यावरील व्याज बचत खाती जमा असलेले रक्कम रु.35,000/- अशी एकूण रक्कम रु.3,26,145/- चे मुदतठेव रकमेचे व त्यांचे वरील व्याजापोटी चेक क्र.150140, 150141, 219551 ते 219560 असे एकूण 13 चेक श्रीमंत मालोजीराजे सह.बँक लि. शाखा राजवाडा, फलटण येथील खाते क्र.461 या खात्यावरील दिले. सदरील चेक क्र.150140, 150141 व 219551 ते 219560 हे प्रत्येकी रु.25,000/- रकमेचे होते व चेक क्र.219561 हा रक्कम रु.16,145/- चा अशी एकूण रक्कम रु.3,26,145/- या रकमेचे चेक्स जाबदारानी तक्रारदाराना दिले व सदर चेक तक्रारदाराना मिळाले असलेबाबत व सदर चेक्स वठतील व तुम्हाला तुमचे पैसे मिळतील अशी हमी दिलेचे लेखी पत्र जाबदारानी दिले होते व आहे. जाबदारांचे शब्दावर विश्वास ठेवून तक्रारदारानी स्वतःकडे असणा-या मुदतठेवपावत्यांच्या छायांकित प्रती स्वतःकडे ठेवून मूळ मुदत ठेव पावत्या जाबदार क्र.1 व 2 चे ताब्यात दिल्या. सदरील जाबदार क्र.1 व 2 यांनी दिलेले चेक क्र.219558, 219559 प्रत्येकी रक्कम रु.25,000/-चे सोडून बाकीचे उर्वरित चेकची रक्कम तक्रारदाराना मिळाली, परंतु तक्रारदारानी चेक क्र.219558, 219559 प्रत्येकी रक्कम रु.25,000/- असे एकूण रु.50,000/- हे वटणेसाठी भरले असता सदर खात्यावर पुरेशी रक्कम नसल्याचा शेरा मारुन न वटता परत आले. त्याची कल्पना तक्रारदारानी जाबदार क्र.1 व 2 याना दिली व तक्रारदारानी मुदत ठेवीची उर्वरित रक्कम रु.50,000/-ची मागणी जाबदाराना केली परंतु सदर रक्कम देणेस जाबदारानी टाळाटाळ केली. तक्रारदारानी जाबदार क्र.1 व 2 ची भेट घेऊन सदर ठेवपावत्याच्या रकमेची मागणी केली असता जाबदार 2 यानी अरेरावीची भाषा वापरुन तक्रारदारास परत पाठवले, त्यामुळे तक्रारदारानी अँड.बी.के.शिंदे फलटण यांचेतर्फे दि.5-1-2013 रोजी रजि.नोटीस पाठवून सदर चेक्सचे -ठेवपावत्यांची रक्कम परत मिळावी अशी मागणी केली. सदर नोटीस मिळूनही जाबदारानी तक्रारदाराना रक्कम परत दिली नाही. वस्तुतः तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असून जाबदारानी चांगली सेवा देणे ही त्यांची जबाबदारी आहे. तक्रारदारानी जाबदार संस्थेत ठेवलेल्या मुदतठेवपावत्यांची होणारी व्याजासह रक्कम जाबदारानी देणे कायदयाने आवश्यक व बंधनकारक होते. जाबदारानी तक्रारदाराना मुदतठेव पावती रकमेपोटी दिलेल्या एकूण 13 चेकपैकी 2 चेक अनुक्रमे क्र.219558 व 219559 प्रत्येकी रु.25,000/- चे तक्रारदाराना मिळू नयेत या हेतूनेच दिले व सदर चेकची रक्कम तक्रारदाराना मिळू नये या हेतूने जाबदारांनी बँक खात्यावर पुरेशी रक्कम ठेवली नाही त्यामुळे तक्रारदाराना मुदतठेवीची रक्कम रु.50,000/- मिळू शकली नाही. अशा प्रकारे जाबदारानी तक्रारदारांची फसवणूक केली, तसेच जाबदारानी तक्रारदाराना रक्कम देणेची टाळाटाळ करुन रक्कम देणेचे नाकारलेने जाबदारानी सेवेत त्रुटी केली असल्याने सदरची तक्रार दाखल करणे तक्रारदाराना भाग पडत आहे. जाबदारांचे कृत्यामुळे तक्रारदाराना अतोनात मानसिक व शारिरीक त्रास सोसावा लागला असून त्यामुळे तक्रारदाराना मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.5000/-प्रमाणे नुकसानभरपाई मागितली आहे. तक्रारदारानी कलम 3 मध्ये नमूद केलेल्या मुदतठेव रकमेपोटी दिलेल्या चेक क्र.219558 व 219559 प्रत्येकी रक्कम रु.25,000/- असे एकूण रु.50,000/- च्या रकमेची मागणी जाबदारांकडे केली असता ती त्यांनी देणेची टाळाटाळ केली, त्यामुळे तक्रारदारानी वकीलांतर्फे दि.5-1-2013 रोजी रजि.नोटीस पाठवून उर्वरित ठेवपावतीच्या रकमेची मागणी केली असता जाबदारानी सदर रक्कम देणेस नकार देऊन सेवेत त्रुटी केली त्यावेळेपासून आजपर्यंत तक्रारीस कारण घडत आहे. तक्रारदार हे मे.कोर्टाचे अधिकार स्थळसीमेत रहात असून जाबदार संस्था ही मे.कोर्टाचे अधिकार स्थळसीमेत आपला व्यवसाय करते. जाबदारांनी सेवेत त्रुटी केली असल्याने व त्यास कारण मे.कोर्टाचे अधिकार स्थळसीमेत घडलेले असल्याने कोर्टास सदर तक्रार दाखल करुन घेणेचा व निर्णय करणेचा अधिकार आहे. तक्रारदारानी मे.मंचाशिवाय अन्य कोणत्याही कोर्टात रक्कम मिळणेसाठी अर्ज दाखल केलेला नाही. सबब तक्रारदारांनी अशी विनंती केली आहे की, तक्रारदाराना कलम 3 मध्ये नमूद केलेल्या ठेवपावत्यांच्या पोटी दिलेल्या चेकची रक्कम रु.50,000/- देणेबाबत आदेश व्हावेत. तसेच सदर रकमेवर दि.19-5-2012 पासून रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.8 टक्केप्रमाणे व्याज जाबदाराकडून तक्रारदारास मिळावे, मानसिक त्रासापोटी तक्रारदाराना रक्कम रु.10,000/-व अर्जाचे खर्चापोटी रु.5000/- मिळावेत. येणेप्रमाणे तक्रारअर्ज आहे.
3. जाबदार क्र.1 व 2 याना सदर कामी नोटीसा लागू होऊनही ते मंचात गैरहजर राहिले व म्हणणेही दाखल केले नाही, त्यामुळे मे.मंचाने त्यांचेविरुध्द दि.13-8-14 रोजी 'एकतर्फा' आदेश पारित केले आहेत. त्यामुळे सदर कामी जाबदारांचे म्हणणे दाखल नाही.
4. नि.1 वर दि.23-5-14 रोजी तक्रारदारानी दाखल केलेला तक्रारअर्ज, नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.4 वर दि.23-5-14 रोजीचे अँड.शेलार यांचे वकीलपत्र, नि.5 कडे तक्रारदारानी दाखल केलेली कागदयादी, नि.5/1 ते 5/16 कडे तक्रारदारानी दाखल केलेल्या मुदतठेवपावत्यांच्या झेरॉक्स प्रती, नि.5/17 कडे तक्रारदारानी चेअरमन याना दिलेले पत्र, त्यामध्ये पा.क्र.5021 ते 5036 या क्रमांकाचे रु.2,91,145/- व त्यावरील सेव्हींग व्याज खाती जमा असलेली रक्कम रु.35,000/- असे एकूण रु.3,26,145/- च्या रकमेचे चेक आपणांस मिळाले आहेत (चेक क्र.150140, 150141 व 219551 ते 219560 असे प्रत्येकी रक्कम रु.25,000/-चे व चेक क्र.219561 रु.26,145/-) व त्याबाबत आपली काही तक्रार नाही तरी सदर चेक न वटलेस पुढील कारवाई करणेचे अधिकार राखून ठेवले आहेत अशा आशयाचे पत्र, नि.5/18 कडे जाबदारानी मालोजीराजे सह.बँकेवरील रक्कम रु.25000/-चा दि.15-9-12चा तक्रारदारास दिलेला न वटता परत आलेला चेक, नि.5/19 कडे जाबदारानी मालोजीराजे सह.बँकेवरील रक्कम रु.25000/-चा दि.29-9-12 चा तक्रारदारास दिलेला न वटता परत आलेला चेक, नि.5/20 वर पतसंस्थेचे चेअरमन व सचिव यांना 5-1-2012 रोजी अँड.शिंदे यांनी तक्रारदारातर्फे रजि.पोस्टाने पाठविलेल्या नोटीसा, नि.5/21 कडे चेअरमनच्या नोटीसची पोचपावती, नि.5/22 कडे सचिवाना नोटीस पोचलेची पोहोचपावती, नि.6 कडे तक्रारदाराची पत्तापुरसीस, नि.7 कडे मंचाने जाबदाराना पाठवलेल्या नोटीसा, नि.8 व 9 कडे जाबदारांच्या नोटीसच्या पोहोचपावत्या, नि.10 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.11 कडे तक्रारदारांचा युक्तीवाद, इ.कागदपत्रे दाखल आहेत.
5. नि.1 वरील तक्रारदारांची तक्रार, त्यावर जाबदारांचे आलेले म्हणणे, तक्रारदार व जाबदारानी दाखल केलेली कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे, लेखी युक्तीवाद व उभय विधिज्ञांचा तोंडी युक्तीवाद वगैरेचा विचार करुन मंचाने सदर तक्रारीचे निराकरणार्थ खालील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार हे जाबदार पतसंस्थेचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदार हे तक्रारदार यांचे सेवापुरवठादार
आहेत काय? होय.
3. जाबदारानी तक्रारदाराना दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय? होय.
4. जाबदार हे तक्रारदारांच्या रकमा देणे लागतात काय? होय.
5. अंतिम आदेश काय? शेवटी नमूद केलेप्रमाणे.
विवेचन-
6. तक्रारदारानी जाबदार संस्थेत मुदतठेवपावत्या ठेवलेल्या होत्या, त्यामुळे तक्रारदार हा जाबदार पतसंस्थेचा ग्राहक होतो. तक्रारदारांच्या मुदतठेवपावत्यांची मुदत संपूनही व तक्रारदारांनी मुदत ठेवीच्या रकमेची वारंवार मागणी करुनही जाबदारांनी त्याना ठेवीची रक्कम परत केली नाही. शेवटी दि.26-5-2000 रोजी (नि.5/17) जाबदार संस्थेने मूळ मुदतठेवीच्या पावत्या तक्रारदारांकडून परत घेतल्या व त्यापोटी चेक्स अदा केले. पा.क्र.5021 ते 5036 यावर असलेली रक्कम रु.2,91,145/- व त्यावरील सेव्हींग व्याज खाते जमा असलेले रक्कम रु.35,000/- असे एकूण रक्कम रु.3,26,145/- च्या रकमेचे चेक तक्रारदारास जाबदारांनी दिले. एकूण तक्रारदारास रक्कम रु.25,000/-चे 12 व रु.26,145/-चा एक असे 13 चेक्स मुदतठेवपावत्यांचे बदली दिले व तक्रारदारांनी त्याबाबत कोणतीही तक्रार नसलेचे परंतु चेक न वटलेस पुढील कारवाई करणेचे अधिकार राखून ठेवून चेक स्विकारले असलेचे लिहून दिले आहे. परंतु जाबदार संस्थेने दिलेल्या चेकपैकी दोन चेक्स रु.25,000/-चे सोडून इतर सर्व चेक्स वटलेले आहेत. परंतु रु.25,000/-चे दोनही चेक्स वटले नाहीत. त्यामुळे तक्रारदारानी नि.25/20 कडे दि.5-1-2013 रोजी जाबदार पतसंस्थेस अँड.शिंदे यांचेतर्फे नोटीस पाठवून त्याची कल्पना दिली. परंतु जाबदार पतसंस्थेने त्याला उत्तर दिले नाही वा कारवाई केली नाही. जाबदारानी तक्रारदाराना मुदतठेवपावती पोटी दिलेल्या एकूण 13 चेकपैकी दोन चेक प्रत्येकी रु.25,000/- हे तक्रारदाराना पैसे मिळू नयेत या हेतूनेच दिलेले होते. म्हणूनच जाबदारानी त्यांचे बँक खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक ठेवली नाही. त्यामुळे तक्रारदाराना दोन चेक्सची रक्कम रु.50,000/- मिळू शकले नाहीत. अशा प्रकारे जाबदारानी तक्रारदारांची फसवणूक केली तसेच जाबदारानी तक्रारदाराना रक्कम देणेची टाळाटाळ करुन जाबदारानी सेवेत त्रुटी केली असल्याने सदर कामी मे.मंच या निष्कर्षाप्रत येतो की, जाबदार 1 व 2 हे तक्रारदाराचे पैसे देणे लागतात व त्यांनी त्यांच्या रकमा न देऊन त्यांना दयावयाचे सेवेत त्रुटी केली आहे म्हणूनच जाबदार 1 व 2 हे तक्रारदाराना दिलेल्या न वटता परत आलेल्या चेकच्या रकमांचे देणे देणेस जबाबदार आहेत असे या मंचाचे मत आहे. जाबदार क्र.1 पतसंस्था ही जाबदारांचे देणे देणेस वैयक्तिक व संयुक्तीकरित्या जबाबदार असून जाबदार क्र.2 हे पगारी नोकर असलेने त्यांना फक्त संयुक्तीकरित्या जबाबदार धरीत आहोत. तसेच या सर्व कृतीमुळे तक्रारदारास झालेल्या मानसिक, शारिरीक तसेच खर्चास जाबदारच जबाबदार असल्याचे मंचाचे मत आहे.
7. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत.
-ः आदेश ः-
1. जाबदार क्र.1 यांनी चेक क्र.219558, दि.15-9-2012 ची रक्कम रु.25,000/- वैयक्तिक व संयुक्तीकरित्या व जाबदार क्र.2 यांनी संयुक्तीकरित्या तक्रारदारास अदा करावी तसेच दि.15-9-2012 पासून आदेश पारित तारखेपर्यंत त्यावर द.सा.द.शे.8 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
2. जाबदार क्र.1 यांनी चेक क्र.219559, दि.29-9-2012 या चेकची रक्कम रु.25,000/-वैयक्तिक व संयुक्तीकरित्या व जाबदार क्र.2 यांनी संयुक्तीकरित्या तक्रारदारास अदा करावी तसेच दि.15-9-2012 पासून आदेश पारित तारखेपर्यंत त्यावर द.सा.द.शे.8 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
3. वरील आदेशाचे पालन जाबदार 1 व 2 यानी आदेश पारित तारखेपासून 45 दिवसाचे आत करावे. तसे न केलेस आदेश पारित तारखेपासून होणा-या रकमेवर द.सा.द.शे.10 टक्के व्याज रक्कम हाती पडेपर्यंत अदा करावे लागेल.
4. जाबदार क्र.1 यानी तक्रारदारास वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तसेच जाबदार क्र.2 यांनी संयुक्तीकरित्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.3,000/- अदा करावेत.
5. जाबदारानी विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केलेस तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये दाद मागू शकतील.
6. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
7. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 10-3-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.