( पारीत दिनांक : 07/10/2014)
( मा. प्रभारी अध्यक्ष , श्री मिलींद आर.केदार यांच्या आदेशान्वये)
- तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारकर्ता हा मौजा पारडी, तहसील कारंजा, जि. वर्धा येथील रहिवासी असून शेतकरी आहे व तो शेतीचा व्यवसाय करतो. त्याच्याकडे संयुक्त कुटुंबाची शेती सर्व्हे नं.139, आराजी 2.04 हे.आर. असून त्यांनी पारडी येथील वासुदेव ढबाले यांची 10 एकर शेती सन 2012-13 या हंगामासाठी ठेक्याने घेतल्याची तक्रारीत नमूद केले आहे. त्यांनी पुढे असे ही नमूद केले की, वि.प. श्री. दुर्गा कृषी केंद्र पारडी येथून बी-बियाणे, खते, तसेच फवारणीचे औषध खरेदी केले. त्याकरिता स्टेट बॅंक ऑफ इंडिया सारवाडी या शाखेकडून रु.99,000/-चे कर्ज घेतले व त्यापैकी रु.55,000/-वि.प. यांना दिल्याचे तक्रारीत नमूद केले.
त.क. यांनी शेत सर्व्हे नं. 139 आराजी. 2.04 हे.आर. व ठेक्याचे शेतात 3 एकर असे एकूण 8 एकरमध्ये कपाशीच्या बियाण्यांची लागवड केली होती व बाकी शेतात सोयाबीन, तुरी व ज्वारी पेरली होती असे त.क. चे म्हणणे आहे.
- पिकामध्ये तण वाढत असल्यामुळे वि.प.यांच्याकडून तणनाशक औषध विडलॉक्ड किंमत रु.1700/-चे दि. 1.7.2012 व दि. 4.7.2012 रोजी विकत घेतले. दि. 7.7.2012 रोजी कपाशीवरील तणनाशक सोसायटी Twister Unisa-82 नांवाचे औषध खरेदी केले. त.क.नुसार त्यानी वि.प.यांच्याकडून घेतलेले तणनाशक औषध कपाशीवरील पिकांवर फवारणी केल्यामुळे कपाशीसेाबत तन वाळलेले दिसले. त्यामुळे वि.प. यांच्या म्हणण्यानुसार दि. 12.07.2012 रोजी टॅपींग ग्रो, रॅप-ग्रो, ईसा-ग्रो व युरिया 19.19.19 या औषधीचा फवारा केला होता परंतु काही फायदा झाला नाही. त.क.चे असे ही म्हणणे आहे की, वि.प. यांनी सुचविलेले औषध त्यांनी तणनाशक म्हणून कपाशीवरील पिकांवर फवारणी केली परंतु कपाशीचे पीक जळाले. त्यामुळे त.क.चे नुकसान झाले. म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार वि.प. यांच्या विरुध्द दाखल केली असून तक्रारीत नुकसानभरपाई म्हणून रु.2,20,000/-ची मागणी केली व त्यावर 18%व्याज , शारीरिक, मानसिक त्रासाकरिता 10,000/-रुपये व तक्रारीचा खर्च म्हणून 5000/-रुपयाची मागणी केली आहे.
- सदर तक्रारीला वि.प.यांनी नि.क्रं. 11 वर आपले उत्तर दाखल केले. वि.प. यांनी आपल्या उत्तरात त.क.चे बहुतांश म्हणणे नाकारले असून त.क. यांनी त्यांच्याकडून बी-बियाणे व औषधे खरेदी केली ही बाब कबूल केली आहे. तसेच त्यांनी त.क.यांना कपाशी तणनाशक फवारणीकरिता टयुस्टर युनिसा-82 हे औषध कपाशीतील तनाकरिता लाभकारक असल्याचे सांगितले नव्हते. तसेच विडलॉक हे औषध सुध्दा कपाशीतील तनाकरिता नव्हते व त्याबाबत त्यांनी कधीही तक्रारकर्त्याला सांगितले नाही. सदर दोन्ही औषधी सोयाबीनमध्ये उगविणा-या तणावर मारण्यासाठी असल्याचे त्यांनी आपल्या उत्तरात नमूद केले आहे. दोन्ही तणनाशक औषध ही त.क. यांनी त्यांच्याकडून खरेदी केल्याचे मान्य केले असून इतर सर्व म्हणणे नाकारले आहे.
- सदर प्रकरणामध्ये दाखल केलेले दस्ताऐवज उभय पक्षाचे
कथन, शपथपत्र, युक्तिवाद इत्यादीचे मंचाने अवलोकन केले असता, खालील बाबी व मुद्दे विचारार्थ उपस्थित झाले.
अ.क्रं | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? | होय |
2 | विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय ? | नाही |
3 | अंतिम आदेश काय ? | आदेशानुसार |
कारणे व निष्कर्ष
मुद्दा क्रमांक 1 व 2 चे बाबत- सदर प्रकरणामध्ये तक्रारकर्ता हा शेतकरी आहे, ही बाब दस्ताऐवजावरुन स्पष्ट होते. तसेच त.क. यांनी स्वतःच्या मालकीचे शेत व ठेक्याच्या शेतात कपाशी पेरले होते ही बाब दर्शविण्याकरिता त.क. यांनी 7/12 उतारा दाखल केला आहे. त्यामध्ये सोयाबीनचा उल्लेख असून घटनास्थळ पंचनामा मध्ये कपाशी व सोयाबीन असे नमूद आहे. त.क. यांनी वि.प.यांच्याकडून तणनाशक खरेदी केले होते ते Indofil कंपनीचे Society Selective herbicide तणनाशक होते ही बाब दस्ताऐवजावरुन स्पष्ट होते. त्यामुळे त.क. हा वि.प. यांचा ग्राहक ठरतो .
त.क. यांनी तक्रारीत नमूद केले की, वि.प. यांनी विडलॉक व सोसायटी टयुस्टर युनिसा-82 हे दोन्ही तणनाशक कपाशीमधील तणाकरिता वापरण्या योग्य असल्याचे सांगितले असे म्हटले आहे. या उलट विरुध्द पक्ष यांनी त्यांच्या लेखी उत्तरामध्ये सदर तणनाशक कपाशीकरिता उपयुक्त नाही असे नमूद केले आहे. सदर प्रकरणामध्ये त.क. यांनी त्यांच्या तक्रारी सोबत जोडलेल्या घटनास्थळ पंचनामा मध्ये कृषि अधिकारी यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, सदर दोन्ही तणनाशक हे सोयाबीन व उडद म्हणजेच गवतवर्गीय तणाकरिता तसेच धानाकरिता उपयोगी आहे. त्यामुळे हे दोन्ही तणनाशक कपाशीतील तणाकरिता वापरण्या योग्य नाही. त.क. यांनी या प्रकरणामध्ये सदर तणनाशक हे कपाशीमधील तणाकरिता उपयोगी असल्याचे वि.प.ने सुचविल्याचे सिध्द केले नाही किंवा कोणत्याही पुराव्याद्वारे स्पष्ट केले नाही. त्यामुळे त.क. चे म्हणणे ग्राहय धरता येत नाही. तसेच वि.प. यांनी त.क.ची दिशाभूल केली, सेवेत निष्काळजीपणा केला व दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला असे म्हणता येत नाही.
सदर प्रकरणामध्ये घटनास्थळ पंचनाम्यात कृषि अधिकारी यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे की, दोन्ही तणनाशक हे कोणत्या पिकातील तणाकरिता उपयोगी आहे याचा उल्लेख त्याच्या पॅकिंग पॅकेट व डब्यावर लिहिलेला असतो. त्यामुळे तणनाशकाचा उपयोग करण्यापूर्वी त.क. यांनी ते वाचणे गरजेचे होते. तसे या प्रकरणात त.क. यांनी केले नाही व स्वतःची जबाबदारी दुस-यावर ढकलण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते. प्रस्तुत प्रकरणात वि.प. यांनी त.क. यांना सेवा देण्यात कोणताही निष्काळजीपणा किंवा त्रृटी केल्याचे निष्पन्न होत नसल्यामुळे तक्रारकर्त्याची मागणी अमान्य करण्यात येते व सदर तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
वरील निष्कर्षाच्या आधारे मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
- तक्रारकर्त्यांची तक्रार खारीज करण्यात येते.
- मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात.
- निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाहीकरीता पाठविण्यात याव्यात.