निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री आर. एच. बिलोलीकर, सदस्य )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
- अर्जदार भिकाराम पि. दगडू कल्याणकर रा. शिरड ता. हदगांव जि. नांदेड येथील रहिवाशी असून तो शेतकरी आहे. दिनांक 113/05/22008 रोजी मोटार सायकल क्र. एम.एच.26/एस/558 वर बसून उमरखेडहून शिरड येथे येत असतांना उमरखेड ते नांदेड रोडवर पाठीमागून येणारी ट्रक क्र. एम.एच.26/एच-6854 च्या चालकाने जोराची धडक दिल्यामुळे अपघात होवून गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यास सरकारी दवाखाना नांदेड येथे नंतर डॉ. खुरसाळे हॉस्पीटल नांदेड येथे शरीक केले. सदर अपघातात त्यांच्या एका हाताला कायमचे अपंगत्व आलेले आहे. अर्जदारास त्याच्या उपचारासाठी जवळपास 60 ते 70 हजाराचा खर्च आलेला आहे. पोलीस स्टेशन उमरखेड जि. नांदेड यांनी सदर घटनेबाबत गुन्हा ट्रक चालकाविरुध्द क्र. 104/2008 कलम 279, 337, 338 आयपीसी नुसार नोंदविला. अर्जदाराची मौजे शिरड ता. हदगांव जि. नांदेड येथे गट नं. 25/ए मध्ये 93 आर व गट नं. 26/ए/4/2/1, मध्ये 60 आर एवढी शेतजमीन आहे. अर्जदार हा शेतकरी असल्याने महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी विमा अपघात योजनेचा लाभार्थी आहे. महाराष्ट्र शासनाने काढलेल्या पॉलिसीचा कालावधी दिनांक 15/08/2007 ते 14/08/2008 असा होता. सदरची घटना ही दिनांक 13/05/2008 ची आहे त्यामुळे गैरअर्जदार हे अर्जदारास नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत. दिनांक 13/04/2010 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे रजिस्टर पोस्टाने विम्याचा प्रस्ताव संपूर्ण कागदपत्रासह सत्यप्रतीत पाठवला. अर्जदाराने तलाठी यांना घटनेची माहिती लगेच दिली व अर्जदार हा ग्रामीण भागातील व अडाणी असल्यामुळे त्यास सदर योजनेबद्दल माहिती नसल्यामुळे त्यास गैरअर्जदार यांच्याकडे क्लेम दाखल करण्यास उशीर झाला. अर्जदाराने गैरअर्जदार 1 व 2 यांच्याकडे क्लेम दाखल केल्यानंतर अनेक वेळा रक्कम मिळण्यासाठी विनंती केली परंतू गैरअर्जदाराने टाळाटळ केली. अर्जदाराने दिनांक 23/08/2011 रोजी विकलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवली असता देखील गैरअर्जदाराने विम्याची रक्कम दिली नाही. अर्जदाराने पुन्हा दिनांक 25/02/2013 रोजी तोंडी मागणी केली असता गैरअर्जदाराने रक्कम देण्यास नकार दिला त्यामुळे अर्जदाराने सदरची तक्रार दाखल करुन मंचास विनंती केली आहे की, अर्जदारास रक्कम रु. 50,000/- व त्यावर सन 2008 पासून 12 टक्के व्याजासह गैरअर्जदार यांच्याकडून देण्याबाबत आदेश व्हावा. तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व दावा खर्चाबाबत रक्कम रु. 5,000/- देण्याबाबत आदेश व्हावा.
गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे.
2. अर्जदाराची तक्रार खोटी असल्यामुळे ती नाकारण्यात यावी. अर्जदाराचा दिनांक 13/05/2008 रोजी रस्ता अपघातात झाला हे अर्जदाराने सिध्द करावयाचे आहे. गैरअर्जदार 1 व 2 यांनी अर्जदाराचा प्रस्ताव हा रितसर लगेच तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार यांच्यामार्फत यावयास हवा. गैरअर्जदार 1 व 2 हे अर्जदाराकडून त्याचा क्लेम सरळ स्विकारु शकत नाहीत. अर्जदाराचा विमा दावा हा गैरअर्जदारास प्राप्त झालेला नाही. त्यामुळे गैरअर्जदार हे अर्जदाराच्या विमा दाव्यावर कसलाही विचार करु शकलेले नाही त्यामुळे अर्जदाराची तक्रार ही अपरिपक्व असून गैरअर्जदार हे अर्जदारास काहीही देणे लागत नाही त्यामुळे अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी. गैरअर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, अर्जदार हा दिनांक 13/05/2008 रोजी अपघातात जखमी झाला परंतू अर्जदाराने दिनांक 21/03/2013 रोजी मंचात तक्रार दाखल केलेली आहे जी मुदतबाहय आहे. त्यामुळे अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी. अर्जदाराने तहसीलदार यांच्याकडे जो अर्ज दाखल केलेला आहे त्यासोबत अर्जदाराने अपंगत्वाचे प्रमाणपत्र जोडलेले नाही किंवा अर्जदाराने तक्रारीसोबत दाखल केलेले नाही त्यामुळे गैरअर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराची तक्रार ही रक्कम रु. 10,000/- च्या खर्चासह खारीज करण्यात यावी.
3. अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याचे पुष्टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अर्जदार व गैरअर्जदार यांचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
4. अर्जदार भिकाराम दगडू कल्याणकर हा व्यवसायाने शेतकरी होता हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या 7/12 च्या उता-यावरुन स्पष्ट होते. दिनांक 13/05/2008 रोजी अर्जदार हा रस्ता अपघातात जखमी झालेला होता हे अर्जदाराने दाखल केलेल्या पोलीस कागदपत्रांवरुन स्पष्ट आहे. अर्जदार यांनी दिनांक 15/04/2010 रोजी तहसीलदार हदगांव जि. नांदेड यांच्याकडे नुकसान भरपाई मिळण्याबाबत विमा दावा दाखल केलेला होता. हे अर्जदाराने दाखल केलेल्या सदर क्लेमच्या मुळ प्रतीवरुन स्पष्ट आहे. त्यावर तहसील कार्यालय, हदगांव यांच्या दावा मिळाल्याबद्दलच्या नोंदी आहेत. अर्जदाराने वैदयकीय अधिकारी, एस.जी.जी.एस. मेमोरीयल हॉस्पीटल, नांदेड यांनी दिलेल्या अर्जदाराच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राची प्रत दाखल केलेली आहे. सदर प्रमाणपत्राचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, अर्जदारास 25 टक्के अपंगत्व आलेले आहे. गैरअर्जदार यांनी त्याच्या लेखी जबाबात असे म्हटले आहे की, त्यांना अर्जदाराचा विमा दावा प्राप्त झालेला नाही म्हणून ते त्यावर कोणताही निर्णय घेऊ शकले नाहीत. गैरअर्जदार यांच्या हया म्हणण्यात तथ्य दिसून येते.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत विमा दावा दाखल करावा व गैरअर्जदार यांनी तो मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत त्यावर गुणवत्तेवर नियमानुसार निर्णय घ्यावा.
3. खर्चाबद्दल आदेश नाही.
4. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.