::: निकालपत्र :::
( निकाल तारीख :19/03/2015 )
(घोषित द्वारा: श्री अजय भोसरेकर, मा. सदस्य.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदार हा साकोळ ता. शिरुर अनंतपाळ येथील रहिवाशी असून तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 यांच्याकडून सामनेवाला क्र. 3 ने उत्पादीत केलेला 21 इंची रंगीत टि.व्ही. दि. 08.08.2011 रोजी किंमत रु. 6200/- रोख अदा करुन खरेदी केले, त्याची पावती क्र. 131 असून टि.व्ही. Classic 200 असून मॉडेल क्र. CTVVLS/215 BB व सिरियल क्र. 110611010173608961 असा असून सदर टि.व्ही. ला एक वर्षाची वारंटी दिली होती. दि. 11.08.2011 रोजी तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 यांना टि.व्ही. नीट दिसत नसल्याची तक्रार केली. त्यावर सामनेवाला क्र. 1 यांनी सामनेवाला क्र. 2 यांच्याकडे डिलरशिप असल्यामुळे त्यांच्याकडे तक्रार मांडली, तक्रारदाराने सामनेवाला क्र. 2 यांच्याकडे दि. 11.08.2011 रोजी तक्रार केल्यामुळे दि. 12.08.2011 रोजी सामनेवाला क. 2 यांनी टि.व्ही. दुरुस्ती साठी मेकॅनिक पाठवला. मेकॅनिकने टि.व्ही. दुरुस्तीसाठी 15 दिवस ठेवुन घेतली. त्यावर तक्रारदाराने सामनेवाला क्र. 3 यांचा कस्टमर केअर 18004194040 वर तक्रार करुन सविस्तर घडलेल्या घटनेची माहिती दिली, त्यावर तक्रारदारास कस्टमर केअरने तक्रार नंबर 1612110020 असा देण्यात आला.
तक्रारदारास टि.व्ही. दुरुस्तीपोटी मेकॅनिक लवकर पाठवण्याचे सांगीतले. त्यावर शकील भाई नावाचे इंजिनियर तक्रारदाराकडे टि.व्ही. दुरुस्तीसाठी आले असता, टि.व्ही. तील किट काढून नेली ती आज पावेतो तक्रारदारास बसवुन दिली नाही व टि.व्ही. दुरुस्त करुन दिला नाही . म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे. तक्रारदाराने सामनेवाला यांच्या कडून वैयक्तीक अथवा संयुक्तीक नविन टि.व्ही. दयावा, अथवा रु. 6200/- , 15 टक्के व्याजासह दयावे, तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.5000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 3000/- मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपले तक्रारीचे पुष्टयर्थ शपथपत्र व एकुण 10 कागदपत्रे दाखल केले आहेत.
सामनेवाला क्र.1 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले नाही म्हणुन त्यांचे विरुध्द व सामनेवाला क्र. 2 यांना न्यायमंचाची नोटीस पाठवली असता, ती ‘घेण्यास इन्कार’ म्हणुन नोटीस न्यायमंचास परत आली. म्हणुन त्यांचे विरोधात दिनांक 11.10.2012 रोजी ‘नो से ‘ आदेश करण्यात आला आहे.
सामनेवाला क्र. 3 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून त्यांचे लेखी म्हणणे दि. 11.10.2012 रोजी दाखल झाले आहे. सदर लेखी म्हणण्यावर, प्रतिज्ञापत्रावर सहया न करता दाखल केले असल्यामुळे, व प्रतिज्ञापत्र दाखल न करता सामनेवाला क्र. 3 यांचे लेखी म्हणणे ग्राहक संरक्षण कायदयाच्या नियमानुसार ग्राहय धरता येणार नाही.
तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, सोबतचे कागदपत्र व दिनांक 17.03.2015 रोजी केलेला तोंडी युक्तीवाद याचे बारकाईने अवलोकन केले असता, सामनेवाला यांनी लेखी म्हणणे दाखल न केल्या वरुन व मंचाची नोटीस घेण्यास इन्कार केल्या वरुन
तक्रारदाराची तक्रार योग्य असल्याचे न्यायमंचाचे मत आहे. म्हणुन सामनेवाला क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तीक तक्रारदारास टि.व्ही.संचाची रक्कम रु. 6200/- व त्यावर टि.व्हि. खरेदी तारीख 08.08.2011 पासुन 9 टक्के व्याज, मानसिक व शारिरीक त्रासापोटी 1000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 1000/- गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी प्रत्येकी, देण्याचा आदेश करणे न्यायाचे होईल, असे या न्यायमंचाचे मत आहे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- सामनेवाला क्र. 1 ते 3 यांनी, तक्रारदारास टि.व्ही. संचाची रक्कम रु्. 6200/- (रुपये सहा हजार दोनशे फक्त) टि.व्ही.खरेदी तारीख दि. 08.08.2011 पासुन 9 टक्के व्याजाने, वैयक्तीक अथवा संयुक्तीक आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत दयावेत.
- सामनेवाला क्र. 1 ते 3 यांनी प्रत्येकी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 1000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 1000/- , आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत दयावेत.