ग्राहक तक्रार क्र. 100/2013
अर्ज दाखल तारीख : 11/07/2013
अर्ज निकाल तारीख: 20/11/2014
कालावधी: 01 वर्षे 04 महिने 10 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. उमाबाई आण्णासाहेब भोसले,
वय-50 वर्षे, धंदा – घरकाम,
रा.गावसूद, ता. व जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. मॅनेजर, श्री गणेश कृष्णा जाधव,
वय –सज्ञान, धंदा नोकरी,
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड,
4 था मजला, चिंतामणी अव्हॅन्यु,
वेस्टर्न एक्सप्रेस हायवे,
नेक्स टु विरवणी इंडस्ट्रीयल इस्टेट,
गोरेगांव (पुर्व), मुंबई -400063,
2. तहसिलदार, श्री. सुभाष काकडे,
वय-सज्ञान, धंदा-नोकरी.
तहसिल कार्यालय, उस्मानाबाद.
3. मा. व्यवस्थापक, विनीत आठल्ये,
वय-सज्ञान, धंदा-व्यवस्थापक,
कबाल इन्शुरनस सर्व्हीसेस प्रा. लि.,
शॅप नं.2, दिशा अलंकार, कॅनॉट गार्डन टाऊन सेंटर,
सिडको, औरंगाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.डी.मोरे.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री.ए.व्ही.देशमूख.
विरुध्द पक्षकार क्र.2 तर्फे विधीज्ञ : स्वत:.
विरुध्द पक्षकार क्र.3 तर्फे विधीज्ञ : स्वत:.
निकालपत्र
मा. सदस्या सौ. विद्युलता जे. दलभंजन यांचे व्दारा:
1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
तक्रारदार मौजे गावसुद ता. व जि. उस्मानाबाद येथील रहीवाशी असून तीचे पती नामे आण्णासाहेब जगन्नाथ भोसले, वय 55 वर्षे यांचे नावे मौजे गावसुद, ता. जि. उस्मानाबाद येथे जमीन गट नंबर 30, क्षेत्र 0 हे. 56 आर, आकार रु.2.00 पैसे एवढी जमीन होती व ते शेतकरी होते. दि.20/10/2007 रोजी मयत आण्णासाहेब जगन्नाथ भोसले हे शेतामध्ये काम करीत असतांना सुभाष भोसले, भुजंग भोसले, रविकिरण भोसले, शिवराज भोसले व शिवानंद भोसले यांनी तक्रारदाराच्या पतीच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यांचा पो.स्टे. ग्रामीण उस्मानाबाद येथे गु.रं.क्र.86/2007 कलम 302, 326, 143, 147, 148, 149 भा.दं.वी. अन्वये आरोपी विरुध्द गुन्हा नोंद झाला आहे. तक्रारदाराने दि.15/06/2009 रोजी सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन प्रस्ताव दाखल करुन विमा रक्कमेची मागणी केली. त्यांनतर विप क्र.2 ने सदरचा प्रस्ताव विप क.3 यांच्याकडे पाठविला व विप क्र.3 ने सदरचा प्रस्ताव विप क्र.1 कडे पाठविला. विप क्र.2 यांनी सदर प्रस्तावात त्रुटी असल्याचे कळविले. अर्जदाराने त्रुटीची पूर्तता केली परंतू पुर्तता करुन देखील आजतागायत विप ने अर्जदारास विमा रक्कम दिली नाही.
दि.08/07/2013 रोजी व त्यापुर्वी विप क्र.2 कडे वारंवार विमा प्रस्तावाची चौकशी केली परत विप क्र.1 व 3 यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही म्हणून दि.08/07/2013 रोजी तक्रार दाखल करणे भाग पडले. म्हणून विम्याची रक्कम रु.1,00,000/- दि.15/06/2009 रोजी पासून व्याजासह देण्याचा हुकूम व्हावा अशी विनंती केली आहे.
तक्रारदाराने तक्रारीसोबत विमा क्लेम फॉर्म भाग 2 व 4, सातबारा जमीन गट क्र.30 चे तीन उतारे, गाव नमुना 6 क चे दोन उतारे, फेर नं.550 नक्कल, वारस प्रमाणपत्र, मृत्यूप्रमाणपत्र, FIR, गुर.न.86/07, गु.रु.नं.86/07, घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, ई. कागदपत्रांच्या प्रती दाखल केली आहेत.
2) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार क्र.1 यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी दि.05/12/2014 रोजी आपले म्हणणे दाखल केले ते संक्षीप्त स्वरुपात खालीलप्रमाणे
सदरची तक्रार विमा पॉलीसीच्या करारातील अटी व शर्तीमधील अट क्र. XVII अन्वये जिल्हा नियंत्रण समिती स्थापन करणे आवश्यक आहे. विमा पॉलीसीतील अटी व शर्तीनुसार विमा पॉलीसीबाबत काही तक्रार असल्यास अथवा विमा रक्कम मिळाली नसल्यास तक्रादार यांनी अशी तक्रार जिल्हा नियंत्रण समितीकडे देणे आवश्यक होते. अर्जदाराच्या पतीचे व त्यांचा भाऊ सुभाष जगन्नाथ भोसले यांच्यामध्ये शेतीच्या वाटणीवरुन भांडण चालू होते व अर्जदाराच्या पतीने त्यांच्या भावांचा व पुतण्याचा खुन केल्यामुळे अर्जदाराच्या पतीविरुध्द ग्रामीण पोलीस स्टेशन उस्मानाबाद येथे गु.र.नं.85/2007 कलम 302 भा.दं.वि.प्रमाणे दि.20/10/2007 रोजी नोंद झालेला आहे. सदर भांडणामध्ये अर्जदाराच्या पतीचा खून झाला आहे. त्यामुळे अर्जदार शेतकरी अपघात विमा योजनेनुसार विमा रक्कम मिळण्यास पात्र नाही. सदरचा विमा प्रस्ताव विमा योजनेचा कालावधी संपल्यापासुन 90 दिवसात दाखल केलेला नाही. अर्जदाराने यापूर्वी मे.मंचात ग्रा.त.क्र.2011 उमाबाई भोसले विरुध्द तहसिलदार उस्मानाबाद व आय.सी.आय. दाखल केलेली होती परंतु मे. मंचाने अर्जदाराची तक्रार मुदतीत नसल्यामुळे दि.08/10/2012 रोजी नामंजूर केली होती. सदर विमा विप क्र.2 यांनी विप क्र.1 यांच्याकडे विमा प्रस्ताव सादर केलेला नाही. त्यामुळे सेवेत त्रुटी करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार चूकीची असून खर्चासह नामंजूर करण्यात यावी असे नमूद केले आहे.
3) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार क्र.2 यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी दि.14/08/2013 रोजी आपले म्हणणे दाखल केले ते संक्षीप्त स्वरुपात खालीलप्रमाणे
सदर प्रकरणात जिल्हा कृषि अधिक्षक उस्मानाबाद व व्यवस्थापक कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस प्रा.लि. औरंगाबाद यांच्याकडुन माहीती मागविण्यात आलेली आहे. अद्याप सदर माहीती व कार्यालयास प्राप्त झाली नाही तसेच सदर प्रकरणे ही कृषि कार्यालयाकडे वर्ग झाल्याने सदर प्रकरणातील कसलीही माहीती या कार्यालयात उपलब्ध नाही. तसेच सदर प्रकरण हे सन 2007 चे असल्याने तत्कालीन तहसिलदार यांना पार्टी करणे योग्य राहील. तरी संबंधित प्रकरणातुन मला वैयक्तिकरित्या प्रतीवादी म्हणून वगळण्यात यावे ही नम्र विनंती. असे नमूद केले आहे.
4) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार क्र.3 यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी दि.02/04/2014 रोजी आपले म्हणणे दाखल केले ते संक्षीप्त स्वरुपात खालीलप्रमाणे
आमच्या अशिलास विमा सेवा पुरविणे आणि विमा कंपनी आणि आमचे अशील यांचेत मध्यस्थ म्हणून काम करणे एव्हढेच मर्यादित काम आमची संस्था करते. माझ्या संस्थेने महाराष्ट्र शासनास कोणत्याही प्रकारची फी अथवा आर्थिक मदत मागितलेली नाही, लागू केलेली नाही अथवा स्विकारलेली नाही. म्हणून दाव्यापासून दावेदारास मिळणा-या अथवा न मिळणा-या आर्थिक लाभासाठी माझ्या संस्थेस जबाबदार धरण्यात येवू शकत नाही. त्याचप्रमाणे सदरचा दावा तहसील कार्यालय उस्मानाबाद यांचे मार्फत कार्यालयीन रेकॉर्डवरुन कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्हिस प्रा.लि. औरंगाबाद या कार्यालयास प्राप्त झालेला नाही करीता आम्ही वरील दाव्याबाबात काहीही सांगण्यास असमर्थ आहोत. असे म्हणणे दिले आहे.
5) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, गैरतक्रारदार यांचे म्हणणे, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, उभयतांचा लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित करीत आहोत. त्यांचे निष्कर्ष खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्ये निष्कर्ष
1) अर्जदार यांनी विमा प्रस्ताव विप क्र.2
यांच्याकडे दाखल केलेले आहे का ? नाही.
2) विरुध्द पक्षकारने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे का ? नाही.
3) अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? नाही.
4) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्ष
मुददा क्र.1, 2 व 3
6) अर्जदाराच्या पतीचा त्याच्याच भावाने खून केला व तो मयत झाला. मयत झाला त्यावेळी अर्जदाराचे पती शेतकरी होते. याबाबत अभिलेखावर 7/12 दाखल केलेला आहे. अर्जदार हीने सदर प्रस्ताव दि.15/06/2009 रोजी दाखल केलेला आहे व तिच्या पतीचा मृत्यू दि.20/10/2007 रोजी झालेला आहे. त्यामुळे सदर प्रस्ताव हा दाखल केला हे दाखवणारा कागदोपत्री पुरावा अभिलेखावर नाही.
7) विरुध्द पक्ष क्र.2 व 3 यांनी त्यांच्या लेखी कैफियतीमध्ये प्रस्ताव अप्राप्त आहे असे नमूद केलेले आहे. त्यामुळे अर्जदाराने विप क्र. 2 व 3 यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला हे ग्राहय धरणे अनुचित होईल. त्यामुळे अर्जदाराचे म्हणणे कि विप क्र.1 ने सेवेत त्रुटी केली हे संयुक्तिक वाटत नाही आणि अर्जदाराने विप क्र.2 व विप क्र.3 यांच्याकडे विमा प्रस्ताव दाखल न केल्यामुळे विमा रक्कम मिळविण्यास अपात्र ठरते म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) शासन परिपत्रकानूसार अर्जदार यांनी त्यांच्या मयत पतीच्या पूराव्याकामी प्रथम माहिती अहवालाची (F.I.R) ची प्रमाणित प्रत, शवविच्छेदन अहवालाची प्रमाणीत प्रत, मरणोत्तर पंचनाम्याची प्रमाणीत प्रत, दोषारोप पत्राची प्रमाणित प्रत, पंचनाम्याची प्रमाणीत प्रत, मृत्यू दाखल्याची प्रमाणित प्रत, 7/12 इ. कागदपत्रे कृषी अधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे आदेश दिल्या तारखेपासून 30 दिवसात दाखल करावेत.
2) त्यानंतर कृषी अधिकारी यांनी अर्जदार हीने दाखल केलेल्या प्रमाणित प्रती विप क्र.1 यांना 30 दिवसात पाठवाव्यात व तशी नोंद ठेवावी.
3) विप क्र.1 विमा कंपनीने सदर कागदपत्राच्या प्रमाणित प्रतींची शहानिशा करुन अर्जदार हीस 30 दिवसात देय विमा रक्कम दयावी.
4) सदर प्रकरणात विमा प्रस्तावासाठी अर्जदाराच्या मयत पतीच्या मृत्यूपासून मुदतीची बाधा येणार नाही हे विप यांनी नोंद घ्यावी.
5) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
6) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
7) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,
सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न
केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.