निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री आर. एच. बिलोलीकर, सदस्य )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांनी निकृष्ट दर्जाचे बियाणे पुरविल्याबद्दलची आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
2. अर्जदार संदिप पि. बाबुराव उर्फ गंगाराम क-हाळे (पाटील) हा कामठाळा ता. किनवट जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्याची कामठाळा येथे 2 हे 22 आर जमीन आहे. अर्जदाराने दिनांक 28/02/2013 रोजी गैरअर्जदार 1 यांच्या दुकानातून गैरअर्जदार 2 कंपनीचे रिसर्च तिळ वेस्टर्न-11 या जातीचे तिळाचे बियाणे विकत घेतले. अर्जदार सदर रिसर्च तिळ वेस्टर्न-11 या जातीचे तिळाचे बियाणे 500 ग्रॅम वजनाच्या 6 बॅगा रक्कम रु. 780/- देवून गैरअर्जदार यांच्याकडून विकत घेतले व त्याची रितसर पावती घेतली. अर्जदाराने गैरअर्जदार 1 यांना सांगितल्याप्रमाणे त्याच्या कामठाळा येथील शेतात सदर बियाणे 72 आर जमीनीत पेरले. गैरअर्जदार 1 यांच्या सांगण्याप्रमाणे रासायनिक खते, पेरणी पूर्व व पेरल्यानंतर संपूर्ण काळजी घेतली तसेच तुषार पध्दतीने पाणी दिले. अर्जदाराने सर्व काळजी घेवून सुध्द पेरलेले बियाणे उगवलेले नाही. हया बाबत त्यांनी गैरअर्जदार 1 कडे विचारपूस केली असता गैरअर्जदार 1 यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अर्जदार यांनी दिनांक 20.3.2013 रोजी कृषी अधिकारी पंचायत समिती किनवट यांच्याकडे रिसर्च तिळ वेस्टर्न-11 या गैरअर्जदार 2 कंपनीच्या बियाणाबाबत रितसर तक्रार केली. दिनांक 30/03/2013 रोजी तालुका तक्रार निवारण समिती, तपासणी कृषी अधिकारी व इतर सदस्यांनी अर्जदाराचे शेताची तपासणी करुन अहवाल दिला. अर्जदाराने गैरअर्जदार 2 या कंपनीस सदरचे बियाणे न उगवल्याबाबत फोन करुन तक्रार नोंदविली. त्यानुसार दिनांक 16.4.2013 रोजी गैरअर्जदार 2 वेस्टर्न अॅग्री सिडस लिमिटेड शाखा अकोलाचा अधिकृत कर्मचारी विश्वास आडे हे अर्जदाराच्या शेतात कामठाळा येथे आला व त्यांनी शेताची पाहणी करुन अहवाल दिला. सदर दोन्ही अहवालानुसार अर्जदाराच्या शेतात बियाण्याची उगवण झालेली नाही. अर्जदारास बियाणा व्यतिरिक्त दरमहा 10,000/- रुपये खर्च आला. तसेच रासायनिक खाते व तुषार सिंचनाद्वाने पाणी देण्याकरिता रु.20,000/- खर्च आला. तसेच गैरअर्जदार यांनी सांगितल्याप्रमाणे तिळाचे 8 ते 10 क्विंटल उत्पन्न आले नाही. अशाप्रकारे अर्जदारास किमान दिड लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झालेले आहे. यासर्वासाठी गैरअर्जदार 1 व 2 हे जबाबदार आहेत. गैरअर्जदार 1 व 2 यांनी सदरची आर्थिक नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली म्हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केलेली आहे व मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज मान्य करण्यात यावा व अर्जदारास गैरअर्जदाराकडून नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 1,50,000/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 50,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- देण्याचा आदेश करावा.
3. गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार 1 व 2 यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले.
गैरअर्जदार 1 यांचे लेखी म्हणणे थोडक्यात पुढील प्रमाणे.
4. तक्रारदाराची तक्रार ही बेकायदेशीर असून फेटाळण्या योग्य आहे. गैरअर्जदार हे नामांकित व्यापारी असून सुमारे 30 वर्षापासून व्यवसाय करीत आहेत. ते नांदेड येथील होलसेल दुकानातून नामांकित कंपनीचे बियाणे खरेदी करुन किनवट बाजारात किमशनवर विकताता. अर्जदार हा दिनांक 28.02.2013 रोजी गैरअर्जदार 1 यांच्या दुकानात तिळाचे बियाणे खरेदी करण्यासाठी आला होता. हे अर्जदाराचे म्हणणे बरोबर आहे. गैरअर्जदार 1 यांनी सदरील बियाणाचे 500 ग्राम वजनाचे 6 बॅगा अर्जदारास एकूण 780/- रुपयात विकत दिल्या व त्याबद्दल रितसर पावती दिली. गैरअर्जदार हा घाऊक विक्रेता आहे. तो फक्त बाजारातून होलसेलमध्ये बियाणे खरेदी करुन त्याची किरकोळ विक्री करुन कमीशन घेतो. गैरअर्जदार 2 ही बियाणे तयार करणारी कंपनी आहे त्यामुळे नुकसान भरपाई देण्यास गैरअर्जदार 1 हे बांधील नाहीत. अर्जदाराने बियाणे त्याच्या शेतात पेरल्याबद्दल कोणतीही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. तसेच 7/12 पाहिला असता सन 2012-13 मध्ये 80 गुंठे जमिनीत तिळ पेरला असे दिसत नाही. कृषी अधिकारी यांनी दिनांक 30/03/2013 रोजी दिलेला अहवाल पाहिला असता त्यामध्ये तपासणी समितीचा निष्कर्ष असा आहे की, ‘तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 30/03/2013 रोजी प्रत्यक्ष पाहणी केली असता शेतामध्ये बियाणाची उगवण झाली नाही असे दिसून आले आहे. सदर पंचनाम्यात पंच म्हणून अर्जदाराचा चुलत भाऊ आहे. अर्जदार यांच्या व्यतिरिक्त सदर बियाणाबाबत किनवट तालुक्यातील एकाही शेतक-याची तक्रार प्राप्त झाली नाही. गैरअर्जदाराने अर्जदाराच्या गावातील ब-याचजणांना सदर बियाणे विकलेले आहे. गैरअर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराची तक्रार 25,000/- रुपयाच्या दंडासहीत गैरअर्जदार 1 विरुध्द खारीज करण्यात यावी.
गैरअर्जदार 2 यांचे लेखी म्हणणे थोडक्यात पुढील प्रमाणे.
5. अर्जदाराची तक्रार ही कल्पीत कथनावर आधारीत असल्यामुळे ती बेकायदेशीर असून फेटाळण्यायोग्य आहे. गैरअर्जदार कंपनी ही एक मान्यताप्राप्त कंपनी असून गेल्या अनेक वर्षापासून बियाणे उत्पादन व विक्री क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करीत आहे. सदर कंपनी ही I S O प्रमाणित व केंद्रशासन यांच्याकडून मान्यता प्राप्त कंपनी आहे. बियाणे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यापूर्वी गैरअर्जदार यांच्या प्रयोगशाळेमध्ये सर्वप्रकारच्या तपासण्या केल्या जातात. कंपनीचे तिळ वेस्टर्न 11 चे लॉट क्र. 26 चे बियाणे बियाण्याच्या सर्व चाचण्या घेतल्यानंतर मा. सहाय्यक संचालक (कृषी) गुजरात राज्य यांच्याकडे पाठवून त्याची चाचणी झाल्यानंतर बियाणे विक्रीसाठी प्रमाणित झाल्यानंतर बाजारात पाठविले. तसेच महाराष्ट्र शासनाचा परवाना मिळाल्यानंतरच सदर बियाणे महाराष्ट्रात विक्रीसाठी उपलब्ध केले. भौतिक शुध्दतेविषयी प्रयोगशाळेत व शेतातही चाचण्या घेतल्या जातात. म्हणून बियाणे चांगले असते तरी बियाणाची उगवण होण्याबाबत इतर अनेक गोष्टी परिणाम करतात. जसे जमिनीचा पोत, गुणवत्ता, प्रकार, हवामान व वातावरणातील आर्द्रता, पिकास पाणी देण्याची पध्दत, तापमान, खाते व औषधाचा वापर, पेरणी व पेरणीपूर्वी केलेली मशागत इत्यादी. म्हणून पिकाची उगवण झाली नाही त्याबद्दल फक्त बियाणे सदोष आहे असे म्हणून शेतक-याने स्वतःची जबाबदारी झटकता येणार नाही. या सर्व कारणामुळे सदरची तक्रार फेटाळण्या योग्य आहे. दिनांक 30/03/2013 रोजी अर्जदाराच्या शेताची तपासणी करीत असतांना गैरअर्जदार 2 यांनी अर्जदाराने काहीही माहिती दिली नाही. सदर समितीची पाहणी गैरअर्जदार 2 यांच्या अपरोक्ष झाली म्हणून सदरचा अहवाल गैरअर्जदार 2 यांना अमान्य आहे. गैरअर्जदार 2 यांनी अर्जदाराचे बहुतांश म्हणणे अमान्य केलेले आहे व मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
6. अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केली आहेत. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात.
7. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या बियाण्याच्या खरेदीच्या पावतीवरुन स्पष्ट आहे. सदर पावतीचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून वेस्टर्न-11 हे वेस्टर्न कंपनीने उत्पादित केलेले तिळाचे बियाणे 500 ग्राम वजनाचे सहा पाकीट 780/- रुपयास विकत घेतलेले होते. सदर बियाणाचा लॉट क्र. 26 असा आहे. अर्जदाराने सदर बियाणे पेरल्यानंतर त्याची उगवण झाली नाही म्हणून अर्जदाराने कृषि अधिकारी किनवट यांच्याकडे दिनांक 20.3.2013 रोजी तक्रार दिलेली आहे. सदर तक्रारीची प्रत अर्जदाराने मंचात दाखल केलेली आहे. सदर तक्रारीची दखल घेवून तपासणी समितीने दिनांक 30.3.2013 रोजी अर्जदार संदीप बाबुराव क-हाळे यांच्या शेतात जावून तपासणी करुन तपसणी अहवाल दिलेला आहे. सदर तपासणी अहवालाची प्रत अर्जदाराने मंचात दाखल केलेली आहे. सदर तपासणी अहवालाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, अर्जदाराच्या शेतात पेरलेले बियाणे उगवलेले नाही. तसा निष्कर्ष समितीने तपासणी अहवालात नमूद केलेला आहे. अर्जदाराच्या शेतात पेरलेले वेस्टर्न कंपनीचे बियाणे उगवले नसल्यामुळे शेतक-यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. गैरअर्जदार क्र. 2 यांनी उत्पादन केलेले तिळाचे बियाणे उगवले नसल्याने गैरअर्जदार हे अर्जदारास नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत परंतू अर्जदाराने त्याचे किती नुकसान झाले या बद्दल काहीही पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. गैरअर्जदार यांनी मंचासमोर दाखल केलेल्या लेखी म्हणण्यात अर्जदाराने तिळ पेरले आहे याचा पुरावा दिलेला नाही, पंचनाम्यावर सिल नाही, असे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, जे की, विचार करण्या योग्य नाहीत, असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदाराने सदर नुकसानीची भरपाई केलेली नाही त्यामुळे अर्जदारास मानसिक त्रास झालेला आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास बियाणे विकलेले आहे. अर्जदाराने त्यांच्याकडे बियाण्याबाबत तक्रार केली असता त्याची दखल घेऊन उत्पादक कंपनीस ते कळवणे गरजेचे होते व उत्पादकाकडून अर्जदारास नुकसान भरपाई मिळण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे होते. गैरअर्जदार क्र. 1 यांनी तसे केलेले दिसून येत नाही. तसे करुन गैरअर्जदार 1 यांनी अर्जदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास त्याच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून रु.15,000/- दयावे तसेच बियाणाची किंमत रु.780/- आदेश तारखेपासून 30 दिवसाच्या आत दयावेत.
3. गैरअर्जदार 1 व 2 यांनी वैयक्तीक आणि संयुक्तीकरित्या अर्जदारास मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व दावा खर्चापोटी रु.2,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल
करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.