नि.35 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर तक्रार क्रमांक : 07/2010 तक्रार दाखल झाल्याचा दि.30/01/2010 तक्रार निकाली झाल्याचा दि.01/07/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या श्री.मनोज मधुकर जागुष्टे रा.मु.पो.साडवली, ता.संगमेश्वर, जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कं.लि., करीता व्यवस्थापक गणेश पाटील शिर्के प्लाझा, पहिला मजला, शिर्के पेट्रोल पंपाजवळ, जयस्तंभ, रत्नागिरी. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.पेडणेकर सामनेवालेतर्फे : विधिज्ञ श्री.जायगडे -: नि का ल प त्र :- द्वारा : मा.अध्यक्ष, श्री.अनिल गोडसे 1. तक्रारदार यांनी सदरची तक्रार त्यांच्या वाहन कर्जाबाबत सामनेवाला यांनी दिलेल्या दोषपूर्ण सेवेबाबत दाखल केली आहे. 2. सदर तक्रारीचा थोडक्यात तपशिल खालीलप्रमाणे – तक्रारदार यास भारती साळवी यांच्याकडून ट्रक खरेदी करावयाचा असल्याने कर्ज रकमेची आवश्यकता होती. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून रक्कम रु.1,70,000/- इतके कर्ज घेतले. सदरचे कर्ज हे सामनेवाला यांनी डिसेंबर 2005 मध्ये अदा केले. तक्रारदार हा नियमीतपणे कर्जाची परतफेड करीत असताना सन 2005 ते 16/11/2009 पर्यंत तक्रारदार यांनी कर्ज रकमेपोटी रु.2,64,000/- सामनेवाला यांच्याकडे भरणा केलेले आहेत. असे असताना सामनेवाला यांनी तक्रारदारकडून अवास्तव अशी रक्कम मुद्दल व व्याजापोटी जमा करुन घेतली. वास्तविक सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे कर्ज खाते पूर्णफेड करुन बंद करणे गरजेचे होते तथापी सामनेवाला यांनी वारंवार तक्रारदार यास नोटीस पाठविल्या. सदर नोटीसीस अनुसरुन दि.16/11/2009 रोजी तक्रारदार यांनी रक्कम रु.12,000/- चा हप्ता भरला व त्याचदिवशी कर्ज खात्याच्या परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी खातेउता-याची मागणी केली असता सामनेवाला यांनी पुढील आठवडयात या असे सांगितले. दि.24/11/2009 रोजी तक्रारदार यांनी कार्यालयात संपर्क साधला असता सामनेवाला यांनी तुमची थकित रक्कम रु.46,000/- येणे आहे, ताबडतोब भरणा करा. तेव्हा तक्रारदार यांनी मी आतापर्यंत रु.2,64,000/- जमा केले, तुम्ही माझे कर्ज खाते बंद का केले नाही असे विचारले असता सामनेवाला यांनी Full & final settlement करायची असेल तर व कर्ज खाते Nil करायचे असेल तर रु.1,20,000/- चा भरणा करावा लागेल असे सांगितले, अवास्तव रकमेची मागणी केली. त्यानंतर सामनेवाला यांनी तक्रारदारास नाहक त्रास देण्याच्या हेतून फोन करुन हप्ता भरा, नाहीतर गाडी ओढून घेवून जातो अशी धमकी देणे सुरु केले. त्यानंतर सामनेवाला यांनी तक्रारदार यास दि.31/12/2009 रोजी थकित रक्कम रु.37,832/- ताबडतोब भरणा करण्याबाबत कळविले व तसे न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली. वास्तविक तक्रारदार व सामनेवाला यांच्यात झालेल्या करारानुसार तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे रक्कम रु.15,575/- जादा भरले आहेत त्यामुळे सदरची जादा भरलेली रक्कम परत मिळण्यासाठी, शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळण्यासाठी तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रार अर्जाच्या पृष्ठयर्थ नि.2 ला शपथपत्र व नि.5 चे यादीने एकूण 33 कागद दाखल केले आहेत. 3. तक्रारदार यांनी नि.6 वर तक्रारदार यांचे वाहन जप्त करु नये असे तूर्तातूर्त मागणीचा अर्ज सादर केला. सदरचे अर्जावर तक्रारदाराचे वाहन पुढील आदेश होईपर्यंत जप्त करु नये अशी तूर्तातूर्त ताकीद देण्यात आली. सामनेवाला यांनी याकामी हजर होवून नि.14 वर तूर्तातूर्त ताकीदीच्या अर्जाबाबत म्हणणे सादर केले व सामनेवाला हे तक्रारदाराचे वाहन जप्त करणार नाहीत त्यामुळे तक्रारदारांचे विनंती मंजूर करण्यास हरकत नाही असे म्हणणे सादर केले. 4. सामनेवाला यांनी नि.22 वर मूळ अर्जाबाबत म्हणणे सादर केले असून त्यामध्ये त्यांनी तक्रारदाराच्या तक्रार अर्जातील मजकूर नाकारलेला आहे. सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यातील परिच्छेद 8 मध्ये तक्रारदार यांना रु.1,70,000/- चे कर्ज मंजूर करण्यात आले होते. सदर कर्जावर फायनान्स चार्जेस म्हणून 35 महिन्याचे 11.52% व्याज दराने रु.57,120/- व इन्शुरन्स डिपॉझिट म्हणून रु.17,993/- अशी एकूण रक्कम रु.2,45,113/- ही रक्कम तक्रारदार यांनी करार तारखेपासून म्हणजे दि.29/10/2005 पासून 35 मासिक हप्त्यांमध्ये फेडावयाची होती. सदरचे हप्ते हे रु.10,823/- चे 11 हप्ते, रु.8,070/- चे 12 हप्ते, रु.2,435/- चे 12 हप्ते याप्रमाणे फेडायचे होते. तक्रारदार यांनी दि.28/02/2007 पर्यंत केवळ रु.1,05,000/- सामनेवाला यांच्याकडे जमा केले. वास्तविक तक्रारदार यांनी रु.1,59,403/- जमा करणे गरजेचे होते त्यामुळे दि.28/02/2007 पर्यंत तक्रारदार यांच्याकडून रक्कम रु.54,403/- येणे बाकी होते. त्यामुळे सदरचे थकित कर्ज रक्कम भरुन कर्ज खाते रेग्युलर करण्याकरीता फेब्रुवारी 2007 मध्ये सामनेवाला यांचे वसूली अधिकारी यांनी कळविले होते तेव्हा तक्रारदार यांनी सदरची थकित रक्कम एकाचवेळी फेडणे अशक्य झाल्याने सदरचे कर्ज खाते Renew करुन द्यावे अशी मागणी केल्याने तक्रारदार यांना रक्कम रु.1,30,000/- चे नविन कर्ज देण्यात आले व दि.28/02/2007 रोजी नविन कर्ज करार करणेत आला. सदर नविन कर्ज कराराप्रमाणे मूळ कर्ज रक्कम रु.1,30,000/- व त्यावर 14.57% व्याज दराने 35 महिन्यांचे व्याज रु.56,823/- अधिक इन्शुरन्स डिपॉझिट रु.20,000/- अशी एकूण रक्कम रु.2,06,823/- एवढी रक्कम तक्रारदार यांनी दरमहा रु.5,909/- चे 34 हप्ते व रु.5,917/- चा एक हप्ता अशा एकूण 35 हप्त्यांमध्ये फेडावयाची होती. तक्रारदार यांनी नविन कराराप्रमाणे संपूर्ण रक्कम अदा केलेली नाही. तक्रारदार हा Willful Defaulter आहे. तक्रारदाराकडून अद्यापही रु.47,803/- अधिक व्याज व अन्य चार्जेस येणे बाकी आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता तक्रारदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा. सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.23 ला शपथपत्र व नि.25 चे यादीने कर्ज खात्याचे उतारे दाखल केले आहेत. 5. तक्रारदार यांनी नि.27 ला आपले शपथपत्राच्या स्वरुपात प्रतिउत्तर दाखल केले आहे व त्यामध्ये त्यांनी सामनेवाला यांच्या म्हणण्यातील मजकूर नाकारलेला आहे. तक्रारदार यांनी कराराचे नियम व अटीनुसार रु.2,45,113/- कर्ज फेड करण्याचे मान्य केले होते असे नमूद केले आहे व कर्ज घेताना एकदाच सहया केल्या होत्या. सामनेवाला यांनी सदर सहयांचा वापर दुसरा करार केल्याचा भासविण्यासाठी केलेला आहे असे तक्रारदार यांनी आपल्या प्रतिउत्तरामध्ये नमूद केले आहे. 6. तक्रारदारतर्फे नि.30 ला लेखी युक्तिवाद दाखल करण्यात आला. सामनेवालातर्फे नि.32 वर लेखी युक्तिवाद दाखल करण्यात आला. सामनेवाला यांनी लेखी युक्तिवादासोबत नि.33 च्या यादीने कराराच्या सत्यप्रती दाखल केल्या आहेत. तक्रारदारतर्फे विधिज्ञांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्यात आला. सामनेवाला अथवा त्यांचे विधिज्ञ हे युक्तिवादाचेवेळेस गैरहजर राहिले. 7. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाला यांनी दिलेले म्हणणे, शपथपत्र, सामनेवाला यांनी दाखल केलेली कागदपत्रे, प्रतिउत्तर, दोन्ही बाजूंनी दाखल लेखी युक्तिवाद व तक्रारदार यांचा ऐकलेला तोंडी युक्तिवाद यावरुन खालील मुद्दे मंचाच्या निष्कर्षासाठी उपस्थित होतात. अ.क्र. | मुद्दे | उत्तरे | 1. | सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब करुन तक्रारदार यास सदोष सेवा दिली आहे काय ? | होय. | 2. | तक्रारदार मागणीप्रमाणे अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? | अंशतः मंजूर. | 3. | काय आदेश ? | अंतिम आदेशाप्रमाणे. |
विवेचन 8. मुद्दा क्र.1- तक्रारदार यांनी गाडी खरेदी करणेकरीता सामनेवाला यांचेकडून रु.1,70,000/- चे कर्ज घेतले होते ही गोष्ट उभयपक्षी मान्य आहे. सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये सदर कर्जाची परतफेड ही 35 हप्त्यांमध्ये करण्याची होती असे नमूद केले आहे. सदर कर्जावर 11.52% व्याजदराने रक्कम रु.57,120/- इतके व्याज आकारण करुन त्यामध्ये इन्शुरन्स डिपॉझिट म्हणून रक्कम रु.17,993/- जमा दाखविले आहेत व सर्व रकमेची एकूण मिळून रु.2,45,113/- इतक्या रकमेची परतफेड तक्रारदार यांनी 35 महिन्यांमध्ये करावयाची आहे असे सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. सामनेवाला यांनी याकामी नि.33/1 वर दि.29/10/2005 रोजीच्या कराराची सत्यप्रत दाखल केली आहे. सदर कराराला परिशिष्ट 1, 2 व 3 जोडण्यात आलेले आहे. सदर परिशिष्टावर कोणतीही तारीख नमूद नाही. सदर कराराचे अवलोकन केले असता करारातील कलम 1.4 नुसार कर्जाची परतफेड ही समान मासिक हप्त्यांमध्ये करावयाची आहे असे नमूद केले आहे. परंतु तक्रारदारांना देण्यात आलेले हप्ते हे सुरुवातीस रु.10,823/- चे 11, रु.8,070/- चे 12, रु.2,435/- चे 12 असे नमूद आहेत. सदर करारामध्ये इन्शुरन्स डिपॉझिट म्हणून रक्कम रु.17,993/- घेण्यात आली असे कोठेही नमूद नाही. सदरची रक्कम कशासाठी घेण्यात आली याचा कोणताही खुलासा सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यात नमूद केला नाही. तसेच सामनेवाला अथवा त्यांचे विधिज्ञ तोंडी युक्तिवादाचेवेळेस उपस्थित राहिले नाहीत. मूळ करारामध्ये कर्जाची फेड 35 मासिक समान हप्त्यांमध्ये करावयाची असे नमूद असताना परिशिष्टामध्ये नमूद करण्यात आलेले हप्ते हे वेगवेगळे दिसून येतात त्यामुळे सामनेवाला यांच्या करारामध्ये विसंगती दिसून येते. तसेच इन्शुरन्स डिपॉझिटची रक्कम जमा करुन कशासाठी घेतली याबाबतचाही खुलासा सामनेवाला यांनी केला नाही त्यामुळे सदर रकमेबाबत साशंकता निर्माण होते. 9. सामनेवाला यांनी दि.28/02/2007 पर्यंत हप्ते जमा केल्यावर दि.28/02/2007 रोजी म्हणजे करार झाल्यापासून 16 महिन्यांतच सदर कर्ज प्रकरण Renew केले असल्याचे सामनेवाला यांनी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. सदर कर्ज प्रकरण Renew करतानाही तक्रारदाराचे उर्वरीत व्याजासह रक्कम व सदर व्याजासहीत रकमेवर परत आणखी 15% व्याजाने तीन वर्षांची व्याज आकारणी करुन तक्रारदारास परत 35 महिन्यांचे हप्ते देण्यात आले असे सामनेवाला यांनी नमूद केले आहे. सदर दि.28/02/2007 रोजीचा करार सामनेवाला यांनी नि.33/2 वर दाखल केला आहे. तक्रारदार यांनी सदर कर्जाची Renew करण्याची मागणी केली नव्हती. आपण कर्ज घेताना फक्त एकदाच सहया केल्या असे आपल्या प्रतिउत्तरामध्ये नमूद केले आहे. सदरच्या नि.33/2 वरील दि.28/02/2007 रोजीच्या कराराचे अवलोकन केले असता सदरच्या करारावर कराराचे ठिकाण मुंबई दर्शविण्यात आले आहे व मूळच्या दि.29/10/2005 रोजीचे कराराचे ठिकाण रत्नागिरी दर्शविण्यात आले आहे. तसेच दि.28/02/2007 च्या कराराचे अवलोकन केले असता पहिल्या पानावर LOAN CUM HYPOTHICATION AGREEMENT असे नमूद आहे. त्याच्या वरती HDFC Bank Ltd., Ratnagiri असा शिक्का असल्याचे दिसून येते. त्याबाबतचा कोणताही खुलासा होत नाही व तसा खुलासा करण्यास सामनेवाले याकामी उपस्थित राहिलेले नाहीत त्यामुळे एकूण संपूर्ण कराराबाबतच साशंकता निर्माण होते. सदर दुसरा करार करतानाही सामनेवाला यांनी इन्शुरन्स डिपॉझिट म्हणून रक्कम रु.20,000/- ची आकारणी केली असल्याचे आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे परंतु तसे सदर करारामध्ये कोठेही नमूद नाही. सामनेवाला यांनी तक्रारदार यास समान हप्ते दिलेले नाहीत, सुरुवातीचे हप्ते जास्तीचे दिले आहेत व सदरच्या हप्त्यांप्रमाणे रक्कम थकित झाली म्हणून सदरचे कर्ज Renew करण्याचा प्रयत्न केला आहे. सदरच्या नविन कराराबाबत साशंकता निर्माण होते. आकारण्यात आलेल्या इन्शुरन्सच्या डिपॉझिटच्या रकमेबाबत कोणताही खुलासा नाही. सदरची रक्कम ही दोनदा आकारण्यात आलेली दिसून येते. या सर्व बाबींचा विचार करता सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब करुन तक्रारदार यास सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे. 10. मुद्दा क्र.2- तक्रारदार यांनी सदरकामी जादा भरलेली रक्कम रु.15,575/- ही परत मिळावी व रक्कम रु.10,000/- शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रु.5,000/- मिळावेत अशी मागणी केलेली आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे दि.16/11/2009 पर्यंत रु.2,64,000/- जमा केले आहेत. सामनेवाला यांनी मूळच्या कराराप्रमाणे इन्शुरन्सच्या डिपॉझिटसह तक्रारदार यांनी रु.2,45,113/- भरावयाचे होते असे नमूद केले आहे. तक्रारदार यांनी दि.29/10/2005 रोजी करार केला. सदर कराराप्रमाणे व्याजाचा दर 11.52% गृहीत धरला तरी दि.29/10/2005 ते दि.29/10/2009 असे चार वर्षांचे रु.1,70,000/- वर रु.78,336/- इतके व्याज होते व मूळ मुद्दल रु.1,70,000/- असे मिळून रक्कम रु.2,48,336/- होतात. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे रक्कम रु.2,64,000/- जमा केले आहेत. म्हणजेच रु.15,664/- सामनेवाला यांच्याकडे जादा जमा केले आहेत. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांच्याकडे जादा जमा केलेली रक्कम मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. तसेच सदर वाहनाच्या करारापोटी तक्रारदाराकडून कोणतीही रक्कम न आकारता नो-डयूज सर्टिफिकेट तक्रारदार यास देण्याबाबत आदेश करणे योग्य होईल असे मंचाचे मत आहे. 11. तक्रारदार यांनी शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाच्या खर्चाची मागणी केली आहे. सामनेवाला यांनी अवलंबिलेली अनुचित व्यापारी पध्दती विचारात घेता तक्रारदार यांना निश्चितच शारिरिक, मानसिक त्रासास सामोरे जावे लागले व सदरचा तक्रार अर्ज या मंचात दाखल करावा लागला त्यामुळे तक्रारदारास शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च देण्याबाबत आदेश करणे योग्य ठरेल असेही या मंचाचे मत आहे. वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2. तक्रारदार यांच्याकडून जादा घेण्यात आलेली रक्कम रु.15,664/- तक्रारदार यांना त्वरित परत करुन सदर वाहनाच्या कर्ज प्रकरणापोटी तक्रारदार यांना नो-डयूज सर्टिफिकेट अदा करावे असा सामनेवाला यांना आदेश करण्यात येतो. 3. तक्रारदार यांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.5,000/- अदा करावेत असा सामनेवाला यांना आदेश करण्यात येतो. 4. वर नमूद आदेशाची पूर्तता सामनेवाला यांनी दि.01/08/2010 पर्यंत करण्याची आहे. सामनेवाला यांनी विहीत मुदतीत आदेशाची पूर्तता न केल्यास वर नमूद दोन्ही रकमेंवर सामनेवाला यांना तक्रार अर्ज दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत संपूर्ण रकमेवर द.सा.द.शे.12% दराने व्याज अदा करावे लागेल. 5. सामनेवाला यांनी आदेशाची पूर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील. रत्नागिरी दिनांक : 01/07/2010. (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने |