नि.59 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर तक्रार क्रमांक : 155/2009 तक्रार दाखल झाल्याचा दि.04/12/2009 तक्रार निकाली झाल्याचा दि.04/08/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या साईप्रसाद नंदकुमार तांबट रा.मु.पो.ता.लांजा, जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द 1. व्यवस्थापक ग्राहक सेवा क्रेडीट कार्ड विभाग एच.डी.एफ.सी.बँक पोस्ट बॉक्स नं.8654 Thiruvamniyur चेन्नई – 600 041. 2. शाखा व्यवस्थापक एच.डी.एफ.सी.बँक आरोग्य मंदिर जवळ, मु.पो.ता.रत्नागिरी. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.देसाई सामनेवाले क्र.1 : स्वतः सामनेवाले क्र.2 तर्फे : विधिज्ञ श्री.फणसेकर -: नि का ल प त्र :- द्वारा : मा.सदस्या, श्रीमती स्मिता देसाई 1. तक्रारदार यांच्या पत्नीचा अपघाती मृत्यु झाल्यानंतर सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या पत्नीच्या बचत खात्यातील रक्कम तक्रारदार यांना परत दिली नाही तसेच गोल्ड कार्ड संदर्भात देण्यात येणारी नुकसानभरपाई तक्रारदार यांना दिली नाही म्हणून सामनेवाला यांच्या या सदोष सेवेबाबत तक्रारदार यांनी मंचामध्ये तक्रार दाखल केलेली आहे. 2. तक्रारदार यांच्या तक्रारीप्रमाणे तक्रारदार याच्या पत्नी कै.गौरी तांबट यांनी सामनेवाला यांचेकडे बचत खाते उघडले होते. सामनेवाला यांचेकडून तक्रारदार यांच्या पत्नी यांना मास्टर कार्ड, क्रेडीट कार्ड व गोल्ड कार्ड या सुविधा देण्यात आल्या होत्या. दि.09/03/2008 रोजी तक्रारदार यांच्या पत्नीचा अपघाती मृत्यु झाला. सदर अपघाताची माहिती तक्रारदार यांनी सामनेवाला यांना कळविली व विमा नुकसानभरपाईची मागणी केली व त्या संदर्भात आवश्यक कागदपत्रे सामनेवाला यांचेकडे पाठविली. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या मागणीची दखल घेतली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी दि.15/06/2009 रोजी सामनेवाला यांना नोटीस पाठविली परंतु सामनेवाला क्र.1 यांनी दि.07/07/2009 रोजी तक्रारदार यांच्या नोटीसीतील क्र.1 ची नुकसानभरपाईची मागणी नाकारली व पुढील कार्यवाहीचे आश्वासन दिले. परंतु त्यानंतर सामनेवाला यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही म्हणून तक्रारदार यांनी पुन्हा दि.22/09/2009 रोजी सामनेवाला यांना नोटीस पाठविली परंतु तरीही सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या मागणीची दखल घेतली नाही व सदोष सेवा दिली म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार सामनेवालाविरुध्द दाखल केलेली आहे. तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जातील मागणीमध्ये तक्रारदार यांच्या पत्नी कै.गौरी तांबट यांची सामनेवाला यांच्या बँकेतील बचत खात्यात असलेली रक्कम व्याजासह तक्रारदार यांना अदा करणेबाबत सामनेवाला यांना आदेश करण्यात यावा तसेच तक्रारदार यांना सामनेवाला यांच्या बँकचे नियमानुसार गोल्ड कार्ड व क्रेडीट कार्ड धारक म्हणून विमा रक्कम रु.5,00,000/- त्यावर अर्ज तारखेपासून द.सा.द.शे.18% व्याजासह अदा करणेबाबत सामनेवाला यांना आदेश करण्यात यावा व तक्रारदार यांना झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासापोटी सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.15,000/- व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.5,000/- सामनेवाला यांचेकडून वसूल होऊन मिळावी अशी मंचासमोर विनंती केलेली आहे. तक्रारदार यांनी आपल्या नि.1 वरील तक्रार अर्जाच्या पृष्ठयर्थ नि.2 वर शपथपत्र, नि.4 वरील कागदपत्रांच्या यादी अन्वये नि.4/1 ते नि.4/6 वर कागदपत्रे दाखल केलेली आहेत. 3. सामनेवाला क्र.1 यांनी सदर तक्रार अर्जाच्या कामी हजर होऊनही आपले म्हणणे मांडले नाही म्हणून त्यांच्या विरुध्द म्हणणे नाही असा हुकूम दि.11/03/2010 रोजी नि.1 वर करण्यात आला. तथापी सामनेवाला क्र.1 यांनी नि.32 च्या अर्जान्वये नि.1 वरील दि.11/03/2010 रोजीचा आदेश रद्द करण्यात यावा म्हणून मंचासमोर विनंती केली व त्या अर्जाच्या पृष्ठयर्थ नि.33 वर शपथपत्र दिले. सामनेवाला यांचा नि.32 वरील अर्ज रक्कम रु.700/- खर्च म्हणून तक्रारदार यांना सामनेवाला यांनी देण्याच्या अटीवर दि.07/04/2010 रोजी मंजूर करण्यात आला. 4. सामनेवाला क्र.1 यांनी नि.34 वर आपले म्हणणे सादर केलेले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांच्या तक्रार अर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. तक्रारदार यांच्या पत्नी यांना सामनेवाला यांनी कार्डची सेवा पुरविलेली होती हे सामनेवाला यांनी मान्य केलेले आहे. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे कार्ड मेंबर ऍग्रीमेंटच्या अटी व शर्ती उभय पक्षकारांवर बंधनकारक आहेत. तक्रारदार यांच्या पत्नी यांनी सामनेवाला यांनी दिलेल्या कार्डचा एकदाही वापर केलेला नाही त्यामुळे तक्रारदार यांना विम्याच्या सुविधेपासून वंचित रहावे लागले आहे व याबाबत सामनेवाला यांनी तक्रारदार यांना कळविलेले होते. तक्रारदार यांच्या पत्नी यांनी कार्डची सुविधा घेताना कार्ड मेंबर ऍग्रीमेंटवर सही केली होती. सदर कराराच्या नियमामध्ये विम्याची सुविधा कार्डचा वापर केल्यानंतरच उपलब्ध होते व त्याबाबत वाद निर्माण झाला तर तो विमा कंपनीपुढे मांडायचा आहे व सामनेवाला यांची बँक सदर वादासंदर्भात जबाबदार नाही असे नमूद आहे असे सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यामध्ये कथन केले आहे. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिलेली नाही. शेवटी तक्रारदार यांची तक्रार खोटी व खोडसाळ असल्यामुळे तक्रारदार यांचा तक्रार अर्ज रद्द करण्यात यावा अशी मंचासमोर विनंती केलेली आहे. सामनेवाला क्र.1 यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.35 वर शपथपत्र, नि.36 च्या अर्जान्वये नि.36/1 वर कागदपत्र, नि.52 अन्वये तक्रारदार यांच्या पत्नीच्या क्रेडीट कार्ड खात्यासंदर्भातील माहिती दाखल केलेली आहे. 5. सामनेवाला क्र.2 यांनी नि.16 वर आपले म्हणणे दाखल केलेले आहे. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज खोटा व खोडसाळ असल्याने नाकारण्यात यावा असे कथन केले आहे. क्रेडीट कार्ड संदर्भातील सर्व निर्णय सामनेवाला क्र.1 घेतात त्याच्याशी सामनेवाला क्र.2 यांचा संबंध येत नाही व तक्रारदार यांच्या पत्नीच्या क्रेडीट कार्ड धारण करावयाच्या प्रस्तावाप्रमाणे सामनेवाला क्र.2 यांनी सदर प्रस्ताव सामनेवाला क्र.1 यांचेकडे पाठविला होता. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांचे पत्नीस नियोजीत अटी व शर्ती यांचे आधारावर / निकषावर सदर क्रेडिट कार्ड त्यांचे वापराचे अटी व शर्ती सूचना त्यावरील विशिष्ट सेवा त्यांचे अटी व शर्ती यांचे माहितीपत्रकासह दिलेले होते असे सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांचे बँकेमध्ये येवून विमा रकमेची व बँकेच्या अकाऊंटमधील शिल्लक रकमेची चौकशी केली होती हे सामनेवाला क्र.2 यांनी मान्य केले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांना शिल्लक रकमेची माहिती दिली होती व विमा रकमेच्या प्राप्तीसाठी सामनेवाला क्र.1 यांचेशी संपर्क साधून त्याची विहीत कार्यवाही समजावून सांगितली होती. तसेच तक्रारदार यांच्या पत्नीने बचत खाते उघडताना नॉमिनीची नोंद केली नव्हती त्यामुळे बँकिंग नियमाप्रमाणे अकाऊंटमधील शिल्लक रक्कम काढून घेणेस तक्रारदार यांना स्वतः दोन साक्षीदारांसह ओळखपत्र व रहिवास दाखले (तक्रारदार व साक्षीदार यांचे) घेवून बँकेत येण्यास समजावून सांगितले होते परंतु तक्रारदार यांनी अद्याप कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे शिल्लक रक्कम मिळण्यास विलंब होत आहे व सदर विलंबास तक्रारदार हेच जबाबदार आहेत. सामनेवाला क्र.2 हे तक्रारदार यांच्या पत्नीच्या खात्यातील शिल्लक माहे डिसेंबर अखेरची रक्कम रु.5,204/- बँकिंग नियमाप्रमाणे तक्रारदार यांना देण्यास तयार आहेत असे सामनेवाला यांनी नमूद केले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिलेली नाही त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी अशी मंचासमोर विनंती केलेली आहे. सामनेवाला क्र.2 यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.17 वर शपथपत्र, नि.18 चया अर्जान्वये नि.18/1 वर कागदपत्र दाखल केलेली आहेत. सामनेवाला क्र.2 यांच्या विधिज्ञांनी नि.40 वर सामनेवाला क्र.1 तर्फे दिलेले वकिलपत्र रद्द करण्याबाबतची पुरशिस दिलेली आहे. 6. तक्रारदार यांनी नि.27 वर प्रतिउत्तर व प्रतिउत्तराच्या पृष्ठयर्थ नि.28 वर शपथपत्र दाखल केलेले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांनी प्रतिउत्तर दाखल केल्यानंतर म्हणणे दिले त्यामुळे तक्रारदार यांनी पुन्हा नि.46 वर शपथपत्रासह प्रतिउत्तर दाखल केलेले आहे. तक्रारदार यांनी प्रतिउत्तरामध्ये सामनेवाला यांचे म्हणणे नाकारलेले आहे. तक्रारदार यांनी आपल्या प्रतिउत्तरामध्ये सामनेवाला क्र.2 यांनी साक्षीदार यांची ओळखपत्रे व त्यांचे रहिवासी दाखल यांची केलेली मागणी तक्रारदार यांना खर्चात घालणेसाठी केली आहे असे नमूद केले आहे. तसेच सामनेवाला यांनी मयत खातेदार व सामनेवाला यांचेमधील कराराची प्रत दाखल केलेली नाही. सामनेवाला यांना “कार्ड वापरले नाही” या कारणाने विमा सुविधा नाकारता येत नाही कारण तसा लेखी करार नव्हता व नाही व तसे नियम तक्रारदार यांना सामनेवाला यांनी सांगितले नाहीत. सामनेवाला यांनी दाखल केलेले पुस्तक हे स्किमचे माहितीपत्रक असून तो करार नाही. तसेच सामनेवाला यांनी ऍक्टीव्हेशनबाबत आपल्या म्हणण्यामध्ये खुलासा केलेला नाही व पुरावाही सादर केलेला नाही. शेवटी तक्रारदार यांची तक्रार मंजूर करण्यात यावी अशी प्रतिउत्तरामध्ये मंचासमोर विनंती केलेली आहे. तक्रारदार यांनी नि.54 च्या अर्जान्वये कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रारदार यांनी नि.30 वर व पुन्हा नि.48 वर व सामनेवाला क्र.2 यांनी नि.31 वर लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. 7. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाला यांनी दिलेले म्हणणे, शपथपत्र, सामनेवाला यांनी दाखल केलेली कागदपत्रे, प्रतिउत्तर, तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद व ऐकण्यात आलेला तोंडी युक्तिवाद यावरुन खालील मुद्दे मंचाच्या निष्कर्षासाठी उपस्थित होतात. अ.क्र. | मुद्दे | उत्तरे | 1. | सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे काय ? | होय. | 2. | तक्रारदार हे सामनेवाला क्र.2 यांचेकडून मागणीप्रमाणे अनुतोष मिळण्यास पात्र आहेत काय ? | अंशतः मंजूर. | 3. | काय आदेश ? | अंतिम आदेशाप्रमाणे. |
विवेचन 8. मुद्दा क्र.1 - नि.4/2 वरील सामनेवाला यांनी तक्रारदार यांना पाठविलेल्या पत्राचे अवलोकन करता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना त्यांच्या पत्नीच्या बचत खात्याबाबतची माहिती संबंधीत खात्याकडून थोडयाच अवधित तक्रारदार यांना पुरविली जाईल असे लेखी आश्वासन दिले होते हे स्पष्ट होते. परंतु तक्रारदार यांनी सामनेवालाविरुध्द मंचात तक्रार दाखल करेपर्यंत तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 व 2 यांच्याकडे मागणी केल्यावर त्यांच्या शंकेचे निराकरण करण्यात आले व त्यांना त्यांच्या पत्नीच्या बचत खात्याबाबत योग्य ती माहिती देण्यात आली असा पुरावा सामनेवाला यांनी सादर केलेला नाही. तक्रारदार यांना त्यांचे पत्नीचे बचत खात्याबाबत लेखी माहिती न पुरवून सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविलेली आहे अशा निर्णयाप्रत मंच आले आहे. 9. मुद्दा क्र.2 - तक्रारदार यांनी आपल्या मागणी क्र. अ मध्ये त्यांच्या पत्नी कै.गौरी तांबट हिचे सामनेवाला बँकेतील बचत खात्यात असलेली रक्कम व्याजासह अदा करणेबाबत सामनेवाला यांना आदेश करण्यात यावा अशी विनंती केलेली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या पत्नीचे बचत खाते त्यांच्याकडे आहे हे मान्य केलेले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी आपल्या नि.16 वरील म्हणण्यामध्ये तक्रारदार यांच्या पत्नीच्या बचत खात्यामधील शिल्लक रक्कम रु.5,204/- बँकिंग नियमाप्रमाणे देण्यास तयार आहेत असे नमूद केले आहे. सामनेवाला यांनी नि.16 वरील म्हणण्यामध्ये तक्रारदार यांच्या पत्नीच्या बचत खात्यातील रक्कम अदा करण्याबाबत नमूद केलेल्या बँकिंग नियमाबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणलेला नाही. त्यामुळे सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांच्या पत्नी कै.गौरी तांबट यांच्या बचत खात्यात असलेली रक्कम रु.5,204/- तक्रार दाखल तारखेपासून म्हणजेच दि.04/12/2009 पासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे.9% व्याजदराने अदा करणेबाबत आदेश करणे योग्य व संयुक्तिक होईल अशा निर्णयाप्रत मंच आले आहे. तक्रारदार यांनी आपल्या मागणी क्र. ब मध्ये तक्रारदारास सामनेवाला बँकेचे नियमानुसार गोल्ड कार्ड व क्रेडिट कार्ड धारक म्हणून विमा रक्कम रु.5,00,000/-, त्यावर अर्ज तारखेपासून द.सा.द.शे.18% व्याजासह अदा करणेबाबत सामनेवाला यांना आदेश करण्यात यावे अशी विनंती केलेली आहे. दाखल कागदपत्राचे अवलोकन करता सामनेवाला यांनी दाखल केलेल्या नि.36/1 वरील दाखल केलेल्या कार्डबाबतच्या वापराबाबतच्या कागदपत्राचे अवलोकन करता तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीने कार्ड ऍक्टीव्हेट केले होते, त्याचा वापर केला होता असा पुरावा मंचासमोर आणलेला नाही. तक्रारदार यांनी आपल्या नि.46 वरील प्रतिउत्तरामध्ये सामनेवाला यांनी तक्रारदार यांना कोणतेही नियम सांगितले नाही असे नमूद केले आहे. तक्रारदार यांनी आपली रक्कम रु.5,00,000/- विमा सुविधांची मागणी कोणत्या कराराच्या आधारावर मागत आहेत याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणलेला नाही. तसेच सामनेवाला यांनी कराराप्रमाणे सदोष सेवा कशी दिली याबाबतही पुरावा मंचासमोर आणलेला नाही. तसेच सामनेवाला यांना तक्रारदार व सामनेवाला यांचेमधील करार सादर करण्याबाबतचा अर्जही दाखल केलेला नाही. तसेच मंचाने युक्तिवादाचे दरम्यान सामनेवाला क्र.1 यांनी नि.36/1 वर दाखल केलेल्या कागदपत्रातील नियमाप्रमाणे तक्रारदार यांच्या पत्नीने दिलेले क्रेडिट कार्डचा वापर केला होता का ? याबाबतचा पुरावा मंचासमोर हजर करण्याबाबत उभय पक्षांना संधी दिली होती त्याला अनुसरुन सामनेवाला क्र.1 यांनी नि.52 अन्वये तक्रारदार यांच्या पत्नीच्या क्रेडीट कार्ड खात्यासंदर्भातील माहिती दाखल केली. तक्रारदार यांनी नि.54 अन्वये गोल्ड कार्ड, डेबीट कार्ड, ए.टी.एम.कार्ड दाखल केले परंतु तक्रारदार यांनी क्रेडिट कार्ड ऍक्टिव्हेट केल्याबाबतचा सबळ पुरावा मंचासमोर दाखल केला नाही. तसेच सामनेवाला यांनी नि.52 अन्वये तक्रारदार यांच्या पत्नीच्या क्रेडिट कार्ड संदर्भातील माहिती दिल्यानंतरही तक्रारदार यांनी त्याबाबत आक्षेप घेतला नाही त्यामुळे योग्य पुराव्याअभावी तक्रारदार यांची मागणी मान्य करणे योग्य व संयुक्तिक वाटत नाही अशा निर्णयाप्रत मंच येत आहे. 10. तक्रारदार यांनी सामनेवाला यांनी दिलेल्या सदोष सेवेबाबत शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.15,000/- व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.5,000/- ची मागणी केलेली आहे. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी दिलेल्या सदोष सेवेमुळे तक्रारदार यांना निश्चितच शारिरिक, मानसिक त्रास व प्रकरण खर्चास सामोरे जावे लागले आहे हे दाखल कागदपत्रावरुन व वरिल विवेचनावरुन स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडून शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च असे एकूण रक्कम रु.2,000/- मिळण्यास पात्र ठरतात अशा निर्णयाप्रत मंच येत आहे. वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांना त्यांच्या पत्नीच्या बचत खात्यातील रक्कम रु.5,204/- (रु.पाच हजार दोनशे चार मात्र) द्यावेत व त्या रकमेवर दि.04/12/2009 पासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे.9% व्याज अदा करावे असा सामनेवाला यांना आदेश करण्यात येतो. 3. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या अथवा संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च असे एकूण रक्कम रु.2,000/- (रु.दोन हजार मात्र) अदा करावेत असा सामनेवाला यांना आदेश करण्यात येतो. 4. वरील नमूद आदेशाची पूर्तता सामनेवाला यांनी दि.04/09/2010 पर्यंत करण्याची आहे. 5. सामनेवाला यांनी विहित मुदतीत आदेशाची पूर्तता न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील. रत्नागिरी दिनांक : 04/08/2010 (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |