जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/170 प्रकरण दाखल तारीख - 27/07/2009 प्रकरण निकाल तारीख – 06/01/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य. संभाजी कोंडिंबा लोकरे, वय धंदा शेती, अर्जदार. रा.हिसा-पाथरड ता.मुदखेड जि.नांदेड. विरुध्द. विभागीय व्यवस्थापक, युनायटेड इन्शोरन्स कंपनी, गुरु कॉम्प्लेक्स जी.जी.रोड,नांदेड गैरअर्जदार. अर्जदारा तर्फे वकील - अड.कपाळे बी.एस. गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.जी.एस.औंढेकर. निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्या) अर्जदार यांची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदाराने स्वतःच्या खाजगी वापरासाठी व व्यवसायासाठी जुनी इंडिका डिएलएस कार ही प्रदीप अनंतराव कनाव यांचेकडुन विकत घेतली व दि.15/01/2009 रोजी आर.टी.ओ. नांदेड येथे स्वतःच्या नांवे करुन घेतली. सदरील गाडी अनंतराव कनाव यांचेकडुन विकत घेतल्यामुळे गाडीचे मुळ मालक अनंतराव कनाव हे होते. त्यांनी सदरच्या गाडीचा विमा गैरअर्जदार दि.युनायटेड इन्शोरन्स कपंनी यांचेकडे दि.13/01/2009 रोजी विमा उतरवून विम्याची रितसर पावती घेतली. म्हणुन सदरची इंडिका गाडी एमएच 31 सीएम-4403 ही दि.31/01/2009 पासुनच विमा धारक आहे. अर्जदाराची इंडिका गाडी दि.20/01/2009 रोजी अलंद-गुलबर्ग रोड (कर्नाटक) या मार्गावर अपघातग्रस्त होवून गाडीचे नुकसान झालेले आहे व सदर अपघात ग्रामीण पोलिस स्टेशन गु.र.नं.15/2009-279 नोंदविण्यात आला. सदरची गाडी बाफना मोटर्स नांदेड येथे दुरुस्त करुन घेतली व सदर गाडीच्या दुरुस्तीचा एकुण खर्च रु.1,60,000/- झाला. अर्जदाराने अपघातग्रस्त गाडीचे बाफना मोटर्स नांदेड यांचेकडुन झालेल्या नुकसानीची इस्टीमेट करुन सदर गाडी दुरुस्त करुन दुरुस्तीचे बिल व इस्टीमेट व इतर आवश्यक कागदपत्रासह गैरअर्जदार युनायटेड इंडिया इन्शोरन्स कंपनी, नांदेड यांचेकडे क्लेम दाखल केला व क्लेम नाकारल्याचे पत्र अर्जदारास दिले आहे. अर्जदाराने मुळ मालकाकडुन वाहन स्वतःच्या नांवे केल्यानंतर व सदरचे वाहन अपघातग्रस्त झाल्यानंतर मुळ वाहन मालकाने काढलेली विमा पॉलिसी ही स्वतःच्या नांवे दि.27/01/2009 रोजी करुन घेतली आहे. सदर अर्जासोबत मुळ मालकाने भरलेल्या पॉलिसीच्या रक्कमेची पॉलिसी व मुळ पॉलिसी हस्तांतरण केले आहे. अर्जदाराचा क्लेम नामंजुर करुन गैरअर्जदारांनीसेवेत त्रुटी केली म्हणुन अर्जदाराची मागणी आहे की, वाहन क्र.एमएच 31 सीएम 4403 सी नुकसानीची विमा रक्कम भरपाई रु.1,60,000/- गैरअर्जदाराकडुन मिळावेत. गैरअर्जदार यांना नोटीस देण्यात आली त्यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांचे म्हणणे असे की, अर्जदार यांनी केलेले सर्व आरोप खोटे व चुकीचे आहेत त्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळण्यात यावा. अर्जदार यांचे वाहन अपघात झाला त्या वेळी वाहनाचा विमा काढलेला नव्हता. तसेच ते वाहन अर्जदाराच्या नांवे ट्रान्सफर झालेले नव्हते. अर्जदारांचे वाहनांचा विमा दि.27.01.2009 ते दि.13.01.2010 या कालावधी साठी काढलेला होता. अपघाताचे वेळी अर्जदाराचे वाहनाचे विमा काढलेला नव्हता. गैरअर्जदाराचे सर्व्हेअर श्री. डि.एस.नलबलवार यांनी रिपोर्ट दिला त्यामध्ये अर्जदार यांनी वाहन जोरात चालवले असून त्यामूळे वाहनाचा अपघात झालेला आहे असे म्हटले आहे तसेच वाहनाची नूकसान भरपाई त्यांनी रिपोर्ट मध्ये दिलेली आहे. त्यांना ही गोष्ट मान्य नाही अर्जदार यांना वाहन दूरुस्तीसाठी रु.1,54,000/- इतका खर्च आला. अपघात झाला त्यावेळेला वाहन हे प्रदिप कनाव्ह यांचे नांवे होते त्यामूळे अर्जदाराला विमा दावा मिळू शकत नाही. अर्जदार यांचे वाहनाचा अपघात हा दि.20.01.2009 रोजी झालेला आहे त्यावेळी अर्जदार हे विमा पॉलिसी धारक नव्हते. त्यामूळे तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? होय. 3. काय ? आदेश अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 अर्जदार यांनी जूनी इंडिका डिएलएस कार प्रदिप अनंतराव कनाव्ह यांचे कडून विकत घेतलेली आहे. सदरची गाडी आरटीओ नांदेड यांचेकडून त्यांचे नांवे करुन दि.15.01.2009 रोजी करुन घेतलेली आहे. सदर गाडीचा विमा अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे उतरुवून त्यांची पावती घेतलेली आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ त्यांनी दाखल केलेली विमा रक्कम भरले बाबतची पावती यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. मूददा क्र. 2 अर्जदार यांचे वाहनाचा अपघात दि.20.01.2009 रोजी झालेला आहे. अर्जदार यांच्या वाहनाचा अपघात झाला त्यावेळेला अर्जदार हे गैरअर्जदार कंपनीचे विमाधारक नव्हते. त्यामूळे गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचा विमा क्लेम नाकारलेला आहे. अर्जदार यांनी अर्जासोबत दाखल केलेले कागदपञाचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी दि.13.01.2009 रोजी गैरअर्जदार यांचेकडे विम्याची रक्कम भरुन त्यांची पावतीही घेतलेली आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दि.27.01.2009 पासून ते दि.13.01.2010 पर्यत विमा पॉलिसी दिलेली आहे. अर्जदार यांनी जर विम्याची रक्कम दि.13.01.2009 रोजी दिलेली असेल तर त्या दिवसापासूनच अर्जदार हे गैरअर्जदार यांचे विमाधारक झालेले आहेत. अर्जदार यांचे वाहनाचा अपघात दि.20.01.2009 रोजी झालेला आहे. त्या सदंर्भात एफ.आय.आर., कन्टप्पा राज्जना दायमागोंड यांचा जवाब, स्पॉट पंचनामा, इत्यादी कागदपञ या अर्जाचे कामी दाखल केलेली आहेत. अर्जदार यांचे वाहनाचा अपघात झाल्यानंतर बाफना मोटार्स यांचेकडून दूरुस्त करुन घेतलेले आहे. त्या बाबतचा टॅक्स इन्व्हाईस अर्जदार यांनी या अर्जाचे कामी दाखल केलेले आहेत. त्याप्रमाणे अर्जदार यांना सदरचे वाहन दूरुस्त करुन घेण्यासाठी एकूण रक्कम रु.1,50,638/- इतका खर्च आलेला आहे. अर्जदार यांनी दूरुस्ती बिल व इतर कागदपञासहीत विमा क्लेमची रक्कम मिळणेसाठी गैरअर्जदार यांचेकडे मागणी केलेनंतर गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचा विमा क्लेम दि.20.05.2009 रोजी AT THE TIME OF ACCIDENT NOT INSURABLE INTEREST SO CLAIM IN NOCLAIM. असे कारण देऊन नाकारलेला आहे. अपघात होणे पूर्वीच अर्जदार यांनी विम्याची रक्कम गैरअर्जदार यांचेकडे भरलेली आहे. परंतु गैरअर्जदार यांनी अपघात घडला त्यावेळेला विमा पॉलिसी अर्जदार यांचे नांवे नव्हती असे कारण देऊन अर्जदार यांचा विमा क्लेम नाकारला. अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे. अर्जदार यांचे अपघातग्रस्त वाहन दुरुस्त करण्यासाठी अर्जदार यांना रक्कम रु.1,50,638/- एवढा खर्च आलेला आहे. गैरअर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी सर्व्हे रिपार्ट दाखल केलेला आहे. सदर सर्व्हे रिपोर्ट प्रमाणे एकुण रक्कम रु.97,104/- मधुन रु.1,604/- सॉलवेज वजा जाता रक्कम रु.95,500/- एवढी रक्कम अर्जदार गैरअर्जदार यांचेकडुन वसुल होऊन मिळणेस पात्र आहेत. सदरचा सर्व्हे रिपोर्ट अर्जदार यांनी कोणत्याही प्रकारे नाकारलेले नाही. सदर वाहनाचा विमा उतरविलेला असल्याने अर्जदार यांनी वाहन दूरुस्तीपोटी आलेल्या खर्चाची रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडे केलेली आहे. परंतु गैरअर्जदार यांनी कोणतेही योग्य व संयूक्तीक कारण नसताना अर्जदार यांचा विमा क्लेम दि.20.05.2009 रोजी नाकारलेला आहे. त्यामूळे अर्जदार यांना सदर रक्कमेपासून आजपर्यत वंचित राहावे लागलेले आहे. त्यामूळे अर्जदार हे विमा रक्कमेवर दि.20.05.2009 पासून प्रत्यक्ष रक्कम पदरीपडेपर्यत 9 टक्के व्याजासह रक्कम वसूल होऊन मिळण्यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांची विम्याची रक्कम दिलेली नाही. म्हणून सदरची रक्कम मिळणेसाठी अर्जदार यांना या मंचामध्ये अर्ज करावा लागलेला आहे व त्या अनुषंगाने खर्चही करावा लागलेला आहे त्यामूळे अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडून मानसिक ञासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होऊन मिळण्यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व त्यांनी दाखल केलेले कागदपञ, तसेच गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, शपथपञ व त्यांनी दाखल केलेले कागदपञ व दोन्ही पक्षातर्फे झालेला यूक्तीवाद यांचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत खालील प्रमाणे रक्कमा दयाव्यात. 1. रक्कम रु.95,500/- व त्यावर दि.20.05.2009 पासून प्रत्यक्ष रक्कम पदरीपडेपर्यत 9 टक्के व्याजासह होणारी रक्कम दयावी. 2. मानसिक ञासापोटी रु.5000/- व दावा खर्च म्हणून रु.1,000/- मंजूर करण्यात येतात. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार,लघुलेखक. |