मंचाचे निर्णयान्वये - श्री. मिलिंद केदार, सदस्य. //- आदेश -// (पारित दिनांक – 08/09/2010) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली असून तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय असा आहे की, तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराच्या नेपाळ, दार्जिलिंग, गंगटोक, काशी या सहलीकरीता संपूर्ण परीवाराकरीता म्हणजेच चार सदस्यांकरीता रु.60,000/- खर्च येत असल्याचे सांगितल्याने तक्रारकर्त्याने रु.50,000/- अग्रीम म्हणून गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार त्याच्या खात्यात जमा केले. परंतू गैरअर्जदाराने सदर सहल रद्द केली. म्हणून तक्रारकर्त्याने त्याने सहलीकरीता दिलेली रक्कम परत मागितली असता रु.50,000/- पैकी रु.20,000/- तक्रारकर्त्याच्या बचत खात्यात जमा केले. परंतू उर्वरित रु.30,000/- तक्रारकर्त्याला दिले नाही. याबाबत वारंवार मागणी करुनही रक्कम न मिळाल्याने तक्रारकर्त्याने नोटीस पाठविला असता गैरअर्जदाराने त्यालाही प्रतिसाद दिला नाही. म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार दाखल करुन रु.30,000/- ही रक्कम व्याजासह मागितली आहे. तसेच मानसिक व शारिरीक त्रासाबाबत भरपाई व तक्रारीच्या खर्चाची मागणी केलेली आहे. आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ तक्रारकर्त्याने एकूण 8 कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत. 2. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदारावर बजावण्यात आला असता गैरअर्जदाराने तो घेण्यास नकार दिला, नोटीस “Not claimed” या पोस्टाच्या शे-यासह परत आला. तक्रारकर्ता मंचात हजरही झाला नाही व त्याने मंचासमोर आपले म्हणणेही मांडले नसल्याने मंचाने त्याच्याविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश दि.02.09.2010 रोजी पारित केला. 3. सदर प्रकरण मंचासमोर 02.09.2010 रोजी मंचासमोर युक्तीवादाकरीता आल्यानंतर मंचाने तक्रारकर्त्याचा युक्तीवाद त्याच्या वकील प्रतिनीधींमार्फत ऐकला. गैरअर्जदार यावेळेस गैरहजर होते. मंचाने सदर प्रकरणी तक्रारकर्त्याने प्रतिज्ञापत्रावर दाखल केलेली तक्रार व त्यापुष्टयर्थ जोडलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता मंचाचे निदर्शनास खालील बाबी आल्या. -निष्कर्ष- 4. मंचाने तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्तऐवज क्र. 1 चे अवलोकन केले असता गैरअर्जदार हा निरनिराळया स्थळाकरीता सहल आयोजित करीत होता व त्याकरीता जाहिरातीत नमूद केलेल्याप्रमाणे मोबदला आकारीत होता हे निदर्शनास येते. दस्तऐवज क्र. 4 व 5 वर नमूद पावतीमध्ये तक्रारीत नमूद नेपाळ, दार्जिलिंग, गंगटोक सहलीकरीता गैरअर्जदाराने रु.50,000/- घेतल्याचे निदर्शनास येते व त्यावरुन तक्रारकर्ता हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे हे सिध्द होते. 5. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवज क्र. 2 व 3 वरुन गैरअर्जदाराला तक्रारकर्त्याने एकूण रु.50,000/- दिल्याचे स्पष्ट होते. तसेच सदर रक्कम ही नेपाळ, दार्जिलिंग, गंगटोक या सहलीकरीता असल्याचेही गैरअर्जदाराने दस्तऐवज क्र. 4 व 5 वरील तक्रारकर्त्याला दिलेल्या पावतीमध्ये नमूद केलेले आहे. प्रत्येक व्यक्तीस रु.15,000/- असे चार व्यक्तीकरीता गैरअर्जदारास रु.60,000/- द्यावयाचे होते व त्यापैकी रु.50,000/- दिल्याचे जे तक्रारीत तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे ते सिध्द होते. परंतू सदर सहल रद्द झाल्याने गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास रु.50,000/- पैकी फक्त रु.20,000/- तक्रारकर्त्याच्या बचत खात्यात जमा केले व उर्वरित रु.30,000/- ही मागणी करुनही परत केलेली नाही, म्हणून तक्रारकर्त्याने नोटीस पाठविला. तरीही सदर उर्वरित रक्कम गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास परत केलेली नाही. याबाबत मंचाने गैरअर्जदाराचे यावर काय म्हणणे आहे हे जाणून घेण्यास गैरअर्जदाराला नोटीस पाठविला असता गैरअर्जदाराने सदर नोटीस घेण्यास नकार दिला. तसेच मंचासमोर हजर होऊन तक्रारकर्त्याचे म्हणणे शपथपत्रावर व कागदपत्रासह नाकारलेले नाही. मंचाचे मते तक्रारकर्त्याने शपथपत्रावर कागदपत्रासह दाखल केलेल्या तक्रारीतील अभिकथन सत्य समजण्यास हरकत नाही. तक्रारकर्त्याकडून सहलीकरीता रक्कम आकारुन ती नंतर रद्द करणे व नंतर घेतलेली रक्कम परत न करणे ही गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला उर्वरित रक्कम रु.30,000/- परत करावी असे मंचाचे मत आहे. तसेच वारंवार उर्वरित रकमेची मागणी करुनही गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला रक्कम परत केलेली नाही. त्यामुळे गैरअर्जदाराच्या सदर कृतीमुळे तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला. सदर त्रासाची भरपाई म्हणून गैरअर्जदाराने रु.3,000/- तक्रारकर्त्याला द्यावे. तसेच तक्रारीच्या खर्चाबाबत गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला रु.2,000/- द्यावे. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदाराला आदेश देण्यात येतो की, त्याने तक्रारकर्त्याला रु.30,000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत परत करावे अन्यथा सदर रकमेवर 9 टक्के व्याज देण्यास गैरअर्जदार बाध्य राहील. 3) तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रासाची भरपाई म्हणून गैरअर्जदाराने रु.3,000/- द्यावे. 4) तक्रारीच्या खर्चाबाबत गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला रु.2,000/- द्यावे. 5) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे. 6) तक्रारकर्त्याने दाखल ‘ब’ व ‘क’ फाईल्स (सदस्यांकरीता फाईल्स) घेऊन जावे.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |