Dated The 02 Mar 2016
न्यायनिर्णय
(द्वारा सौ. माधुरी एस. विश्वरुपे- मा. सदस्या)
- तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे दि. 23/10/2011 रोजी रक्कम रु. 2,30,000/- खोली खरेदीपोटी भरणा केले. तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्ये दि. 25/10/2011 रोजी झालेल्या खोली खरेदीच्या करारनाम्याप्रमाणे सदर खोलीचा ताबा डिसेंबर, 2012 मध्ये देण्याचे सामनेवाले यांनी मान्य केले. तथापि, सामनेवाले यांनी तक्रारदारांकडून खोलीची संपूर्ण किंमत स्विकारुन चाळीचे बांधकाम चालू केले नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे सातत्याने लेखी व तोंडी तक्रार केली. परंतु सामनेवाले यांनी प्रतिसाद दिला नाही.
- सामनेवाले यांनी त्यांचे कार्यालय दोन वेळा स्थलांतरीत केले. अखेर सामनेवाले यांच्या अनखरपाडा येथील कार्यालयात इमारतीच्या बांधकामाची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. परंतु कार्यालयामध्ये संपर्क करण्यासाठी कोणतीही व्यक्ती उपलब्ध नव्हती.
- सामनेवाले यांनी तक्रारदारांकडून खोली खरेदीपोटी संपूर्ण रक्कम स्विकारुन खोलीचा नोंदणीकृत करारनामा तसेच ताबा दिला नाही या कारणास्तव तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
- सामनेवाले यांचेविरुध्द दि. 26/01/2016 रोजी एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे.
- तक्रारदारांनी पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद दाखल केला. तसेच तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे हाच त्यांचा पुरावा ग्राहय धरण्यात यावा अशी पुरसिस दाखल केली. तक्रारीतील उपलब्ध कागदपत्रांआधारे मंच खालीलप्रमाणे निष्कर्ष काढीत आहेः
-
- मुद्देः
-
अ. सामनेवाले यांनी तक्रारदारांकडून खोलीची पूर्ण रक्कम स्विकारुन तसेच दि. 25/10/2011 रोजीच्या खरेदी करारानुसार खोलीचा ताबा डिसेंबर,2012 मध्ये देण्याचे मान्य केल्याप्रमाणे ताबा न देऊन त्रुटीची सेवा दिल्याची बाब तक्रारदारांनी सिध्द केली आहे काय? - होय
ब. तक्रारदार दाद मिळण्यास पात्र आहेत का? - होय
क. अंतिम आदेश? - निकालाप्रमाणे
- कारणमिमांसाः
- तक्रारदारांनी दि. 09/09/2011 रोजी सामनेवाले यांचेकडे 250 चौ.फूट खोली खरेदीपोटी रक्कम रु. 11,000/- भरणा केल्याची तसेच दि. 23/10/2011 रोजी रक्कम रु. 2,19,000/- भरणा केल्याच्या पावत्या मंचात दाखल आहेत.
ब. तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्ये दि. 23/10/2011 रोजी झालेल्या करारानुसार तक्रारदारांना भव्य घरकुल योजना “मंगलमूर्ती होम्स्” च्या मिळकत मौ. घोटसोई येथील चाळीमधील 250 चौ.फू. खोलीचा ताबा डिसेंबर, 2012 पर्यंत देण्याचे सामनेवाले यांनी मान्य केल्याचे दिसून येते. तसेच करारामध्ये तक्रारदारांनी सामनेवाले यांना सदर खोली खरेदीपोटी संपूर्ण रक्कम रु. 2,30,000/- अदा केल्याची बाब नमूद आहे.
क. तक्रारदारांनी दि. 17/03/2013, दि. 22/05/2013, दि. 30/11/2013, दि. 05/07/2014 रोजी सामनेवाले यांचेकडे खोलीचा ताबा मिळण्यासाठी लेखी पत्र पाठवले आहेत. सदर पत्रांच्या प्रती मंचात दाखल आहेत.
ड. सामनेवाले यांनी तक्रारदारांकडून खोली खरेदीपोटी रक्कम रु. 2,30,000/- स्विकारुनही अदयापर्यंत खोलीचा ताबा न देऊन त्रुटीची सेवा दिल्याचे तक्रारीतील दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट होते असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांचा पुरावा अबाधित आहे. सबब मुद्दा क्र. 6 अ. व ब. चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
सबब मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करत आहेः
आ दे श
- तक्रार क्र. 592/2014 अंशतः मंजूर करण्यात येते.
- सामनेवाले यांनी तक्रारदारांकडून खोली खरेदीपोटी रक्कम स्विकारुन तसेच दि. 25/10/2011 रोजीच्या करारामध्ये मान्य केल्याप्रमाणे खोलीचा ताबा न देऊन त्रुटीची सेवा दिल्याचे जाहीर करण्यात येते.
- सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की तक्रारदारांनी खोली खरेदीपोटी सामनेवाले यांचेकडे जमा केलेली रक्कम रु. 2,30,000/- दि. 25/10/2011 पासून दि. 30/04/2016 पर्यंत 12% व्याजदराने परत दयावी. विहीत मुदतीत अदा न केल्यास दि. 01/05/2016 पासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत 15% व्याजदाराने दयावी.
- सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की त्यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु. 5,000/- दि. 30/04/2016 पर्यंत दयावी. विहीत मुदतीत अदा न केल्यास दि. 01/05/2016 पासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत 9% व्याजदाराने दयावी.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनाविलंब व विनामुल्य पोष्टाने पाठविण्यात याव्यात.
- संचिकेच्या अतिरिक्त प्रती असल्यास तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.