निकालपत्र मिलिंद सा.सोनवणे, अध्यक्ष यांनी पारीत केले
नि का ल प त्र
पारित दिनांकः17/03/2015
तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 (यापुढे संक्षेपासाठी ‘ग्रा.सं. कायदा’) च्या कलम 12 नुसार प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक्रारदारांचे म्हणणे थोडक्यात असे की, त्यांनी सामनेवाला क्र.1 यांच्याकडून दि.28/8/2014 रोजी मायक्रोमॅक्स पी 310 या कंपनीचा टॅब विकत घेतला. त्या टॅबची किंमत रु.7400/- इतकी होती. त्याची पावती क्र.1680 अशी आहे. टॅब विकत घेतल्यानंतर तो आपोआप सुरु होत असे. दि.4/10/2014 रोजी व तत्पुर्वी देखील त्यांनी सामनेवाल्यांना त्याबाबत तक्रार दिली होती. मात्र उपयोग झाला नाही. दि.10/9/2014 रोजी त्यांनी तो टॅब दुरुस्तीसाठी सामनेवाला क्र.2 यांच्याकडे जमा केला. मात्र आजतागायत तो मिळालेला नाही.त्यांनी सामनेवाल्यांकडे तशी चौकशी केली असता, सामनेवाल्यांनी दमदाटी केली. सामनेवाल्यांनी सेवा देण्यात कमतरता केलेली आहे. त्यामुळे मानसिक त्रासासाठी रु.25,000/- शारिरीक त्रास व असुविधेपोटी रु.10,000/- आर्थिक झळीपोटी रु.10,000/- व टॅबच्या उपयोगापासून वंचीत केल्यामुळे रु.20,000/- तक्रार अर्जाचा खर्च रु.500/- अशी एकूण रु.65,500/- इतकी नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती त्यांनी मंचास केलेली आहे.
3. तक्रारदार यांनी तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ दस्तऐवज यादी नि.2 लगत टॅब खरेदीची पावती, टॅब दुरुस्तीचे जॉबशीट्स, सामनेवाल्यांना पाठविलेले पत्र, त्याच्या पावत्या इ.कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4. सामनेवाल्यांना नोटीसा मिळूनही ते गैरहजर राहील्याने प्रस्तूत तक्रार अर्ज त्यांच्या विरुध्द एकतर्फा चालविण्यात आला.
5. तक्रारदारांचा युक्तीवाद ऐकण्यात आला.
6. निष्कर्षांसाठीचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
- सामनेवाल्यांनी तक्रारदारांना
सदोष टॅब विक्री केला काय? होय.
- आदेशाबाबत काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः
7. सामनेवाल्यांनी आपल्याला सदोष टॅब विक्री केला. टॅबचे गुगल अॅप आपोआप चालु होत असे. दि.10/9/2014 रोजी सामनेवाल्यांनी त्यांचा टॅब दुरुस्तीसाठी जमा करुन घेतला व तो आजतागायत दिलेला नाही. तो सदोष असल्यामुळेच रिपेअर करणे त्यांना शक्य झालेले नाही, इत्यादी विधाने तक्रारदारांनी शपथेवर मंचासमोर केलेली आहेत. त्यांनी दस्तऐवज यादी नि.2/2 व 3 ला दाखल केलेले जॉबशीट स्पष्ट करतात की, टॅबमधील अॅप्लिकेशन रिस्टार्ट व बुट होतात, अशी तक्रार तक्रारदारांनी रिपोर्ट केलेली आहे. सामनेवाल्यांनी तक्रारदारांचा वरील पुरावा हजर होवून आव्हानित केलेला नाही. तक्रारदारांचा पुरावा सामनेवाल्यांना मान्य असल्यामुळेच तो त्यांनी आव्हानित केलेला नाही, असा प्रतिकूल निष्कर्ष त्यामुळे काढण्यास पुरेसा वाव आहे. परिणामी सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना सदोष टॅब विक्री केला व सामनेवाला क्र.2 यांनी तो दुरुस्त करुन परत न दिल्यामुळे दोघांनीही तक्रारदारांना सेवा देण्यात कमतरता केली, असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 बाबतः
8. मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष स्पष्ट करतो की, सामनेवाल्यांनी तक्रारदारांना सेवा देण्यात कमतरता केली. त्यामुळे तक्रारदार टॅबची किंमत रु.7400/- टॅब खरेदी करण्याचा दिनांक 28/8/2014 पासून ते प्रत्यक्ष रक्कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे.12% व्याजासह मिळण्यास पात्र आहेत. तक्रारदारांनी शारिरीक व मानसिक त्रास तसेच आर्थीक झळ व टॅबच्या फायद्यापासून वंचीत राहील्याची नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.65,000/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे. मात्र तक्रारदारांची ती मागणी पुर्णतः अवाजवी आहे. आमच्या मते, त्यापोटी तक्रारदारांना रु.3000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.500/- मंजूर करणे न्यायोचित ठरेल. यास्तव मुद्दा क्र.2 च्या निष्कर्षापोटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आ दे श
1. सामनेवाला क्र.1 व 2 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारांना वैयक्तीक व संयुक्तीकरित्या टॅबची किंमत रक्कम रु.7400/- 28/8/2014 पासून ते प्रत्यक्ष रक्कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे.12% व्याजासह अदा करावी.
2. सामनेवाला क्र.1 व 2 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारांना वैयक्तीक व संयुक्तीकरित्या मानसिक, शारिरीक व आर्थीक त्रासापोटी भरपाई म्हणून रक्कम रु.3000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.500/- अदा करावेत.
3. निकालपत्राच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य द्याव्यात.
नाशिक
दिनांकः-17/03/2015