जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ७४/२०१०
तक्रार दाखल दिनांक – १७/०२/२०१०
तक्रार निकाली दिनांक – १७/०२/२०१४
युनाटेड सर्व्हीसेस,
प्रो.श्री. दिलीप ग. कोरडे,
उ.व.५२, धंदा – व्यवसाय,
रा.जे.आर. सिटी हायस्कूल समोर,
धुळे. ................ तक्रारदार
विरुध्द
१) प्रोजेक्ट मॅनेजर,
टोटेम इन्फ्रास्टक्चर प्रा.लि.
आर्वी शिवार, आर्वी,
ता.जि. धुळे.
२) मॅनेजिंग डायरेक्टर,
जे टोटेम प्रोजेक्ट प्रा.लि.
प्लॉट नं.७२३, श्री व्यंकटेश हिल,
रोड नं.३, बंजार हिल्स,
हैद्राबाद – ३०००३४
३) मॅनेजर,
युनियम बॅंक ऑफ इंडिया,
ग.नं.५, धुळे. ............... जाबदेणार
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदार तर्फे – अॅड.श्री.एम.जी. देवळे)
(जाबदेणार नं.१ तर्फे – अॅड.श्री.एम.एम. पाटील)
(जाबदेणार नं.३ तर्फे – अॅड.श्री.बी.बी. जमादार)
(जाबदेणार नं.२ तर्फे – एकतर्फा)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
१. सामनेवाला क्रमांक १ यांनी सामनेवाला क्रमांक ३ या बॅंकेचा बेअरर धनादेश दिला, पण तो प्रत्यक्षात मिळालाच नाही. त्या धनादेशावर अन्य व्यक्तीनेच पैसे काढले. बेअरर धनादेश देवून आणि तो वटवून सामनेवाला नं.१ व ३ यांनी सेवेत त्रुटी केली. या कारणावरून तक्रारदार यांनी कलम १२ अन्वये सदरची तक्रार दाखल केली.
२. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांचा युनाटेड सर्व्हीसेस नावाने सिक्युरिटी गार्डस् पुरविण्याचा व्यवसाय आहे. सन २००६ ते २००७ या कालावधीत त्यांनी सामनेवाला नं.१ यांना सिक्युरिटी गार्डस् पुरविले. त्याचे पैसे रूपये ३,२५,०००/- बाकी होते. दि.२५/०४/२००८ रोजी तक्रारदार यांनी सामनेवाला नं.१ यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी निदर्शनास आले की सामनेवाले नं.१ यांनी रूपये १,७९,०००/- चा बेअरर धनादेश सामनेवाले नं.३ या बॅंकेचा अदा केला. याबाबत तक्रारदार यांनी सामनेवाले नं.३ यांच्याशी संपर्क साधल्यावर तो संबंधित धनादेश क्रमांक ७४५८६२ दिनांक ०८/०६/२००७ रोजी वटविण्यात आल्याचे उघडकीस आले. वरील क्रमांकाचा धनादेश आपल्याला मिळलाच नाही. अन्य व्यक्तीला देवून सामनेवाले नं.१ व ३ यांनी सेवेत त्रुटी केली केली, असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. सामनेवाले यांच्याकडून रूपये १,७९,०००/- एवढी रक्कम, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रूपये १०,०००/- तक्रारीचा खर्च रूपये ५,०००/- मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
३. आपल्या तक्रारीच्या पुष्ट्यर्थ तक्रारदार यांनी सामनेवाले नं.३ यांना पाठविलेली दि.३१/०५/२००८ रोजीची तक्रार (निशाणी ५/१), सामनेवाले नं.३ यांनी तक्रारदारांना पाठविलेले दि.०६/०६/२००८ रोजीचे उत्तर (निशाणी ५/२) दाखल केले आहे.
४. मंचाची नोटीस मिळाल्यानंतर सामनेवाले नं.१ व ३ हजर झालेत. त्यांनी आपला खुलासाही दाखल केला. सामनेवाले नं.१ यांनी दाखल केलेल्या खुलाशात (निशाणी २२) म्हटले आहे की, तक्रारदारांचा तक्रार अर्ज चुकीचा, खोटा आहे. दि.१०/०३/२००७ रोजी युनाटेड सर्व्हीसेस लि.नावाने युनियन बॅंकेचा धनादेश क्रमांक ७४५८६२ हा तक्रारदारास दिला. रक्कम स्विकारल्यानंतर गैर लालसेपोटी तक्रारदार यांनी चुकीची तक्रार दाखल केली आहे. धनादेश बेअरर द्यायचा की, रोखीने याचा पूर्ण अधिकार सामनेवाला यांना आहे. त्यानुसार पूर्ण खात्री करूनच सामनेवाला यांनी तक्रारदार यांना धनादेश दिला. त्यामुळे सामनेवाले यांनी सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. सबब तक्रार रद्द करावी अशी मागणी सामनेवाले नं.१ यांनी केली आहे.
५. आपल्या खुलाशाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी प्रोजेक्ट मॅनेजर अशिलेशकुमार पांडे यांचे शपथपत्र (निशाणी २३) दाखल केले आहे.
६. सामनेवाले नं.३ यांनीही आपला खुलासा दाखल केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, तक्रारदार हे बॅंकेचे ग्राहक नाहीत. त्यामुळे त्यांना बॅंकेविरूध्द तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. तक्रारदार यांच्या तक्रारीतील मजकूर खोटा, लबाडीचा आणि दिशाभूल करणारा आहे. सामनेवाले नं.१ यांनीच रेखांकीत धनादेश देणे आवश्यक होते. मात्र धनादेश देणा-यावर तसे बंधन नाही. त्यामुळे बॅंकेने या प्रकरणात कोणतीही चूक अगर निष्काळजीपणा केलेला नाही. तक्रारदार व बॅंक यांच्यात कोणत्याही प्रकारचे ग्राहक व विक्रेता असे संबंध नाहीत. त्यामुळे बॅंकेविरूध्दची सदर तक्रार रद्द होण्यास पात्र आहे.
७. सामनेवाले नं.३ यांनी आपल्या खुलाशाच्या पुष्ट्यर्थ बॅंकेचे शाखाधिकारी सुधीर भाऊराव पाटील यांचे शपथपत्र (निशाणी १८) दाखल केले आहे.
८. मंचाची नोटीस मिळूनही सामनेवाला नं.२ हजर झाले नाहीत, किंवा त्यांनी खुलासा दाखल केला नाही. त्यामुळे त्यांच्याविरूध्द ‘एकतर्फा’ आदेश करण्यात आला.
९. तक्रारदार यांचा अर्ज, सामनेवाला नं.१ व ३ यांनी दाखल केलेला खुलासा पाहिल्यावर आणि तक्रारदार आणि सामनेवाला नं.१, सामनेवाला नं.३ यांच्या वकीलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मंचासमोर पुढील मुद्दे उपस्थित होतात. त्यांची उत्तरेही आम्ही सकारण देत आहोत.
१०. मुद्दे निष्कर्ष
अ. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक
आहेत का ? नाही
ब. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केली
आहे काय ? नाही
क. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
विवेचन
११. मुद्दा ‘अ’ - तक्रारदार यांचा सिक्युरिटी गार्ड पुरविण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी सामनेवाला नं.१ यांना सिक्युरिटी गार्ड पुरविले होते. दोघांमध्ये तसा करार झाला होता. तक्रादार यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे त्यांनी सामनेवाला नं.१ यांना सिक्युरिटी गार्ड पुरवून सेवा दिली होती. याचा अर्थ सामनेवाला नं.१ यांनी तक्रारदाराकडून सिक्युरिटी गार्डची सेवा घेतली होती. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार एखाद्या संस्थेकडून कराराने किंवा पैसे देवून कोणतीही सेवा घेणारा किंवा सेवा घेण्याचा करार करणारा व्यक्ती त्या संस्थेचा ग्राहक ठरत असतो. सदर तक्रार अर्जानुसार सामनेवाला नं.१ यांनी तक्रारदाराकडून सेवा घेतली होती. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला नं.१ यांचे ग्राहक होत नाही. तर तक्रारदार यांचे सामनेवाला नं.३ यांच्या बॅंकेत कोणतेही खाते नाही. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार एखाद्या व्यक्तीने संबंधित संस्थेकडून सेवा घेणे किंवा सेवेचा करार करणे आवश्यक असते. सदर तक्रार अर्जानुसार अर्जदार यांचे सामनेवाला नं.३ यांच्या बॅंकेत खाते नाही. त्यामुळे दोघांमध्ये कोणताही व्यवहार झालेला नाही. याच कारणामुळे तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक ठरू शकत नाही, असे मंचाचे स्पष्ट मत बनले आहे. म्हणूनच मुद्दा ‘अ’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
१२. मुद्दा ‘ब’ – सामनेवाले नं.१ व ३ यांनी सेवेत त्रुटी केली असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. तथापि तक्रारदार यांनी सामनेवाले नं.१ यांच्याकडून कोणतीही सेवा घेतल्याचे त्यांनी सिध्द केलेले नाही. सदर तक्रार अर्जावरून तक्रारदार यांनीच सामनेवाला नं.१ यांना सिक्युरिटी गार्ड पुरविण्याची सेवा दिली आहे, असे दिसते. मग सामनेवाला नं.१ यांनी सेवेत त्रुटी केली असे कसे म्हणता येईल ? तर तक्रारदार हे सामनेवाले नं.३ यांचे ग्राहक नाहीत. सामनेवाले नं.३ यांच्या बॅंकेत तक्रारदार यांचे खाते नाही. दोघांमध्ये कोणताही आर्थिक व्यवहार किंवा करार झालेला नाही. त्यामुळे त्यांच्यात विक्रेता व ग्राहक असे नाते संबंध निर्माण झालेले नाही. तक्रारदार यांच्या तक्रार अर्जानुसार, सामनेवाले नं.१ यांनी अन्य कुणा व्यक्तिला बेअरर धनादेश दिला आणि तो सामनेवाले नं.३ यांनी वटवला. सामनेवाले नं.१ यांनी तक्रारदार यांना धनादेश दिलाच नाही, तो तक्रारदार यांनी स्विकारलाच नाही, आणि तक्रारदार यांनी तो सामनेवाले नं.३ यांच्याकडून वटवलाच नाही. त्यामुळे तिघांमध्ये सूक्ष्म नातेही निर्माण झाले नाही. तक्रारदार यांनी जी सेवा सामनेवाले नं.१ व ३ यांच्याकडून घेतलीच नाही, त्यात त्रुटी निर्माण झाली असे म्हणता येणार नाही. त्यामुळे सामनेवाले नं.१ व ३ यांनी सेवेत त्रुटी केली नाही असे मंचाचे मत बनले आहे. म्हणूनच मुद्दा ‘ब’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
१३. मुद्दा ‘क’ – तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार, सामनेवाला नं.१ व ३ यांनी दाखल केलेला खुलासा, तक्रारदार यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद आणि वरील मुद्यांचा विचार करता तक्रारदार हे सामनेवाला नं.१ व ३ यांचे ग्राहक आहेत आणि सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केली आहे हे तक्रारदार सिध्द करू शकलेले नाही. तक्रारदार यांचे शपथपत्र आणि सामनेवाला नं.३ बॅंकेने पाठविलेले पत्र तक्रारीसोबत दाखल करण्यात आले आहे. त्यावरून तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत आणि सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी केली आहे हे सिध्द होत नाही, असे मंचाचे मत बनले आहे. सबब या कारणावरून सामनेवालांविरूध्द कोणताही आदेश करणे अयोग्य होईल, असे मंचाला वाटते. म्हणून आम्ही पुढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत इतर कोणताही आदेश नाहीत.
धुळे.
दि.१७/०२/२०१४
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.