नि का ल प त्र
श्री.डी.डी.मडके, अध्यक्षः तक्रारदार यांचा विमा दावा विमा कंपनीने कायदेशीर व संयुक्तीक कारण नसतांना नाकारुन सेवेत त्रुटी केली म्हणून तक्रारदार यांनी विम्याचे लाभ मिळणेकरीता प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
१. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी रसिकललाल फाऊंडेशनच्या माध्यमातून शिरपूर विधानसभा मतदार संघातील संपुर्ण मतदारांचा विमा विरुध्द पक्ष दि न्यु इंडीया इन्शुरन्स कंपनी (यापुढे संक्षिप्तेसाठी विमा कंपनी असे संबोधण्यात येईल) यांचेकडे पॉलिसी क्र.४५१७०१/४७/०८/६१/००००००७३ चा विमा उतरवला होता. तक्रारदार यांचा मुलगा दि.२७/०१/०९ रोजी १७.४५ वाजता खामखेडाहून हिरोहोंडा सी.डी. डिलक्स मोटार सायकल क्र.एम.एच.१८-क्यु-६१३१ ने मुंबई-आग्रा हायवे रोड वरुन चोपडा फाटयाकडे जात असतांना शिरपूरकडे जाणा-या टी पॉईंट जवळ समोरुन येणारी मालट्रक नं.एम.एच.१८-एम-२१३६ हीने
तक्रार क्र.३०६/१०
तक्रारदारच्या मुलाच्या गाडीस ठोस दिली व सदर अपघातात तक्रारदारच्या मुलाचा मृत्यु झाला.
२. तक्रारदार यांचे पुढे असे म्हणणे आहे की, सदर घटनेची नोंद शिरपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा क्र.१८/०९ अन्वये करण्यात आली. तसेच सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन अपघात नुकसान भरपाई मिळणेसाठी विमा कंपनीकडे अर्ज केला. परंतू विमा कंपनीने दि.१७/०२/१० रोजी पत्र देऊन नॉन क्म्प्लायन्स नो क्लेम म्हणून विमा दावा नामंजूर केल्याचे कळवले.
३. तक्रारदार यांचे पुढे असे म्हणणे आहे की, विमा कंपनीने अयोग्य कारण देऊन विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी केली आहे.
४. तक्रारदार यांनी शेवटी विमा कंपनीकडून अपघात नुकसान भरपाईची रक्कम रु.२५,०००/-, विमा पॉलिसी क्लेमची रक्कम रु.२५,०००/- व त्यावर दि.१७/०२/१० पासून १८ टक्के दराने व्याज, शारीरीक, मानसिक व आर्थीक त्रासापोटी रु.२५,०००/-, तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.५०००/- व त्यावर १८ टक्के व्याज मिळावे अशी मागणी केली आहे.
५. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ नि.३ वर शपथपत्र तसेच नि.६ वरील कागदपत्रांच्या यादीनुसार ५ कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात नि.६/१ फिर्याद, नि.६/२ वर जबाब, नि.६/३ वर पंचनामा, नि.६/४ वर मरन्नोत्तर पंचनामा, नि.६/५ वर विमा दावा नाकारल्याचे पत्र इ. चा समावेश आहे.
६. विमा कंपनीने आपले लेखी म्हणणे नि.१८ वर दाखल करुन तक्रारदार यांची तक्रार, त्यातील म्हणणे व मागणे खोटे आहे. तक्रार दाखल करण्यास कुठलेही कारण घडलेले नाही तसेच विमा कंपनीने दिलेल्या सेवेत कुठलीही त्रुटी केलेली नाही त्यामुळे तक्रार रद्द करावी अशी विनंती केली आहे.
७. विमा कंपनीने पुढे असे म्हटले आहे की, विमा कंपनीने दिलेल्या कुठल्याही प्रकारची विमा पॉलिसी ही काही विशिष्ट अटी व शर्तीच्या अधिन राहून दिलेली असते. त्या अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक असते. त्यापैकी कुठल्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास विमा कंपनी तिचे नुकसान भरपाई देण्याचे जबाबदारीतून मुक्त होते. तसेच प्रत्येक पॉलिसीच्या बाबतीत काही ठराविक परिस्थितीचा अथवा घटनांचा अपवाद केलेला असतो. जनता पर्सनल पॉलिसीच्या बाबतीतही असे exclusion clauses आहेत. त्या काही ठिकाणी लागू आहेत.
तक्रार क्र.३०६/१०
८. विमा कंपनीने पुढे असे म्हटले आहे की, मयत राहुल प्रविण पाटील हयाचा मृत्यु झाला त्याची पोलिस स्टेशनला गुन्हा क्र.१८/०९ अन्वये नोंद झाली. अपघात समयी त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. परवाना नसतांना मोटार सायकल चालवून स्वतःचे मरण त्याने ओढवून घेतले. त्याचे हे कृत्य अक्षम्य निष्काळजीपणाचे होते. त्यामुळे विमा पॉलिसीतील exclusion clauses लागू होवून मयताचा क्लेम देय राहिला नाही. तक्रारदारास अनेकवेळा पत्र पाठवून त्यास मयताचा वाहन चालक परवाना सादर करावयास सांगितले परंतू ते दाखल न केल्यामुळे नाईलाजाने फाईल बंद करावी लागली. कारण क्लेम देय नव्हता. सदर निर्णय कायदेशीर आहे व त्यात सेवेतील कुठलीही त्रुटी नाही. त्यामुळे तक्रार रद्द होण्यास पात्र आहे.
९. विमा कंपनीने आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ नि.१९ वर शपथपत्र, नि.२३ वर पुराव्याचे शपथपत्र आणि नि.२४ वर लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
१०. तक्रारदार यांनी नि.२१ वर पुराव्याचे शपथपत्र आणि नि.२२/१ वर पॉलिसीची फोटोकॉपी दाखल केली आहे.
११. तक्रारदार यांची तक्रार विमा कंपनीचे म्हणणे व दाखल कागदपत्रे पाहता आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्दे उत्तर
१. विमा कंपनीने विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी
केली आहे काय? होय.
२. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे? अंतिम आदेशा प्रमाणे.
३. आदेश काय? खालील प्रमाणे.
विवेचन
१२. मुद्दा क्र.१ – तक्रारदार यांनी आपल्या शपथपत्रात त्यांचा मुलगा दि.२७/०१/०९ रोजी १७.४५ वाजता खामखेडाहून हिरोहोंडा सी.डी. डिलक्स मोटार सायकल क्र.एम.एच.१८-क्यु-६१३१ ने मुंबई-आग्रा हायवे रोड वरुन चोपडा फाटयाकडे जात असतांना शिरपूरकडे जाणा-या टी पॉईंट जवळ समोरुन येणारी मालट्रक नं.एम.एच.१८-एम-२१३६ हीने तक्रारदारच्या मुलाच्या गाडीस ठोस दिली व सदर अपघातात तक्रारदारच्या मुलाचा मृत्यु झाला. तसेच सदर अपघात
तक्रार क्र.३०६/१०
समोरुन यणा-या गाडीच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेला आहे. त्यात मयताचा काहीही दोष नाही असे म्हटले आहे. त्यांचा विमा दावा विमा कंपनीने चुकीचे कारण देऊन नाकारला आहे.
१३. विमा कंपनीने आपल्या खुलाशामध्ये विमा कंपनीने पुढे असे म्हटले आहे की, विमा कंपनीने दिलेल्या कुठल्याही प्रकारची विमा पॉलिसी ही काही विशिष्ट अटी व शर्तीच्या अधिन राहून दिलेली असते. त्या अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक असते. त्यापैकी कुठल्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास विमा कंपनी तिचे नुकसान भरपाई देण्याचे जबाबदारीतून मुक्त होते. तसेच प्रत्येक पॉलिसीच्या बाबतीत काही ठराविक परिस्थितीचा अथवा घटनांचा अपवाद केलेला असतो. जनता पर्सनल पॉलिसीच्या बाबतीतही असे exclusion clauses आहेत. त्या काही ठिकाणी लागू आहेत.
१४. विमा कंपनीने पुढे असे म्हटले आहे की, मयत राहुल प्रविण पाटील हयाचा मृत्यु झाला त्याची पोलिस स्टेशनला गुन्हा क्र.१८/०९ अन्वये नोंद झाली. अपघात समयी त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. परवाना नसतांना मोटार सायकल चालवून स्वतःचे मरण त्याने ओढवून घेतले. त्याचे हे कृत्य अक्षम्य निष्काळजीपणाचे होते. त्यामुळे विमा पॉलिसीतील exclusion clauses लागू होवून मयताचा क्लेम देय राहिला नाही. तक्रारदारास अनेकवेळा पत्र पाठवून त्यास मयताचा वाहन चालक परवाना सादर करावयास सांगितले परंतू ते दाखल न केल्यामुळे नाईलाजाने फाईल बंद करावी लागली. कारण क्लेम देय नव्हता. सदर निर्णय कायदेशीर आहे व त्यात सेवेतील कुठलीही त्रुटी नाही.
१५. आम्ही तक्रारदार यांनी नि.६/१ ते ६४ वर दाखल केलेल्या पोलिस स्टेशनच्या कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले आहे. त्यावरुन सदर अपघात होण्यास मयत जबाबदार होता असे दिसून येत नाही. तसेच विमा कंपनीचे नि.२२/१ वरील विमा पॉलिसीचे exclusion clauses अवलोकन केले असता, त्यात पुढील प्रमाणे नमुद करण्यात आले आहे.
Provided always that the Company shall not be liable under policy for:
1. ………
2. ………
3. ………
4. Payment of compensation in respect of death] disablement of the Insured from (a) intentional self injury suicide or attempted suicide (b) Whilst under the influence of intoxicating liquor or drug. (c) Directly or indirectly caused by insanity. (d) Arising or resulting from the Insured committing breach of the law with criminal intent.
१६. आम्ही सदर तरतुदींचे बारकाईने अवलोकन केले आहे. त्यामध्ये (d) Arising or resulting from the Insured committing breach of the law with criminal intent या विमेदारास
तक्रार क्र.३०६/१०
लागू आहे असेही दिसून येत नाही. कारण मयताचा मोटर सायकलवर जात असतांना कुठल्याही प्रकारे criminal intent होता असे म्हणता येणार नाही. यावरुन विमा कंपनीने exclusion clauses च्या आधारे विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी केली आहे असे दिसून येते. त्यामुळे मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
१७. मुद्दा क्र.२ – तक्रारदार यांनी विमा कंपनीकडून अपघात नुकसान भरपाईची रक्कम रु.२५,०००/-, विमा पॉलिसी क्लेमची रक्कम रु.२५,०००/- व त्यावर दि.१७/०२/१० पासून १८ टक्के दराने व्याज, शारीरीक, मानसिक व आर्थीक त्रासापोटी रु.२५,०००/-, तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.५०००/- व त्यावर १८ टक्के व्याज मिळावे अशी मागणी केली आहे. सदर पॉलिसी रु.२५,०००/- ची असल्यामुळे तक्रारदार हे विमा क्लेमची रक्कम रु.२५,०००/- मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत. तसेच सदर रकमेवर विमा दावा नाकारल्याची तारीख दि.१७/०२/१० पासून द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज मिळण्यासही तक्रारदार पात्र आहे. तसेच मानसिक त्रास व अर्जाच्या खर्चाची मागणी अवास्तव वाटते. तक्रारदार मानसिक त्रासापोटी रु.२०००/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.१०००/- मिळण्यास पात्र आहे.
१८. मुद्दा क्र.३ - वरील विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
२. विरुध्द पक्ष दि न्यु इंडीया इन्शुरन्स कं.लि. यांनी तक्रारदारास रक्कम रु.२५,०००/- व त्यावर दि.१७/०२/१० पासून द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज या आदेशाच्या प्राप्ती पासून ३० दिवसाच्या आत द्यावेत.
३. विरुध्द पक्ष दि न्यु इंडीया इन्शुरन्स कं.लि. यांनी मानसिक त्रासापोटी रु.२०००/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.१०००/- या आदेशाच्या प्राप्ती पासून ३० दिवसाच्या आत द्यावेत.
(सी.एम.येशीराव) (डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे