निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 15/03/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 08/07/2013 तक्रार निकाल दिनांकः- 10/03/2014
कालावधी 08 महिने. 02 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
वनिता भ्र.चंमनराव बोकारे, अर्जदार
वय 28 वर्षे. धंदा.घरकाम. अॅड.मा.तु.पारवे.
रा.फुकटगाव ता.पूर्णा,जि.परभणी.
विरुध्द
1 व्यवस्थापक, गैरअर्जदार.
रिलायन्स जनरल इन्शूरन्स कंपनी लि. 4 था मजला, अॅड.जी.एच.दोडीया.
चिंतामणी अव्हेन्यु कार्यालय वेस्टर्न एक्सप्रेस हायवे नेक्स्ट
टू विरवाणी इंडस्ट्रीयल इस्टेट, गोरेगाव पूर्व मुंबई 400063.
2 व्यवस्थापक, स्वतः
कबाल इन्सुरन्स ब्रोकींग सर्विसेस प्रा.लि.राज अपार्टमेंट,
प्लॉट नं.19 जी सेक्टर रिलायन्स फ्री वेहीच्या मागे,
औरंगाबाद.
3 मा.तहसिलदार साहेब,
तहसिल कार्यालय, पूर्णा
ता.पूर्णा जि.परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिच्या मयत पतीचा विमादावा ताटकाळत ठेवून अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराचे पती नामे चंपतराव रंगनाथराव बोकारे यांचा दिनांक 26/04/2009 रोजी त्यांना मोटार सायकलने धडक देवुन अपघात झाला व त्यात ते गंभीर जखमी होवुन मरण पावले.
अर्जदाराचे म्हणणे की, तिचे मयत पती हे शेतकरी असल्यामुळे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळावा म्हणून दिनांक 23/06/2009 रोजी मुदतीच्या आत तिच्या मयत पतीचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 3 कडे दाखल केला होता. त्यानंतर संबंधीतास अर्जदाराने आपल्या विमा दाव्याबाबत चौकशी केली असता, उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे शेवटी अर्जदाराने तिच्या वकिला मार्फत दिनांक 08/02/2013 रोजी गैरअर्जदार नं. 1 ते 3 यांना नोटीस दिली तरी देखील गैरअर्जदाराने आज तागयत पर्यंत तिच्या मयत पतीच्या विम्यादाव्या बाबत कांहीही कळविले नाही व अर्जदारास सेवेत त्रुटी दिली. म्हणून सदरची तक्रार मंचासमोर दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार मंजूर करुन गैरअर्जदारांना आदेश करावा की, त्याने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिच्या मयत पतीच्या विम्या दाव्यापोटी 1 लाख रु. 26/06/2009 पासून 15 टक्के दराने अर्जदारास द्यावेत व तसेच सेवात्रुटी व दावाखर्च पोटी 21,000/- गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचे आदेश व्हावेत.
तक्रार अर्जाच्या पुष्टयार्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 5 वर 19 कागदपत्राच्या प्रती दाखल केले आहेत. ज्यामध्ये दिनांक 03/07/2009 चे तहसिल कार्यालयाचे पत्र, क्लेमफॉर्म भाग 1, 2 व 3, रहिवाशी प्रमाणपत्र, मृत्यूचा दाखला, बँक पासबुक, वारसाचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड, ओळखपत्र, फेरफार, 7/12, होल्डींग, एफ.आय.आर. घटना स्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, पी.एम. रिपोर्ट, नोटीस, पोच पावती, शासन परिपत्रक इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या.
गैरअर्जदार क्रमांक 1 वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 8 वर आपला लेखी जबाब सादर केला. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व तसेच अर्जदार वा त्याचे पती आमचे ग्राहक नाहीत वा त्याने विम्याच्या हप्त्यापोटी त्यानी आमचेकडे हप्ता देखील भरलेला नाही. या कारणास्तव सदरची तक्रार खारीज होणे योग्य आहे.
गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे की, आम्ही अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्या प्रमाणे सदरची तक्रार मंचात चालु शकत नाही. तसेच अर्जदाराने कोणताही विमादावा त्यांच्याकडे दाखल केलेला नाही. त्यामुळे विमादावा नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी देण्याचा प्रश्नच उदभवत नाही व तसेच विमा कंपनीचे म्हणणे की, मयताचा अपघात हा दिनांक 26/04/2009 रोजी झालेला आहे व सदरची तक्रार ही 2013 मध्ये दाखल केली आहे व सदरची तक्रार 4 ½ वर्षा नंतर दाखल केली आहे जे की, मुदत बाहय आहे व ती खारीज होणे योग्य आहे. म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
गैरअर्जदार क्रमांक 2 मंचासमोर हजर व नि.क्रमांक 14 वर आपला लेखी जबाब सादर केला व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदार आमचे ग्राहक नाहीत ते फक्त विमा कंपनीचे ग्राहक आहेत. आम्ही केवळ मध्यस्थ सल्लागार आहोंत व शासनास विना मोबदला सहाय्य करतो तसेच या कामासाठी आम्ही कोणताही विमा हप्ता घेतलेला नाही.
गैरअर्जदार क्रमांक 2 चे म्हणणे की, मयत चंपत रंगनाथ बोकरे गाव फुकटगाव ता.पर्णा जि परभणी यांचा अपघात हा दिनांक 26/04/2009 रोजी झाला, सदरील प्रस्ताव हा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय परभणी मार्फत आमच्या कार्यालयास प्राप्त झाला व तो प्रस्ताव आमच्याकार्याल्या मार्फत रिलायन्स जनरल इन्शुरंन्स कंपनीला दिनांक 04/11/2009 रोजी पाठविलेला आहे. सदरचा विमादावा रिलायंस जनरल इंशुरंन्स कंपनीकडे प्रलंबीत आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार 5,000/- रु. खर्च आकारुन आम्हांस सदर तक्रारीतून मुक्त करावे.
गैरअर्जदार क्रमांक 2 याने लेखी जबाबाच्या पुष्टयार्थ नि.क्रमांक 14/1 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 यास मंचाची नोटीस तामील होवुनही मंचासमोर हजर नाहीत, त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने शेतकरी अपघात
विमा योजने अंतर्गत अर्जदाराच्या मयत पतीचा
विमादावा मंजूर करण्याचे प्रलंबीत ठेवुन अर्जदारास
सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराचे पती नामे चंपतराव रंगनाथ बोकारे यांना फुकटगाव ता.पूर्णा शिवारात गट क्रमांक 157 मध्ये 1 हेक्टर 25 आर जमीन होती व ते शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत ते लाभार्थी होते. ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 5/11 वरील फेरफार नक्कल, नि.क्रमांक 5/12 वरील 7/12 उतारा तसेच नि.क्रमांक 5/13 वरील गाव नमुना नं. 8 (अ) या रेव्हेन्यु रेकॉर्डवरुन सिध्द होते. अर्जदार ही मयत चंपतराव बोकारे यांची पत्नी वारसदार आहे. ही बाब नि.क्रमांक 5/4 वर दाखल केलेल्या तलाठ्याच्या प्रमाणपत्रावरुन सिध्द होते.
अर्जदाराचे पती चंपतराव रंगनाथराव बोकारे यांचा दिनांक 26/04/2009 रोजी गाव खुजडा ता.पूर्णा येथे पूर्णा ताडकळस रोडवर सदर गावाजवळ मोटार सायकल क्रमांक MH-22-J- 6629 च्या चालकाने सदरचे वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन अर्जदाराच्या पतीस धडक दिली व त्यात गंभर जखमी होवुन अपघाती मरण पावले. ही बाब नि.क्रमांक 5/14 वरील दाखल केलेल्या पूर्णा पोलीस स्टेशनच्या एफ.आय.आर. प्रतीवरुन व तसेच नि.क्रमांक 5/15 वरील दाखल केलेल्या घटनास्थळ पंचनाम्याच्या व मरणोत्तर पंचनाम्याच्या प्रतीवरुन सिध्द होते. व तसेच सदरची बाब नि.क्रमांक 5/16 वर दाखल केलेल्या पी.एम. रिपोर्ट वरुन सिध्द होते.
अर्जदाराने शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळावा म्हणून सदर विमा योजने अंतर्गत तिच्या मयत पतीचा विमादावा सर्व कागदपत्रासह गैरअर्जदार क्रमांक 3 कडे दाखल केला होता. ही बाब नि.क्रमांक 5/2 वर दाखल केलेल्या तहसिलदार पूर्णा यांनी विनीत आठल्ये औरंगाबाद यास लिहिलेल्या पत्रावरुन व तसेच नि.क्रमांक 5/3 वर दाखल केलेल्या क्लेमफॉर्म भाग -1, नि.क्रमांक 5/4 वरील क्लेमफॉर्म भाग -2 कागदपत्रावरुन सिध्द होते.
अर्जदाराने सदरच्या विमादावा बाबत मंजुरीसाठी वकिला मार्फत दिनांक 08/02/2013 रोजी गैरअर्जदारास नोटीस पाठविली होती. ही बाब नि.क्रमांक 5/17 वर दाखल केलेल्या नोटीसीच्या प्रतीवरुन सिध्द होते.
अर्जदाराच्या सदर विमादाव्या बाबत गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीचे लेखी जबाबात म्हणणे की, अर्जदाराच्या मयत पतीचा विमादावा अर्जदाराने त्यांचेकडे दाखल केलेला नाही. हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही. कारण गैरअर्जदार क्रमांक 2 याने दाखल केलेल्या नि.क्रमांक 14 वरील लेखी जबाबात म्हंटले आहे की, अर्जदाराच्या सदरचा विमादावा त्यांच्याकडे प्राप्त झाला व तो विमा दावा त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीकडे पाठविला व तो विमादावा विमा कंपनीकडे प्रलंबीत आहे. सदर गैरअर्जदार क्रमांक 2 चे म्हणण्यात तथ्य आहे. असे मंचास वाटते कारण नि.क्रमांक 13 वर दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, विमा कंपनीने दिनांक 29/04/2013 रोजी अर्जदारास पत्र पाठवुन 1) पोस्टमार्टेम रिपोर्ट, 2) Valid Driving License या कागदपत्राची मागणी केली होती. हे सिध्द होते. याचाच अर्थ असा होतो की, अर्जदाराचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीकडे दिनांक 29/04/2013 रोजी पर्यंत प्रलंबीत आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने आपल्या लेखी जबाबात धडधडीतपणे व बेजबाबदारपणे अर्जदाराचा विमादावा त्यांच्याकडे आला नाही, असे खोटे कथन कले आहे. सदर गैरअर्जदार विमा कंपनीची वर्तणुक मंचास योग्य वाटत नाही, अर्जदाराचा विमादावा विमा कंपनीकडे अजुनही प्रलंबीत असले कारणाने विमा कंपनीचे लेखी जबाबात म्हंणणे की, सदरची तक्रार मुदत बाहय आहे. हे मंचास योग्य वाटत नाही. व सदरची तक्रार मुदतीत वरील कारणास्तव आहे. असे मंचाचे मत आहे. याबाबत मा.राज्य आयोग मुंबई यांनी F.A. No. A/10/1255 आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड विरुध्द श्रीमती सकुबाई पाटील या प्रकरणा मध्ये दिलेला निकाल प्रस्तुत प्रकरणास तंतोतंत लागु पडतो.
तसेच विमा कंपनीने दिनांक 29/04/2013 रोजीच्या पत्राव्दारे अर्जदारास सदरची कागदपत्राची मागणी करणे मंचास योग्य वाटत नाही. कारण नि.क्रमांक 5/2 वर दाखल कागदपत्रावरुन स्पष्ट होते की, अर्जदाराने विमादावा दाखल करते वेळी सर्वच्या सर्व 14 कागदपत्रे प्रस्तावा सोबत दाखल केली होती, व तसेच विमा कंपनीने मयताचे Driving License ची अर्जदारास मागणी करणे मंचास योग्य वाटत नाही. कारण नि.क्रमांक 5/14 वर दाखल केलेल्या एफ. आय.आर. च्या प्रतीवरुन हे सिध्द होते की, गाडी क्रमांक MH-22- J- 6629 च्या चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे सदरचे वाहन चालवुन मयत चंपत बोकारे यास धडक दिली व त्यात गंभरी जखमी होवुन चंपत बोकारे हा अपघातात मयत झाला. अपघाता वेळी मयत चंपत बोकारे हा वाहन चालवत नव्हता हे स्पष्टपणे दिसते. म्हणून मयताचे Driving License ची मागणी करणे योग्य वाटत नाही. तसेच मयत चंपत बोकारे हा वाहन चालवत असतांना अपघातात मृत्यू झाला. याबाबत विमा कंपनीने कोणताही कागदोपत्री ठोस पुरावा मंचासमोर आणला नाही.
गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने अर्जदाराच्या मयत पतीचा विमादावा अनावश्यक कागदपत्राची मागणी करुन प्रलंबीत ठेवुन अर्जदारास निश्चित सेवेत त्रुटी दिली आहे. असे मंचाचे ठाम मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने आदेश तारखे पासून 30 दिवसाच्या आत
शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत अर्जदाराच्या मयत पतीच्या विमा
दाव्यापोटी रु. 1,00,000/- फक्त ( अक्षरी रु. एकलाख फक्त ) अर्जदारास
द्यावेत.
3 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.