::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. किर्ती गाडगीळ (वैदय) )
(पारीत दिनांक :- 27/07/2017)
1. अर्जदार हा चंद्रपूर येथील रहिवासी असून गरअर्जदार क्र.1 यांच्या राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेअंतर्गत गैरअर्जदार क्र.2 यांचे रूग्णालयात उपचाराकरीता तो व त्याचे कुटूंबातील सदस्य लाभार्थी असून ते सर्व गैरअर्जदार क्र.1 ते 4 यांचे ग्राहक आहेत. अर्जदाराच्या नवजात नातवाला पिलीया हा रोग झाल्यामुळे अर्जदार दि.12/5/2012 रोजी अर्जदार त्याला गैरअर्जदार क्र.2 यांच्या रूग्णालयात उपचाराकरीता रात्री 9.30 वाजता घेवून गेला असता तेथील वैद्यकीय अधिका-याने त्याची तपासणी केली व लगेच रू.33,000/- रूग्णालयात नगदी जमा करावयांस सांगितले. अर्जदाराने, राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेचे कार्ड गैरअर्जदार क्र.2 ला दाखविले व तो दारिद्रय रेषेखालील व्यक्ती असून नवजात शिशूवर सदर योजनेअंतर्गत उपचार करण्याची विनंती केली. गैरअर्जदार क्र.2 ने अर्जदाराकडून ट्रिटमेंट कार्ड चे रू.100/- घेतले व त्यानंतर त्यांच्याकडील एम.एच.सी. कार्ड मशीन तात्पुरती बंद असल्याचे सांगून तात्काळ नगदीने रू.33,000/- भरा नाही तर रूग्ण् शिशूला दुस-या दवसाखान्यांत घेवून जा असे सांगितले. म्हणून अर्जदाराने रात्री 11 च्या दरम्यान रूग्ण् शिशूला शासकीय रूग्णालयात हलविले परंतु दुस-याच दिवशी रूग्ण् शिशूचा मृत्यू झाला. अर्जदार हा बि.पी.एल सुविधाधारक व्यक्ती असून त्याच्या नातवांस गैरअर्जदार क्र.1 च्या कार्ड योजनेनुसार गैरअर्जदार क्र.2 च्या रूग्णालयात उपचार मिळणे आवश्यक होते आणी गैरअर्जदार क्र.2 कडील एमएचसी कार्ड मशीनमध्ये तात्पुरता बिघाड झाल्यामुळे सदर सुविधा तात्पुरत्या स्वरूपात बंद आहे हे गैरअर्जदार क्र.2 यांचे म्हणणे कायदेशीर नाही व त्या कारणास्तव गैरअर्जदार क्र.2 हे सदर कार्डअंतर्गत सुविधा नाकरू शकत नाहीत. गैरअर्जदार क्र.2 यांनी गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांच्याशी विचार विनिमय करून लगेच उपचार दिले असते तर नवजात शिशूचा मृत्यू झाला नसता सबब गैरअर्जदार क्र.1 ते 4 हे सदर मृत्यूंस जबाबदार आहे. याबद्दल अर्जदाराने गैरअर्जदारांना पत्र पाठविले परंतु त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. सबब गैरअर्जदार क्र.1 ते 4 यांनी अर्जदारांस सेवा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार मंचात दाखल केली आहे.
2. तक्रारकर्त्याने विनंती केली आहे की गैरअर्जदार क्र.1 च्या विमा योजनेच्या कार्ड अंतर्गत गैरअर्जदार क्र.2 यांनी उपचार नाकारल्यामुळे नवजात शिशूचा मृत्यू झाला त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 ते 4 यांच्याकडून वैयक्तीक किंवा संयुक्तरीत्या, नुकसान भरपाईपोटी रू.2 लाख व तक्रारीच्या खर्चापोटी रू.10,000/- तक्रारकर्त्याला देण्याबाबत आदेश व्हावेत.
३. गैरअर्जदार क्र.1 ते 4 यांना मंचाचा नोटीस पाठविण्यांत आला. गैरअर्जदार क्र.1 यांनी नोटीस प्राप्त होवूनदेखील ते मंचात उपस्थीत न झाल्याने त्यांच्याविरूध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारीत करण्यांत आला.
4. गैरअर्जदार क्र.2 यांनी मंचात उपस्थीत होवून त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले असून तक्रारीतील कथन नाकबूल केले आहे. आपल्या विशेष कथनात त्यांनी नमूद केले की गैरअर्जदार क्र.2 ही धर्मदाय संस्था असून संस्थेमार्फत सार्वजनीक, सामाजीक आरोग्य विषयक सेवा समाजातील दलीत, पिडीत, आर्थीकदृष्टया अक्षम, अपंग व्यक्तींना पुरविण्याच्या हेतूने गैरअर्जदार क्र.2 यांनी रूग्णालय चालविले आहे.सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेच्या अंतर्गत गैरअर्जदार क्र.2 चे रूग्णालय आरबीआय स्मार्टकार्डचे सुविधेत उपलब्ध करण्यांत आले आहेत. या सुविधेअंतर्गत रू.30,000/- पर्यंत उपचाराची तरतूद आहे. अर्जदार दि.12/5/2012 रोजी नवजात बाळाला गैरअर्जदार क्र.2 यांच्या रूग्णालयात उपचाराकरीता रात्री 9.30 वाजता घेवून आला. गैरअर्जदाराच्या कर्मचा-यांनी बाळाला ताबडतोब आकस्मीक रूग्ण विभागात पाठविले. तेथे त्याची बाळरोग तज्ञांने तपासणी केली व बाळयाच्या रक्ततपासणीचा सल्ला दिला. बाळाच्या आईवडिलांनी, ते बी.पी.एल.कार्डधारक असून बाळाच्या आजोबांच्या म्हणजेच अर्जदार श्री.रामदास सातपुते यांच्या एन.एच.सी. योजनेअंतर्गत अंतर्भूत आहेत असे सांगितले. परंतु काही तांत्रिक कारणामुळे तुर्त काही कालावधीकरीता बंद असल्याचे गैरअर्जदार क्र.2 ने अर्जदाराला सांगितले. बाळाची अवस्था गंभीर आहे असे सांगूनदेखील बाळाच्या आईने स्वतःच्या जबाबदारीवर बाळाला दुस-या रूग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला व त्याप्रमाणे गैरअर्जदार क्र.2 ला लेखी संमतीपत्र लिहून दिले. त्यानंतर त्यांनी बाळाला कोठे नेले याबद्दल गैरअर्जदार क्र.2 ला काहीही माहिती नाही. एन.एच.सी.कार्डचे यंत्र बंद असूनही बाळावर उपचार करण्यांस गैरअर्जदार तयार होते परंतु त्याच्या आईवडिलांनी स्वतःच्या जबाबदारीवर बाळाला दुस-या रूग्णालयात हलविले व तेथील उपचारामुळे बाळ मृत्यू पावल्याची शक्यता नाकारता येत नाही. एन.एच.सी.कार्डचे यंत्र बंद असूनही बाळावर उपचार करण्यांस गैरअर्जदार क्र.2 तयार होते परंतु त्याच्या आई वडिलांनी जबरदस्तीने त्याला दुस-या रूग्णालयात हलविले व तेथील उपचारामुळे बाळ मरण पावल्याची शक्यता नाकारता येत नाही. गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदाराला रू.33,000/- ची मागणी केली ही बाब खोटी आहे. गैरअर्जदार क्र.2 रूग्णालयात एन.एच.सी.मशीन गैरअर्जदार क्र.1,3 व 4यांच्या देखरेखीखाली लावण्यांत आले होते. यंत्राबाबत काहीही तक्रार असल्यांस गैरअर्जदार क्र.4 यांना सूचना देणे आवश्यक असते व तशी सुचना गैरअर्जदार क्र.2 यांनी गैरअर्जदार क्र.4 यांना दिली होती व मशीनदेखील दुरूस्तीकरीता पाठविले होते. परंतु नवजात बाळाचे आई वडिल असतांना अर्जदारांस गैरअर्जदारांविरूध्द तक्रार दाखल करण्याचा कायदेशीर अधिकार नाही. राष्ट्रीय स्वास्थ्य योजनेनुसार कुटूंबातील 5 व्यक्तींचा कार्डमध्ये समावेश होतो व कार्ड काढीत असतांना त्या व्यक्ती हजर असाव्या लागतात व त्यांचे फोटो तसेच हाताचे ठसे सुध्दा आवश्यक असतात. परंतु सदर प्रकरणात रूग्ण हा एक नवजात शिशू असून त्याचा सदर कार्डमध्ये समावेश नव्हता. तक्रारकर्त्याला डिसेंबर,2011 मध्ये सदर कार्ड देण्यांत आले होते व त्याचा कालावधी एक वर्षाचा असतो. मृतक बाळाचे आईला प्रसूतीकरीता आधी प्राथमीक आरोग्य केंद्रात भरती करण्यांत आले होते, परंतु तेथे वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे तिची प्रसूती एका परिचारिकेने केली असा तक्रारकत्र्याने उल्लेख केलेला आहे. त्यामुळे सदर बाळ गैरअर्जदार क्र.2 कडे आणण्यापूर्वीच आजारी पडले व त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बाळाचा मृत्यू झाला त्या रूग्णालयाला प्रस्तूत तक्रारीत पक्षकार करणे आवश्यक होते. प्रस्तूत प्रकरणात गैरअर्जदार क्र.2 ची काहीही चुक नसतांना त्याला प्रकरणात गोवण्यांत आले आहे. गैरअर्जदार क्र.2 ने सेवेत कोणतीही न्युनता दिलेली नसल्यामुळे त्यांच्याविरूध्द तक्रार खारीज करण्यांत यावी अशी विनंती केली आहे.
5. गैरअर्जदार क्र.3 यांनी मंचात उपस्थीत होवून त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले असून तक्रारीतील कथन अमान्य केले आहे. आपल्या विशेष कथनात त्यांनी नमूद केले की गैरअर्जदार क्र.2 कडे बाळाला उपचाराकरीता आणल्यानंतर तेथे त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु त्यादरम्यान बी.पी.एल.कार्डसुविधा यंत्रात बिघाड असल्याचे गैरअर्जदार क्र.2 यांना समजले व त्यामुळे बाळाची परिस्थिती गंभीर असूनही बाळाच्या आईवडिलांनी त्याला दुस-या रूग्णालयात हलविजले व त्यामुळे बाळावर पुढील उपचार गैरअर्जदार क्र.2 करू शकले नाहीत. अर्जदाराच्या तक्रारीवरून वरीष्ठांच्या निर्देशानुसार संबंधीत वैद्यकीय अधिकारी यांची चौकशी करण्यांत आली परंतु बाळाच्या उपचाराकरीता कोणताही विलंब केलेला नसल्यामुळे गैरअर्जदार क्र.1 ते 4 यांची जबाबदारी नाही. तक्रारकर्त्याने त्याच्या कुटूंबातील सदस्यांचे दस्तावेज दाखल केलेले नसल्यामुळे अर्जदार व शिशू हे ग्राहक होत नाहीत. अर्जदाराच्या तक्रारीवरून स्पष््ट होते की, अर्जदाराने गैरअर्जदार क्र.3 यांच्याकडे कोणताही विमा दावा दाखल केलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्र.3 हे कोणत्याही नुकसान-भरपाईंस जबाबदार नसून त्यांच्याविरूध्द तक्रार खारीज करण्यांत यावी अशी विनंती केली आहे.
6.गैरअर्जदार क्र.4 यांनी मंचात उपस्थीत होवून त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले. त्यात त्यांनी नमूद केले की, गैरअर्जदार क्र.2 यांचे रूग्णालयात अर्जदाराजवळ स्मार्ट कार्ड असूनही अर्जदाराच्या नवजात नातवाला उपचाराची सुविधा मिळाली नाही व या घटनेची माहिती त्यांना सहा दिवसांनी त्यांच्या कंपनीकडून मिळाली. सदर माहिती संबंधीत डॉक्टरांकडून मिळावयांस हवी होती. परंतु त्यावेळी गैरअर्जदार क्र.2 च्या डॉक्टरांनी तशी माहिती न देता रूग्ण शिशूला सरकारी रूग्णालयांस रेफर केले व तेथे त्याचा मृत्यू झाला. त्याच वेळी गैरअर्जदार क्र.2 च्या डॉक्टरांनी तशी माहिती दिली असती तर मॅन्युअली उपचार सुरू करता आला असता व बाळाचा जीव वाचला असता. परंतु गैरअर्जदार क्र.2 ने डॉक्टरअसूनही रूग्णाच्या आई वडिलांना पूर्ण माहिती दिली नाही. मॅन्युअल उपचाराची माहिती डॉ.बनींनी त्यांच्या स्टाफलासूध्दा दिलेली नव्हती तसेच गैरअर्जदार क्र.4 यांचा मोबाईल नंबर असूनदेखील त्यांनासूध्दा त्याबाबत माहिती दिली नाही. अशाच परिस्थितीत अन्य रूग्णालयातसुध्दा मॅन्युअली ट्रिटमेंटची सूचना गैरअर्जदार क्र.4 यांनी यापूर्वी दिलेली आहे.
7. तक्रारदारांची तक्रार, दस्ताऐवज, गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे, तक्रारदारांचे शपथपत्र, तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद तसेच तसेच तोंडी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता तक्रार निकालकामी खालील मुद्दे तयार करण्यांत येतात.
कारण मिमांसा
8. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 च्या स्वास्थ्य विमा योजनेअंतर्गत त्याच्या नवजात नातवाला, गैरअर्जदार क्र.2 यांच्या रूग्णालयात उपचाराकरीता नेले होते. लेखी उत्तरात गैरअर्जदार क्र.2 यांनी आक्षेप घेतला आहे की, तक्रारकर्त्याच्या नवजात नातवाच्या नांवाची नोंद कार्डमध्ये नाही. परंतु मंचाच्या मते अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 च्या स्वास्थ्य विमा योजनेअंतर्गत कार्ड काढले असून त्याचे कुटूंबिय सदर योजनेचे लाभार्थी आहेत. गैरअर्जदार क्र.1 ने या बाबीला अमान्य केलेले नाही. शिवाय केवळ पाच दिवसांपूर्वी जन्मलेल्या बाळाचे नांव सदर योजनेंत अंतर्भूत करणे अशक्य असल्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1,2,3 यांचा ग्राहक असून त्याचे कुटूंबिय सदर योजनेचे लाभार्थी आहेत.
9. गैरअर्जदार क्र.1 ला नोटीस प्राप्त होवूनही ते उपस्थीत न झाल्यामुळे त्यांच्याविरूध्द एकतर्फी कारवाईचा आदेश पारीत करण्यांत आला व तो आजतागायत अबाधीत आहे.
अर्जदाराने त्याच्या नवजात नातवाची प्रकृती बिघडल्याने गैरअर्जदार क्र.2 यांच्या दवाखान्यात रात्री 9.30 वाजता नेले. गैरअर्जदार क्र.2 यांच्या उत्तराप्रमाणे त्यांचे रूग्णालय हे धर्मदाय असून दारिद्रय रेषेखालील दुर्बल लोकांवर ते उपचार करीत असतात. असे असूनदेखील अर्जदाराकडे उपचाराकरीता रक्कम नसल्यामुळे व गैरअर्जदार क्र.1 च्या स्वास्थ्य विमा योजनेचे कार्ड त्याच्याकडे आहे असे सांगितल्यावरही,केवळ दवाखान्यातील एन.एच.सी. मशीन नादुरूस्त असल्यामुळे गैरअर्जदार क्र.2 ने शिशूवर उपचार केला नाही. त्यामुळे अर्जदाराप्रती गैरअर्जदार क्र.2 चे सेवेत न्यूनता दिसून येते. तसेच गैरअर्जदार क्र.4 यांनी त्यांचे लेखी उत्तरात स्पष््ट केले आहे की एन.एच.सी.मशीन नादुरूस्त असले तरी मॅन्युअली उपचार सुरू केले जावू शकतात परंतु गैरअर्जदार क्र.2 ने गैरअर्जदार क्र.4 यांचेशी संपर्क साधून तशी माहिती ताबडतोब दिली असती तर मॅन्युअली उपचार सुरू होवून शिशूचा जीव वाचू शकला असता. याबाबत गैरअर्जदार क्र.2 चा निष्काळजीपणा दिसून येतो.
10. गैरअर्जदार क्र.4 यांनी आपल्या लेखी उत्तरात प्रस्तूत प्रकरणी स्वतःची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु अर्जदाराने दाखल केलेल्या दस्तावेज क्र.24 वरून असे स्पष्ट होते की गैरअर्जदार क्र.2 ने दि.1/6/2012 रोजी गैरअर्जदार क्र.4 यांना पत्र पाठविले व त्यात नमूद केले की 3 महिन्यांआधी सदर मशीन बिघडल्याने गैरअर्जदार क्र.2 ने ती मशीन गैरअर्जदार क्र.4 कडे दुरूस्तीकरीता पाठविली होती परंतु मशीन नादुरूस्त अवस्थेतच गैरअर्जदार क्र.4 ने गैरअर्जदार क्र.2 कडे परत पाठविली. सदर पत्रावरच गैरअर्जदार क्र.4 चे एन.एच.सी.मशीन मिळाली असे लिहून त्यावर दि.18/06/2012 ही तारीख नमूद आहे. यावरून असे सिध्द होत आहे की गैरअर्जदार क्र.4 यांनी, सदर मशीन त्यांच्याकडे त्यापूर्वीच दुरूस्तीला येवूनही दुरूस्त करून न देता गैरअर्जदार क्र.2 ला परत पाठविली. त्यामुळे अर्जदाराला त्याच्याकडे असलेल्या सुविधेचा लाभ घेता आला नाही.
11. गैरअर्जदार क्र.3 यांच्याकडे नुकसान भरपाईकरीता कोणताही विमा दावा दाखल केला गेलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्र.3 हयांनी सेवेत कोणतीही न्युनता केलेली नाही. सबब त्यांच्याविरूध्द तक्रार खारीज करण्यांत येते.
12. गैरअर्जदार क्र.1,2 व 4 यांनी अर्जदाराला न्युनतापूर्ण् सेवा दिली हे सिध्द होत असल्यामुळे मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रार क्र.81/2013 अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) गैरअर्जदार क्र.1,2 व 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरीत्या अर्जदारांस
नुकसान भरपाईदाखल रू.1 लाख आदेश प्राप्त दिनांकापासून 30 दिवसांत
द्यावे.
(3) गैरअर्जदार क्र.1,2 व 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरीत्या अर्जदारांस
तक्रार खर्चापोटी रु.10000/- आदेश प्राप्त दिनांकापासून 30 दिवसांत द्यावे.
(4) गैरअर्जदार क्र.1,2 व 4 यांना निर्देश देण्यांत येतात की, भविष्यात, राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रस्तूत प्रकरणाप्रमाणे केवळ तांत्रिक कारणास्तव उपचारापासून वंचीत रहावे लागू नये याकरीता आवश्यक दक्षता घ्यावी.
(5) गैरअर्जदार क्र.3 विरूध्द तक्रार खारीज करण्यांत येते.
(6) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
चंद्रपूर
दिनांक – 27/07/2017
( अधि.कल्पना जांगडे (कुटे) ) ( अधि. किर्ती गाडगिळ (वैदय) )( श्री उमेश व्ही.जावळकर)
मा.सदस्या. मा.सदस्या. मा. अध्यक्ष