(घोषित दि. 29.05.2013 व्दारा श्रीमती रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदार यांनी त्यांच्या वाहनासाठी गैरअर्जदार यांच्याकडून विमा पॉलीसी घेतली असून गाडीस अपघात झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी विमा रक्कम न दिल्यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारी नुसार त्यांनी वाहन कर्ज घेऊन रत्नप्रभा मोटर्स यांच्याकडून दिनांक 31.12.2009 रोजी महिंद्रा कंपनीची झायलो गाडी खरेदी केली. सदरील गाडीसाठी गैरअर्जदार यांच्याकडून दिनांक 31.12.2009 ते 31.12.2010 या कालवधीकरीता विमा पॉलीसी काढली आहे. दिनांक 17.09.2012 रोजी अर्जदाराचा मुलगा गाडी चालवित असताना गाडी डिव्हायडरला धडकून गाडीचे नुकसान झाले. सदरील घटनेची नोंद संबंधित पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून गाडी दुरुस्तीसाठी रत्नप्रभा मोटर्सकडे देण्यात आली. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे गाडीच्या नुकसान भरपाईसाठी 1,80,000/- रुपयाचा विमा प्रस्ताव दाखल केला. परंतू गैरअर्जदार यांनी सदरील गाडी व्यावसायिक कारणसाठी चालविण्यात येत असल्याचे कारण सांगून विमा प्रस्ताव नाकारला. त्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन विमा रक्कम व नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत क्लेम फॉर्म, ड्रायव्हिंग लायसन्स, विमा पॉलीसीची प्रत, पोलीसाचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराने त्यांच्याकडून विमा पॉलीसी घेतल्याचे त्यांना मान्य आहे. अर्जदाराने खाजगी वाहनाचा वापर व्यापारी कारणासाठी केला असल्याचे इन्व्हेस्टिगेटरला आढळून आल्यामुळे अर्जदाराचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. अर्जदाराने पॉलीसीतील अटी व शर्तीचा भंग केल्यामुळे अर्जदाराची तक्रार अमान्य करण्यात आली आहे.
गैरअर्जदार यांनी तक्रारी सोबत सर्व्हेअरचा अहवाल व इन्व्हेस्टिंगेटरचा अहवाल दाखल केला आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे आढळून येते की,
1. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून महिंद्रा कंपनीची झायलो या वाहनासाठी विमा पॉलीसी घेतली आहे. पॉलीसीची मुदत दिनांक 31.12.2009 ते 30.12.2010 अशी असून सदरील पॉलीसी प्रायव्हेट कार पॅकेज पॉलीसी असल्याचे नि.क्र. 3/4 वरील पॉलीसी सर्टिफीकेट वरुन दिसून येते.
2. दिनांक 17.09.2010 रोजी अर्जदाराचा मुलगा गाडी चालवित असताना डिव्हायडरचा धक्का लागून गाडीचे चेसीस बेंड झाल्याचे अर्जदाराने तक्रारीत म्हटले आहे. अर्जदाराने घटनास्थळ पंचनामा मंचामध्ये दाखल केला नाही. परंतू नि.क्र.3/5 वर पोलीस ठाणे अंमलदाराचे सही शिक्का असलेले प्रमाणपत्र दाखल केले आहे. यामध्ये गाडी कोण चालवित होता याचा उल्लेख नाही. परंतू गैरअर्जदार यांनी पोलीस स्टेशनच्या तक्रारीबद्दल कोणताही आक्षेप घेतलेला नाही.
3. गैरअर्जदार यांनी सदरील गाडीचा विमा खाजगी वाहना अंतर्गत काढलेला असताना अर्जदार यांनी वाहन भाडयाने दिले असल्याचे सांगून अर्जदाराचा विमा प्रस्ताव नाकारला आहे. गैरअर्जदार यांनी नि.15 वर इन्व्हेस्टिगेशन अहवाल दाखल केला आहे. या अहवालामध्ये पान नंबर 7 वर इन्व्हेस्टिगेटर यांनी चेतन सतिष बोथरा गाडी चालवित असून त्यांच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असल्याचे म्हटले आहे. परंतू अर्जदाराच्या शेजारी व टॅक्सी स्टँड वरील लोकांकडे चौकशी केली असता सदरील वाहन व्यापारी कारणासाठी वापरले जात असल्याचे आढळून आले असल्याचे म्हटले आहे. इन्व्हेस्टिगेटरने वाहन चेतन बोथरा चालवित असून अपघाताच्या वेळेस गाडीमध्ये दोन लोक असल्याचे सांगून अर्जदार व्यापारी कारणासाठी वाहन चालवित असल्याचा निष्कर्ष दिला आहे. परंतू कोणाचेही प्रतिज्ञापत्र मंचात दाखल केलेले नाही. अपघाताच्या वेळेस वाहन भाडेतत्वावर चालवित असल्याचा कोणताही पुरावा मंचात दाखल केला नसल्यामुळे मंच सदरील वाहन व्यापारी कारणासाठी चालवित असल्याचे कारण ग्राहय मानत नाही.
4. गैरअर्जदार यांनी नि.क्रं. 15 वर असेसमेंट शीट दाखल केली असून त्यानुसार 70,553/- रुपये विमा रक्कम म्हणून विमा धारकास देता येईल असे नमूद केलेले आहे. मंच सर्व्हेअरच्या अहवाला नुसार 70,553/- रुपये मान्य करीत आहे.
वरील सर्व निरीक्षणावरुन अर्जदाराची तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे. अर्जदाराने 1,80,000/- रुपयाची नुकसान भरपाई मागितली आहे. परंतू सर्व्हेअरच्या अहवालानुसार अर्जदार 70,553/- रुपये मिळण्यास पात्र आहे.
आदेश
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास 70,553/- (सत्तर हजार पाचशे त्रेपन्न फक्त) रुपये 30 दिवसात द्यावे.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास नुकसान भरपाई पोटी रुपये 5,000/- (पाच हजार रुपये फक्त) व खर्चाबद्दल रुपये 2,500/- (दोन हजार पाचशे फक्त) 30 दिवसात द्यावे.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.