(मा.अध्यक्ष श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र अर्जदार यांना सामनेवालेकडून रक्कम रु.7,84,454/-मिळावी, सामनेवाला यांनी क्लेम देण्यास टाळाटाळ केल्यामुळे गाडी तीन महिने उभी होती त्यामुळे अपघात तारखेपासून नुकसान भरपाई म्हणून रु.2,10,000/- मिळावेत, नुकसान भरपाईवर द.सा.द.शे.12%व्याज मिळावे, मानसिक त्रास, अर्जाचा खर्च याची नुकसान भरपाई रक्कम रु.25,000/- मिळावी, सामनेवाला यांना श्री. योगेश पाटील सर्व्हेयर यांचा सर्व्हे रिपोर्ट दाखल करण्याचे आदेश व्हावेत. या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे. अर्जदार यांचा तक्रार अर्ज दाखल करुन घेणेस पात्र आहे काय? असे आदेश दि.10/02/2012 रोजी करण्यात आलेले आहेत. अर्जदार यांनी पान क्र.31 लगत लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे. अर्जदार यांनी पान क्र.1 लगत तक्रार अर्ज, पान क्र.2 लगत प्रतिज्ञापत्र, पान क्र.5 व पान क्र.6 चे यादीसोबत पान क्र.7 ते 30 लगत कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रमाणीत प्रती दाखल केलेल्या आहेत. अर्जदार यांनी तक्रार अर्ज कलम 7 मध्ये व लेखी युक्तीवादामध्ये “सामनेवाला यांनी अर्जदार यांना रक्कम रु.1,64,043/- दिले व उर्वरीत रक्कम आम्ही तुम्हाला नंतर देतो असे सांगितले. त्यानंतर चकरा मारुन देखील सामनेवाला यांनी उडवाउडवीची उत्तरे देवून नुकसान भरपाई देण्याची टाळाटाळ केली. आजपावेतो नुकसान भरपाई दिली नाही. प्रत्यक्षात सामनेवाला यांनी अर्जदार यांना ऑफीसला बोलावून तडजोडीची बोलणी करुन रक्कम रु.25,000/- देण्याचा प्रस्ताव मांडला परंतु अर्जदार यांचे गाडीचे संपुर्ण नुकसान झालेले असल्यामुळे गाडी दुरुस्तीचा खर्च रु.7,38,497/-गाडी तीन महिने उभी राहील्याने त्याचे नुकसान रु.2,10,000/- असे एकूण रक्कम रु.9,48,497/- इतके नुकसान झालेले आहे. त्यापैकी सामनेवाला यांनी फक्त रु.1,64,043/- दिले. सामनेवाला यांचेकडे रु.7,84,454/- इतकी नुकसान भरपाई मिळणे बाकी आहे.” असा उल्लेख तक्रार अर्जात केलेला आहे. परंतु अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडून जी रक्कम रु.1,64,043/- मिळालेली आहे, ही रक्कम अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडून पुढील हक्क राखून ठेवून (अंडर प्रोटेस्ट) स्विकारलेली आहे, याबाबतचा कोणताही उल्लेख अर्जदार यांनी तक्रार अर्ज व प्रतिज्ञापत्रामध्ये केलेला नाही. तसेच सामनेवाला यांचेकडून जी रक्कम रु.1,64,043/- मिळालेली आहे, ही रक्कम अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडून पुढील हक्क राखून ठेवून (अंडर प्रोटेस्ट) स्विकारलेली आहे, हे दर्शवण्याकरीता अर्जदार यांनी कोणताही योग्य तो पुरावा अथवा सामनेवाला यांना लिहून दिलेली पावती किंवा पावतीची प्रत दाखल केलेली नाही. अर्जदार यांनी पुढील हक्क राखून ठेवून (अंडर प्रोटेस्ट) रक्कम सामेनवाला कडून स्विकारलेली नसल्यामुळे रक्कम रु.1,64,043/- ही रक्कम अर्जदार यांनी अंतीम हिशेब करुनच (फुल अँण्ड फायनल सेटलमेंट) स्विकारलेली आहे असे स्पष्ट होत आहे. एकदा फुल अँण्ड फायनल सेटलमेंट म्हणून रक्कम स्विकारलेनंतर अर्जदार यांना सामनेवाला यांचे विरुध्द दाद मागण्यास कोणतेही कारण राहीलेले नाही असे या मंचाचे मत आहे. यामुळे अर्जदार यांचा तक्रार अर्ज दाखल करुन घेण्यापुर्वीच फेटाळण्यास पात्र आहे असेही या मंचाचे मत आहे. याबाबत मंचाचे वतीने पुढील प्रमाणे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्राचा आधार घेतलेला आहे. 2(2011) सिपीजे राष्ट्रीय आयोग पान 246 अजय वर्मा विरुध्द युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं. अर्जदार यांचा तक्रार अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद, मंचाचे वतीने आधार घेतलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्र आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः आ दे श अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. |