निकालपत्र
(घोषितव्दारा – श्रीमती रेखा जाधव,मा.सदस्या )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार हा मौजे रामतीर्थ ता. निलंगा, जि; लातुर येथील रहिवाशी असून, त्याला पिंपळवाडी शिवारात सर्वे नं. 4 मध्ये 3 हेक्टर 14 आर शेतजमीन आहे. अर्जदार हा गैरअर्जदाराचा सभासद आहे. अर्जदाराचे दि. 19/02/2007 रोजी नोंदणीकृत वाटणीपत्र झाले असुन तेव्हा पासुन अर्जदार व त्याचे कुटुंब विभक्त राहत आहेत. अर्जदारास सन – 2011 मध्ये 123 टन ऊस किल्लारी सहकारी साखर कारखान्यास गेला आहे, त्याचे एकुण ऊसाचे बिल रु. 2,21,517/- इतके झाले. अर्जदाराचे वडीलांचे नावावर गैरअर्जदार क्र. 1 यांचे थकीत कर्ज रक्कम रु. 1,66,381/- सदरील ऊस बिलातुन कपात केली आहे. अर्जदाराचे वडीलांनी सदरचे कर्ज दि. 03/07/2007 रोजी गैरअर्जदार क्र. 1 ने विविध कार्यकारी सेवा सोसायटी मार्फत दिले होते. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 यास दि. 13/03/2012 रोजी ऊस कपातीच्या बिला बद्दल अर्ज दिला आहे. अर्जदाराच्या वडीलांच्या नावावर मौजे रामतीर्थ येथे सर्वे नं; 1व 37 मध्ये शेतजमीन आहे. सदरच्या जमीनीवरुन कर्जाची वसुली केली जावी अर्जदाराने गैरअर्जदारास दि. 16/04/12 रोजी नोटीस दिली आहे. अर्जदाराने तक्रारी अर्जात रक्कम रु. 1,66,381/- दि. 06/03/12 पासुन 18 टक्के व्याज दराने तसेच तक्रारीचा खर्च व मानसिक,शारिरीक त्रासापोटी रु. 30,000/- ची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी अर्जासोबत पुरावा म्हणून शपथपत्र दिले आहे व त्यासोबत एकुण -18 कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने लेखी म्हणणे दिले आहे . सदरचे प्रकरण मंचाच्या कार्यक्षेत्रात येत नाही. गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी केली नाही. अर्जदार व त्यांच्या वडीलास दि. 19/02/2007 वाटणी झाली असुन, विभक्त राहत आहेत हे गैरअर्जदारास मान्य नाही. अर्जदाराचे वाटणीपत्र दि. 21/01/2009 रोजी नोंदणीकृत केले आहे. अर्जदाराचा ऊस विठ्ठल साई कारखान्यास गेला आहे. किल्लारी येथील साखर कारखान्याचे बिल नाही. अर्जदाराच्या वडिलांनी दि. 03/07/2007 रोजी कर्ज वाटप करण्यात आले होते. सदरचे कर्ज अर्जदाराच्या ऊस बिलातुन व्याजासह रु. 1,66,381/- कपात केले आहे. अर्जदाराच्या वडीलांनी सर्वे नं. 1 मधील जमीनीवर कर्जाचा बोजा टाकण्यास किंवा त्या जमिनीतील उत्पन्नातुन कर्ज कपात करण्यास गैरअर्जदाराच्या हक्कात प्रतिज्ञापत्र करुन दिले होते. अर्जदाराच्या वडीलांनी कर्ज घेते वेळेस एकत्र कुटुंब म्हणून माहिती दिली होती. विविध कार्यकारी सेवा सोसायटी ने दि. 14/02/2012 रोजी ठराव घेवून अर्जदाराच्या वडीलांनी वेळेत कर्जाची परतफेड न केल्यामुळे एकत्रित कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे असलेल्या शेती उत्पन्नातुन कर्जाची वसुली करण्यात यावी, असा ठराव घेवून गैरअर्जदार क्र. 2 यास कळविले. अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.
अर्जदाराचा तक्रारी अर्ज व त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, व पुरावा म्हणून दिलेले शपथपत्र तसेच गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे, अर्जदार व गैरअर्जदार यांचा युक्तीवाद याचे अवलोकन केले असता खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? नाही
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? नाही
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर :- अर्जदार हा गैरअर्जदाराचा सभासद असल्यामुळे त्यासाठी लागणारा मोबदला गैरअर्जदाराने स्विकारल्यामुळे अर्जदार हा ग्राहक या संज्ञेत येतो.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर :- अर्जदारास गट क्र. 4 मध्ये 3 हेक्टर 14 आर शेतजमीन असल्याचे 7/12 च्या खाते उता-यावरुन दिसुन येते. अर्जदाराच्या वडीलांनी दि. 03/07/2007 रोजी रक्कम रु. 99,000/- चे कर्ज घेतले होते. सदरचे कर्ज दि. 06/03/2012 रोजी बेबाकी झाल्याचे विविध कार्यकारी सेवा सोसायटी मदनसुरी
च्या खाते उता-यावरुन दिसुन येते. अर्जदाराच्या वडीलांनी कर्ज घेतेवेळेस गैरअर्जदारास प्रतिज्ञापत्र दिले आहे त्यात रामतीर्थ ता. निलंगा गट क्र. 1 मधील क्षेत्र 7 एकर 07 गुंठे याची नोंद प्रतिज्ञापत्रावर केल्याचे दिसुन येते. विविध कार्यकारी सेवा सोसायटी मदनसुरी
दि. 09/03/2012 रोजी च्या पत्रावरुन दिसुन येते की, अर्जदाराच्या ऊस बिलातुन त्याच्या वडीलांच्या नावावरचे कर्ज कपात करण्याचा ठराव घेतला असुन, ठरावाप्रमाणे कर्ज कपात करण्यास गैरअर्जदारास कळविण्यात आले आहे. सदरचा ठराव घेताना विविध कार्यकारी सेवा सोसायटीने अर्जदारास माहिती व नोटीस दिल्याचा पुरावा दिसत नाही. अर्जदार व अर्जदाराचे वडीलांचे स्वतंत्र खाते गैरअर्जदाराकडे असल्यामुळे विविध कार्यकारी सेवा सोसायटीने ठराव घेतेवेळेस अर्जदारास कळविल्याचा पुरावा दिलेला नाही. अर्जदाराच्या वडीलांच्या नावावर गट क्र. 1 मध्ये 7 एकर 7 गुंठे जमीन असताना सदरच्या जमीनीवर कर्जाचा बोजा टाकण्याची अर्जदाराच्या वडीलांनी प्रतिज्ञापत्रावर संमती दिली असताना विविध कार्यकारी सेवा सोसायटीने अर्जदाराच्या नावावरील ऊस बिलातुन त्यास माहिती न देता परस्पर कर्जाची रक्कम ऊस बिलातुन वळती करुन अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात झालेल्या कराराचे पालन केले नसल्याचे सिध्द होते. विविध कार्यकारी सेवा सोसायटीने कराराचा भंग करुन सेवेत त्रुटी केल्याचे दिसुन येते. अर्जदाराने दाखल केलेल्या 7/12 वरुन अर्जदाराचे व त्याच्या वडीलांचे व त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तीचे नावाने वेगवेगळया जमीनीची स्वतंत्र नोंद 7/12 च्या उता-यावरुन सिध्द होते. गैरअर्जदाराने सदरची रक्कम विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांच्या सांगण्यावरुन कपात केली असल्यामुळे गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी केली असल्याचे दिसुन येत नाही. म्हणून मुद्दा क्र. 2 चे उत्तर नाही असे आहे.
मुद्दा क्र. 3 चे उत्तर :- अर्जदाराने कागदोपत्री पुरावा देवून सदरचा तक्रारी अर्ज सिध्द केल्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदाराने कर्ज कपात केलेली रक्कम रु. 1,66,381/- मिळण्यास पात्र आहे. परंतु अर्जदाराने योग्य त्या गैरअर्जदारास सदरील प्रकरणात पार्टी केले नसल्यामुळे, न्यायाच्या दृष्टीने अर्जदाराची मागणी योग्य नसल्यामुळे, सदरचे प्रकरण नामंजुर करण्यात येत आहे. हे सदर न्यायमंचाचे मत आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
- अर्जदाराची तक्रार नामंजुर करण्यात येत आहे.
- खर्चाबाबत आदेश नाही.