जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/225 प्रकरण दाखल तारीख - 08/10/2009 प्रकरण निकाल तारीख – 19/01/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते. - सदस्य मा.श्रीमती एस.आर.देशमुख - सदस्या तुकाराम पि.भिवराजी पांचाळ, वय वर्षे 45 व्यवसाय व्यापार, अर्जदार. रा.अंबानगर,सांगवी ता.जि.नांदेड. विरुध्द. 1. व्यवस्थापक, शांती फायनांन्स, गैरअर्जदार. चांडक ईन्स्ट्रूमेंट प्रा.लि.कंपनी, 84/5 महाजन मार्केट, सिताबडी, नागपुर. 2. व्यवस्थापक, श्री.मोटर्स, डॉ.किन्हाळकर दवाखाना बिल्डींग, वामननगर,पुर्णा रोड, नांदेड. 3. फोर्स मोटर्स लिमिटेड, एम 4 सुपर (फॉरमली नोन अझ बजाज टेम्पो लि) मुंबई - पुणे रोड, आकुर्डी,पुणे ता.जि.पुणे. अर्जदारा तर्फे वकील - अड.शेख जियाओद्यीन. गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - अड.एस.व्ही.मेहता. गैरअर्जदार क्र. 3 तर्फे वकील - अड.स्वतः. निकालपत्र (द्वारा- मा.श्री.सतीश सामते,सदस्य) गैरअर्जदाराकडुन रु.1,00,000/- नुकसान भरपाई मिळावी व अर्जदाराचे मिनीडोअर टेम्पो क्र. एम.एच.26-3831 गैरअर्जदारांना ताब्यात घेण्यास मनाई करावी अशा प्रकारच्या मागणीसाठी अर्जदाराने आपली तक्रार नोंदविली आहे. तक्रारीप्रमाणे गैरअर्जदाराकडुन अर्जदाराने दि.07/01/2009 रोजी टेम्पो घेण्यासाठी फायनांन्स कंपनीकडुन रु.2,25,000/- चे कर्ज घेतले. याचे परतफेड दर महा रु.7,500/- प्रमाणे 48 हप्त्यात करावयाची होती. गैरअर्जदार क्र. 2 हे गैरअर्जदार क्र. 1 चे एजंट असुन त्यांनी कार्यालयात बसुन करार केलेला आहे. अर्जदाराने कर्जाचे परतफेड नियमितपणे केली. अर्जदाराची गाडी गॅरंटीच्या मुदतीत खराब झाली. सदर गाडीचे इंजन जास्तीचे गरम होऊ लागले त्यामुळे ऑईल व डिझेल जास्त लागु लागले तसेच गाडीचे टायर सुध्दा खराब होते. गैरअर्जदाराने गाडीचे फ्रि सर्व्हीसिंग मुदतीच्या आंत असून देखील करुन दिले नाही. अशातच सदर वाहनाचा अपघात झाला. त्यामुळे अर्जदारास नुकसान सहन करावे लागले. इंशुरन्स हे गैरअर्जदार क्र. 1 यांच्या नांवावर असल्या कारणाने त्यांनी इंशुरन्सची रक्कम त्यांनी परस्पर उचलुन घेतली. इंशुरन्सची रक्कम अर्जदाराने मागीतली असता, वाहन जप्त करण्याची धमकी दिली म्हणुन दि.04/09/2009 रोजी वकीला मार्फत नोटीस पाठवून देखील गैरअर्जदारांनी नुकसान भरपाई दिली नाही. अर्जदारास रु.1,00,000/- मानसिक त्रासपोटी मिळावे अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दिले आहे. त्याप्रमाणे अर्जदारांनी फोर्स एम 4 सुपर पीकअप हे वाहन ज्याचा क्र. एम.एच. 26,एच-3831 आहे, यासाठी रु.2,25,000/- चे कर्ज घेतलेले आहे व फायनांन्सचा हप्ता रु.7,500/- प्रमाणे 48 हप्त्यात ही रक्कम भरावयाची आहे. गैरअर्जदार क्र. 2 हे गैरअर्जदार क्र. 1 चे एजंट आहे याचा ते नकार देतात व अर्जदाराच्या सुविधेसाठी त्यांनी रक्कमेचा स्विकार केलेला आहे. अर्जदार हा हप्ता भरण्यात नियमित होत हे ते अमान्य करतात. प्रती महिन्याला त्यांनी रु.8,000/- हप्ता भरावयाचे ठरले होते. अर्जदाराने कुठेही नियमितपणे रक्कम भरली नाही व हप्त्याची रक्कम देखील पार्ट पेमेंटमधे दिलेली आहे जसे की, दि.15/01/2009 चा हप्ता हा एकदा रु.7,000/- एकदा रु.1,000/- अशा रितीने भरलेले आहे. अर्जदाराचे वाहनाचा दि.22/04/2009 रोजी अपघात झाला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गैरअर्जदार यांनी इंशुरन्सची रक्कम घेतलेली नाही व अर्जदारास त्यांचे वाहन जप्त करण्याची धमकी देखील दिलेली नाही. अर्जदार व गैरअर्जदार करार हा हायर पर्चेस अग्रीमेंट असल्या कारणाने गैरअर्जदार हे मालक असुन अर्जदार हा हायरर आहेत. अर्जदाराकडे असलेले थकबाकी विषयी गैरअर्जदाराने त्यांना अनेक वेळा कळविलेले आहे व रक्कम भरण्यास सांगीतलेले आहे. याची सुचना सेलवर व लेखी देखील दिलेले आहे व याप्रमाणे त्यांनी रक्कम न भरल्यास गैरअर्जदार हे त्यांचे वाहन जप्त करु शकतात तरी देखील आजपर्यंत गैरअर्जदाराने असे काही केलेले नाही. त्यामुळे त्यांनी कुठेही सेवेत त्रुटी केलेली नाही, खर्चासह अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र. 2 हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. याप्रमाणे अर्जदार यांनी त्यांच्याकडुन एम 4 सुपर पीकअप हे वाहन विकत घेतलेले असून ज्याचा रजिस्ट्रेशन क्र.एम.एच.26 एच 3831 असा आहे. गैरअर्जदार हे नाकारतात की, त्यांनी अर्जदारास फ्रि सव्हीसींग दिली नाही. अर्जदाराचे वाहनाची डिलीवरी देते वेळी त्यांनी वाहनाची फ्रि सर्व्हीसींग कुपन प्रमाणे पुर्ण वाहनाची तपासणी करुन ते वाहन अर्जदारास दिलेले आहे. वॉरंटीप्रमाणे वाहनाची वॉरंटी ही 360 दिवस किंवा 36 हजार कि.मी. जे काही लवकर होईल याप्रमाणे आहे व या कालावधीत वाहनासाठी सहा फ्रि सर्व्हीसेस दिलेले आहे. अर्जदाराने त्यांचे वाहन गैरअर्जदाराकडे आणुन प्रत्येक सहा सर्व्हीसिंग त्यांचेकडे केली तरच ही वॉरंटी कायम राहते व याप्रमाणे अर्जदार यांनी दि.15/03/2009 रोजी त्यांचे वाहन त्यांचेकडे आणुन व पहीली सर्व्हीसिंग केली याप्रमाणे जॉबकार्डवर समाधानी आहे म्हणुन सही केली आहे. दुसरी सर्व्हीसिंग दि.12/05/2009 रोजी करुन घेतली त्यात किरकोळ ऑईल चेंज, फिल्टर चेंज अशी सर्व्हीसिंग केल्यानंतर वाहनाचा ट्रायल घेतल्यानंतर अर्जदाराने जॉबकार्डवर समाधान आहे म्हणुन सही केली आहे व आपले वाहन नेले आहे. मध्यंतरी दि.22/04/2009 रोजी अर्जदाराच्या वाहनास अपघात झाले व नांदेड येथे दुरुस्ती शक्य नसल्या कारणाने त्यांनी गैरअर्जदाराच्या अकोला येथील वर्कशॉपमध्ये वाहन नेले व त्यांचेकडे दुरुस्तीसाठी रक्कम नाही असे सांगीतले म्हणुन गैरअर्जदाराने त्यांच्याकडुन एकही पैसा न घेता पुर्ण वाहनाची दुरुस्ती केली व वाहनाचा विमा हा इफको टोकीओ जनरल इंशुरन्स कंपनी यांनी काढली होती. याप्रमाणे कॅशलेस रिपेअर गैरअर्जदारांनी वाहन दुरुस्त करुन दिले त्या वेळी अर्जदाराची कुठलीही तक्रार नव्हती.इंशुरन्स कंपनीने बिल दिल्यानंतर व सर्व्हे प्रमाणे काही रक्कम वाहनाच्या दुरुस्तीसाठी म्हणुन गैरअर्जदाराना दिलेले आहे व यास अर्जदाराची देखील संमती आहे. वाहनाच्या अपघातानंतर पुढे वाहनाची वॉरंटीचा प्रश्नच येत नाही. वाहनाची वॉरंटी उत्पादक कंपनी देते गैरअर्जदार क.1 डिलर असल्या कारणाने फक्त सर्व्हीसिंग देणे त्यांचे काम आहे. वॉरंटी साठी शिकाऊ व्यक्तिने वाहन चालवणे, वाहनाची स्पिड कमी अधिक ठेवणे, क्षमतेपेक्षा जास्त माल भरणे इ. अनेक कारणामुळे वाहन खराब होऊ शकते. त्यामुळे गैरअर्जदाराकडुन सेवेत कुठेही त्रुटी झालेली नाही व अर्जदाराची तक्रार ही खोटी असल्या कारणाने ती खर्चासह फेटाळण्यात यावी, असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र. 3 यांनी वकीला मार्फत आपले लेखी जबाब दाखल केलेला आहे. या अर्जातील आरोप कायदयाने सत्य व बरोबर नाही. गैरअर्जदार हे कर्मशिअल गाडयाचे निर्माते आहेत. अर्जदाराने त्यांच्या कपंनीचे एम.एच.26 एच 3831 हे वाहन गैरअर्जदार क्र. 2 यांचे मार्फत खरेदी केले आहे ते त्यांचे अधिकृत विक्रेते आहेत. कर्जा विषयी त्यांचा काहीही संबंध येत नाही. सर्व्हीसिंग रेकॉर्डवरुन असे दिसते की, अर्जदाराने वेळोवेळी सर्व्हीस अर्जदारास देण्यात आलेली आहे. गाडी चालविण्याच्या पध्दतीने अनेकदा अडचणी येतात ते निर्माते व विक्रेते यांच्या हाती नसते. गाडीची व्यवस्थीत देखभाल व काळजी न घेणे, रस्त्याची कंडीशन, ऑइल आणि फयुल (पेट्रोल आणि डिझेलची) गुणवत्ता, गाडीत टाकण्यात आलेल्या मालाचे वजन इ.गोष्टीमुळे दोष येऊ शकतात. त्यामुळे अर्जदाराने लावलेल आरोप त्यांना नाकबुल आहेत. अर्जदाराचे वाहन क्वॉलिटी कंट्रोल पध्दतीने निर्मीती केलेली आहे. सदर वाहन अर्जदारास दिले त्या वेळेस ते दोष विरहीत होते. याप्रमाणे प्रि डिलीव्हरी इन्सपेक्शन करण्यात येते. वाहनाचा ट्रायल देण्यात येते, ग्राहकाच्या समाधानाने त्यांना वाहन देण्यात येते. गैरअर्जदाराचे इंशुरन्स कराराशी संबंध नाही. अर्जदाराने विना कारण त्रास देण्याच्या हेतुने तक्रार केली म्हणुन अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार क्र. 1,2 व 3 यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहेत. सर्व पक्षकार यांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रुटी सिध्द होते काय? नाही. 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 शांती फायनांन्स यांना पार्टी केलेले आहे पण एकंदरीत तक्रारीचे स्वरुप पाहीले असता, त्यांच्या फायनांन्स कंपनीच्या विरुध्द कर्जाबद्यल किंवा हप्त्याबद्यल कुठलीच तक्रार दिसत नाही. फक्त तक्रार आहे ती अर्जदाराच्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर इंशुरन्सची मिळणारी रक्कम जे गैरअर्जदाराने उचलले आहे पण या तक्रारीचे बारकाईने अवलोकन केले असता, हे स्पष्ट होते की, अर्जदाराचे एम 4 सुपर पिकअप क्र. एम.एच.26 एच 3831 या वाहनाचा दि.22/04/2009 रोजी अपघात झाल्यानंतर याच्या दुरुस्ती करीता मिळणारी रक्कम ही गैरअर्जदार क्र. 1 यांनी घेतली नाही तर ती दुरुस्तीसाठी म्हणुन गैरअर्जदार क्र. 2 यांनी स्विकारली आहे व या पावतीवर अर्जदाराची सही आहे, याचा अर्थ अर्जदाराच्या संमतीनेच विम्याची रक्कम ही दुरुस्तीपोटी अदा करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या रक्कमेची गैरअर्जदार क्र. 1 शी संबंध येणार नाही. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदार यांना हप्ता भरण्यास नियमित नसल्याबद्यल अनेक वेळा नोटीस पाठविलेली आहे व रक्कम भरण्या विषयी कळविलेले आहे. ती नोटीस या प्रकरणांत दाखल केलेले आहे. या शिवाय हायर पर्चेस अग्रीमेंट, फायनांन्स स्टेटमेंट दाखल केलेले आहे. हपता रु.7,500/- असुन प्रती महिन्याचे पंधरा तारखेला 48 हप्त्यामध्ये करारनाम्याप्रमाणे अर्जदाराने कर्जाची रक्कम वापस करावयाचे आहे. पहीला हप्ता दि.15/01/2009 चा आहे यासाठी दि.13/09/2009 ला रु.7,000/- दि.09/07/2009 ला रु.1,000/- भरलेले आहे म्हणजे हप्त्याची रक्कम अनेकदा भरलेली असुन म्हणजे उशिरा भरलेली आहे दि.15/02/2009 चा दुसरा हप्ता यासाठी दि.09/07/2009 ला रु.5,500/- हा हप्ता पुर्णतः भरलेला नाही यानंतर अर्जदाराने एकही पैसा भरल्याची नोंद दिसत नाही. त्यामुळे अर्जदार स्वतः डिफॉल्टर आहेत व गैरअर्जदार क्र. 1 यांची कर्जाच्या रक्कमे विषयी कुठलीच तक्रार नसतांना त्यांना या प्रकरणांत विना कारण गोवलेले आहे हे स्पष्ट होते. गैरअर्जदार क्र. 2 हे डिलर आहेत यांचे काम वाहनाची तपासणी करुन सर्व्हीस देणे एवढेच आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी आपले लेखी म्हणण्यात स्पष्ट केलेले आहे की, गैरअर्जदार क्र. 2 हे त्यांचे एजंट नसुन त्यांनी अर्जदाराच्या सुविधेसाठी त्यांना मदत केलेली आहे व रक्कम स्विकारलेली आहे. त्यामुळे त्यांचा दोष नाही. अर्जदार त्यांचे वाहनाच्या वॉरंटीसाठी एक वर्ष असे म्हटले आहे परंतु गैरअर्जदाराची वॉरंटी ही 360 दिवसासाठी किंवा 36 हजार कि.मी. पर्यंत एवढीच आहे त्या विषयी पुरावा आहे. अर्जदाराने त्यांचे वाहन हे श्री.मोटर्स अमरावती यांचेकडे फ्रि सर्व्हींसींगसाठी नेले आहे याला पुरावा म्हणुन गैरअर्जदाराने जॉबकार्ड दाखल केलेले आहे याप्रमाणे अर्जदाराने त्यांचे वाहन दि.15/03/2009 रोजी पहीली सर्व्हींसींग, दि.15/05/2009 रोजी दुसरी सर्व्हीसिंग, दि.15/07/2009 रोजी तीसरी सर्व्हीसिंग, दि.15/09/2009 रोजी चौथी सर्व्हीसिंग असे चार जॉबकार्ड दाखल केलेले असुन यावर नियमित ऑईल चेंज, फिल्टर चेंज असे करुन दिलेले असुन वाहनाचा त्यानंतर गाडीचे ट्रायल घेवुन समाधान झाले म्हणुन प्रत्येक जॉबकार्डवर सही केलेली आहे. त्यामुळे गैरअर्जदार यांनी त्यांना फ्रि सर्व्हीसिंग दिलीनाही हे अर्जदाराचे म्हणणे खोटे ठरते. वाहनामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नव्हता असेही जॉबकार्डवरुन स्पष्ट होते कारण त्यावर अर्जदाराने सही केलेली आहे. दि.12/04/2009 रोजी वाहनाचा अपघात झाल्यानंतर ते वाहन श्री मोटर्स अमरावती यांचेकडे दुरुस्तीसाठी दिलेले होते. अर्जदाराने वाहनाच्या दुरुस्तीसाठी एकही पैसा दिला नाही हे सिध्द होते व इफको टोकीओ या इंशुरन्स कंपनीशी असलेल्या करारा प्रमाणे कॅशलेस अटीवर श्री मोटर्सने वाहनाची पुर्णतः दुरुस्ती करुन दिलेली आहे व हे वाहन समाधानकारक रित्या दुरस्त म्हणुन अर्जदाराने सही करुन दि.15/07/2009 रोजी पत्र दिलेले आहे ते गैरअर्जदाराने या प्रकरणांत दाखल केलेले आहे. इंशुरन्स कंपनीने दिलेले सर्व्हे रिपोर्टप्रमाणे रक्कम रु.1,18,000/- हे श्री मोटर्स यांनी दुरुस्तीसाठी म्हणुन स्विकारलेले आहे व त्यावर देखील संपुर्ण समाधान म्हणुन अर्जदार यांची सही आहे तेंव्हा अर्जदाराने वाहनाच्या दोषा विषयी केलेली तक्रार ही सिध्द होत नाही. श्री मोटर्सस यांनी जे स्टेटमेंट दाखल केलेले आहे यावरुन वाहनाची खरेदी किंमती एकुण रक्कमेतुन रु.28,256/- अर्जदाराकडेच निघतात असे दिसते. अर्जदार हे स्वतः डिफॉल्टर आहेत. गैरअर्जदार क्र. 1 शी केलेल्या कराराप्रमाणे त्यांनी कर्जाची रक्कम भरलेली नाही व डिफॉल्टर झाले म्हणून गैरअर्जदार हे कायदयाप्रमाणे काय निर्णय घ्यावयाचे त्यासाठी ते मोकळे आहेत. एकंदरीत प्रकरणातील सर्व कागदपत्रावरुन जवळपास हे सिध्द झाले आहे की, कोणत्याही गैरअर्जदाराकडुन सेवेत त्रुटी झालेली नाही. गैरअर्जदार क्र. 1 कंपनी यांचा विरुध्द एकंदरीत या प्रकरणातील वाहनाच्या दोषासंबंधी अर्जदाराची कुठलीही तक्रार नसतांना त्यांना पक्षकार केले आहे. याबाबत अर्जदार त्यांना कॉम्पेंसेटरी कॉस्ट लावता येऊ शकतो परंतु अर्जदाराची मानसिक परिस्थिती व तो आडाणी आहे व वाहन अपघतात सापडल्यामुळे ते हप्ते हप्ते भरण्यास असमर्थ आहे. एकंदरीत परिस्थितीचा विचार केला असता, आम्ही अर्जदारास कॉम्पेंसेटरी कॉस्ट न लावण्याचा निर्णय घेतला आहे. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज खारीज करण्यात येतो. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.एस.आर.देशमुख) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार,लघुलेखक. |