जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 84/2011 तक्रार दाखल तारीख –01/07/2011
मुक्ताबाई भ्र.अंकुश गाडे
वय 45 वर्षे धंदा घरकाम .तक्रारदार
रा.बोरगांव ता.शिरुर (का.) जि.बीड
विरुध्द
1. मंडल प्रबंधक,
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
मंडल कार्यालय क्र.2 अंबिका हाऊस
शंकर नगर चौक,नागपूर -440 010 सामनेवाला
2. व्यवस्थापक, कबाल इन्शुरन्स कंपनी लि.
एच.डी.एफ.सी.लाईफ इन्शुरन्स, टाऊन सेंटर
राजमाता जिजाऊ मिशनच्या खाली,सिडको,औरंगाबाद.
3. तालुका कृषी अधिकारी,
कृषी अधिकारी कार्यालय, शिरुर कासार
ता.शिरुर कासार जि.बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.ऐ.डी.काळे
सामनेवाला क्र.1 तर्फे ः- स्वतः
सामनेवाला क्र.2 तर्फे ः- स्वतः
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार व तिचे पती अंकुश अण्णासाहेब गाडे हे बोरगांव (च.) ता.शिरुर कासार येथील रहिवासी आहेत. तक्रारदाराच्या पतीच्या नांवे मौजे उकिर्डा (च.) ता.शिरुर कासार येथे गट नं.154 मध्ये जमिन आहे. तक्रारदाराचे पती हे कामानिमीत बाहेरगांवी जात असताना बोरगांव चकला-मातोरी फाटा रोडवर दि.10.05.2010 रोजी झालेल्या अपघातामुळे दि.11.5.2010 रोजी उपचार चालू असताना अहमदनगर येथे मृत्यू झाला. त्या बाबत अशोक संतराम झिंजुर्डे रा.बोरगांव (च.) यांनी चकलांबा पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली.त्यांचा ग.र.नं.24/2010 आहे. मयमाचे सिव्हील हॉस्पीटल अहमदनगर येथे शवविच्छेदन करण्सयात आले. मृत्यू हा डोक्याला मार लागल्याने झालेला आहे. तक्रारदारांनी सर्व कागदपत्रे गोळा करुन नियमाप्रमाणे सामनेवाला क्र.3 कडे प्रस्ताव दाखल केला. त्यांनी सामनेवाला क्र.2 कडे प्रस्ताव पाठविला. सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 कडे प्रस्ताव पाठविला. तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 चे कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन दावा व कागदपत्र मिळाली की नाही यांची पडताळणी केली. त्यावेळी सामनेवाला क्र.1 यांनी सांगितले की, त्यांचे काही गांवात येऊन माहीती गोळा करतील त्यानंतर नियमाप्रमाणे रक्कम मिळेल.
दि.31.12.2010 रोजी सामनेवाला क्र.1 यांना पत्र देऊन तक्रारदारांना कळविले की, अपूर्ण कागदपत्रामूळे त्यांना रक्कम देता येत नाही,परंतु तक्रारदारांना कोणतेही कागदपत्र दिली नाही यांचा सदर पत्रात उल्लेख नाही.रक्कम न देऊन सामनेवाला यांनी सेवेत कसूर केला. त्यामुळे मानसिक त्रासाची रक्कम रु.20,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- ची मागणी तक्रारदार करीत आहेत.
विनंती की, सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना विमा रक्कम रु.1,00,000/-, मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- व्याजासह दयावेत.
सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचा खुलासा दि.4.10.2011 रोजी दाखल केला.खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. दावा दाखल करण्यासाठी कागदपत्रे विमा कालावधीच्या 90 दिवसाचे ग्रेस कालावधीनतर दाखल केलेले होते ते अपूरे होते. आता केसचा तपास करणे किंवा क्लेम खरा आहे किंवा कसे हे ठरवणे अवघड आहे.
तक्रारीत आयूक्त शेती, महाराष्ट्र शासन यांना सामनेवाला न केल्याने आवश्यक सामनेवाला या मूददयावर तक्रार खारीज करणे योग्य होईल.
आयूक्त शेती महाराष्ट्र शासन यांचे बरोबर कंपनीचा करार झालेला असून शेतकरी कंपनीकडे फाईल दाखल करु शकत नाही. विम्याचे पैसे त्यांने कंपनीला दिलेले नाहीत.
घटना घडल्यानंतर 90 दिवसांमध्ये दाव्याचे कागदपत्र कंपनीकडे पाठवावयास पाहिजे होते तसे झालेले नाही त्यामुळे क्लेम नामंजूर केलेला आहे.विनंती की, तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचा खुलासा दि.29.8.2011 रोजी पोस्टाद्वारे दाखल केला.खुलाशात श्री.अंकुश गाडे रा.बोरगांव ता.शिरुर कासार यांचा अपघात दि.10.5.2010 रोजी झाला. त्यांचा दावा दि.18.08.2010 रोजी अपूर्ण कागदपत्र उदा.मृत्यूचे मूळ प्रमाणपत्र, रक्कम रु.20/-च्या स्टँम्प वरती शपथपत्र मूळ, मूळ 7/12, फेरफार, 6-क मूळ, रासायनिक प्रयोगशाळेचा अहवाल पोलिस अधिका-याने सांक्षाकित केलेला. या बाबत दि.2.09.2010 रोजी पत्र देऊन कळविले व तसेच दि.2.10.2010,3.11.2010, 6.12.2010 रोजी स्मरणपत्रे दिली. तक्रारदारांनी आवश्यक ती कागदपत्र न पाठविल्याने सदरचा दावा त्यांचे सुचनेवरुन युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी नागपूर कडे दि.21.12.2010 रोजी अपूर्ण कागदपत्र या शे-याने पाठविला. शेवटी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने दि.31.12.2010 रोजीच्या पत्राअन्वये दावा बंद केला.
सामनेवाला क्र.3 यांनी त्यांचा खुलासा दि.01.12.2011 रोजी दाखल केला. खुलाशात विमा प्रस्ताव सामनेवाला क्र.3 यांना दि.09.08.2010 रोजी मंडळ कृषी अधिकारी शिरुर कासार कार्यालयाकडे प्राप्त झाला. सदरचा प्रस्ताव मा.जिल्हा कृषी अधिक्षक बीड यांना दोन प्रतित दि.16.8.2010 सादर केला. त्यानंतर सामनेवाला क्र.1 कडून प्रस्तावामध्ये कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक असल्या बाबतचे पत्र सामनेवाला क्र.3 यांना दि.29.9.2010रोजी प्राप्त झाले. त्या आधारे सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदारांना आवश्यक असलेल्या कागदपत्राची पूर्तता करण्याबाबत मंडळ कृषी अधिकारी शिरुर कासार यांचेमार्फत कळविले. पंरतु तक्रारदारांनी पत्राची दखल न घेता पूर्तता केली नाही. सामनेवाला क्र.1 कडून तक्रारदाराकडून पूर्तता होत नसल्याबाबत स्मरणपत्रे पाठविण्यात आली. सामनेवाला क्र.3 यांनी ते पत्र प्राप्त होताच सामनेवाला क्र.3 यांना तक्रारदारास पूर्ततेविषयी कळविले परंतु तक्रारदाराकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आवश्यक ती कागदपत्राची पूर्तता होऊ शकली नाही. तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 कडे परस्पर संपर्क साधला त्या बददल सामनेवाला क्र.3 पूर्णपणे अनभिज्ञ आहे. पूर्ततअभावी तक्रारदाराचा प्रस्ताव निकाली काढला गेला. त्यांस सामनेवाला क्र.3 कोणत्याही प्रकारे जिम्मेदार नाहीत. तक्रार सामनेवाला क्र.3 चे हददीपर्यत निकाली काढावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला क्र.1 ते 3 यांचा खुलासा, शपथपत्र यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.काळे व सामनेवाले क्र.1 यांचे विद्वान वकील श्री.जाधव यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता अंकुश अण्णासाहेब गाडे हे शेतकरी असल्याची बाब 7/12 उता-यावरुन स्पष्ट होते. दि.10.5.2010 रोजी त्यांचा रस्ता अपघातात दि.11.5.2010 रोजी उपचार चालू असताना नगर येथे त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्या बाबत चकलांबा पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असून त्यांचा गू.र.नं.24/10 आहे. शवाचे शवविच्छेदन करण्यात आले असून डोक्याचे जखमेमुळे मृत्यू असे निदान शवविच्छेदन अहवालात नमूद केलेले आहे. मृत्यू नंतर तक्रारदारांनी प्रस्ताव सामनेवाला क्र.3 यांचेमार्फत सामनेवाला क्र.1 व 2 कडे पाठविला.सामनेवाला क्र.2 यांनी सदर प्रस्ताव तपासणीमध्ये 6-क मूळ आणि वाहन चालक परवाना पोलिस अधिकारी यांनी सांक्षाकीत केलेला या दोन कागदपत्र अपूर्णतेचे बाबत सामनेवाला क्र.3 यांनी नमूद केलेल्या दिनांकाचा पत्रव्यवहार केलेला आहे. सामनेवाला क्र.3 यांनी सदरची बाब त्यांचे खुलाशात मान्य केली आहे. परंतु अपघाताचे स्वरुप पाहता अपघाताची खबर अशोक संतराम झिंजुर्डे यांनी दिलेली असून अपघाताचे वेळी अशोक झिंजुर्डे, अंकूश अण्णासाहेब गाडे आणि दिनकर गाडे हे घरगुती कामासाठी वस्तीवर एम.एच.-05-डब्ल्यू-607 हिरो होंडा फॅशन वाहनावर बसून जात असताना अपघात झालेला आहे. त्यावेळी हिरो होंडा हे वाहन अशोक झिंजुर्डे चालवित होते व सदर मोटार सायकलला एम.एच.-23-व्ही-4712 या मोटार सायकलने धडक दिल्याने अपघात झालेला आहे. अंकूश हे मोटार सायकल चालवित नव्हते ते किंवा अशोक हे जरी मोटार सायकल चालवित होते तरी अपघात हा समोरुन येणा-या मोटार सायकलचे धडकेमूळे झालेला असल्याने या संदर्भात मोटार सायकल चालकाचे चालक परवान्यामूळे आवश्यक नाही. या संदर्भात तक्रारदारांनी खालील न्यायनिर्णयाचा आधार घेतलेला आहे.
II (2008) CPJ 403
Maharashtra ‘State Consumer Disputes Redressal Commission, Mumbai
ICICI Lombard general Insurance com. Ltd.
Vs
Sindhubhai Khanderao Khairnar
(i) Consumer Protection Act, 1986—Section 2(1)(g)—Insurance—Agriculturist Accident Insurance policy—Claim rejected due to delayed submission of claim papers –All required documents except driving licence submitted to insurer—Driving licence not necessary to settle claim—Clause regarding time-limit for submission of claim not mandatory—Cannot be used to defeat genuine claim—Insurance company rejected claim on highly technical ground—Rejection unreasonable—Insurer liable to pay sum assured under policy.
या न्यायनिर्णयाचा आधार तक्रारदाराने घेतलेला आहे. सदर न्यायनिर्णयाचे सखोल वाचन केले असता सामनेवालाकडे सर्व कागदपत्र दाखल झाल्यानंतरही वाहन चालक परवान्याची आवश्यकता नसताना सदरचे कागदपत्राची मागणी सामनेवाला क्र.2 यांनी केलेली आहे. या बाबत सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.3 यांना पत्र देऊन कागदपत्राची पूर्तता करण्याची व सामनेवाला क्र.3 यांनी त्यांचे खुलाशात सदरची बाब मागणी केली असली तरी कोणते कागदपत्राची मागणी सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदाराकडे केली, कधी केली या बाबत सामनेवाला क्र.3 यांचा खुलासा अत्यंत मोघम आहे. त्यांचे विधानाचे समर्थनार्थ त्यांनी कागदपत्र मागणी केल्याबाबतचे पत्राची स्थळ प्रत दाखल केलेली नाही. त्यामुळे सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदाराना कागदपत्राची मागणी केली होती ही बाब स्पष्ट होत नाही. प्रस्ताव मूदतीत दाखल झाल्याने व कागदपत्र सर्व दाखल असताना सामनेवाला क्र.1 यांनी अपूर्ण कागदपत्राचा त्यात कूठेही तपशील न देता सदरचा दावा बंद केला आहे. सदरची सामनेवाला क्र.1 ची कृती ही नैसर्गीक न्यायाशी विसंगत आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदाराचा दावा योग्य रितीने बंद केला असे म्हणता येणार नाही. तक्रारदाराचा दावा नाकारुन सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होत असल्याने असल्याने सामनेवाला यांनी तक्रारदारांना अंकूश गाडे यांचे मृत्यूची नूकसान भरपाई रु.1,00,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सेवेत कसूरीची बाब स्पष्ट झाल्याने तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासाबददल रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- सामनेवाला क्र.1 यांनी दयावा.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मयत
अंकुश गाडे यांचे अपघाती मृत्यू दाव्याची रक्कम
रु.1,00,000/- (अक्षरी एक लाख फक्त) आदेश मिळाल्यापासून
एक महिन्याचे आंत अदा करावी.
3. सामनेवाला क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की,वरील रक्कम मूदतीत
न दिल्यास वरील रक्कमेवर द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज तक्रार
दाखल दि.01.07.2011 पासून देण्यास सामनेवाला क्र.1 जबाबदार
राहतील.
4. सामनेवाला क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की, मानसिक त्रासाची
रक्कम रु.5000/-(अक्षरी रु.पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चाची
रककम रु.5,000/-(अक्षरी रु. पाच हजार फक्त) आदेश
प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत अदा करावी.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड