( आदेश पारित द्वारा मा. अध्यक्षा, श्रीमती रोहिणी दि. कुंडले)
-- आदेश --
( पारित दि. 22 नोव्हेंबर, 2012)
1. तक्रारः- शेतकरी अपघात विम्याची रक्कम मिळण्याबद्दल मंचात दाखल आहे. तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्तीच्या पतीच्या नांवे (सदाराम मोतीराम नेताम) त्यांच्या मालकीचे मौजा पदमपूर, पो. फुटाना, ता. देवरी, जिल्हा गोंदीया येथे सर्व्हे नंबर 213, क्षेत्रफळ 0.84 हे. आर. व जमा 0.60 या वर्णनाची शेतजमीन आहे. त्यांचे कुटुंब शेतावर अवलंबून होते. ते शेतकरी असल्याने शासनाच्या शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेचे लाभार्थी होते.
3. इन्शुअर्ड सदारामचा दिनांक 05/08/2011 रोजी शेतातील बांधीच्या धु-यावरील पाणी जाण्याचे खांडीवर ठेवलेल्या दगडावर पाय घसरून नाकाच्या भारावर पडून जखमी होऊन मृत्यु झाला.
4. तक्रारकर्तीने मृतक विमाधारकाची पत्नी/वारस व लाभार्थी या नात्याने विरूध्द पक्ष 2 तर्फे विरूध्द पक्ष 1 विमा कंपनीकडे शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची रक्कम मिळण्यासाठी अर्ज दिनांक 09/11/2011 रोजी केला. विरूध्द पक्ष यांनी वेळोवेळी मागितलेले दस्त पुरविले.
5. विरूध्द पक्ष 1 विमा कंपनीने दिनांक 13/02/2012 रोजी पॉलीसी दरम्यान तक्रारकर्तीच्या पतीच्या नावे शेत जमीन नव्हती हे कारण देऊन तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळला.
6. तक्रारकर्तीचे म्हणणे आहे की, उपरोक्त शेतजमीन दिनांक 16/12/2010 रोजी विमाधारक सदारामचे वडील मोतीराम नेताम मरण पावले त्याच क्षणी वारसा हक्काने मृतक विमाधारकाकडे आली. त्याचे नावे शेतजमीन होती या गोष्टीची शहानिशा न करताच विरूध्द पक्ष 1 यांनी दावा फेटाळला ही त्यांच्या सेवेतील त्रुटी ठरते असे तक्रारकर्ती म्हणते.
7. तक्रारकर्तीची मागणीः-
- शेतकरी अपघात विमा दाव्याची रक्कम `1,00,000/- मिळावी.
- या रकमेवर दि. 09/11/2011 पासून (तक्रार दाखल तारीख) 18% दराने व्याज मिळावे.
- शारीरिक, मानसिक त्रासाची नुकसानभरपाई `20,000/- मिळावी.
- तक्रार खर्च `10,000/- मिळावा.
7. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत 12 दस्त दाखल केले आहेत.
8. विरूध्द पक्ष 1 यांचे उत्तर थोडक्यात खालीलप्रमाणेः-
9. विरूध्द पक्ष 1 विमा कंपनीने सुरूवातीलाच प्राथमिक आक्षेप घेतलेले आहेत.
10. तक्रारीस कारण घडले नाही. तक्रार tenable नाही. तक्रारकर्ती किंवा मृतक विमाधारक यांच्यामध्ये व विरूध्द पक्ष 1 विमा कंपनी यांच्यात प्रत्यक्षपणे कोणताही करार झाला नाही. विरूध्द पक्ष 1 चा व विरूध्द पक्ष 2 चा कोणताही संबंध नाही. तक्रारकर्ती किंवा मृतक विमाधारक लाभार्थी ठरत नाहीत. तक्रार खोटी व कपोलकल्पित आहे. तक्रारकर्तीने मंचाची दिशाभूल केली आहे. मृतक विमाधारकाचा अपघात झाल्याचे ठिकाण dangerous zone मध्ये मोडत नाही. मृतक विमाधारकाच्या नावे शेतजमीन नाही. विरूध्द पक्ष 1 ही नामांकित विमा कंपनी असून पात्र ठरणा-यांचे हजारो दावे त्यांनी कोर्टाच्या हस्तक्षेपाशिवाय प्रदान केलेले आहेत. तक्रारकर्तीशी त्यांचा वैयक्तिक हेवा-दावा नाही. तक्रार मुदतबाह्य आहे. विमाधारकाच्या मृत्युची तारीख आणि दावा दाखल केल्याची तारीख यातील तफावत/अंतर तक्रारकर्तीने स्पष्ट केले नाही. त्यामुळे अनेक शंका उपस्थित होतात. पोस्टमार्टेम रिपोर्टनुसार मृत्युचे कारण अजूनही अज्ञात आहे. व्हिसेराचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच विमाधारकाच्या मृत्युचे अधिकृत कारण समजू शकेल. या मंचाच्या अधिकार/कार्यक्षेत्रात तक्रारीस कारण घडले नाही. तक्रारकर्तीने दाखल केलेले दस्त खरे व विश्वासार्ह नाहीत. तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष 1 विमा कंपनीविरूध्द खोटी केस दाखल केलेली आहे. या प्रकरणात उलट तपासणीची आवश्यकता आहे. म्हणून दिवाणी कोर्ट हे योग्य फोरम ठरते. उपरोक्त सर्व कारणास्तव तक्रार खारीज करण्याची प्रार्थना विरूध्द पक्ष 1 करतात.
11. विशेष कथनामध्ये विरूध्द पक्ष 1 पुढे म्हणतात की, शासनाने कमिशनर-कृषि यांच्यासोबत प्रत्यक्ष करार केला आहे. म्हणून कमिशनर-कृषि हे आवश्यक पार्टी ठरतात. त्यांना पार्टी न केल्याने (Non joinder of necessary party) तक्रार खारीज होण्यास पात्र ठरते. पुढे उत्तराच्या पृष्ठ क्रमांक 3 परिच्छेद-11 वर नमूद आहे की, “………Apart from this in the policy there is arbitration and conciliation clause and before taking any action one must refers its dispute to arbitration and conciliation and if any one bypasses this clause, the legal action taken against company becomes void ab-initiao”.
12. विरूध्द पक्ष 1 पुढे परिच्छेद - 12 मध्ये म्हणतात की, महसूल अधिका-यांनी
बनविलेली पात्र लाभार्थी शेतक-यांची यादी तक्रारकर्तीने जोडली नाही. त्यात मृतक विमाधारकाचे नाव आहे की नाही हे स्पष्ट होत नाही.
13. उत्तराच्या परिच्छेद 13 मध्ये विरूध्द पक्ष 1 म्हणतात, “That the complaint is also lacking on many material factual and legal aspect. The complainant has suppressed many true and real facts from the court. hence her case is liable to be dismissed”. तक्रार खर्चासहित खारीज करण्याची विनंती विरूध्द पक्ष 1 करतात.
14. विरूध्द पक्ष 1 यांनी एकही दस्त रेकॉर्डवर दाखल केलेला नाही.
15. विरूध्द पक्ष 2 कबाल चे उत्तर रेकॉर्डवर आहे. त्यानुसार
16. तक्रारकर्ती विरूध्द पक्ष 2 ची ‘’ग्राहक’’ ठरत नाही. कारण विरूध्द पक्ष 2 हे केवळ सल्लागार आहेत. त्यांनी तक्रारकर्तीला कोणत्याही सेवा प्रदान केल्या नाहीत. ते विनामोबदला शासनाला सल्ला देतात. त्यांच्याकडे तहसीलदार किंवा तालुका कृषि अधिकारी यांच्यामार्फत आलेले प्रस्ताव विरूध्द पक्ष 1 विमा कंपनीकडे पाठविणे एवढेच मर्यादित त्यांचे काम आहे. त्यांनी ते चोख बजावले आहे. त्यामुळे त्यांच्या सेवेत त्रुटी नाही.
17. तक्रारकर्तीचा विम्याचा प्रस्ताव जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी यांच्याकडून विरूध्द पक्ष 2 ला दिनांक 18/11/2011 रोजी प्राप्त झाला. तो त्यांनी दिनांक 26/12/2011 रोजी विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे पाठविला. विरूध्द पक्ष 1 यांनी दिनांक 13/02/2012 रोजीच्या पत्रान्वये तक्रारकर्तीचा दावा नामंजूर केला व तसे तक्रारकर्तीला कळविले. विरूध्द पक्ष 2 च्या सेवेत त्रुटी नसल्याने तक्रार खर्चासहित खारीज करण्याची विनंती विरूध्द पक्ष 2 करतात.
18. मंचाने तक्रारकर्तीचे वकील व विरूध्द पक्ष 1 चे वकील यांचा युक्तिवाद ऐकला. रेकॉर्डवरील संपूर्ण कागदपत्रे तपासली. त्यावरून मंचाची निरीक्षणे व निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत.
- निरीक्षणे व निष्कर्ष -
19. विरूध्द पक्ष 1 यांनी अनेक प्राथमिक आक्षेप घेतलेले आहेत. जसे तक्रारीस कारण घडले नाही, तक्रार tenable नाही, तक्रारकर्ती/ मृतक विमाधारक यांच्याशी प्रत्यक्षपणे कोणताही करार विरूध्द पक्ष 1 यांनी केला नाही, करार कमिशनर-कृषि यांच्याशी केला असल्याने त्यांना आवश्यक पार्टी म्हणून जोडणे भाग होते, तक्रारकर्ती/मृतक विमाधारक लाभार्थी ठरत नाही...इत्यादी.
20. यापैकी एकाही आक्षेपात मंचाला तथ्य वाटत नाही. तक्रारीस कारण मृतक विमाधारकाचा मृत्यु (दि. 05/08/2011) झाला तेव्हापासून घडले. शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना तपासली असता तक्रारकर्ती/ मृतक विमाधारक लाभार्थी असल्याचे स्पष्ट होते आणि कमिशनर-कृषि यांना पार्टी म्हणून जोडण्याची आवश्यकता नाही असा मंचाचा निष्कर्ष आहे. म्हणून विरूध्द पक्ष 1 चे सर्व प्राथमिक आक्षेप हे मंच फेटाळून लावते.
21. मृतक विमाधारक सदाराम मोतीराम नेताम यांच्या नावे शेतजमीन असल्याबद्दल तक्रारकर्तीने पुरावा दाखल केला आहे. त्यात मृतकाच्या वडिलांच्या मृत्युनंतर (दिनांक 18/12/2010) वारसांची नांवे चढविल्याचा दस्त डॉक्यु. 5 पेज 20 वर आहे. दिनांक 01/01/2011 ची नोंद तपासली असता त्यात मोतीरामचे नाव समाविष्ट आहे असे निष्पन्न होते. गाव नमूना 8 मध्ये मृतक विमाधारकाचे नाव चढले आहे. रेकॉर्डवर (पेज नं. 12) मृतक ‘शेतकरी’ असल्याबद्दल प्रमाणपत्र आहे. उपरोक्त सर्व सरकारी दस्तांवरून मृतक विमाधारकाच्या नावे शेतजमीन आहे व म्हणून तो शेतकरी व्यक्तिगत अपघात योजनेअंतर्गत ‘’लाभार्थी’’ ठरतो. तसेच त्याच्या मृत्युनंतर त्याची पत्नी ‘’लाभार्थी’’ ठरते असा मंचाचा निष्कर्ष आहे.
22. विरूध्द पक्ष 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा दावा विमाधारकाचे नावे शेतजमीन नाही म्हणून कोणतीही शहानिशा न करता खारीज केला. ही त्यांची कृती नियमाला धरून नसल्याने सेवेतील त्रुटी ठरते असा मंचाचा निष्कर्ष आहे. विरूध्द पक्ष 1 यांचे Repudiation हे मंच अवैध ठरविते.
23. तक्रारकर्त्याच्या नावे शेतजमीन नाही. तो मालक नाही, केवळ भोगवटदार आहे. भोगवटदार encroacher सुध्दा असू शकतो असा युक्तिवाद विरूध्द पक्ष 1 च्या वकिलांनी केला. मंचाला ह्यात अजिबात तथ्य वाटत नाही. मंचाचा निष्कर्ष आहे की, तक्रारकर्तीने मृतक विमाधारक ‘’शेतकरी’’ असल्याबद्दलचा सबळ कागदोपत्री पुरावा दाखल केला आहे.
24. विरूध्द पक्ष 1 यांचा दुसरा आक्षेप ग्राहक मंचाला अधिकारक्षेत्र नसल्याबद्दल आहे. शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात व आदरणीय राष्ट्रीय आयोगापुढे अनेक प्रकरणे हाताळण्यात आलेली आहेत व वेळोवेळी केस लॉ निश्चित केले आहेत. त्यामुळे हे प्रकरण हाताळण्याचा ग्राहक मंचाला अधिकार आहे असा मंचाचा निष्कर्ष आहे.
25. विरूध्द पक्ष 1 यांनी उत्तरात तक्रारकर्तीवर खोटी केस केल्याचा व खोटे दस्त दाखल केल्याचा आरोप केला आहे. तो मंचाला अजिबात ग्राह्य वाटत नाही. कारण त्यासाठी कोणताही सबळ पुरावा विरूध्द पक्ष 1 यांनी दाखल केला नाही. उलट तक्रारकर्तीने दाखल केलेले सर्व दस्त सरकारी असल्याने विश्वासार्ह आहेत असा निष्कर्ष हे मंच नोंदविते.
26. विरूध्द पक्ष 1 यांनी उत्तरात Arbitration Clause चा उल्लेख करून हे प्रकरण लवादाकडे पाठवायला पाहिजे असे म्हटले आहे. मंचाने संपूर्ण योजना तपासली असता लवादाचा त्यात कुठेही उल्लेख आढळत नाही. विरूध्द पक्ष 1 यांचे म्हणणे कपोलकल्पित म्हणून मंच फेटाळते. तसेच अपघात “danger zone” मध्ये झाला नाही असा अत्यंत हास्यास्पद आरोप विरूध्द पक्ष 1 करतात. त्यात कणभरही तथ्य नाही असा मंचाचा निष्कर्ष आहे.
27. लाभार्थी शेतक-यांची यादी तक्रारकर्तीने दाखल केली नाही या आक्षेपातही मंचाला तथ्य वाटत नाही. कारण ते म्हणतात तशी यादी शासनाने तयार केली नाही. विशिष्ट वयोगटातील राज्यातील सर्व शेतक-यांसाठी ही योजना आहे.
28. विरूध्द पक्ष 1 यांनी मृतक विमाधारकाच्या मृत्युच्या कारणाबद्दल शंका घेतली आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही, आत्महत्या असू शकते इत्यादी. दिनांक 01/11/2011 च्या केमिकल ऍनलाईजरचा रिपोर्ट तपासला असता त्यात संशयास्पद असे काही आढळले नाही असे नमूद केले आहे (“General and specific chemical testing does not reveal any poison in exhibit Nos. 1, 2 and 3”)
29. विरूध्द पक्ष 1 यांचे उत्तर अत्यंत मोघम, संदिग्ध व कपोलकल्पित आहे. त्यांनी आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ कोणताही पुरावा जोडला नाही. म्हणून मंचाला ते ग्राह्य वाटत नाही.
सबब आदेश
-// अंतिम आदेश //-
तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
1. विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीला शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दाव्याची रक्कम `1,00,000/- द्यावी. या रकमेवर दिनांक 05/08/2011 (मृतक विमाधारकाच्या मृत्युची तारीख) पासून रक्कम अदा करेपर्यंत द. सा. द. शे. 12% दराने व्याज द्यावे.
2. तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीला `5,000/- द्यावे.
3. प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून विरूध्द पक्ष 1 यांनी `2,000/- तक्रारकर्तीला द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 यांनी खोटे शपथपत्र व उत्तर दाखल केल्याबद्दल Punitive Damages म्हणून विरूध्द पक्ष 1 यांनी `5,000/- तक्रारकर्तीला द्यावे.
5. विरूध्द पक्ष 2 विरूध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
6. विरूध्द पक्ष 1 यांनी वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावी.