अर्जदारा तर्फे वकील - श्री.जी.के.पोफळे
गैरअर्जदार तर्फे वकील - श्री.पी.एस.भक्कड
निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्ष)
1. अर्जदाराची तक्रार ही गैरअर्जदारने दिलेल्या सेवेतील त्रुटीमुळे झालेल्या नुकसान भरपाई मिळणेसाठीची आहे.
अर्जदारची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे.
2. अर्जदार यांनी दिनांक 19.10.2011 रोजी तक्रार क्रमांक 345/2011 दाखल केली होती. मंचाने दिनांक 21.02.2012 रोजी तक्रार अंशतः मंजूर करुन खालील प्रमाणे आदेश दिलाः-
‘’ गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडून दिनांक 15.12.2011 रोजी जी थकबाकी रु.07,31,973/- दाखविली आहे त्यामध्ये रक्कम रु.35,000/- ची सुट देऊन बाकीची रक्कम उभयतांमध्ये समान मासिक हप्त्यात भरण्याचे ठरवून वसुल करावी व अर्जदारास ट्रक रजि.नंबर एमएच 26/एच 7392चा ताबा चालुस्थितीत द्यावा तसेच वाहनाचे बेबाकी प्रमाणपत्र, एन.ओ.सी. व इतर कागदपत्रे द्यावे असा आदेश दिला.’’
मंचाचे आदेशानुसार दिनांक 07.06.2012 रोजी अर्जदाराने पंजाब नॅशनल बँकेचा दिनांक 06.06.2012 रोजीचा रक्कम रु.6,96,973/- चा धनादेश गैरअर्जदारास पोस्टाने पाठविला. सदर पत्र गैरअर्जदारास दिनांक 08.06.2012 रोजी मिळाले. गैरअर्जदार यांना धनादेशाची रक्कम त्यांचे खात्यात जमा करुन अर्जदारास दिनांक 22.06.2012 रोजी ट्रक लातूर येथील यार्डामधून घेऊन जाणेस सांगितले. अर्जदार ट्रक घेणेसाठी गेला असता गैरअर्जदाराने सदरील ट्रकमध्ये बराच बदल केलेला होता. ट्रकचे सेल्फ ,बॅटरी व डिस्क काढून घेतले होते. अर्जदाराने लावलेले नवीन टायर्स काढून जुने टायर टाकलेले होते. त्यामुळे अर्जदाराचा ट्रक नादुरुस्त अवस्थेत उभा होता. अर्जदाराने गैरअर्जदार यांना ट्रकचे सर्व पार्टस बसवून देणेस सांगितले असता गैरअर्जदार यांनी नकार दिला. त्यामुळे अर्जदाराचे दोन लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे. गैरअर्जदार यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन अर्जदाराचे ट्रकचे सामान काढून घेऊन अर्जदाराचे दोन लाख रुपयाचे नुकसान केलेले आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा ट्रक दिनांक 21.02.2012 च्या आदेशानुसार परत केला नाही. त्यामुळे अर्जदारास मानसिक व शारिरिक त्रास झालेला आहे. वरील सर्व कारणांसाठी अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून दिनांक 06.06.2012 पासून ट्रक ताब्यात देईपर्यंत प्रतीदिन रक्कम रु.4,000/- प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी. तसेच ट्रक एमएच 26/एच 7392 ची बॅटरी,डिस्केलेली व सेल्फ पावतीप्रमाणे पुर्ण टायर्स टाकून ट्रक चालुस्थितीत नांदेड येथे आणून द्यावा. मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.50,000/- तसेच दावा खर्च रक्कम रु.10,000/- गैरअर्जदार याचेकडून मिळावे इत्यादी मागणी तक्रारीव्दारे अर्जदार करतात.
3. गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी वकीलमार्फत हजर होऊन लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे लेखी म्हणणे थोडक्यात पुढीलप्रमाणेः-
4. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या तक्रारीतील संपुर्ण कथन अमान्य केलेले असून गैरअर्जदार याचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे रक्कम रु.6,96,393/- चा डी.डी. पाठविला. गैरअर्जदाराच्या खात्यामध्ये दिनांक 14.06.2012 रोजी रक्कम जमा झाली. अर्जदार यांनी निर्णयाच्या अंदाजे 4 महिन्यानंतर डी.डी. पाठविला आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास दिनांक 13.08.2012 रोजी ट्रकचा ताबा दिलेला आहे. अर्जदार यांनी त्यांना ट्रक चालुस्थितीत मिळाल्याचे लिहून दिलेले आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांनी ट्रकचे सामान काढून दोन लाख रुपयाचे नुकसान केले हे म्हणणे योग्य नाही. गैरअर्जदारामुळे अर्जदारास कुठलेही नुकसान झालेले नाही. गैरअर्जदार यांनी मंचाने दिलेल्या निर्णयाची पुर्तता केलेली आहे. दिनांक 19.06.2012 रोजी गैरअर्जदार यांनी अर्जदारास नोटीस पाठवून कोणत्याही दिवशी कार्यालयीन वेळेमध्ये हजर राहून बेबाकी प्रमाणपत्र व ट्रक नेणेसाठी सांगण्यात आले. अर्जदाराने दिनांक 23.06.2012 रोजी गैरअर्जदारास नोटीस पाठविली, त्यास गैरअर्जदार यांनी दिनांक 26.07.2012 रोजी उत्तर दिलेले असून अर्जदारास दिनांक 01.01.2013 पासून सात दिवसाचे आत एन.ओ.सी. घेणेसाठी विनंती केली होती. परंतु अर्जदार हे एन.ओ.सी. घेणेसाठी आलेला नसल्याने गैरअर्जदार यांनी सदर कागदपत्रे मंचासमोर दाखल केलेली आहेत. गैरअर्जदार यांनी मंचाचे आदेशाचे पुर्ण पालन केलेले असल्याने अर्जदाराची तक्रार खारीज करावी अशी विनंती आपल्या लेखी जबाबाव्दारे केलेली आहे.
5. अर्जदार यांनी तक्रारीच्या पुराव्याकामी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहे. गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अर्जदार व गैरअर्जदार यांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
6. अर्जदार यांनी दाखल केलेली तक्रार क्रमांक 345/2011 च्या निकालाचे अवलोकन केले असता सदरील प्रकरणामध्ये मंचाने अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे रक्कम भरावी व गैरअर्जदार यांनी अर्जदारास ट्रकचा ताबा चालुस्थितीत द्यावा. तसेच वाहनाचे कर्जाचे बेबाकी प्रमाणपत्र , एन.ओ.सी. व इतर कागदपत्रे द्यावीत असा आदेश दिलेला होता. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे मंचाचे आदेशानुसार डी.डी.व्दारे रक्कम जमा केलेली आहे. ही बाब दोन्ही पक्षकारास मान्य आहे. अर्जदार यांची गैरअर्जदार यांचेविरुध्द प्रमुख तक्रार अशी आहे की, गैरअर्जदार यांनी मचाचे आदेशानुसार अर्जदाराने रक्कम भरल्यानंतरही वाहनाचा ताबा चालुस्थितीत दिलेला नाही. त्यासाठी अर्जदाराने दिनांक 21.06.2012 रोजीचे वाहन तपासणी करणेसाठी केलेला अर्ज तक्रारीसोबत दाखल केलेला आहे. सदर पत्रानुसार दिनांक 22.06.2012 रोजी अर्जदारासने गैरअर्जदार यांचेकडे जाऊन वाहनाची तपासणी केलेली असल्याचे निदर्शनास येते. अर्जदाराने वाहन नादुरुस्त स्थितीत असल्याबद्दलचे न्यु नेहा टायर्स, व बाफना मोटार प्रा.लि. यांचे कोटेशन दाखल केलेले आहे. सदर कोटेशनचे अवलोकन केले असता न्यु नेहा टायर्स हे कोटेशन दिनांक 20.06.2012 रोजी असून बाफना मोटार प्रा.लि. यांचे कोटेशन हे दिनांक 19.06.2012 रोजीचे असल्याचे स्पष्ट होते. यावरुन अर्जदाराने वाहनाची तपासणी जर दिनांक 22.06.2012 रोजी केलेली आहे तर त्या पुर्वी न्यु नेहा टायर्स, व बाफना मोटार प्रा.लि. यांनी वाहनाचे नादुरुस्त असल्याबद्दलचे कोटेशन कसे दिले याचा अर्थबोध होत नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदाराने वाहनाचा ताबा चालुस्थितीत घेतलेला असल्या संदर्भातील कागदपत्रे दाखल केलेली आहेत, त्याचे अवलोकन केले असता दिनांक 13.08.2012 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार यांना रक्कम रु.100/- च्या बॉण्ड पेपरवर अर्जदारास ट्रकचा ताबा चालुस्थितीत सर्व सामानासह मिळालेला असल्याने त्यासंबंधाने अर्जदाराची काही एक हरकत अगर तक्रार नाही असे लिहून दिलेले आहे. गैरअर्जदार यांनी सदरील कागदपत्रे दाखल केल्यानंतर अर्जदाराने त्यावर कुठलाही आक्षेप घेतलेला नाही. अर्जदार यांनी वाहनाचा ताबा नादुरुस्त अवस्थेत घेतला याबद्दलचा कोणताही पुरावा मंचासमोर दिलेला नाही. यावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदाराने रक्कम जमा केल्यानंतर अर्जदाराचे वाहनाचा ताबा अर्जदारास चालुस्थितीत दिलेला असल्याचे दिसून येते. त्यामुळे अर्जदाराचे तक्रारीत तथ्य नाही असे मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.