जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे
तक्रार क्र.३५/११ रजि.तारीखः- १७/०२/११
निकाल तारीखः-२५/०९/१२
१. श्री.अशोक नथ्थु/ नाटु पाटील
उ.व. ५१ वर्षे, धंदा - शेती,
रा.मौजे, नवे भामपुर,
ता.शिरपुर, जि.धुळे. .......तक्रारदार
विरुध्द
१. कबाल जनरल इन्शुरन्स सर्व्हिसेस प्रा.लि.
४ ए, देहमंदिर को-ऑप-हौसिंग सोसायटी,
श्रीरंगनगर, पंपीग स्टेशन रोड,
गंगापुर रोड, नाशिक - ४२२००२.
२. दि. ओरिएंटल विमा कंपनी लि.,
नागपुर, विभागीय कार्यालय,
शुक्ल भवन, वेस्ट हायकोर्ट रोड,
धरम पेठ, नागपुर – ४४००१०.
३. दि. ओरिएंटल विमा कंपनी लि.,
धुळे. ......विरुध्द पक्ष
कोरम - श्री.डी.डी.मडके, अध्यक्ष
सौ.एस.एस.जैन, सदस्या
तक्रारदार तर्फेः- अॅड.डी.व्ही. घरटे
विरुध्द पक्ष तर्फेः- अॅड.सी.के. मुगुल
नि का ल प त्र
श्री.डी.डी.मडके, अध्यक्षः तक्रारदार यांचा विमा दावा चुकीचे कारण देऊन नाकारुन विरुध्द पक्ष यांनी सेवेत त्रृटी केली म्हणुन तक्रारदार त्यांनी सदर तक्रार या मंचात दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, महाराष्ट्र शासनाचे राज्यातील सर्वखातेदार शेतक-यांच्या कल्याणासाठी विम्याचे संरक्षण असावे यासाठी दि.१५ ऑगस्ट २००८ ते १४ ऑगस्ट २००९ या कालावधीसाठी विरुध्द पक्ष क्र.२ व ३ दि. ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी (यापुढे संक्षिप्ततेसाठी विमा कंपनी असे संबोधण्यात येईल) यांच्याकडे प्रती शेतकरी रु.८/- प्रमाणे प्रिमियम भरुन प्रत्येक शेतक-याचा रु.१,००,०००/- चा विमा उतरवला आहे. सदर योजनेच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी विरुध्द पक्ष क्र.१ कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस यांची नियुक्ती केली आहे.
३. तक्रारदार यांनी पुढे असे म्हटले आहे की, दि.२१/०४/२००९ रोजी शिरपुर शहादा रोडने मोटार सायकल क्रं.एम.एफ.एस./१७६८ वर मागे बसुन जात असताना समोरुन मोटार सायकल क्रं. एम.एच.१८ पी/६८९६ च्या चालकाने मोटारसायकल हलगर्जीपणे चालवुन त्यांच्या गाडीस धडक दिली. सदर अपघातात त्यांच्या उजव्या डोळयास मार लागला व तो पूर्णपणे निकामी झाला.
४. तक्रारदार यांनी तालुका कृषी अधिकारी धुळे मार्फत विमा प्रस्ताव सादर केला. सदर प्रस्ताव विमा कंपनीने दि.०८.०३.१० रोजी खोटे कारण देऊन नाकारला व सेवेत त्रृटी केली आहे.
५. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून रक्कम रु.५०,०००/- व त्यावर १८ टक्के दराने व्याज, मानसिक व शारीरीक त्रासापोटी रु.३०,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.१०,०००/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
६ तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ नि.३ वर शपथपत्र तसेच नि.६ वरील कागदपत्रांच्या यादीनुसार ६ कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात नि.६/१ वर फिर्याद, नि.६/२ वर घटनास्थळ पंचनामा, ६/३ वर जखमेचे प्रमाणपत्र, नि.६/४ वर अपंगत्वाचे प्रमाणपत्र, नि.६/५ वर ८अ व ७/१२ उतारा आणि नि.६/६ वर विमा दावा नाकारल्याचे पत्र दाखल केले आहे.
७. विरुध्द पक्ष क्र.१ कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस यांनी आपला खुलासा नि.८ वर दाखल केला आहे. त्यात कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हीसेस प्रा.लि. ही बीमा विनियामक और विकास प्राधिकरण भारत सरकार यांची अनुज्ञत्पि प्राप्त विमा सल्लागार कंपनी आहे. महाराष्ट्र राज्य शासनाला सदरील विमा योजना राबवण्यासाठी विना मोबदला सहाय करतो. यामध्ये मुख्यत्वे शेतक-यांचा विमा दावा अर्ज तालुका कृषी अधिकारी/तहसीलदार यामार्फत आमच्याकडे आल्यावर विमा दावा अर्ज योग्यपणे भरला आहे का? सोबत जोडलेली कागदपत्रे विमा कंपनीने मागणी केल्या प्रमाणे आहेत का? नसल्यास तालुका कृषी अधिकारी तहसीलदार यांना कळवून त्यांची पुर्तता करवून घेणे व सर्व योग्य कागदपत्रे मिळाल्यावर योग्य त्या विमा कंपनीकडे पाठवून देणे व विमा कंपनीकडून दावा मंजूर होवून आलेला धनादेश संबंधीत वारसदारांना देणे एवढाच आहे. यासाठी आम्ही राज्य शासन वा शेतकरी यांच्याकडून कोणताही मोबदला घेत नाही, तसेच कोणताही विमा प्रिमियम घेतलेला नाही असे म्हटले आहे.
८. कबाल इन्शुरन्स कं. यांनी पुढे असे म्हटले आहे की, अशोक पाटील यांचा प्रस्ताव विमा कंपनीने दि.०८.०६.१० रोजी नाकारला आहे.
९. ओरिएन्टल विमा कंपनीने आपला खुलासा नि.१७ वर दाखल करुन तक्रारदार यांची तक्रार मुदतीत नाही, अर्जातील मागणी खोटी व बेकायदेशीर आहे तसेच तक्रारदार हा शेतकरी नव्हता, त्यामुळे ती रद्द करावी अशी विनंती केली आहे.
१०. विमा कंपनीने पुढे असे म्हटले आहे की, अपघात विमा योजनेमध्ये फक्त शेतक-याचा मृत्यु झाला तरच विम्याचे लाभ मिळण्यास तो पात्र ठरतो. अपंगत्वासाठी जोखीम स्वीकारण्यात आलेली नाही. तसेच अपंगत्वाचे संदर्भात ५०% अपंगत्व असल्यास अर्जाचा विचार होऊ शकतो. तक्रारदार यांना ३०% अपंगत्व आले आहे.
११. शेवटी तक्रार रदद करावी अशी त्यांनी विनंती केली आहे.
१२. विमा कंपनीने आपल्या म्हणण्याच्या पृष्टयार्थ नि.१८ वर शपथपत्र दाखल केले आहे.
१३. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे खुलासे व सबंधीत वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही
सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्दे उत्तर
१. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना
दयावयाच्या सेवेत त्रृटी केली आहे काय? होय.
२. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे? अंतिम आदेशा प्रमाणे.
३. आदेश काय? खालील प्रमाणे.
विवेचन
१४. मुद्दा क्र.१- तक्रारदार हे शेतकरी आहेत. मोटार अपघातामध्ये त्यांचा उजवा डोळा पूर्णपणे निकामी झाला म्हणुन त्यांनी विमा प्रस्ताव विमा कंपनीकडे सादर केला. विमा कंपनीने दि.०८.०३.१० रोजी विमा दावा नाकारला. त्यात कायम अपंगत्व नाही असे कारण दिलेले आहे. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा उजवा डोळा पूर्णपणे निकामी झाल्यामुळे त्यांना कायमचे अपंगत्व आले आहे व विमा पॉलीसीनुसार ते रू.५०,०००/- मिळणेस पात्र आहेत. विमा कंपनीने प्रथम अपंगत्वासाठी जोखमच स्वीकारली नाही असे म्हटले आहे व नंतर कायम अपंगत्व आले तर दाव्याचा विचार होऊ शकतो. परंतु अपंगत्व ५०% आवश्यक आहे असे नमुद करून तक्रारदार यांचे अपंगत्व ३०% असल्यामुळे दावा नाकारला असे म्हटले आहे.
१५. या संदर्भात आम्ही शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेचे परिपत्रक दि.०७/०८/२००६ चे अवलोकन केले आहे. त्यात प्रपत्र ‘अ’ मध्ये अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास रू.५०,०००/- नुकसानभरपाई मिळेल असा उल्लेख आहे. त्यामुळे अपंगत्वाची जोखीम विमा कंपनीने स्वीकारली आहे असे दिसुन येते.
१६. तक्रारदार यांनी त्यांचा एक डोळा निकामी झाला आहे हे सिध्द करण्यासाठी नि.६/३ वर जखमेबाबतचे प्रमाणपत्र दाखल केले आहे. त्या प्रमाणपत्रामध्ये ‘Right eyeball out of socket’ असा उल्लेख आहे. तसेच त्यांना ३०% दृष्टीचे अपंगत्व आल्याचे प्रमाणपत्र नि.६/४ वर आहे. तसेच त्यावरील फोटोवरुनही तक्रारदाराचा उजवा डोळा निकामी झाल्याचे दिसुन येते.
१७. तक्रारदार तर्फे अॅड.घरटे यांनी तक्रारदार यांचे पूर्ण दृष्टीच्या अनुषंगाने ३०% अपंगत्व असले तरी १ डोळा पूर्णपणे निकामी झाला असल्यामुळे रु.५०,०००/- मिळण्यास तक्रारदार पात्र आहे असा युक्तीवाद केला. विमा कंपनीतर्फे अॅड.मुगुल यांनी अपंगत्व ५०% आवश्यक आहे तरच रककम मिळु शकते असा युक्तीवाद केला.
१८. आम्ही तक्रारदार यांनी दाखल केलेल्या वैदयकीय प्रमाणपत्रांचे व विमा पॉलीसीच्या अटीचे अवलोकन केले आहे. त्यावरून तक्रारदार यांचा उजवा डोळा निकामी झाल्याचे दिसुन येते. सदर अपंगत्व नजरेच्या दृष्टीने ३०% असले तरी पॉलीसीनुसार १ डोळा निकामी झालेला असल्यामुळे तक्रारदार रू.५०,०००/- मिळणेस पात्र आहे असे आम्हास वाटते त्यामुळे विमा कंपनीने कायमचे अपंगत्व नाही असे चुकीचे कारण देऊन विमा दावा नाकारुन सेवेत त्रृटी केली आहे या मतास आम्ही आलो आहोत. म्हणुन मुद्दाक्रं.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
१९. मुद्दा क्र.२- तक्रारदार यांनी विमा कंपनीकडून विम्याची रक्कम रू.५०,०००/- तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.३०,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.१०,०००/- मिळावेत अशी विनंती केली आहे. सबब तक्रारदार हे विमा पॉलिसीनुसार रक्कम रु.५०,०००/- व त्यावर विमा दावा नाकारल्याची तारीख दि.०८/०३/१० पासून द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारदार यांना मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च झालेला असल्यामुळे तक्रारदार मानसिक त्रासापोटी रु.२०००/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.१०००/- मिळणेस पात्र आहेत.
२०. मुद्दा क्र.3 - वरील विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
२ विरुध्द पक्ष दि. ओरिएंटल विमा कंपनी लि.,यांनी तक्रारदारास रक्कम रु.५०,०००/- व त्यावर दि.०८/०३/१० पासून द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज या आदेशाच्या प्राप्ती पासून ३० दिवसाच्या आत द्यावेत.
३. विरुध्द पक्ष दि. ओरिएंटल विमा कंपनी लि., यांनी मानसिक त्रासापोटी रु.२०००/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.१०००/- या आदेशाच्या प्राप्ती पासून ३० दिवसाच्या आत दयावेत.
(सौ.एस.एस.जैन) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे.