::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 08/08/2016 )
आदरणीय, अध्यक्ष श्रीमती एस.एम.उंटवाले यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, …
तक्रारकर्त्याने दि. 22/12/2012 रोजी ट्रॅक्टर, ज्याचा नोंदणी क्र. एम.एच.30 एबी 6573, इंजिन नं. ई3209424, चेचीस नं. बी3188788 विकत घेतला व विरुध्दपक्ष 1 व 2 कडे सदर ट्रॅक्टरच्या विम्याचा हप्ता भरला. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी ट्रॅक्टरची किंमत रु. 5,32,000/- अशी ठरविली. विम्याचा रकमेचा हप्ता म्हणून रु. 8,976/-इतकी रक्कम तक्रारकर्त्याकडून विरुध्दपक्षाने स्विकारली. सदर पॉलिसी ही दि. 21/12/2013 पर्यंत वैध होती व पॉलिसी क्र पी0013400002/ 41074107/137804 असा आहे. सदर ट्रॅक्टरला सांगवी मोहाडी फाट्याजवळ दि. 24/6/2013 रोजी ट्रक क्र.आरजे11जीए6004 ने जोरदार धडक दिल्यामुळे अपघात झाला व सदर अपघातात ट्रॅक्टरचे नुकसान झाले. या बाबतची माहीती विमा कंपनीला देण्यात आली व विमा कंपनीचे सर्व्हेअर श्री एन.एच.खत्री यांनी तपासणी करुन अहवाल दिला, सदर अहवालामध्ये ट्रॅक्टरला लागणारा खर्च रु. 5,13,399/- दर्शविण्यात आला.तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे दावा क्र. सी/14/200024/4107/2/ 05002401 दाखल केला व अर्ज करुन विनंती केली की, सदर ट्रॅक्टर दुरुस्त होऊ शकत नसल्यामुळे, नविन ट्रॅक्टर मंजुर करावा. परंतु विरुध्दपक्षाने वेगवेगळे उत्तरे देवून तक्रारकर्त्यास दस्तऐवज दाखल करण्यास सांगितले. तक्रारकर्त्याने रिझर्व बँकेकडे केलेल्या तक्रारीनुसार विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास दि. 22/7/2014 व 17/12/2013 चे पत्रानुसार दस्तऐवज सादर करण्याबाबत कळविले होते. तक्रारकर्त्याने दि. 22/7/2014 चे पत्रास दि. 6/8/2014 रोजी उत्तर देवून ट्रॅक्टर, दुरुस्तीचे लायक नसल्यामुळे नविन ट्रॅक्टर अथवा रु. 5,32,000/- मंजुर करण्याबाबत विनंती केली होती. परंतु विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याच्या अर्जाची दखल घेतली नाही, म्हणून तक्रारकर्त्याने दि. 17/5/2015 रोजी वकीलामार्फत विरुध्दपक्षाला नोटीस पाठविली. परंतु सदर नोटीसची सुध्दा दखल घेण्यात आली नाही. अशा प्रकारे विरुध्दपक्षाने त्रुटीपुर्ण सेवा दिली आहे. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार मंचासक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व अपघातग्रस्त ट्रॅक्टरच्या विम्याची रक्कम रु. 5,32,000/- विरुध्दपक्षाकडून तक्रारकर्त्यास मंजुर करण्यात यावी. तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 1,00,000/- मंजुर करावे तसेच दाव्यापोटी न्यायालयीन खर्च म्हणून रु. 5000/- इतकी रक्कम द्यावी.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 11 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचा लेखीजवाब :-
2. विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी संयुक्त लेखी जबाब दाखल करुन तक्रारीतील आरोप नाकबुल करुन असे नमुद केले की, तक्रारकर्त्याकडून अपघातग्रस्त वाहनाची सुचना मिळाल्यानंतर विरुध्दपक्षाने सर्व्हेअर श्री खत्री यांची नुकसानीचे मुल्यांकन करण्यासाठी नियुक्ती केली. तक्रारकर्त्याने सदर ट्रॅक्टर श्री साई एजन्सीज, अकोला येथे आणले होते. परंतु सर्व्हेअर श्री खत्री जेंव्हा तेथे सर्व्हे करण्यासाठी गेले त्यावेळी सदरहू ट्रॅक्टर हा पुर्णत: डिसमेंटल केलेल्या स्थितीमध्ये आढळला, सर्व्हेअरच्या अनुपस्थितीत अपघातग्रस्त वाहनाला अगोदरच डिसमेंटल करुन ठेवणे, हे सर्व्हेअरकडून नुकसानीचे मुल्यांकन आकारणीच्या मुळ तत्वाला बाधा पोहचविणारी बाब आहे. तरी सुध्दा सर्व्हेअरने डिसमेंटल केलेल्या ट्रॅक्टरच्या भागाचे फोटो काढले व श्री साई एजन्सीज यांनी दिलेले अंदाजपत्रक तपासून व त्यांचे प्रतिनिधीशी चर्चा करुन पॉलिसीच्या शर्ती व अटीला अधिन राहून, ट्रॅक्टरच्या सॅल्व्हेजचे मुल्यांकन रु. 17,000/- व विमा पॉलिसीच्या एक्सेसपोटी रु. 2,660/- आणि घसारा ( डिप्रीसिएशन ) पोटी रु. 22,783.50 असे आकारलेल्या रकमेतून वजा करुन निव्वळ देय रक्कम रु. 2,99,950/- इतकी येते. ट्रॅक्टर मध्ये इंजिन व चेचिस हा एकरुप असतो, त्याला क्रॅन्क केस कम सिलेंडर बॉक्स असे म्हणतात व तो ओतिव लोखंडाचा असतो व त्याला जर जोराचा मार लागला तर तो तुटून वेगळा होतो, चेपत नाही. ट्रॅक्टर मध्ये वेगळे चेचिस येत नाही. सर्व्हेअरने तो तुळून वेगळा झाल्यामुळे तो पार्ट मंजुर केला आहे. तसेच इंजिनचे जे जे पार्ट्स निकामी किंवा दुरुस्त होऊ शकत नाही, ते पार्टस् मंजुर केलेले आहेत, ज्यामुळे ट्रॅक्टर दुरुस्त होऊन रस्त्यावर चालु शकेल. तक्रारकर्त्याची मागणी चुकीची आहे. विरुध्दपक्षाने सदर ट्रॅक्टरचे मुल्यांकन आकारले असतांना सुध्दा तक्रारकर्त्याने सदरहू ट्रॅक्टर दुरुस्ती करुन त्याचे बिल / इन्व्हाईस तसेच इतर कागदपत्रे विरुध्दपक्षाने मागणी करुन सुध्दा दिली नाहीत. उलट ट्रॅक्टर दुरुस्त न करता नविन ट्रॅक्टरची मागणी केली, ती मुळात चुकीची आहे. कागदपत्रांची पुर्तता न केल्यामुळे विरुध्दपक्षाला नाईलाजास्तव तक्रारकर्त्याची फाईल बंद करावी लागली. अपघाताचे वेळी सदर ट्रॅक्टर, तक्रारकर्त्याचा मुलगा, पांडुरंग नारायण खेडकर हा चालवित होता व त्याचा मित्र अविनाश हा त्याचे सोबत होता, असे असतांना सुध्दा तक्रारकर्त्याने क्लेम फॉर्म मध्ये गणेश राजाराम मुंडे हा अपघाताचे वेळी ट्रॅक्टर चालक आहे, असे खोटे दर्शविलेले आहे. तक्रारकर्त्याच्या मुलाचे ड्रायव्हींग लायसन्सची मागणी करुन सुध्दा तक्रारकर्त्याने त्याची पुर्तता केली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने विमा पॉलिसीच्या शर्ती व अटींचा भंग केला आहे. सदरहू ट्रॅक्टर पुर्णत: दुरुस्त होऊ शकतो. सदर प्रकरणात गुंतागुंतीचे मुद्दे असल्याने ही तक्रार दिवाणी न्यायालयातच चालु शकते. विरुध्दपक्षाने सेवेमध्ये न्युनता दर्शविली नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
3. त्यानंतर तक्रारकर्त्याने प्रतिउत्तर व लेखी युक्तीवाद दाखल केला, तसेच विरुध्दपक्षाने प्रतिज्ञालेखावर पुरावा व लेखी युक्तीवाद दाखल केला. उभय पक्षांनी तोंडी युक्तीवाद केला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचा संयुक्त लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ते यांचे प्रतिउत्तर, उभय पक्षांचा लेखी युक्तीवाद यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देऊन नमुद केला.
या प्रकरणात उभय पक्षात वाद नसलेल्या बाबी अशा आहेत की, तक्रारकर्त्याच्या मालकीचे वाहन ट्रॅक्टरचा विमा तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षा- कडून काढला होता. पॉलिसी कालावधी बद्दल व क्रमांकाबद्दल वाद नाही. सदर ट्रॅक्टरचा, विमा कालावधीत अपघात झाला होता, ही बाब विरुध्दपक्षाला कबुल आहे. अपघातग्रस्त टॅक्टरची विरुध्दपक्षाने त्यांचे सर्व्हेअर श्री खत्री यांचेकडून तपासणी करुन घेतली होती, ही बाब उभय पक्षांना कबुल आहे. उभय पक्षाने सर्व्हेअर श्री खत्री यांचा तपासणी अहवाल रेकॉर्डवर दाखल केला आहे. अशा प्रकारे उभय पक्षातील कबुल असलेल्या बाबींवरुन तक्रारकर्ते विरुध्दपक्षाचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
तक्रारकर्ते यांचा युक्तीवाद असा आहे की, अपघातग्रस्त ट्रॅक्टरचे संपुर्ण नुकसान झाले आहे व त्यामुळे तो दुरुस्त होणे शक्य नाही व दुरुस्त केल्यास त्याचा कोणताही उपयोग होवू शकणार नाही म्हणून विरुध्पक्षाच्या सर्व्हेअरने सर्व्हे करुन एकूण रु. 5,13,399/- एवढा खर्च दाखविला आहे, त्यामुळे ट्रॅक्टरच्या विमा रकमेपोटी रक्कम रु. 5,32,000/- मंजुर करावे.
यावर विरुध्दपक्षाने दस्त दाखल करुन असा युक्तीवाद केला की, वादातील अपघातग्रस्त ट्रॅक्टर दुरुस्त होवू शकतो. कारण विरुध्दपक्षाने त्यांच्या परवानाधारक तज्ञ सर्व्हेअर श्री एन.एच.खत्री यांचेकडून तक्रारकर्त्याच्या अपघातग्रस्त ट्रॅक्टरची तपासणी करुन घेतली व त्यानुसार रेकॉर्डवर मुल्यांकन अहवाल सादर केला आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने मागणी केलली रक्कम देता येणार नाही. तसेच अपघाताच्या वेळेस वादातील ट्रॅक्टर हा तक्रारकर्त्याचा मुलगा चालवत होता व त्याच्याकडे ट्रॅक्टर चालविण्याचा वैध परवाना नव्हता. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार प्रतिपालनीय नाही. सदर प्रकरणात गुंतागुंतीचे मुद्दे असल्याने ही तक्रार दिवाणी न्यायालयानेच तपासणे योग्य राहील.
अशा प्रकारे उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मंचाचे मत असे आहे की, उभय पक्षाने अपघातग्रस्त ट्रॅक्टरचा, सर्व्हेअर श्री खत्री यांनी तपासणी केलेला अहवाल दाखल केला आहे. तक्रारकर्त्याच्या मते सर्व्हेअरने एकूण रु. 5,13,399/- एवढ्या रकमेचे मुल्यांकन दाखविले आहे व विरुध्दपक्षाने श्री खत्री यांचा प्रतिज्ञालेख दाखल करुन त्यात नुकसानीचे मुल्यांकन रु. 2,99,950/- इतकी रक्कम नमुद केली. परंतु दाखल सर्व्हे अवालात सर्व्हेअरने सदर ट्रॅक्टरच्या नुकसानीचे मुल्यांकन रु. 3,16,950/- इतकी रक्कम दाखविली आहे. त्यामुळे सर्व्हेअरने प्रतिज्ञापत्रात चुकीची रक्कम कशी लिहली? याबद्दलचे स्पष्टीकरण विरुध्दपक्षाने मंचासमोर सादर केले नाही. तसेच सदर सर्व्हे ट्रॅक्टर अपघातानंतर बऱ्याच कालावधीनंतर का केला ? याबद्दलचे स्पष्टीकरण मंचाला प्राप्त झाले नाही. त्यामुळे विरुध्दपक्षाचा बचाव ग्राह्य न धरता, सर्व्हे रिपोर्ट मध्ये नमुद केलेली, ट्रॅक्टर दुरुस्तीच्या नुकसानीची आकारणी रक्कम सव्याज इतर नुकसान भरपाई व प्रकरण खर्चासह विरुध्दपक्षाकडून घेण्यास तक्रारकर्ता पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाच्या परवानाधारक सर्व्हेअरच्या गुणवत्तेबद्दल कुठलीही शंका उपस्थित केली नाही, तसेच या सर्व्हे रिपोर्टला नकारार्थी असा दुसरा सर्व्हे रिपोर्ट दाखल केला नाही. शिवाय ट्रॅक्टर दुरुस्त होवु शकतो, असे सर्व्हे रिपोर्ट मधील कथनावरुन दिसते.
अपघाताबद्दल उभय पक्षाने दाखल केलेले दस्त असे दर्शवितात की, तक्रारकर्त्याच्या वाहनाला दुसऱ्या वाहनाने ठोस मारल्यामुळे हा अपघात झालेला आहे व पोलिस पंचनाम्यात सदर ट्रॅक्टर हा गणेश राजाराम मुंडे चालवित होता, असे नमुद आहे. त्यामुळे विरुध्दपक्षाचा या बद्दलचा आक्षेप की अपघाताच्या वेळेस वादातील ट्रॅक्टर तक्रारकर्त्याचा मुलगा चालविता होता व त्याच्याकडे वैध परवाना नव्हता, हा फेटाळण्यात येतो. म्हणून अंतीम आदेश खालील प्रमाणे पारीत केला.
:::अं ति म आ दे श:::
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीकपणे व संयुक्तरित्या तक्रारकर्त्यास ट्रॅक्टर क्र. एमएच 30 एबी 6573 च्या विम्याची रक्कम, सर्व्हेअरच्या मुल्यांकनानुसार रु.3,16,950/- ( रुपये तिन लाख सोळा हजार नऊशे पन्नास ) द.सा.द.शे. 8 टक्के व्याज दराने दि. 25/6/2015 (प्रकरण दाखल दिनांक ) पासून ते प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत व्याजासह द्यावी, तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 5000/- ( रुपये पाच हजार ) व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 3000/- ( रुपये तिन हजार ) द्यावे.
- सदर आदेशाचे पालन, निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसात करावी, मुदतीत आदेशाचे पालन न केल्यास उपरोक्त सर्व रकमांवर आदेश तारखेपासून प्रत्यक्ष रक्कम देईपर्यंत द.सा.द.शे. 8 टक्के दराने व्याजासह रक्कम देण्यास विरुध्दपक्ष बाध्य राहील.
4) सदर आदेशाच्या प्रती संबंधीतांना निशुल्क देण्यात याव्या.