निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 11.01.2010 तक्रार नोदणी दिनांकः- 18.01.2010 तक्रार निकाल दिनांकः- 22.12.2010 कालावधी 11महिने04 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशीB.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. प्रकरण क्रमांक 16/2010आणि 17/2010 1 अरुण पिता पृथ्वीराज श्रीखंडे अर्जदार- तक्रार क्रमांक16/2010 वय 35 वर्षे धंदा शेती रा.इठलापूर, ता.जि.परभणी 2 मारोती पिता संभाजी खंटीग अर्जदार- तक्रार क्रमांक17/2010 वय 35 वर्षे धंदा शेती रा.इठलापूर, ता.गंगाखेड जि.परभणी ( सर्व अर्जदारातर्फे अड.डि.यू.दराडे ) विरुध्द 1 मॅनंजिंग डॉयरेक्टर गैरअर्जदार तुलसी पाईप ठिबक सिंचन , अड एन.एन.वेलणकर क्रमांक 99/100 एम.आय.डी.सी.एरीया, जळगांव. 2 मे.पाडूरंग ट्रेडर्स अड.बी.एन.जोशी स्टेशन रोड, परभणी, मार्फत प्रोप्रायटर. कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्य ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष ) शेती पाणीपुरवठयासाठी खरेदी केलेल्या पी.व्ही.सी.पाईप्स निकृष्ट दर्जाचे निघाल्याबद्यलची नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रस्तूतच्या तक्रारी आहेत. दोन्ही तक्रार अर्जातील अर्जदार एकाच गावचे रहिवासी असून त्याच्या तक्रारीचे स्वरुप एकसारखेच आहे तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 तुलसी पाईप्स जळगांव आणि गैरअर्जदार क्रमांक 2 पाडूरंग ट्रेडर्स परभणी हे दोन्ही प्रकरणात एकच विरुध्द पार्टी आहेत त्यानी सादर केलेले लेखी जबाब एकसारखेच असल्यामुळे दोन्ही प्रकरणाचा संयुक्त निकालपत्रा व्दारे निर्णय देण्यात येत आहे. अर्जदारांच्या तक्रारीची थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे. अर्जदार मौजे ईठलापूर जिल्हा परभणी येथील रहिवासी शेतकरी आहेत त्यांच्या मालकीच्या शेत जमिनीतील पिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे दुकानातून गैरअर्जदार क्रमांक 1 यानी उत्पादीत केलेल्या तीन इंच पी.व्ही.सी. पाईप्सचे आवश्यकते प्रमाणे कोटेशन घेऊन प्रती पाईप दर रुपये 383/- प्रमाणे दिनांक 25.11.2008 रोजी प्रकरण क्रमांक 16/2010 मधील अर्जदाराने एकूण 375 नग पाईप्स 143625/- रुपयास खरेदी केले आणि प्रकरण 17/2010 मधील अर्जदाराने एकूण 325 नग पाईप्स 124425/- रुपयास खरेदी केले. खरेदीच्या पावत्या अर्जदार क्रमांक 2 ने दिल्या आहेत. अर्जदाराचे म्हणणे असे की, कोटेशन घेतेवेळी गैरअर्जदार क्रमांक 2 ने पाईपची सात वर्षाची कंपनीची गॅरटी सागून सोळा वर्षात पाईप डॅमेज झाल्यास अथवा सदोष निघाल्यास खरेदीची संपूर्ण रक्कम परत करण्यात येइल असे आश्वासन दिले होते. अर्जदारानी त्यानंतर शेतामध्ये चरी खोदून त्यासाठी प्रत्येकी सुमारे रुपये 20,000/- खर्च करुन पाईप लाइन करुन घेतली. व भूइमांगाच्या पिकाची पेरणी केली होती. सुरुवातीला माहे ऑक्टोबर मध्ये पाईप लिकेज असल्याचे पिकाना पाणी देताना दिसून आले. त्यानंतर जोडलेल्या पाईप्स पैकी 10 ते 15 पाईप वेगवेगळया ठिकाणी फुटलेल्या आढळल्या. त्याबाबत गैरअर्जदार क्रमाक 2 कडे तक्रार नोंदविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 कंपनीचा तांत्रीक अभियंत्याने अर्जदाराच्या शेतातील पी.व्ही.सी. पाईप्स लाईनची पाहणी करुन सर्व्हे केला व पाईप लाईन मध्ये तांत्रीक बिघाड असल्याचे त्याने अर्जदाराला सांगितले त्यानंतर अर्जदारानी गैरअर्जदाराकडे नुकसान भरपाईची मागणी केली असता ते दुर्लक्ष करु लागले. म्हणून 16.06.2009 रोजी वकिलामार्फत गैरअर्जदाराना नोटीस पाठवून रुपये दोन लाख नुकसान भरपाईची मागणी केली होती परंतू नोटीस स्विकारुनही नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था केली नाही म्हणून त्याची कायदेशीर दाद मिळण्यासाठी ग्राहक मंचात प्रस्तूतचे तक्रार अर्ज दाखल करुन प्रकरण 16/2010 मधील अर्जदाराने पाईप्स ची नुकसान भरपाई रुपये 124475/- , मानसिक त्रासापोटी रुपये 3000/- पिकाची नुकसान भरपाई रुपये 50000/- व तक्रार अर्जाचा खर्च रुपये 2000/- मिळावा अशी मागणी केली आहे. तसेच प्रकरण 17/2010 मधील अर्जदाराने पाईप्स ची नुकसान भरपाई रुपये 143625/- , मानसिक त्रासापोटी रुपये 5000/- पिकाची नुकसान भरपाई रुपये 30000/- व तक्रार अर्जाचा खर्च रुपये 2000/- मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदारांची शपथपत्रे ( नि.2) व पुराव्यातील कागदपत्रात नि. 4 लगत पाइप खरेदीची बीले, नोटीसीची स्थळप्रत व पोष्टाच्या पावत्या वगैरे 6 कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार कमांक 1 ने दिनांक 12.04.2010 रोजी व गैरअर्जदार क्रमांक 2 ने 29.03.2010 रोजी आपले लेखी जबाब दोन्ही प्रकरणात दाखल केले. गैरअर्जदार क्रमांक 1 तुलसी पाईप याने तक्रार अर्जातील सर्व विधाने साफ नाकारली असून त्यांचे विरुध्द खोटी व चुकीची तक्रार केलेली असून तक्रार अर्ज परिच्छेद क्रमांक 2 मध्ये म्हटलेप्रमाणे अर्जदाराला पाईपची सात वर्षाची गॅरंटी व सोळा वर्षात कोणत्याही प्रकारे पाईप खराब निघाले तर संपूर्ण रक्कमेची नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिलेले नव्हते असे त्यांचे म्हणणे आहे. कंपनी कोणत्याही प्रकारची गॅरंटी देत नाही. त्यानी उत्पादीत केलेल्या तुलसी पी.व्ही.सी.पाईप्स दर्जेदार असून आय.एस.आय.मार्क मिळालेले आहेत. पी.व्ही.सी. पाईप्सची वांरटी अथवा गॅरटी दिली जात नाही. अर्जदाराने शेतात पाईप लाईन टाकताना तज्ञ इंजिनीअरचा सल्ला व मार्गदर्शन न घेता भरपूर लांबीची पाईप लाईन टाकताना ठरावीत अंतरावर तांत्रीक दृष्टया बसविण्याचे वॉल व एअर वॉल बसविलेले नव्हते. पाईप टाकताना जमिनीच्या चढ उतार विचारात घेतला नाही तसेच पाणी पुरवठा कोणत्याही कारणास्तव बंद झाल्यावर पाईप मधील पाण्याचे प्रेशर कमी करण्यासाठी व ठरावीक अंतरावर पाणी पाईप मधून एकदम प्रेशरने परत येवू नये म्हणून नॉन रिटर्न वॉल देखील बसविलेले नव्हते. पाईप फीटींग व पाईपचे कफलर योग्यरित्या जोडले नव्हते या त्रूटीमुळेच पाईपावर पाण्याचे प्रेशर येवून काही ठिकाणी पाईप्स फुटल्या आहेत. त्याला अर्जदार हे सर्वस्वी जबाबदार आहेत. गैरअर्जदाराने उत्पादीत केलेले पाईप्स मुळीच निकृष्ट दर्जाचे नाहीत. भरमसाठ नुकसान भरपाई मिळणेसाठी अर्जदाराने खोटी तक्रार केली आहे. ती खर्चासह खारीज करण्यात यावी अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदारातर्फे एल.एम.जाधव यांचे शपथपत्र (नि.20 ) दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 2 यानी लेखी जबाबात (नि.11) त्यांच्याकडून अर्जदारानी पी.व्ही.सी. पाईप्स खरेदीकेल्याचा मजकूर वगळता बाकीची सर्व विधाने साफ नाकारली आहेत. त्यांचे म्हणणे असे की, गैरअर्जदार क्रमांक 2 हे तुलसी पाईप्सचे डिलर आहेत. अर्जदार पाईप खरेदीचे कोटेशन घेण्यासाठी आले होते त्यावेळी त्याना पाईपची सात वर्षाची गॅरटी आणि सोळा वर्षात पाईप डॅमेज झाल्यास कंपनी पूर्ण किंमत परत करते असे मुळीच अश्वासन दिले नव्हते. पाईप लाईन टाकताना जमिनीची पातळी, ठरावीक व योग्य अंतरावर पाण्याचा दाब नियंत्रीत राहण्यासाठी वॉल टाकणे, पाण्याला प्रेशर असेल तर योग्य दाबाने पाणी वाहून नेण्यासाठी तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली वॉलची व पाईप्स ची अगजेसमेंट करुन घेणे या बाबी विचारात घ्याव्या लागतात. अर्जदारानी त्यांच्या 10/15 पाईप फुटल्याचे तक्रारी घेवून आल्यावर गैरअर्जदाराने स्वतः शेतातील पाईप लाईनची पाहणी केली असता अर्जदाराने जोडलेल्या पाईप लाईन सदोष व तज्ञाचे मार्गदर्शन न घेता प्रेशर अडजेस्टमेंटच्या आवश्यक त्या बाबी न करता पाईप जोडलेले दिसून आले. पाईप पाण्याचे प्रेशर मुळे फुटलेले होते. त्यामध्ये उत्पादनातील कसलाही दोष नव्हता. अर्जदारानी तक्रार अर्जामध्ये कंपनीचे इंजिनीअर पाईप लाईन पाहाणी करण्यासाठी व त्याने सर्व्हे केला होता. हे केलेले कथन साफ खोटे आहे. गैरअर्जदाराचे पुढे म्हणणे असे की, अर्जदाराने नोव्हेबर 2008 मध्ये पाईप खरेदी केल्यावर भुइमुगांची पेरणी करुन पिके काढल्यावर आठ महिन्यानंतर म्हणजे 16.06.2009 रोजी पाईपच्या सदोषते बदल गैरअर्जदाराकडे तक्रार केली होती. त्यामुळे पिकाच्या नुकसानीची मागणी त्याने साफ नाकारली आहे. अर्जदाराने वकिलामार्फत पाठविलेल्या नोटीसीला दिनांक 30.06.2009 रोजी सविस्तर उत्तर पाठविलेले होते तरी देखील सहा महिन्यानंतर गैरअर्जदार मुद्याम त्रास देण्यासाठी व भरमसाठ रक्कम उकळण्याचे हेतूने खोटया तक्रारी केल्या आहेत त्या खर्चासह फेटाळयात याव्यात अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबचे पुष्टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 2 चे शपथपत्र (नि.12) दाखल केले . आहे. तक्रार अर्जाचे अंतिम सुनावणीचे वेळी अर्जदारातर्फे अड. दराडे यानी व गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे अड. वेलणकर व गैरअर्जदार क्रमांक 2 तर्फे अड. बी.एन.जोशी यानी युक्तिवाद केला. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्ये. मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदार क्रमांक 1 यानी उत्पादीत केलेल व गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडून अर्जदारानी खरेदी केलेल्या तुलसी पि.व्ही.सी. पाईस सदोष व निकृष्ट दर्जाचे होते हे अर्जदाराकडून शाबीत झाले आहे काय ? नाही 2 गैरअर्जदाराकडून सेवा त्रूटीची व पाईपची नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? नाही कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 ः- दोन्ही प्रकरणातील अर्जदारानी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या दुकानातून पी.व्ही.सी. पाईप्स खरेदी केल्याच्या पावत्या (नि. 4/2) पुराव्यात दाखल केलेल्या असल्यामुळे गैरअर्जदारांचे ते ग्राहक आहेत. ही प्राथमिक बाब शाबीत झाली आहे. परंतू त्यानी कोणत्या गट नंबर मधील शेतामध्ये पाईप लाईन केली होती त्या संबधीचा कसलाही ठोस पुरावा उदाः जमिनीचा 7/12 दाखल केलेला नाही व तक्रार अर्जामध्ये त्या बाबत स्पष्ट खुलासा केलेला नाही. तसेच पाईप लाईन बसविण्यासाठी मंजूरी व जोडणीसाठी त्यानी प्रत्येकी रुपये 20,000/- खर्च केले होते असे तक्रार अर्जात म्हटले आहे परंतू खर्चाची पावती अगर अन्य पुरावाही दाखल केलेला नाही तसेच पाईप फुटल्यावर कंपनीचा तंत्रज्ञ शेतावर आला होता त्याने पाहणी करुन सर्व्हे केला व अहवाल दिला असे तक्रार अर्जात म्हटलेले आहे परंतू त्याचा ही कोणताही ठोस पुरावा अर्जदारानी स्वतः दाखल केलेला नाही अगर कंपनीच्या तंत्रज्ञाने सर्व्हे केला होता तो अहवाल गैरअर्जदार क्रमांक 1 कडून मंचापुढे दाखल करण्याची मागणी अर्जदारानी केलेली नाही. तुलसी पाईप्स ची गैरअर्जदार क्रमांक 2 ने सात वर्षाची गॅरटी दिली होती व सोळा वर्षात कोणत्याही कारणास्तव पाईप डॅमेज झाल्यास त्याची पूर्ण नुकसान भरपाई कंपनी देइल असे अश्वासन दिल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे परंतू पाईप खरेदी पावत्यावर त्या बाबतचा कसलाही उललेख दिसून येत नाही. पावत्यावर गॅरंटी/वॉरंटी मजकूर छापलेली दिसत नाही म्हटल्यानंतर अर्जदारानी गैरअर्जदार क्रमांक 2 कडून दिलेले आश्वासन कायदेशीररित्या त्याचेवर बंधनकारक राहावे म्हणून गैरअर्जदार क्रमांक 2 कडून पावत्यावर तसे लिहून घेतलेले दिसत नाही. त्यामुळे तक्रार अर्जामध्ये याबाबत केलेली विधाने पोकळ स्वरुपाची असल्याची अनुमान निघते. विनाशाबीती ते मुळीच ग्राहय धरता येणार नाही. तक्रार अर्जात अर्जदाराने जोडलेल्या पाईप पैकी 10 ते 15 पाईप फुटलेले आहेत मात्र नुकसान भरपाईची मागणी संपूर्ण पाईप खरेदीच्या रक्कमेची कशी काय केली याचेच आश्चर्य वाटते. मुळातच अर्जदारानी शेतात बसवलेल्या पी.व्ही.सी. पाईप्स तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली योग्य व ठरावीक अंतरावर वॉल बसवून पाण्याचे प्रेशरमुळे पाईपवर दाब पडून फुटू नये म्हणून योग्य त्या दाबाने पाणी वाहून नेणारी तांत्रीक अडजेस्टमेंट केलेली होती व आवश्यक त्या सर्व तांत्रीक बाबीची काळजी घेतली असतानाही पाण्याचे प्रेशरविना पाईप निकृष्ट दर्जाचे व सदोष होत्या म्हणून फुटल्या असा कोणताही ठोस व सबळ पुरावा अर्जदाराने मंचापुढे सादर केलेला नसल्यामुळे गैरअर्जदारावर पाईपच्या उत्पदनातील सदोषतेचा ठपका ठेवून वेगवेगळया कारणाखाली भरमसाठ रक्कमेची नुकसान भरपाईची केलेली मागणी निरर्थक असून ती मान्य करता येणार नाही. पुराव्यात पाईप फुटल्याचे फोटो दाखल केले आहे त्यावरुन पाईप निकृष्ट दर्जाचे आहेत हे ठरवता येणार नाही कारण ग्राहकाने खरेदी केलेल्या वस्तूमध्ये उत्पादनातील दोष आहे अथवा ती वॉरटी गॅरटीप्रमाणे नाही किंवा निकृष्ट दर्जाचे आहे हे कायदेशीररित्या शाबीत करण्याची जबाबदारी ग्राहकाची असते व तज्ञाच्या अहवालाव्दारे ते शाबीत करावे लागते. ग्राहक संरक्षण कायदयात ही तशी स्पष्ट तरतूद आहे त्याप्रमाणे तज्ञाचे मत मागवण्याचा एकाही अर्जदाराने शेवटपर्यंत प्रयत्न केलेला नाही गैरअर्जदाराकडून सेवा त्रूटी झाल्याचे शाबीत झालेले नसल्यामुळे अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही त्यामुळे तक्रार अर्ज निश्चीतपणे फेटाळण्यास पात्र ठरतात. अशा तक्रारीच्या बाबतीत मा. राष्ट्रीय आयोगाने खालील रिपोर्टेड केसेसमध्ये व्यक्त केलेली मते अर्जदारांच्या तक्रारीला ही ती लागू पडतात. 1 रिपोर्टेड केस 2010 (1) सी.पी.आर.पान 110 ( राष्ट्रीय आयोग ) Point-Allegation of manufacturing defect has to be proved only by expert evidence. 2 रिपोर्टेड केस 2010 (2) सी.पी.आर.पान 418 ( राष्ट्रीय आयोग ) Point - Until and unless the manufacturing defect is pointed out and proved the manufacturer cannot be asked to replace the article or give compensation सबब मुद्या क्रमांक 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देवून आम्हीखालीलप्रमाणेआदेशदेत आहोत. आदेश 1 अर्जदारांचा तक्रार अर्ज क्रमांक 16/2010, आणि 17/2010 नामंजूर करण्यात येत आहे. 2 दोन्ही पक्षानी आपआपला खर्च सोसावा. 3 संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. 4 निकाल पत्राची मुळप्रत प्रकरण क्रमांक 16/2010 मध्ये ठेवावी. श्रीमती.अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |