न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार क्र.1 हे वि.प. बँकेत क्लार्क म्हणून दि. 10/4/1978 रोजी नोकरीस लागले. तक्रारदार क्र.1 यांना वि.प.क्र.1 बँकेने काम करीत असताना नोकरीतून कमी केले. त्यावेळेस त्यांची 18 वर्षे 9 महिने इतकी सेवा झाली होती. बँकींग इंडस्ट्रीमध्ये निवृत्तीवेतनाबाबत दि. 29/10/1993 रोजी राष्ट्रीय पातळीवर द्विपक्षीय करार झाला. या करारावर वि.प.क्र.2 यांनी सहया केल्या आहेत. वि.प.क्र.1 बँक ही सदरचे करारात सामील होती. वि.प.क्र.1 यांनी त्यांच्या कर्मचा-यांना परिपत्रक पाठवून सदर कराराबाबत माहिती दिली व कर्मचा-यांकडून irrevocable options to become member of pension fund मागितले. त्यानुसार वि.प.क्र.1 बँकेने पेन्शन रेग्युलेशन्स 1995 या निवृत्ती वेतन नियमावलीची अंमलबजावणी सुरु केली. तक्रारदार याने निवृत्ती वेतनाचा पर्याय स्वीकारला होता व त्यामुळे त्यांचे प्रॉव्हिडंड फंडाची मालकाचे हिश्याची रक्कम ही निवृत्ती वेतनाचे फंडास जमा होत होती. सदरची बाब वि.प.क्र.1 यांनी त्यांचे उत्तरी नोटीसीत मान्य केली आहे. तक्रारदार यांना नोकरीतून कमी केलेनंतर वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांचे शिल्लक रजेचा पगार तसेच प्रॉव्हिंडंड फंड, ग्रॅच्युईटी रजेचा पगार या सर्व रकमा मिळण्यास तक्रारदार पात्र होता. मात्र वि.प.क्र.1 यांनी तक्रारदारास निवृत्ती वेतनाची दरमहा रक्कम दिली नाही. तसेच तक्रारदाराचे प्रॉव्हिंडंड फंडाची स्वतःचे हिश्याची रक्कम व ग्रॅच्युईटी वि.प.क्र.1 यांनी दिलेली नाही. तसेच वि.प.क्र.2 यांनी काढलेले परिपत्रक क्र. HR&IR/CIR/2015-16/1852 दि. 23/12/2015 या परिपत्रकाचा लाभ वि.प.क्र.1 यांनी तक्रारदारास मिळू दिलेला नाही. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून तक्रारदार निवृत्त झाल्यापासून आजपावेतो होणा-या निवृत्ती वेतनाची रक्कम व्याजासह मंजूर करण्यात यावी तसेच अर्जित रजेच्या पगाराची रक्कम तक्रारदारास वि.प.क्र.1 कडून मिळावी, मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 1,00,000/- व निवृत्ती वेतनाच्या देय रकमेवर द.सा.द.शे. 12 टक्के दराने व्याज मिळावे, व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.25,000/- तक्रारदारास मिळावे अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 13 कडे अनुक्रमे निवृत्ती वेतन कराराबाबतचे परिपत्रक, निवृत्तीवेतन नियमावली बाबतचे परिपत्रक, निवृत्ती वेतन नियमावली, दि. 25/2/08 चे मिटींगचे इतिवृत्त, वन मोअर ऑप्शन कराराचे मेमोरंडम, वरिष्ठ न्यायालयांचे निवाडे, वि.प.क्र.1 यांनी दिलेली उत्तरी नोटीस, लेबर कमिशनर यांचेकडून तक्रार काढून घेत असलेबाबतचे तक्रारदारांचे पत्र वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प.क्र.2 यांना प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस लागू होवूनही वि.प.क्र.2 हे याकामी हजर झाले नाहीत व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले नाही. सबब, वि.प.क्र.2 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
5. वि.प.क्र.1 यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत तक्रारदाराचा बडतर्फ आदेश, लेबर कमिशनर, पुणे यांचेकडील वि.प. यांचे म्हणणे, सेटलमेंटचे परिपत्रक, तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेली नोटीस, सदर नोटीसीस वि.प. यांनी दिलेले उत्तर, करार, वटमुखत्यारपत्र तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. वि.प. क्र.1 ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. क्र.1 ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) तक्रारदार हे वि.प.क्र.1 बँकेत दि. 10/4/1978 रोजी नोकरीस लागले व दि. 8/2/1997 रोजी बँकेने योग्य कार्यवाही अवलंबून त्यांनी केलेल्या गंभीर गैरकृत्यामुळे दि. 14/2/1995 रोजीच्या द्विपक्षीय करारातील तरतुदीप्रमाणे तक्रारदाराला दि. 08/02/1997 रोजी सेवेतून विनानोटीस बडतर्फ केले. तक्रारदार यांनी तक्रारीत मागितलेल्या रकमा या बँकेकडे कधीही मागितल्या नव्हत्या. सदरच्या रकमा तक्रारदार हे 20 वर्षानंतर मागत असलेने सदरची तक्रार ही कालबाहय आहे.
iii) तक्रारदार हे वि.प.बँकेचे सेवक होते व त्यांना बँकेने बडतर्फ केले असल्याने ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ते ग्राहक या संज्ञेत मोडत नाहीत.
iv) तक्रारदाराचे बडतर्फ आदेशानंतर बँकेने तक्रारदार यांची प्रॉव्हिंडंड फंडामधील तक्रारदार यांची स्वतःची वर्गणी व ग्रॅच्युईटची रक्कम त्याचवेळी अदा केली आहे. तक्रारदार हे निवृत्तीवेतनास अपात्र ठरलेने त्यांना निवृत्ती वेतनाची मागणी करणेचा कोणताही अधिकार नाही.
v) The Ratnakar Bank Employees Pension Regulation 1995 मधील नियम 22(1) अन्वये बडतर्फ झालेल्या कर्मचा-यांची पेन्शन सर्वस्वी जप्त केली जाते. सदर रेग्युलेशन पुढीलप्रमाणे Resignation or dismissal or removal or termination of an employee from the services of the Bank shall entail forfeiture of his entire past service and consequently shall not qualify for pensionary benefits.
vi) तक्रारदार यांनी नमूद केलेले वि.प.क्र.2 चे परिपत्रक हे दि. 10/4/2002 नंतर बडतर्फ केलेल्या सेवकांना लागू आहे. तक्रारदार हे दि. 8/2/1997 रोजी बडतर्फ झाले असल्याने त्यांना सदरचे परिपत्रक लागू नाही. तक्रारदार यांची बडतर्फी ही निव्वळ बडतर्फी विना नोटीस दि. 8/2/1997 ची असलेने सदर परिपत्रक लागू होत नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प.क्र.1 यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. क्र.1 यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
6. वर नमूद तक्रारदार व वि.प. क्र.1 यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | तक्रारदाराची तक्रार मुदतीत आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून निवृत्ती वेतन मिळणेस पात्र आहेत काय ? | नाही. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
7. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे कारण तक्रारदार हे वि.प. बँकेत जरी नोकरीस असले तरी नोकरीतून बडतर्फ झाल्यानंतर त्यांना प्रॉव्हिडंड फंडाची रक्कम वि.प. यांनी दिली आहे. सबब, तक्रारदार व वि.प.क्र.1 हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
8. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे कारण तक्रारदाराने पेन्शन ही दरमहा मिळत असून ती न मिळाल्यास कंटीन्यूइंग कॉज ऑफ अॅक्शन होते ही बाब तक्रारदाराने दाखल केले मा. वरिष्ठ न्यायालयांच्या न्यायनिवाडयांतून स्पष्ट होते. सबब, तक्रारदाराची तक्रार ही मुदतीत आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
9. तक्रारदार निवृत्ती वेतन मिळणेस पात्र नाही कारण दि रत्नाकर बँक लि. एम्प्लॉईज पेन्शन रेग्युलेशन्स 1995 हा 1995 साली अंमलात आला. सदर रेग्युलेशनमधील कलम 22 नुसार तक्रारदाराची पूर्वीची सर्व सेवा ही फॉरफिट होते, त्यामुळे तक्रारदार हे निवृत्तीवेतन/पेन्शन मिळण्यास अपात्र आहेत.
कलम 22 - Resignation or dismissal or removal or termination of an employee from the services of the Bank shall entail forfeiture of his entire past service and consequently shall not qualify for pensionary benefits.
10. तसेच तक्रारदाराचे दि. 8/2/1997 चे बडतर्फीचे आदेशाचे अवलोकन करता नमूद तक्रारदार यांना वि.प. बँकेने विनानोटीस बडतर्फ केलेचे स्पष्ट होते. सदर बडतर्फी आदेशामध्ये कुठेही निवृत्तीवेतनाच्या सर्व लाभांसह बडतर्फ असे नमूद केलेले नाही.
11. मेमोरंडम ऑफ सेटलमेंट 2002 मधील कलम 19 मधील उपकलम 6 नुसार कर्मचा-यांनी कलेल्या गैरकृत्याकरिता खालीलप्रमाणे शिक्षा देता येते.
- विना नोटीस बडतर्फ करणे.
ब) निवृत्तीच्या सर्व फायद्यानिशी सेवेतून काढून टाकणे.
क) निवृत्तीच्या सर्व फायद्यानिशी सक्तीची निवृत्ती.
ड) निवृत्तीच्या सर्व फायद्ययानिशी सेवा मुक्त करणे.
सदरचे मेमोरंडम ऑफ सेटलमेंट याकामी वि.प. ने दाखल केले आहे. तसेच दि. 14/2/1995 चे मेमोरंडम ऑफ सेटलमेंट याकामी दाखल केले आहे.
12. सदर कामी वि.प. बँकेने 1995 साली पेन्शन स्कीम आलेनंतर तक्रारदार यांना वि.प. बँकेने दि. 08/02/1997 साली बँकेचे सेवेतून विनोनोटीस बडतर्फ केले आहे. त्यामुळे नमूद पेन्शन स्कीम 1995 चे कलम 22 नुसार तक्रारदाराची पूर्वीची सर्व सेवा ही फॉरफिट होते व तक्रारदार पेन्शन मिळणेस पात्र नाही असे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदाराचे म्हणण्याप्रमाणे कलम 43 नुसार पेन्शन विड्रॉवल व विथहोल्ड करणेचा प्रश्नच उद्भवत नाही व तक्रारदाराचा पेन्शन मिळण्याचा हक्क “ बडतर्फ विनानोटीस ” या आदेशामुळे फॉरफिट झाला आहे.
13. याकामातील तक्रारदार यास बडतर्फ केलेनंतर वि.प. बँकेने तक्रारदार यास फक्त तक्रारदार यांच्या हिश्याची प्रॉव्हिडंड फंडाची वर्गणी व ग्रॅच्युईटी दिली आहे म्हणजे वि.प. यांनी तक्रारदार यांना निवृत्तीचे फायदे दिले असे म्हणता येणार नाही.
14. तक्रारदाराची वि.प.क्र.1 बँकेमध्ये एकूण सर्व्हिस 18 वर्षे 9 महिने झालेली असली तरीही ते सरळ मार्गाने/नैसर्गिकरित्या निवृत्त झाले नसून त्यांचेवर गंभीर आरोप सिध्द झालेमुळे विनानोटीस बडतर्फ केले आहे. त्यामुळे दि रत्नाकर बँक लि. एम्प्लॉईज पेन्शन रेग्युलेशन्स 1995 नुसार तक्रारदाराला विनानोटीस बडतर्फ केले असलेने त्यांची पूर्वीची सर्व्हिस फॉरफिट होते. सबब, तक्रारदार हे निवृत्ती वेतन मिळणेस पात्र नाहीत असे या आयोगाचे निष्कर्ष आहेत.
15. यातील तक्रारदार यांनी 1995 ला पेन्शन स्कीमसाठी पेन्शन स्कीमचा विकल्प निवडला होता तरी देखील तक्रारदार यांना विनानोटीस बडतर्फ केलेले असलेने ते पेन्शन मिळणेस पात्र नाहीत. तक्रारदार यांनी त्यांचे हिश्याची प्रॉव्हिडंड फंड व ग्रॅच्युईटीची रक्कम स्वीकारलेली नाही.
16. याकामी तक्रारदाराने अर्जित रजेची रक्कम मागणी केलेली आहे. परंतु 1979 चे मेमोरंडम ऑफ सेटलमेंट मधील कलम 15 नुसार फक्त सेवानिवृत्त झालेल्या कर्मच-यांना अर्जित रजेची रक्कम मिळू शकते. तक्रारदार हे कधीही नैसर्गिकरित्या सेवा निवृत्त झालेले नाहीत तर तक्रारदार यांना विनानोटीस बडतर्फ केलेले असलेने सदर अर्जित रजेची रक्कम तक्रारदार मिळण्यास पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहेत.
17. वि.प. यांनी याकामी वरिष्ठ न्यायालयाचा खालील निवाडा दाखल केला आहे.
Civil Appeal No. 8251/2018 before the Supreme Court of India decided on 14/08/2018.
Union Bank of India & Ors. Vs. C.G. Ajay Babu & Anr.
18. तक्रारदारांनी याकामी वरिष्ठ न्यायालयांचे खालील निवाडे दाखल केले आहेत.
1) 1999 CJ (SC) 1002
Regional Provident Fund Commissioner Vs. Shivkumar Joshi
2) Civil Appeal No. 10251/2014 before SC
Asger Ibrahim Amin Vs. Life Insurance Corporation of India
3) Civil Appeal No. 10956/2013 before SC
Bank of Baroda Vs. S.K. Kool (D) Through Lrs. And Anr.
4) Civil Appeal No. 7113/2014 before SC
D.D. Tewari Vs. Uttar Haryana Bijli Vitran Nigam Ltd.
5) 2015(1) All MR 387
Devananda Galomal Nichwani Vs. Bank of Maharashtra
परंतु प्रस्तुत निवाडयातील घटनाक्रम व प्रस्तुत प्रकरणातील घटनाक्रम हा भिन्न असल्याने सदरचे निवाडे या प्रकरणास लागू होत नाहीत असे या आयोगाचे मत आहे.
19. वरील नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केले सर्व कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी तोंडी युक्तिवाद तसेच मे. वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे यांचे या आयोगाने काळजीपूर्वक अवलोकन केले असता याकामी तक्रारदार यांना वि.प.क्र. बँकेने विनानोटीस बडतर्फ केले असलेने तक्रारदार हे निवृत्ती वेतन तसेच अर्जित रजेची रक्कम मिळणेस तसेच नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर होण्यास पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर आम्ही नकारार्थी दिले आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येतो.
2) खर्चाबाबत आदेश नाहीत.
3) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.