निकाल (घोषित द्वारा – श्री डी.एस.देशमुख, अध्यक्ष) गैरअर्जदाराने विक्री केलेले बियाणे सदोष असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्याने गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांच्याकडून गैरअर्जदार क्र 1 अजीत सिड्स आणि गैरअर्जदार क्र 4 ग्रीन गोल्ड सिड्स यांनी उत्पादीत केलेले कापसाचे बियाणे खरेदी करुन त्याची आपल्या शेतामध्ये लागवड केली. लागवडीनंतर त्याने पिकाची योग्य मशागत करुन पिकाला आवश्यक ते खत आणि औषध फवारणी केली. सर्व प्रकारे योग्य काळजी घेतल्यानंतरही त्याच्या असे लक्षात आले की, कापसाच्या पिकाची योग्य वाढ होत नव्हती. ब-याच ठिकाणी पिकाची वाढ कमी जास्त झाली होती. अजीत सिड्स कंपनीच्या कापसाच्या वाणास बाधीत क्षेत्रामध्ये 7 ते8 पाने आणि 3 ते 4 बोंडे होती आणि ग्रीन गोल्ड कंपनीच्या कापसाच्या वाणास बाधीत क्षेत्रास 10 – 12 पाने व 6-7 बोंडे लागलेली होती. तसेच 30 टक्के झाडांना मर लागली होती. मर लागल्यामुळे त्याने औषधाची फवारणी केली परंतु त्यानंतरही मर लागल्याचे प्रमाण वाढत राहीले. म्हणून त्याने कृषी अधिकारी सिल्लोड यांना पिकाची पाहणी करण्याबाबत अर्ज दिला असता त्यांनी पिकाची पाहणी केली आणि पाहणीमध्ये पिकांना मर रोग झाल्याचे तसेच पिकाची वाढ खुंटल्याचे दिसून आले त्यानुसार जिल्हास्तरीय चौकशी समितीने दिनांक 29/8/2008 रोजी अहवाल दिला. गैरअर्जदारांनी उत्पादित केलेले कापूस बियाणे सदोष असल्यामुळे त्याचे रु 2 लाखाचे नुकसान झाले. म्हणून त्याने अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदारांनी त्यास रु 2 लाख नुकसान भरपाई द्यावी. गैरअर्जदार क्र 1 व 3 यांनी संयुक्त लेखी निवेदन दाखल केले. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराची तक्रार खोटी व दिशाभूल करणारी आहे. तक्रारदाराने एकाच वेळी वेगवेगळया कंपनीचे बियाणे विकत घेऊन एकत्रित लागवड केल्याचे दिसते. तक्रारदाराने त्याच्या शेतातील कापसाच्या झाडाची मर ही नेमक्या कोणत्या कारणाने झाली याचा उल्लेख केलेला नाही. कृषी अधिका-यांनी केलेल्या पंचनाम्यामध्ये असे नमूद केलेले आहे की, तक्रारदाराच्या शेतातील कापसाच्या पिकाची वाढ उतारातील भागात इतर भागापेक्षा कमी झाली. काही रोपे मुळ कुजल्यामुळे मेल्याचे निदर्शनास आले आणि निचरा व्यवस्थापन आवश्यक वाटते. कृषी अधिका-याने नोंदविलेल्या सदर निरीक्षणावरुन बियाणामध्ये दोष असल्याचे दिसून येते नाही. तक्रारदाराच्या शेतात उताराकडील भागात पाणी साठल्यामुळे झाडांचे मुळ कुजले व त्यामुळेच झाडाची वाढ झालेली नसल्याचे दिसते. तक्रारदाराच्या शेतात इतर भागामध्ये कापसाच्या झाडाची चांगली वाढ झालेली होती. तक्रारदाराला विक्री करण्यात आलेले बियाणे सदोष नव्हते आणि तक्रारदाराचे बियाणातील दोषामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदार क्र 1 व 3 यांनी केली आहे. गैरअर्जदार क्र 2 यांना मंचातर्फे पाठविलेली नोटीस मिळूनही ते गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्या विरुध्द ही तक्रार एकतर्फी चालविण्यात आली. गैरअर्जदार क्र 4 यांनी लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, त्यांनी तकारदाराला विक्री केलेले बियाणे सदोष नव्हते. त्यामुळे तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही त्यामुळे ही तक्रार फेटाळण्यात यावी. दोन्हीही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. तक्रारदार हे सिध्द करु शकतो का की, गैरअर्जदार नाही. क्र 1 आणि गैरअर्जदार क्र 4 यांनी उत्पादीत केलेले कापुस बियाणे सदोष होते? 2. आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मुद्दा क्र 1 :- तक्रारदार आणि गैरअर्जदार क्र 1 ते 3 हजर नाहीत. गैरअर्जदार क्र 4 च्या वतीने अड. डी.एस.तिपोळे यांनी युक्तिवाद केला. तक्रारदाराने गैरअर्जदार क्र 1 आणि 4 यांनी उत्पादित केलेले कापूस बियाणे सदोष असल्याचे सिध्द करण्यासाठी पंचनामा आणि पाहणी अहवाल दिनांक 4/8/2008 दाखल केला आहे. यापैकी पाहणी अहवाल दि 4/8/2008 हे कोणी केलेला आहे याचा काहीही खुलासा तक्रारदाराने केलेला नाही. त्यामुळे सदर पाहणी अहवालाला काहीही अर्थ नाही. दि 29/8/2008 रोजी जिल्हास्तरीय चौकशी समितीने केलेला पंचनामा पाहता तक्रारदाराच्या शेतात ज्या कापूस बियाणाची लागवड करण्यात आली होती ते बियाणे सदोष असल्याबाबत काहीही उल्लेख नाही. पंचनाम्यामधील नोंदीवरुन असे दिसून येते की, तक्रारदाराच्या शेतामध्ये काही भागामध्ये कापसाची वाढ कमी झाली. त्यासाठी कापूस बियाणे कारणीभूत असल्याचे दिसून येत नसून पाण्याचा निचरा व्यवस्थित झालेला नसल्यामुळेच पिकाची वाढ खुंटल्याचे दिसते. पंचनाम्यातील नोंदीवरुन असे दिसून येते की, तक्रारदाराच्या शेतातील उताराच्या भागातील कापसाशिवाय इतर भागातील कापसाची वाढ चांगली झालेली होती आणि कापसाच्या झाडाला चांगल्याप्रकारे बोंडे देखील लागलेली होती. त्यामुळे गैरअर्जदारानी उत्पादीत केलेले कापूस बियाणे सदोष असल्याचे सिध्द होत नाही. म्हणून मुद्दा क्र 1 चे उत्तर वरीलप्रमाण देण्यात आले. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते. 2. तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा. 3. संबंधितांना आदेश कळविण्यात यावा. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री डी.एस. देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष UNK
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |