जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर
ग्राहक तक्रार क्रमांक : 339/2011 दाखल तारीख :31/01/2011
निकाल तारीख :25/02/2015
कालावधी : 04वर्षे 0म.24 दिवस
श्रीमती सुनिता ऊर्फ सविता नोरतमल वर्मा,
वय 40 वर्षे, धंदा घरकाम,
रा. द्वारा गिरी हाऊस, भालती हॉस्पीटलच्या मागे,
बन्सीलाल नगर, अंबाजोगाई,
ता. अंबाजोगाई, जिल्हा बीड. ...तक्रारदार.
-विरुध्द-
1) व्यवस्थापकीय संचालक,
आय सी आय सी आय लोंम्बार्ड जनरल इंशुरन्स,
झेनिथ हाऊस, केशवराव खाडे मार्ग,
महालक्ष्मी मुंबई.
2) शाखा व्यवस्थापक,
आय सी आय सी आय लोम्बार्ड जनरल इंशुरन्स,
आय सी आय सी आय बँकेच्या वर, औसा रोड,
लातूर. ..... गैरअर्जदार
कोरम : 1) श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
2) श्री.अजय भोसरेकर, सदस्य
3) श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे : अॅड.अनिल के.जवळकर.
गै.अ.क्र.1 व 2 तर्फे :अॅड. एस.जी.डोईजोडे.
::: निकालपत्र :::
(घोषित द्वारा: श्रीमती ए.जी.सातपुते, मा. अध्यक्षा.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
अर्जदार ही अंबाजोगाई येथील राहणारी असून, अर्जदाराचे मयत पती हे नौकरीस होते, त्यांची बदली राजस्थान येथे होती, अर्जदाराच्या पतीने गृहकर्जासाठी गैरअर्जदार क्र. 2 कडे रु. 11 लाख कर्ज घेण्यासाठी अंबेजोगाईचा प्लॉट तारण म्हणुन दिला, व संपुर्ण कागदपत्रांची पुर्तता केली व रु. 11 लाखाचे कर्ज घेतले. ज्या कर्जाचा क्र. LBLAT 00001576554 असा होता. अर्जदाराच्या कुटूंबाचे कर्ज घेवुन बांधलेले घर सुरक्षित व संरक्षित राहावे, तसेच अर्जदाराच्या पतीचा कोणत्याही प्रकारे अचानक मृत्यू झाल्यास, कर्ज रक्कम बुडून जावु नये म्हणुन आय सी आय सी आय बँक लातूर यांनी अर्जदाराच्या पतीस गैरअर्जदाराकडे होम सेफ प्लस होम इंशुरन्स व होम सेफ प्लस सेक्युअर माईंड पॉलीसी काढली. या पॉलिसीचा क्र. 4013/ICICI-HSP/154208/00/000 असा होता. याचा कालावधी 30.08.2007 ते 29.08.2012 असा होता, याचा हप्ता रु. 4993/- एवढा होता. सदरच्या पॉलिसीत अर्जदाराच्या कुटूंबाचे घराचा , घुसखोरी होवुन होणारे नुकसान तथा चोरीमुळे होणारे नुकसान एकुण रु. 2,18,757/- चा विमा संरक्षित केला होता. त्यानंतर अर्जदाराच्या पतीने होम सेफ प्लस सेक्युअर माईंड पॉलीसी काढली. त्या पॉलिसीचा क्रमांक 4065/ICICI/HSP/1097349/00/000 असा होता, सदरच्या पॉलिसीचा कालावधी हा 30.08.2007 ते 29.08.2012 असा होता. अर्जदाराच्या पतीने सदरच्या पॉलिसीत अर्जदारास नॉमिनी म्हणुन नेमले होते. जर पॉलिसीधारकास कोणतेही गंभीर आजार पॉलिसीच्या दरम्यान उदभवल्यास किंवा दवाखान्याच्या विलाजासाठी व अपघाती मृत्यू झाल्यास व अपघातात कायमचे अपंगत्व आल्यास रु. 5,24,220/- एवढे मिळतील. सदरच्या पॉलिसीसाठी अर्जदाराने रु. 45,024/- एवढया रक्कमेचा हप्ता होता. परंतु अर्जदाराच्या पतीने गैरअर्जदाराच्या ग्रूप मधुन कर्ज घेतल्यामुळे अर्जदाराच्या पतीकडून सदरच्या पॉलिसी पोटी रक्कम रु. 24,918/- घेण्यात आले. गैरअर्जदाराने अर्जदाराचे पतीचे दोन्ही पॉलिसी जारी केल्या. अर्जदाराचे पती हे नौकरी निमित्ताने अजमेर येथे राहत होते. दि. 29.08.2009 रोजी अर्जदाराच्या पतीचे पोटात दुखु लागले व त्यांना कावीळ झाले, व शौच्यावाटे रक्त जावु लागले. त्यामुळे त्यांना मित्तल हॉस्पीटल अजमेर येथे शरिक करण्यात आले, त्यांना कावीळ झाल्याचे निष्पन्न झाले. मित्तल हॉस्पीटल येथे दि. 19.08.2009 ते 27.08.2009 पर्यंत आंतररुग्ण म्हणुन शरिक होते, त्यानंतर त्यांना सवाई मानसिंग हॉस्पीटल येथे उपचार चालु असतांना, दि. 05.09.2009 रोजी अर्जदाराच्या पतीचा मृत्यू झाला. अर्जदाराने क्लेम फॉर्म व आवश्यक त्या संपुर्ण कागदपत्रांची पुर्तता करुन, गैरअर्जदारांना दि. 19.10.2009 रोजी संपुर्ण विमा संरक्षित रक्कम रु. 5,24,220/- ची मागणी केली. गैरअर्जदाराने सदरची कागदपत्रे घेवुन अर्जदाराने पॉलिसी घेतेवेळी पुर्वीचा असलेला आजार लपवला, म्हणुन दि. 28.12.2009 रोजी अर्जदाराचा क्लेम नाकारला. अर्जदाराच्या पतीने होम सेफ प्लस सेक्यूअर माईंड पॉलिसीची विमा सुरुवात दि. 20.08.2007 रोजी झाली, व अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा दि. 05.09.2009 रोजी झाला, त्यामुळे दोन वर्षानंतर पॉलिसी घेतल्यावर अर्जदाराच्या पतीचा मृत्यू झाला आहे, म्हणुन गैरअर्जदाराने अर्जदाराचा क्लेम नाकारुन अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे, म्हणुन गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी संयुक्तीक व वैयक्तीक रित्या रु. 5,24,220/- , 18 टक्के व्याजाने दयावे, अर्जदारास झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 20,000/- दयावे व दाव्याचा खर्च रु. 10,000/- दयावा, अशी मागणी केली आहे.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 च्या म्हणण्या नुसार अर्जदाराची तक्रार ही खोटी असून, अर्जदाराच्या पतीस यकृताचा आजार होता, व त्याला ही गोष्ट माहिती होती, परंतु त्याने पॉलिसी घेतांना दि. 02 जुलै 2007 रोजी फॉर्म नं. 0010819 मध्ये आजाराचा ईतिहास लिहीला नाही व अशा प्रकारचा ईलाज त्याने यापुर्वी 08 फेब्रूवारी 2007 रोजी अग्रवाल क्लिनीक येथे घेतला, व त्यास PHTD , ascites, joindice with hepatic encephalopathy. अशा प्रकरचा रोग दोन वर्षा पुर्वी पासुन होता, ही बाब त्याने आपल्या विमा पॉलिसीच्या रकान्यात लिहीलेले नाही. त्यामुळे अर्जदारास पुर्वापार चालत आलेला रोग असल्यामुळे तो exclusion clause मधील 2.1.4 नुसार Pre existing illness या सदरात मोडत असल्यामुळे, अर्जदार हा सदरचा क्लेम घेण्यास पात्र नाही. म्हणुन अर्जदार पॉलिसीच्या नियम व अटी नुसार लाभधारक म्हणुन बसु शकत नाही, म्हणुन अर्जदाराची तक्रार ही फेटाळण्यात यावी.
मुद्दे उत्तर
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय .
- काय आदेश ? अंतिम आदेशा प्रमाणे
मु्दा क्र. 1 चे उत्तर होय असून, अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे, व त्याने गैरअर्जदाराकडून पॉलिसी क्र. 4065/ICICI/HSP/1097349/00/000 हा घेतलेला असून, त्याचा कालावधी दि. 30 ऑगष्ट 2007 ते दि. 29.08.2012 असा पाच वर्षाचा आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून, अर्जदाराच्या सेवेत गैरअर्जदाराने त्रूटी केलेली निष्पन्न होते, गैरअर्जदाराने जेंव्हा क्लेम फॉर्म भरुन घेतला त्यावेळेस गैरअर्जदाराने अजदाराचे स्वत:हुन मेडीकल टेस्ट घेतलेली नाही, व त्याने फक्त कागदांवर लिहुन घेतलेले आहे, त्यामुळे अर्जदारास पुर्वापार चालत आलेला रोग होता, हे म्हणणे अर्जदाराच्या पॉलिसी exclusion clause 2.1.4 नुसार योग्य नाही. कारण त्यास pre existing illness हा रोग नव्हता. अर्जदारास दि. 19.08.2009 रोजी त्याच्या पोटात दुखु लागले, व त्यास शौच्यावाटे रक्त जावु लागले, म्हणुन मित्तल हॉस्पीटल येथे त्याच्या सर्व टेस्ट करण्यात आल्या, व अर्जदारास कावीळ हा रोग निघाला. म्हणुन मित्तल हॉस्पीटल मध्ये त्यास दि. 19.08.2009 ते 27.08.2009 या कालावधीत उपचार देण्यात आले. परंतु त्या ठिकाणी त्याचा ईलाज पुर्ण होत नव्हता, म्हणुन त्यास सवाई मानसिक हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, व त्यात त्याचा दि. 05.09.2009 रोजी मृत्यू झाला. अर्जदार हा गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार त्याचे यकृत हे खराब झालेले होते, असे निदाण अग्रवाल यांच्या दि. 08 फेब्रूवारी 2007 च्या सोनोग्राफी अहवाला नुसार कळले. हे सर्व कागदपत्र गैरअर्जदाराने अर्जदाराची पॉलिसी घेण्याच्या अगोदर आणले असते, व त्यास पॉलिसीचा प्रिमीअम न घेता, पॉलिसी दिली नसती तर योग्य झाले असते. विमा कंपनीस जेंव्हा ग्राहक मोबदला व लाभ मागु लागला, म्हणजे त्यास पुर्वापार चालत आलेला आजार आहे, असे म्हणणे सोपे जाते, व त्याचा क्लेम रद्द करण्यात येतो, ही बाब न्यायोचित नाही. कारण कावीळा सारखा रोग जर दोन वर्षापासुन अर्जदाराच्या पतीस होता, व त्याने गैरअर्जदाराकडे पॉलिसी काढली त्यावेळेस विमा पॉलिसी घेणा-या धारकाची विमा कंपनीने मेडीकल चाचणी का घेतली नाही, हा प्रश्न उपस्थित होतो. तसेच आजही गैरअर्जदाराने फक्त उजर घ्यावयाचा म्हणुन अर्जदारास अग्रवाल हॉस्पीटलने यापुर्वीच त्यास कावीळ हा रोग होता, असे नुसते म्हणणे व कोणताही कागदोपत्री पुरावा न देता, अर्जदाराचा क्लेम फेटळण्यात यावा, हे म्हणणे म्हणजेच स्वत:च्याच पॉलिसीला कमी लेखने होईल. पॉलिसी घेताना व देताना गैरअर्जदार हा ग्राहकाचे कागदपत्र व पुर्व इतिहास बघत नसेल, तर त्याला गैरअर्जदार स्वत: जिम्मेदार आहे. म्हणुन अर्जदाराचा गैरअर्जदाराने पुर्वापार आजार म्हणुन जो क्लेम फेटाळला, तो योग्य होणार नाही. म्हणुन हे न्यायमंच अर्जदाराचा क्लेम मंजुर करत आहे, व त्याच्या वारसांना मिळणारा मोबबला रु. 5,24,220/- त्याच्या पॉलिसीच्या लाभाच्या नुसार देण्यात यावा. तसेच अर्जदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 3000/- व दाव्याच्या खर्चापोटी रु. 2000/- देण्यात यावा.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेशा पारित करीत आहे.
आदेश
- अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास विम्याची रक्कम रु. 5,24,220/- पॉलिसीच्या लाभासह, आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत दयावेत.
- गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी आदेश क्र.. 2 चे पालन मुदतीत न केल्यास , त्यावर तक्रार दाखल तारखे पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याज देणे बंधनकारक राहील.
- गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.3000/- व दाव्याच्या खर्चापोटी रु. 2000/-, आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत दयावेत.
स्वा/- स्वा/-
(अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर.
**//राजूरकर//**