Dated the 10 Mar 2017
न्यायनिर्णय
द्वारा- सौ.स्नेहा एस.म्हात्रे...................मा.अध्यक्षा.
1. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदार हे नालासोपारा (पुर्व) येथील रहिवासी असुन सामनेवाले नं.1 ही वुडलँड नावाची कंपनी आहे. तसेच सामनेवाले नं.2 हे वुडलँड कंपनीने तयार केलेल्या बुटांचे वितरक आहेत. तक्रारदार यांनी प्रस्तुत प्रकरणामध्ये सामनेवाले 2 हे सामनेवाले नं.1 यांची शाखा असल्याचे (वितरक) नमुद केले आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले नं.2 यांचेकडून सामनेवाले नं.1 कंपनीने तयार केलेले बुट ता.01.05.2011 रोजी रक्कम रु.2,495/- या किंमतीस खरेदी केले. त्याबाबत सामनेवाले नं.2 यांनी त्यांना इन्व्हाईस क्रमांक-477,आर्टिकल क्रमांक-G4092 Khaki 41 Foot wear याचे खरेदीबाबत ता.01.05.2011 रोजी दिले. सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदार यांना सदर बुट विकत घेतल्यापासुन ता.01.05.2011 ते ता.29.07.2011 पर्यंतची 90 दिवसांची वॉरंटी तक्रारदार यांना सदर बुटाबाबत दिली होती. सदर कालावधीमध्ये बुटामध्ये काही खराबी अथवा बिघाड झाल्यास अथवा निर्मितीमध्ये काही त्रुटी आढळल्यास निर्माती कंपनी किंवा सदर वितरक मे.अँरोक्लब वुड लँड स्टोअर हे सदरची त्रुटी दुरुस्त करुन देईल व त्रुटी दुरुस्त होण्या जोगी नसल्यास खरेदीदाराकडून कोणताही मोबदला न घेता त्यांना नविन बुट देण्यात येईल असे सांगितले होते. तक्रारदार म्हणतात, तक्रारदार यांनी सदर बुट घेतल्यापासुन 30 दिवसांच्या आतच ते खराब झाल्याने ता.01.06.2011 रोजी सामनेवाले नं.2 यांना त्याबाबत कळविले होते. त्यानंतर ता.06.06.2011 रोजी तक्रारदार सदरचे सामनेवाले नं.2 कडून विकत घेतलेले, व वॉरंटी कालावधीमधील खराब झालेले बुट घेऊन सामनेवाले नं.2 यांचेकडे गेले, व सदर बुट वॉरंटी कालावधी संपण्यापुर्वी खराब झाले असल्याने ते दुरुस्त करुन दयावे अथवा सदर खराब झालेल्या बुटांच्या बदल्यात तक्रारदार यांना सामनेवाले यांनी नविन बुट दयावे अशी मागणी तक्रारदार यांनी सामनेवाले नं.2 यांचेकडे केलेली आहे. सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदार यांचे सदर बुट त्यांचेकडे ठेऊन घेतले, व तक्रारदार यांना सदर बुटाच्या दुरुस्तीबाबत रिपेअर्स स्लिप क्रमांक-IM 17/10-11 अशी पोहोच पावती दिली. सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदार यांना आम्ही तुम्हाला 5 दिवसांत तुमचा बुट दुरुस्त करुन देऊ अन्यथा त्या बदल्यात विनामोबदला नविन बुट देऊ असे आश्वासन दिले. परंतु ता.11.06.2011 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाले नं.2 यांचेकडे सदर बुटाचे दुरुस्तीबाबत चौकशी केली असता, सामनेवाले नं.2 यांनी “आम्ही तुझा बुट दुरुस्त करणार नाही, आणि तुला त्याबदल्यात नविन बुटही देणार नाही, तुला काय करावयाचे आहे ते कर” अशा शब्दात तक्रारदार यांना शिवीगाळ केली असे तक्रारदार यांनी नमुद केलेले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना त्यांचे सदर बुट दुरुस्त करुन परत न केल्याने तसेच तक्रारदार यांना सदर बुटाच्या बदल्यात नविन बुट न दिल्याने तक्रारदार यांनी ता.21.06.2011 रोजी सामनेवाले यांना रजिष्टर पोस्टाने नोटीस पाठवून सदर प्रकाराबाबत झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याची मागणी केलेली आहे. सदर नोटीस सामनेवाले यांना प्राप्त झाल्यावर ता.04.07.2011 रोजी सदर नोटीसला उत्तर दिल्याचे तक्रारदार यांनी नमुद केलेले आहे.
2. सामनेवाले यांनी प्रस्तुत प्रकरणामध्ये श्री.किरीट रमेश वाडिकर यांना प्रस्तुत तक्रार चालविण्याचे अधिकार दिले असुन सदर अधिकार पत्रावर सामनेवाले नं.1 यांच्या दिल्ली येथील कार्यालयाचा पत्ता नमुद आहे, तसेच ते सामनेवाले नं.1 व 2 तर्फे दाखल केलेले आहे. सामनेवाले यांनी प्रस्तुत प्रकरणामध्ये ता.27.01.2012 रोजी त्यांचे म्हणणे दाखल केले आहे. प्रस्तुत प्रकरणामध्ये श्री.किरीट वाडिकर यांनी फॉर वुडलँड अशी स्वाक्षरी करुन ते प्रस्तुत प्रकरणात सामनेवाले नं. 1 व 2 यांचेकडून हजर झाल्याचे नमुद केले आहे.
3. सामनेवाले यांनी त्यांच्या कैफीयतीमध्ये तक्रारदार यांनी घेतलेल्या वर नमुद आर्टिकल क्रमांकाच्या ता.01.05.2011 रोजी खरेदी केलेल्या बुटांवर 90 दिवसांचा वॉरंटी कालावधी असल्याचे मान्य केले आहे, तसेच सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिलेल्या सदर बुटांमध्ये केवळ पेस्टींगचा प्रॉब्लेम झाला असुन, सदर बुट सुस्थितीत असुन ते तक्रारदार यांना सामनेवाले दुरुस्त करुन देण्यास तयार होते, तसेच ता.17.10.2011 रोजी सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदर बुटांची दुरुस्त करुन देऊन झाल्यावर सदर बुट सामनेवाले यांचेकडून घेऊन जाण्याबाबत कळविण्यासाठी सामनेवाले नं.2 यांचा माणुस पाठविला, परंतु तक्रारदार यांनी सदर बुटाच्या बदल्यात नविन बुटाची मागणी करुन दुरुस्त केलेले बुट घेण्यास नकार दिल्याचे सामनेवाले नं.2 यांच्या माणसाने सामनेवाले नं.2 यांना कळविल्याचे सामनेवाले नं.2 यांनी नमुद केले आहे. सामनेवाले नं.2 म्हणतात, सामनेवाले यांनी तक्रारदार यांचेशी सदर प्रकरण तडजोडीने मिटविण्याबाबत अनेकवेळा प्रयत्न केले, परंतु तक्रारदार त्यासाठी तयार नसल्याने सामनेवाले नं.2 तक्रारदार यांना सदर बुट देऊ शकले नाहीत. त्यामुळे सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिली असे म्हणता येणार नाही असा युक्तीवाद सामनेवाले यांच्या प्रतिनीधीने सामनेवालेतर्फे केलेला आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या लेखी युक्तीवादामध्ये सामनेवाले यांचेकडून केलेल्या मागण्यांबाबत मुळ तक्रारीमध्ये व त्यांच्या प्रार्थना कलमांमध्ये त्याबाबत दुरुस्ती अर्ज देऊन आवश्यक दुरुस्ती केलेली नसल्याने तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीमध्ये ती दाखल करतांना केलेल्या मुळ प्रार्थना कलमांचा प्रस्तुत तक्रारीमध्ये अंतिम आदेश पारित करतांना विचार करण्यात आला आहे.
4. उभयपक्षांनी प्रस्तुत प्रकरणात पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केल्यावर प्रस्तुत प्रकरण अंतिम आदेशासाठी ठेवण्यात आले. उभयपक्षांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करुन मंचाने तक्रारीच्या निराकरणार्थ खालील मुदयांचा विचार केला.
मुद्दे निष्कर्ष
1.तक्रारदार सामनेवाले यांचेकडून तक्रारीमध्ये (मुळ प्रार्थना कलमांत)
मागणी केल्याप्रमाणे सदर बुटांबाबत सामनेवाले यांना अदा
केलेली रक्कम (अंतिम आदेशात नमुद केलेल्या व्याज दराप्रमाणे)
व्याजासहित परत मिळण्यास पात्र आहेत का ?......................................होय.
2.तक्रारदार सामनेवाले यांचेकडून मानसिक त्रासाची
नुकसानभरपाई व न्यायिक खर्च मिळण्यास पात्र
आहेत का ?......................................................................................होय.
3.अंतिम आदेश काय ?................................................तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
5.कारण मिमांसा-
मुद्दा- क्र.1. तक्रारदार यांनी दाखल केलेली प्रस्तुत तक्रार ही मंचाच्या भौगोलिक, व आर्थिक कार्यक्षेत्रातील असुन तक्रारदार यांनी ती विहीत मुदतीत दाखल केली आहे ही बाब सर्वप्रथम स्पष्ट करण्यात येते. सामनेवाले नं.1 ही कंपनी बुट उत्पादन व वितरण याबाबत प्रसिध्द असलेली कंपनी असुन त्यांच्या सदर बुटांच्या वितरणासाठी विविध ठिकाणी शाखा आहेत, सामनेवाले नं.2 ही सामनेवाले नं.1 यांची सदर वुडलँड कंपनीचे बुट वितरण करणारी/विक्री करणारी शाखा आहे, सामनेवाले यांनी त्यांच्या कैफीयतीत तक्रारदार यांना आर्टिकल क्रमांक- G4092 Khaki 41 Foot wear रक्कम रु.2,495/- या रकमेस ता.01.05.2011 रोजी कॅश मेमो क्रमांक-477 अन्वये विक्री केल्याचे सामनेवाले यांनी मान्य केले आहे, तसेच सदर बुटांवर तीन महिन्यांची वॉरंटी असल्याबाबत सामनेवाले यांनी त्यांच्या पुरावा शपथपत्राबाबत नमुद केले आहे, सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदर बुटांच्या खरेदीबाबत दिलेले बील अभिलेखावर सादर केलेले आहे. (पान क्रमांक-10) तक्रारदार यांना सामनेवाले यांनी सदर बुटांवर ता.01.05.2011 ते ता.29.07.2011 या कालावधी करीता, म्हणजेच 90 दिवसांची वॉरंटी दिली असुन तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून घेतलेले सदर बुट खरेदी केल्यापासुन 30 दिवसांचे आंतच खराब झाल्याचे सामनेवाले यांना ता.01.06.2011 रोजी कळविले, त्यानंतर ता.06.06.2011 रोजी तक्रारदार सामनेवाले नं.2 यांच्या दुकानात सदर बुट घेऊन ते वॉरंटी कालावधी संपण्यापुर्वी खराब झाले असल्याने तक्रारदार यांना ते सामनेवाले यांनी दुरुस्त करुन दयावे अथवा सदर बुटाच्या बदल्यात नविन बुट दयावे या मागणीसह सामनेवाले नं.2 यांचेकडे गेल्यावर सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदार यांचे सदर बुट सामनेवाले नं.2 यांचेकडे दुरुस्तीसाठी ठेऊन घेतल्याबाबत सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदार यांना दिलेली रिपेअर स्लिप क्रमांक- IM 17/10-11 तक्रारदार यांनी अभिलेखावर पान क्रमांक-11 वर सादर केली आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे सदर बुटाबाबत ता.11.06.2011 रोजी चौकशी केली असता, सामनेवाले यांनी तक्रारदार यांना “ आम्ही तुझा बुट दुरुस्त करणार नाही,आणि तुला त्याबदल्यात नविन बुटही देणार नाही, तुला जे करायचे ते कर ” अशा शब्दात धुडकाऊन लावल्याचे तक्रारदार यांनी नमुद केले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदर बुट घेऊन त्याबदल्यात विना मोबदला नविन बुट दयावे अशी मागणी केल्यावर त्यानुसार सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सहकार्य न केल्याने तसेच सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदर बुटाची खरेदीची किंमतही परत न दिल्याने तक्रारदार यांनी सामनेवाले यांना ता.21.06.2011 रोजी वकीलाकरवी पाठविलेली कायदेशीर नोटीस पान क्रमांक-16 वर अभिलेखात उपलब्ध आहे. त्यामध्ये सदर नोटीस मिळाल्यापासुन 7 दिवसांचे आंत आमचे आशिल यांना नविन बुट दयावे, अन्यथा आमचे आशिलांना तुमच्या सेवेमधील त्रुटीबाबत तक्रार दाखल करावी लागेल असे नमुद केलेले आहे. सामनेवाले नं.2 यांनी सदर नोटीसला ई-मेलव्दारे ता.04.07.2011 रोजी दिलेले उत्तर तक्रारदार यांनी अभिलेखावर सादर केलेले असुन ते अभिलेखावर पान क्रमांक-12 वर उपलब्ध आहे. त्यामध्ये तक्रारदार दुरुस्त केलेले बुट घ्यावयास समाधानी नसल्यास कंपनीने सुचना दिल्याप्रमाणे तक्रारदार यांनी सानमेवाले यांचेकडून सदर बुटाच्या खरेदीची किंमत घेऊन जावी असे नमुद केले आहे. सामनेवाले म्हणतात, त्यांनी ता.06.06.2011 रोजी तक्रारदार यांनी सदर बुटाच्या दुरुस्तीबाबत दिलेल्या स्लिपनुसार सामनेवाले यांनी, सामनेवाले नं.2 यांचा माणुस तक्रारदार यांच्या घरी सदर दुरुस्त केलेले बुट घेऊन जाण्यासाठी तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या दुकानात भेट देण्याबाबत कळविण्यासाठी पाठविला, परंतु त्याबाबत सामनेवाले यांनी कोणताही कागदोपत्री पुरावा अभिलेखावर सादर केलेला नाही, तसेच सामनेवाले यांनी तक्रारदार यांना विकलेले सदर बुट हे सुस्थितीत असल्याचे त्यामध्ये केवळ पेस्टींगचा किरकोळ प्रॉब्लेम असल्याचे सामनेवाले यांनी नमुद केले आहे. परंतु जर तक्रारदाराचे बुट सुस्थितीत होते, तर ते वॉरंटी कालावधीमध्ये असतांना म्हणजेच सदर बुट खरेदी केल्यापासुन केवळ 30 दिवसांमध्ये खराब कसे झाले ? तसेच सामनेवाले नं.2 यांना सदर बुटांच्या दुरुस्तीसाठी ते सामनेवाले नं.2 यांचे दुकानात आले असता तक्रारदार यांना त्याबाबत दुरुस्ती स्लिप क्रमांक- IM 17/10-11 देऊन सदर बुट सामनेवाले नं.2 यांना दुरुस्तीसाठी का ठेवावे लागले ? याचा समाधानकारक खुलासा सामनेवाले यांनी केलेला नाही, तसेच ता.04.07.2011 रोजीच्या, सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या दिलेल्या ता.21.06.2011 रोजीच्या नोटीसच्या उत्तरामध्ये, सामनेवाले नं.2 यांनी सामनेवाले नं.1 या कंपनीच्या सुचनेनुसार तक्रारदार यांना सदर बुटाच्या खरेदीची किंमत तक्रारदार यांना सामनेवाले परत करण्यास तयार असल्याचे नमुद केले आहे, असे असतांना सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या घरी माणुस पाठविला असता, सदर बुटांची खरेदीची किंमत तक्रारदार यांना का परत केली नाही ? याबाबत कुठेही खुलासा दिलेला नाही, यावरुन सामनेवाले हे केवळ त्यांचा दोष लपविण्यासाठी सदर प्रकारचे ई-मेल तक्रारदार यांना पाठवित असल्याचे दिसुन येते. सामनेवाले हे बुट वितरणामध्ये असलेली आघाडीची कंपनी असुन सामनेवाले यांचेकडून विकण्यात येणा-या बुटांची किंमत ही इतर दुकानांमधील बुटांपेक्षा सामनेवाले नं.1 कंपनीच्या धोरणांनुसार जास्त प्रमाणात आकारली जाते. तरीही सामनेवाले यांनी उत्पादित केलेले बुट हे उत्कृष्ठ दर्जाचे (Branded Shoes) असतील यावर विश्वास ठेऊन तक्रारदारांसारखे अनेक ग्राहक सदर बुट विश्वासाने व त्यावर सामनेवाले वॉरंटी देत असल्याने विकत घेतात, परंतु वर नमुद प्रकरणामध्ये सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिलेल्या बुटामध्ये सुरुवातीपासुनच (खरेदी केल्यापासुन 30 दिवसांचे आंत) बुटाचे पेस्टींग निघणे इत्यादिबाबत खराबी दिसुन आल्याने सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदार यांना सदोषपुर्ण बुट (डिफेक्टीव्ह शुज) दिले असल्याचे सिध्द होते, तसेच तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून सदर बुट परत घेऊन नविन बुटांची मागणी करुनही सामनेवाले यांनी तक्रारदार यांना ते अदयाप बदलून दिले नाहीत, तसेच त्याची किंमतही परत केली नाही, यावरुन सामनेवाले नं.1 व 2 यांनी तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिल्याचे दिसुन येते. सबब,सामनेवाले नं.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदार यांना सदर बुटाची खरेदीची किंमत रु.2,495/- यावर ता.01.05.2011 पासुन आदेश पारित तारखेपर्यंत दरसाल दर शेकडा 6 टक्के व्याज देऊन व्याजासह होणारी एकूण रक्कम तक्रारदार यांना आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यांत परत करावी असे आदेश सामनेवाले नं.1 व 2 यांना देण्यात येतात.
मुद्दा-क्र.2- तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे सदर बुट वॉरंटी कालावधीमध्ये खराब झाले असल्याने ते दुरुस्त करुन दयावे अथवा त्याची किंमत तक्रारदार यांना परत दयावी अथवा सदर बुटांच्या बदल्यात तक्रारदार यांना नविन बुट दयावे याबाबत सामनेवाले यांचेकडे अनेकवेळा पाठपुरावा केला, त्याबाबत सामनेवाले यांना कायदेशीर नोटीस बजावली, परंतु सामनेवाले यांनी तक्रारदार यांना वर नमुद केल्याप्रमाणे सदर बुट बदलवून देण्याबाबत अथवा त्याची रक्कम परत करण्याबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याने तसेच तक्रारदार सामनेवाले यांच्या दुकानामध्ये ता.06.06.2011 रोजी गेले असता,सामनेवाले यांनी तक्रारदार यांचेशी वर नमुद केल्याप्रमाणे असभ्य वर्तन केल्याने तक्रारदार यांना जो मानसिक त्रास झाला त्याबाबत सामनेवाले नं.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- दयावेत, व तक्रारदारांना वकीलाकरवी ग्राहक मंचात प्रस्तुत तक्रार दाखल करावी लागल्याने आलेल्या न्यायिक खर्चापोटी रक्कम रु.2,000/- सामनेवाले नं.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदार यांना आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यात दयावी. उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
“ या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही ”.
- अंतिम आदेश -
1.तक्रार क्रमांक-401/2011 अंशतः मंजुर करण्यात येते.
2.सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेमध्ये त्रुटीपुर्ण सेवा दिल्याची बाब जाहिर
करण्यात येते.
3.सामनेवाले नं.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदार यांना सदर बुटाची
खरेदीची किंमत रु.2,495/- (अक्षरी रुपये दोन हजार चारशे पंच्याण्णव) यावर
ता.01.05.2011 पासुन आदेश पारित तारखेपर्यंत म्हणजेच ता.10.03.2017 दरसाल दर
शेकडा 6 टक्के व्याज देऊन व्याजासह होणारी एकूण रक्कम, तक्रारदार यांना आदेश पारित
तारखेपासुन दोन महिन्यांत परत करावी.
4.सामनेवाले नं.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी
रक्कम रु.3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार), व तक्रारदार यांना वकीलाकरवी ग्राहक मंचात
प्रस्तुत तक्रार दाखल करावी लागल्याने आलेल्या न्यायिक खर्चापोटी सामनेवाले नं.1 व 2
यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या रक्कम रु.2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार) आदेश
पारित तारखेपासुन दोन महिन्यात तक्रारदार यांना दयावी.
5.आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
6.तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
ता.10.03.2017
जरवा/