सौ. मंजूश्री खनके, सदस्या यांचे कथनांन्वये.
-आदेश-
(पारित दिनांक :31/08/2013)
1. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचेकडे स्वतःचा उपचार करवून घेतलेला असूनही वि.प. यांनी योग्य ती कागदपत्रे आरोग्य समितीकडे वारंवार विनंती करुनही न पाठविल्याने त्रस्त झाल्यामुळे नाईलाजाने शेवटी ग्राहक संरक्षण अधिनियम 1986, च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारकर्त्याचे कथन थोडक्यात खालीलप्रमाणे -
तक्रारकर्ते हे वयोवृध्द असून, त्यांना नोव्हेंबर 2010 मध्ये हृदयाविकाराचा तिव्र झटका आल्यामुळे त्यांनी सर्वप्रथम डॉ. पापळकर, पुसद ह्यांच्या दवाखान्यात जाऊन उपचार घेतले. त्यांनी तक्रारकर्त्यास स्वतःची एंजियोग्राफी करुन घ्यावी असा वैद्यकीय सल्ला दिला. तक्रारकर्त्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांनी विनोबा भावे सावंगी मेघे रुग्णालयात जाऊन एंजियोग्राफी सवलतीत करवून घेतली. त्यावेळी त्यांचे हृदयातील दोन नसा चोकअप असल्याने, तेथील डॉक्टरांनी त्यांना बायपास सर्जरी करुन घेण्याचे सुचित केले. तसेच तक्रारकर्ते हे बायपास सर्जरीला अपेक्षीत असलेला खर्च करण्यास असमर्थ असल्याने तेथील डॉक्टरांनी तक्रारकर्त्यास शासनाच्या जिवनदायी आरोग्य योजना (आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना वैद्यकीय सहाय्य) याबद्दलची माहिती दिली.
मिळालेल्या माहितीवरुन तक्रारकर्त्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करुन सदर योजनेतून रु..1,50,000/- स्वतःच्या उपचारासाठी मंजूर करवून घेतले. परंतू, सुरुवातीला ती रक्कम विनोबा भावे सावंगी मेघे रुग्णालयाचे नावाने मंजूर झालेली होती. तक्रारकर्त्यांनी सदर रुग्णालयात योग्य त्या सुविधा नसल्याने वि.प.ह्यांचे रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले आणि दि.13.12.2010 रोजी स्वतःची शस्त्रक्रिया करवून घेतली. त्यावेळी तक्रारकर्त्यांनी पतसंस्थेकडून तसेच जवळचे मित्राकडून रक्कम जमा करुन वि.प.ह्यांचे रुग्णालयात रु.1,50,000/- शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच अग्रीम म्हणून जमा केली आणि पूर्वी विनोबा भावे रुग्णालय सावंगी मेघे यांचे नावे मंजूर झालेली जिवनदायी योजनेची दि.08.12.2010 ची रक्कम सूचना देऊन वि.प.ह्यांचे रुग्णालयाचे नावाने वळती करवून मंजूर करुन घेतलेली आहे. तसेच तक्रारकर्ता ह्यांनी पतसंस्थेमार्फत घेतलेल्या कर्जाची पावती, तसेच जिवनदायी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या रकमेबद्दलचे आरोग्य मंडळ, नागपूर यांचे तसेच नंतर वि.प. यांचे रुग्णालयाचे नावाने सदर रक्कम वळती केली असल्याबाबतचे, तसेच वि.प.हयांचे रुग्णालयाने आवश्यक ती कागदपत्रे पाठविण्याची मागणी करणारे पत्र इ. सर्व कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
तसेच यापुढे तक्रारकर्त्याचे म्हणणे असे की, तक्रारकर्ता यांनी वि.प. यांना वारंवार आरोग्य मंडळ, नागपूर यांना तक्रारकर्त्याच्या उपचारासंबंधीचे देयके पाठविण्याची तोंडी विनवणी केली. परंतू वि.प. यांनी सदर देयके व कागदपत्रे आरोग्य मंडळ, नागपूर यांचेकडे दाखल करण्यास टाळाटाळ केली. एवढेच नव्हे तर, आजपावेतो दाखल केलेले नाही. यामुळे तक्रारकर्त्यास आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. या सर्व परिस्थितीस गैरअर्जदारांची दोषपूर्ण सेवा कारणीभूत आहे.
त्यामुळे नाईलाजाने अर्जदाराने दि.14.07.2011 रोजी वकिलांमार्फत नोटीस पाठविला व सात दिवसाचे आत संपूर्ण दस्तऐवज आरोग्य मंडळ यांच्याकडे पाठविण्यास विनंती केली. परंतू वि.प.यांनी नोटीसला उत्तर पाठविले. परंतू कागदपत्रे पाठविली नाहीत.
करिता, तक्रारकर्त्याने कागदपत्रे वि.प.यांना आरोग्य मंडळ नागपूर यांचेकडे आवश्यक ते कागदपत्रे न पाठविण्यामुळे झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रस्तुत तक्रार दाखल केली.
3. मंचाने जारी केलेल्या नोटीसची बजावणी झाल्यानंतर, वि.प.यांनी प्रकरणात लेखी उत्तर दाखल केले आणि तक्रारकर्त्याने वि.प.चे रुग्णालयात बायपास सर्जरी करवून घेतल्याचे मान्य केले. तसेच तक्रारकर्त्यांनी उपचारासाठी अॅडव्हांस रक्कम जमा केल्याचे अमान्य केले. परंतू त्यासाठी कुठलेही कागदपत्रे दाखल केलेले नाहीत. तसेच तक्रारकर्त्यांनी बँकेमार्फत, तसेच मित्रांकडून कर्ज घेतल्याचे देखील अमान्य केले. तसेच तक्रारकर्त्याने त्याला जिवनदायी योजनेंतर्गत उपचारासाठी रु.1,50,000/- मान्य झाले असल्याची बाब लपवून ठेवली. तसेच वि.प.चे रुग्णालयात प्रस्तुत योजनेंतर्गत उपचार करण्याची सुविधा नव्हती. तसेच तक्रारकर्त्यास सामान्य पेशंट म्हणून उपचार केलेला असल्याने तक्रारकर्त्याने वरील योजनेंतर्गत सर्जरी केली नसल्यामुळे गैरअर्जदाराचे रु.1,50,000/- चा धनादेश तक्रारकर्त्याच्या नावाने निघण्याकरीता उपचारासंबंधी संपूर्ण देयकांची माहिती अध्यक्ष, जिवनदायी आरोग्य योजना तथा उपसंचालक, आरोग्य सेवा मंडळ, नागपूर यांना पाठविणे आहे ही बाब अमान्य केली. तसेच तक्रारकर्त्याची सर्जरी उत्तमरीत्या केलेली आहे. त्यामुळे वि.प.यांनी त्यांच्या सेवेत लक्ष दिले नाही व दोषपूर्ण सेवा दिली हे म्हणणे खोटे आहे आणि त्यामुळे सदर तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
4. तक्रारीचे पुष्टयर्थ तक्रारकर्त्याने प्रतिज्ञालेख दाखल केला. त्यातही प्रस्तुत जिवनदायी योजनेंतर्गत आरोग्य सेवा मंडळ, नागपूर यांनी श्रीकृष्ण हृदयालय, नागपूर यांचे नावाने तक्रारकर्त्याच्या शस्त्रक्रियेची मंजूर रक्कम रु.1,50,000/- वळती केलेली आहे असे नमूद केले. तक्रारकर्त्याचे तसेच वि.प. यांचा तोंडी युक्तीवाद ऐकला. अभिलेखावर दाखल असलेल्या कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन केले.
5. प्रस्तुत प्रकरणात मंचाचे निर्णयार्थ उपस्थित मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. विरुध्द पक्षकारांचे सेवेतील कमतरता सिध्द होते काय? होय.
2. आदेश? अंतिम आदेशाप्रमाणे.
-कारणमिमांसा-
6. तक्रारकर्त्याने वि.प.यांचे रुग्णालयात शस्त्रक्रिया करुन घेतल्याबाबत वाद नाही. तसेच आजपावेतो तक्रारकर्त्याच्या उपचारासंबंधीचे देयके व कागदपत्रे वि.प. यांनी उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ, नागपूर यांचेकडे दाखल केलेले नाही ही बाब मान्य केलेली आहे. तसेच सदर योजनेंतर्गत सदर मंडळाने श्रीकृष्ण हृदयालय, नागपूर यांचे नावाने रक्कम वळती केलेली आहे असे अभिलेखावरील दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते आणि वि.प. यांनी सदर देयके सादर न केल्याने वयोवृध्द तक्रारकर्त्यास आर्थिक व मानसिक त्रास झालेला आहे असे मंचाचे मत आहे.
7. तक्रारकर्त्याने विनंती करुनही वि.प.यांनी आजपावेतो तक्रारकर्त्याच्या शस्त्रक्रियेची देयके व कागदपत्रे आरोग्य मंडळ, नागपूर यांचेकडे सादर न केल्याचे वि.प. यांनी मान्य केले असल्याने ही त्यांनी प्रदान केलेल्या सेवेतील कमतरता आहे असे मंचाचे मत आहे. वि.प. यांच्या सेवेतील कमतरतेमुळे तक्रारकर्त्याला मंचाकडे दाद मागावी लागली. त्यामुळे तक्रारकर्ता तक्रारीचा खर्च, मानसिक, शारिरीक त्रास व गैरसोयीबद्दल नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्ता हा पुसदचा राहिवासी असल्याने व तक्रार नागपूर जिल्हा मंचामध्ये दाखल करावी लागल्याने तक्रारकर्ता तक्रारीच्या कार्यवाहीचा खर्च मिळण्यास पात्र आहे.
करिता आदेश पुढीलप्रमाणे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) वि.प.यांना निर्देश देण्यात येतो की, त्यांनी उपसंचालक, आरोग्य सेवा मंडळ, नागपूर यांचेकडे तक्रारकर्त्याची शस्त्रक्रिया केल्यासंबंधीचे देयके व कागदपत्रे आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आत पाठवावी अन्यथा तक्रारकर्त्याच्या शस्त्रक्रियेच्या खर्चाची रक्कम रु.1,50,000/- ही तक्रार दाखल दि.03.10.2011 पासून द.सा.द.शे. 9% व्याजासह प्रत्यक्ष देण्याच्या तारखेपर्यंत द्यावी.
3) वि.प.यांनी तक्रारकर्त्याला मानसिक, शारिरीक त्रासाच्या नुकसान भरपाईदाखल रु.50,000/- द्यावे व कार्यवाहीच्या खर्चादाखल रु.10,000/- द्यावे.
4) आदेशाच्या प्रती उभय पक्षांना निःशुल्क पाठविण्यात याव्यात.
5) ‘ब’ व ‘क’ फाईल्स तक्रारकर्त्याला परत करण्यात याव्यात.