(घोषित द्वारा श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 ही ससे उत्पादक प्रशिक्षण संस्था व संशोधन केंद्र असून गैरअर्जदार क्रमांक 1 हे सदर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. सदर संस्था ससे पालनाचे प्रशिक्षण देते तसेच ससे विक्री व खरेदी करते. डिसेंबर 2008 मध्ये गैरअर्जदार क्रमांक 1 ने तक्रारदारास सदर व्यवसायाची माहिती सांगितली व सदर संस्थेमध्ये पैसे गुंतवून व्यवसाय करण्यास सांगितले. तक्रारदाराने गैरअर्जदारासोबत ससे मिळण्याबाबत करारनामा केला. तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून युनिट घेतले त्या युनिटमध्ये 10 ससे व त्यापैकी 7 माद्या व 3 नर , त्याला लागणारी जाळी प्रतिससा 2 बाय 2 ची खरेदी केले. तक्रारदाराने असे 3 युनिट खरेदी केले व प्रति युनिट 17,500/- प्रमाणे दिनांक 22/1/2009 रोजी रक्कम रु 30,000/- आणि दिनांक 20/2/2009 रोजी रक्कम रु 22,500/- असे एकूण रक्कम रु 50,500/- गैरअर्जदाराकडे नगदी भरणा केले. गैरअर्जदारांनी करारात नमूद केल्याप्रमाणे प्रजनन झालेले ससे विकत घेतले नाही त्यामुळे तक्रारदाराचे 200 ससे मरण पावले असून त्याचे अतोनात नुकसान झाले. गैरअर्जदार कराराच्या अटीनुसार ससे विकत घेण्यास टाळाटाळ करीत आहेत म्हणून तक्रारदाराने गैरअर्जदाराकडे जमा केलेली अनामत रक्कम रु 50,500/- , मानसिक व आर्थिक त्रास रु 1,00,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत स्वत:चे शपथपत्र , करारनामा व रक्कम दिल्याच्या पावत्या दाखल केल्या आहेत. गैरअर्जदारांना नोटीसची बजावणी होऊनाही ते मंचात गैरहजर राहिले म्हणून त्यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला. तक्रारदाराचा युक्तिवाद ऐकण्यात आला. तक्रारदार आणि गेरअर्जदार क्रमांक 2 संस्था यांच्यामध्ये झालेला कराराचे अवलोकन केले असता करारातील कलम 11 नुसार संस्था ससे पालकाकडून कराराच्या तारखेपासून रु 100/- प्रति किलोग्रॅम या हमी भावाने किंवा यापेक्षा जास्त किंवा कमी दर असल्यास बाजारभावाने कलम 10 प्रमाणे पुढील 5 वर्षाच्या कालावधीकरीता ससे विकत घेईल असे नमूद केले आहे. सदर कराराप्रमाणे तक्रारदार त्यास दिलेल्या सशांपासून प्रजनन झालेल्या सश्यांची वाढ झाल्यानंतर ससे विक्री करण्यास गेले असता गैरअर्जदाराने प्रजनन झालेले ससे विकत घेतले नाही त्यामुळे तक्रारदाराचे 200 ससे मरण पावले व त्याचे नुकसान झाले. तसेच त्याच्याकडील सश्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गैरअर्जदार त्याचेकडील ससे विकत घेत नाही त्यामुळे ससे मरण पावत आहेत. गैरअर्जदार संस्थेने तक्रारदाराकडील प्रजनन झालेले ससे विकत न घेऊन तक्रारदारास त्रुटीची सेवा दिलेली आहे. गैरअर्जदार करारातील अटीनुसार तक्रारदाराकडील ससे विकत घेण्यास टाळाटाळ करीत असून त्यांनी करारातील अटी व शर्तीचा भंग केला आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे दिनांक 22/1/2009 रोजी रु 30,000/- व दिनांक 20/2/2009 रोजी रु 22,500/- असे एकूण रु 50,500/- जमा केल्याचे पावत्यांवरुन स्पष्ट दिसून येते म्हणून तक्रारदार सदर रक्कम मिळण्यास पात्र आहे. तक्रारदाराचे ससे गैरअर्जदारांनी विकत न घेतल्यामुळे त्याचे नुकसान झाले व त्यास मानसिक त्रास झाला आहे म्हणून तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास देखील पात्र आहे. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी तक्रारदारास रक्कम रु 50,500/- दिनांक 20/2/2009 पासून द.सा.द.शे. 9 % व्याजदराने द्यावेत तसेच नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च म्हणून रु 3,000/- निकाल कळल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावेत.
(श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |