तक्रार दाखल ता.28/09/2015
तक्रार निकाल ता.31/05/2017
न्यायनिर्णय
द्वारा:- - मा. अध्यक्षा –सौ. सविता पी.भोसले.
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे दाखल केला आहे.
2. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे:-
तक्रारदार हे जयसिंगपूर, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर येथील कायमस्वरुपती रहिवाशी आहेत. तर वि.प.क्र.1 ही बिस्कीटे तयार करणारी नामवंत कंपनी आहे व वि.प.क्र.2 हे जयसिंगपूर येथील किराणा व्यापारी असून वि.प.क्र.1 ने उत्पादित केलेली बिस्कीटे त्यांच्या दुकानामार्फत विक्री करतात.
3. यातील वि.प.क्र.1 ही नामवंत बिस्कीट कंपनी असलेने त्यांनी स्व्त:ची उत्पादने ही चांगल्या गुणवत्तेची व दर्जेदार असलेची ग्वाही विविधी जाहीरातींच्या माध्यमातून दिली जाते. त्यामुळे वि.प. हे आपली फसवणूक करणार नाहीत या उद्देशाने व विश्वासाने तक्रारदार हे गेली अनेक वर्षे म्हणजेच त्यांचे लहानपणापासून पार्ले बिस्कीटच खातात. तक्रारदाराने नेहमीप्रमाणे दि.27.04.2015 रोजी वि.प.क्र.2 कडून वि.प.क्र.1 ने उत्पादित केलेला बिस्कीटपूडा रक्कम रु.10/- या किंमतीस खरेदी केला. तक्रारदाराने सदर बिस्कीट पूडा घरी घेऊन गेला असता, नेहमीच्या पुडयामध्ये व खरेदी केले पुडयामध्ये फरक जाणवला. त्यामुळे सदर पुडयावरील माहिती वाचली असता, त्यावर सदर पुडयाचे वजन 140 ग्रॅम लिहीलेचे दिसले परंतु प्रत्यक्षात प्रस्तुत बिस्कीट पुडयाचे वजन केले असता ते 127 ग्रॅम एवढेच भरले म्हणजेच सदर पुडा 23 ग्रॅम कमी वजनाचा होता. म्हणजेच वि.प.क्र.1 ने दिलेल्या हमी व विश्वासापेक्षा कमी वजनाचे बिस्कीट पुडे बाजारात विक्रीस ठेऊन ग्राहकांची फसवणूक करुन अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे व तक्रारदाराला सेवात्रुटी दिली आहे. सबब, प्रस्तुत तक्रारदारांनी सदरचा तक्रार अर्ज या मे.मंचात दाखल केली आहे.
4. तक्रारदाराने प्रस्तुत कामी वि.प. यांचेकडून खरेदी केले पार्ले बिस्कीट पुडयाची खरेदी किंमत रक्कम रु.10/- तसेच नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.2,00,000/- वि.प.यांचेकडून तक्रारदाराला वसुल होऊन मिळावेत, तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.10,000/- वसुल होऊन मिळावा अशी विनंती या कामी तक्रारदाराने केली आहे.
5. तक्रारदाराने प्रस्तुत कामी अॅफीडेव्हीट, बिस्कीट पुडा खरेदीची पावती, वि.प. यांना तक्रारदाराने पाठविलेली नोटीस, पोस्टाच्या रिसीटस, नोटीसच्या पोहोचपावत्या, निरीक्षक वैधमापन शास्त्र यांना दिलेले पत्र, पोलीस उपनिरीक्षक यांचे समन्सपत्र, पुराव्याचे शपथपत्र, पुरावा संपलेची पुरशिस, सहाय्यक नियंत्रक वैध मापन शास्त्र, कोल्हापूर यांचा वादातीत बिस्कीट पुडयाच्या वजनाबाबतचा अहवाल, वगैरे कागदपत्रे या कामी दाखल केली आहेत.
6. सदर कामी वि.प.क्र.2 यांना नोटीस लागू होऊनही ते कामी हजर झालेले नाहीत. सबब, वि.प.क्र.2 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत केलेला आहे.
7. तर वि.प.क्र.1 कंपनीने या कामी नोटीस लागू झालेनंतर पोस्टामार्फत यांचे म्हणणे/कैफियत पाठविली आहे. प्रस्तुत वि.प.क्र.1 ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प.क्र.1 ने तक्रार अर्जावर पुढीलप्रमाणे नोंदवलेले आहेत.
अ तक्रारदारचा तक्रार अर्ज व त्यातील मजकूर मान्य व कबूल नाही.
ब ब-याच कंपन्याची डुप्लीकेट बिस्कीटस् बाजारात विक्रीस येताना दिसत आहेत. सदर वि.प.कंपनीची बिस्कीटस चांगल्या दर्जाची व योग्य त्या वजनाचे पॅकच बाजारात विक्रीसाठी ठेवले जातात. कमी वजनाचे ठेवले जात नाहीत. त्यामुळे कदाचित सदर बिस्कीटसचे पॅक हे डूप्लीकेट असू शकते. त्यामुळे सदर बिस्कीटसचे पॅक हे वि.प.कंपनीने उत्पादीत केलेले नाही. त्यामुळे सदर बिस्कीट पॅक हे वि.प.कंपनीने उत्पादीत केलेले नाही. त्यामुळे तक्रारदाराने केलेल्या आरोपावरून बिस्कीटस पॅकचे वजन नमुद वजानापेक्षा कमी होते हे गृहीत धरता येणार नाही. जोपर्यंत तक्रारदार योग्य तो पुरावा या मंचासमोर सादर करत नाहीत तोवर असे गृहीत धरणे न्यायोचित होणार नाही.
क तक्रारदाराने वादातीत बिस्कीट पुडा मे.मंचासमोर दाखल केलेला नसलेने केवळ तोंडी सांगण्यावरुन प्रस्तुत बिस्कीट पुडा हा वि.प.कंपनीचा हे मान्य नाही.
ड वि.प.क्र.1 कंपनीने डायरेक्ट सदर बिस्कीट पॅक तक्रारदाराला विक्री केलेले नाही ते तक्रारदाराने वि.प.क्र.2 दुकानदाराकडून घेतले असलेने वि.प.क्र.1 कंपनीचा याबाबतीत कोणताही संबंध नाही.
इ तक्रारदाराने वि.प. कंपनीस नोटीस पाठविलेनंतर वि.प.ने तक्रारदाराचे वकीलांमार्फत तक्रारदाराला मिटींगसाठी बोलवले असता, तक्रारदाराने नोटीसमध्ये नमुद नुकसानभरपाई रक्कम रु.2,00,000/- ची मागणी केली व जर वि.प.क्र.1 कंपनीने प्रस्तुत नुकसान भरपाई तक्रारदाराला अदा केली नाही तर मिडीयाकडे जाऊन बदनामी करेन तसेच मे.कोर्टात तक्रार करेन अशा प्रकारे धमक्या वि.प.यांना देऊन वि.प.कंपनीस ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे. वि.प.क्र.1 कंपनीने तक्रारदाराला अनुचित प्रथेचा अवलंब केला नाही तसेच तक्रारदाराला सेवात्रुटी दिलेली नाही. वि.प.कोणतीही नुकसानभरपार्इ देणसे जबाबदार नाहीत. त्यामुळे तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करावा अशी विनंती या कामी केलेली आहे. अशा स्वरूपाचे आक्षेप वि.प.क्र.1 कंपनीने पोस्टामार्फत पाठविलेल्या म्हणण्यामध्ये/कैफियतीमध्ये घेतलेले आहेत. प्रस्तुत वि.प.ने कोणतेही कागदपत्रे व पुरावा दाखल केलेला नाही.
8. वर नमुद तक्रारदार व वि.प.यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन मे.मंचाने सदर तकार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय |
2 | वि.प.क्र.1 कंपनीने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार वि.प.क्र.1 कंपनीकडून नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमुद आदेशाप्रमाणे |
विवेचन :-
9. मु्द्दा क्र.1 ते 4:- वर नमुद मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्तर आम्हीं होकारार्थी दिलेले आहे कारण तक्रारदाराने वि.प.क्र.1 कंपनीने उत्पादित केलेला पार्ले बिस्कीटचा रक्कम रु.10/- चा पुडा वि.प.क्र.2 यांचे दुकानातून खरेदी केला आहे. त्याची पावती या कामी कागद यादीसोबत जोडलेली आहे. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्वीवादपणे सिध्द झाली आहे. तसेच प्रस्तुत पुडा घेतलेनंतर तक्रारदाराला सदर पुडयामध्ये फरक वाटलेने तक्रारदाराने प्रस्तुत पुडयावरील मजकूर पाहिला त्यावर त्याचे वजन 140 ग्रॅम नमुद केले होते. खात्री करणेसाठी तक्रारदाराने प्रस्तुत पुडयाचे वजन केले असता, ते 127 ग्रॅम नमुद केले होते. खात्री करणेसाठी तक्रारदाराने प्रस्तुत पुडयाचे वजन केले असता, ते 127 ग्रॅम भरले. म्हणजेच पुडयावर केले वजनापेक्षा 23 ग्रॅम कमी भरले. त्यामुळे तक्रारदाराने वि.प.क्र.2 चे निदर्शनास सदरची बाब आणून दिली असता, वि.प.क्र.2 ने उत्पादीत कंपनीस जाब विचारा असे सांगितलेने वि.प.क्र.1 यांचेकडे तक्रारदाराने दि.28.04.2015 रोजी लेखी पत्र देऊन/नोटीस देऊन वि.प.ने कमी वजनाचा बिस्कीट पुडा विक्री करुन तक्रारदार यांची फसवणूक करुन सेवे त्रुटी केलेबद्दल रक्कम रु.2,00,000/- नुकसानभरपाईची मागणी केली परंतु वि.प.यांनी सदर नोटीसला उत्तर दिले नाही. त्यामुळे तक्रारदाराने या मे.मंचात तक्रार दाखल केली. प्रस्तुत कामी तक्रारदाराने नमुद वादतीत पार्ले बिस्कीटचा पुडा या कामी दाखल केला आहे. तसेच सदर बिस्कीट पुडयाचे वजन करुन त्याबाबत अहवाल पाठविणेविषयी सहाय्यक नियंत्रक वैध मापन शास्त्र, कोल्हापूर जिल्हा कार्यालय यांचेकडे पाठवणेबाबत अर्ज दिला होता. या कामी मे.कोर्टाने प्रस्तुत बिस्कीट पुडा सहाय्यक नियंत्रक वैध मापनशास्त्र, कोल्हापूर जिल्हा कार्यालय यांचेकडे पाठविणेबाबत अर्ज दिला होता. त्या कामी मे.कोर्टाने प्रस्तुत बिस्कीट पुडा सहाय्यक नियंत्रक वैध मापनशास्त्र, कोल्हापूर यांचेकडे प्रत्यक्ष वजन करुन तसा अहवाल पाठवणेसाठी पाठविणेत आला होता व सहाय्यक नियंत्रक वैध मापनशास्त्र, कोल्हापूर यांनी मे.मंचाचे आदेशाप्रमाणे नमुद बिस्कीट पुडयाचे पॅकींगसह वजन केले असता ते 132.070 ग्रॅम भरलेबाबतचा अहवाल या कामी दाखल आहे.
10. सबब, तक्रारदाराने केलेली तक्रार ही योग्य असून प्रस्तुत वि.प.क्र.1 कंपनी रोज लाखो करोडों लोकांची फसवणूक असे कमी वजनाचे बिस्कीटपुडे विक्री करुन करत असावी असा निष्कर्ष या मे.मंचाने काढला आहे. त्यामुळे वरील सर्व पुरावे, कागदपत्रे यांचा विचार करता, वि.प.क्र.1 व 2 यांनी कोणतेही कागदपत्रे व पुरावे या कामी दाखल केलेले नाहीत. याउलट तक्रारदाराने नमुद बिस्कीट पुडा, बिस्कीट पुडा, खरेदीची पावती, सहाय्यक वैध मापनशास्त्र, कोल्हापूर यांचेकडील सदर बिस्कीट वजन तपासून दिलेला अहवाल, वगैरे पुरावे या कामी दाखल केले आहेत. सदर कागदपत्रांचा, पुराव्याचे शपथपत्र, लेखी व तोंडी युक्तीवाद यांचे अवलोकन केले करता, शपथपत्र व लेखी-तोंडी युक्तीवाद यांचे अवलोकन करता, प्रस्तुत वि.प.क्र.1 कंपनीने नमुद वजनापेक्षा कमी वजनाचे बिस्कीटपुडे बाजारात विक्रीस आणून तक्रारदाराची तसेच लाखो करोडों जनतेची फसवणूक केलेचे स्पष्टपणे शाबीत झालेले आहे. म्हणजेच वि.प.क्र.1 कंपनीने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन नमुद वजनापेक्षा कमी वजनाचे बिस्कीट पुडे बाजारात विक्रीस आणून व ते ग्राहकांना विक्री करुन लाखो करोडो ग्राहकांची व तमाम जनतेची घोर फसवणूक करुन स्वत:चा फायदा करुन घेतला आहे. हे यावरुन स्पष्ट होत आहे. अशा अनुचित व्यापारी प्रथेस आळा बसलाच पाहिजे असे या मे.मंचाचे स्पष्ट मत आहे.
11. सबब, या कामी तक्रारदाराला वि.प.क्र.1 ने दिले सेवात्रुटी व वि.प.क्र.1 ने अवलंबिलेल्या अनुचित व्यापारी प्रथेमुळे तक्रारदाराला मानसिक त्रास झाला व कोर्ट खर्चास भाग पाडले हे स्पष्ट होते. त्यामुळे वि.प.क्र.1 कंपनीकडून तक्रारदार यांना रक्कम रु.50,000/- (अक्षरी रक्कम रुपये पन्नास हजार मात्र) अर्ज स्विकृत दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष मिळेपर्यंत नुकसानभरपाई मिळणेस द.सा.द.शे.9टक्के दराने तसेच रक्कम रु.5,000/- (अक्षरी रक्कम रुपये पाच हजार मात्र) तक्रार अर्जाचा खर्च, वि.प. क्र.1 कंपनीकडून तक्रारदार यांना मिळणे न्यायोचित होणार आहे. सबब, प्रस्तुत कामी आम्हीं खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) तक्रारदाराला वि.प.नं.1 कंपनीने पार्ले बिस्किट पुडयाची किंमत रक्कम रु.10/- (अक्षरी रक्कम रुपये दहा फक्त) अदा करावेत.
3) वि.प.नं.1 कंपनीने तक्रारदाराला नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.50,000/- (अक्षरी रक्कम रुपये पन्नास हजार मात्र) अदा करावेत. प्रस्तुत रक्कमेवर अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9% व्याज वि.प.नं.1 कंपनीने तक्रारदाराला अदा करावेत.
4) अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- (अक्षरी रक्कम रुपये पाच हजार मात्र) वि.प. नं.1 कंपनीने तक्रारदाराला अदा करावेत.
5) वि.प.नं.2 यांना प्रस्तुत जबाबदारीतून मुक्त केलेले आहे.
6) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प.नं.1 यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
7) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम-25 व कलम-27 प्रमाणे वि.प.नं.1 विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
8) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.