::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 06/11/2015 )
आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, …
तक्रारकर्त्याने त्याचे व कुटूंबाचे उदरनिर्वाहाकरिता विरुध्दपक्ष क्र. 2 कडून रु. 1,53,000/- नगदी देऊन ॲपे कंपनीचा ॲटो क्र. एम.एच-30 एल 4429 दि. 01/09/2010 रोजी खरेदी केला, त्याचा इंजीन नं. आर.डी.जी. 2823416 व चेचीस नं.एम.बी.एक्स 0000 डी.बी.एम.जी. 087550 असा आहे. विरुध्दपक्ष क्र. 1 हे सदर ॲटोचे निर्माता असून विरुध्दपक्ष क्र. 2 हे अधिकृत विक्रेता आहेत. सदर वाहनाची विरुध्दपक्ष क्र. 1 तर्फे 8 महिन्यांची वॉरंटी दिलेली असून त्यामध्ये नमुद केलेल्या संपुर्ण शर्तीचे पालन तक्रारकर्त्याने केलेले आहे. तक्रारकर्त्याने विकत घेतलेला सदर ॲटो त्याचे व कुटूंबाचे उदरनिर्वाहाकरिता तक्रारकर्त्याचा भाऊ चालवित होता. एक महिना ॲटो चालल्यानंतर असे आढळले की, त्याचे इंजिन जास्त गरम होत आहे व इंजिन मधील ऑईल जळत आहे, ॲटो पिकअप घेत नाही, गेअर बरोबर काम करीत नाही, तो चालता चालता मध्येच बंद पडतो. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 कडे दि. 05/10/2010 रोजी सदर वाहन दुरुस्तीकरीता दिले. त्यावेळी विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तिन लिटर इंजिन ऑईल टाकले व ॲटोमध्ये फ्युअल पाईप मध्ये बिघाड असल्याचे सांगुन तो बदलला व इतर कारणांमुळे तक्रारकर्त्याकडून रु. 1210/- घेऊन बिल दिले. काही दिवस ॲटो चालविल्यानंतर परत तोच बिघाड झाल्यामुळे ॲटो दि. 14/11/2010 रोजी दुरुस्तीकरीता विरुध्दपक्ष क्र. 2 कडे नेण्यात आला, त्यावेळी विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी पुन्हा 3 लिटर इंजिन ऑईल टाकले तसेच काही सुटे भाग बदल्याचे सांगून, तक्रारकर्त्याकडून रु. 195/- व रु. 545/- घेतले. त्यानंतर पुन्हा ॲटोमध्ये बिघाड झाल्यामुळे दि. 28/11/2010, 12/12/2010, 14/12/2010, दि. 16/12/2010 17/12/2010, 21/12/2010 रोजी दुरुस्तीकरिता विरुध्दपक्ष क्र. 2 कडे नेला व प्रत्येक वेळी विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी बिलाची आकारणी केली. अशा प्रकारे 4 महिन्याचे कालावधीत सदर ॲटो अनेक वेळा दुरुस्तीकरीता द्यावा लागला व विरुध्दपक्ष यांनी एकूण रु. 5579/- ची आकारणी केली. तरी सुध्दा सदर ॲटो दुरुस्त झालाच नाही. वास्तविक पाहता विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी वॉरंटी कालावधीत दुरुस्तीच्या वेळेस बदललेल्या कुठल्याही सुट्या भागांची किंमत, दुरुस्तीच्या सेवेबाबत आकारणी करावयास नको होती, तक्रारकर्त्यास त्याचा ॲटो दुरुस्त करण्याकरिता प्रत्येक वेळी विरुध्दपक्ष क्र. 2 यांचे एम.आय.डी.सी, फेज क्र. 4 मधील दुरुस्ती केंद्रावर न्यावा लागला व तेथे अनेक दिवस दुरुस्तीकरिता ठेवावा लागला, त्यामुळे तक्रारकर्त्यास मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. सदर ॲटो दुरुस्त न झाल्यामुळे तो परत घेऊन त्याची रक्कम परत देण्यात यावी, अशी विनंती तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षांकडे केली, सदर ॲटोमध्ये उत्पादकिय दोष असल्यामुळे ते काही करु शकत नाही, असे विरुध्दपक्ष क्र. 2 ने सांगून तक्रारकर्त्यास परत पाठविले. त्यामुळे तक्रारकर्त्याने दि.02/02/2011 रोजी वकीलामार्फत विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना रजिस्टर पोष्टाद्वारे नोटीस पाठवून तक्रारकर्त्यास ॲटो परत घेऊन रक्कम परत करावी व झालेला खर्च परत करावा तसेच नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली, परंतु सदर नोटीसला विरुध्दपक्षांनी कुठलेच उत्तर दिले नाही व नुकसान भरपाई दिलेली नाही. तक्रारकर्त्याने दि. 15/02/2011 रोजी श्री. रियाज अहमद खान हमीदखान या तज्ञ व्यक्तीला सदर ॲटो दाखविला व त्यांनी निरीक्षण करुन त्यांचे लिखीत मत दिले, त्यामध्ये ॲटोचे इंजिन बॉडीवर इंजीन नंबर आढळला नाही, ॲटोमध्ये उत्पादकीय त्रुटी आहेत तसेच ट्रायलिंग आर्म मध्ये सुध्दा उत्पादकीय त्रुटी असून हा ॲटो चालवू नये, त्यामुळे कधीही अपघात होण्याचा धोका संभवतो, असे त्यांनी मत दिले आहे. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास खोटे आश्वासन देवून उत्पादकीय त्रुटी असलेला ॲटो विकला आहे. वारंटी कालावधीत तक्रारकर्त्याकडून पैसे घेतले, तसेच नंबर नसलेली इंजीन बॉडी लावली. अशा प्रकारे विरुध्दपक्ष यांनी सेवेत न्युनता, त्रुटी तसेच निष्काळजीपणा केलेला असून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे. तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करावी व विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याने विकत घेतलेला ॲटो परत घेऊन दुसरा ॲटो बदलून द्यावा किंवा ॲटोची किंमत रु. 1,53,000/- परत करावी, तसेच तक्रारकर्त्याला लागलेला खर्च रु. 5589/- व शारीरिक, मानसिक त्रास व ॲटोचा वापर करु न शकल्यामुळे उत्पन्नाचे नुकसान ई. रु. 2,00,000/- व तक्रारीचा खर्च रु. 5000/- तक्रारकर्त्यास देण्याचा आदेश व्हावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 25 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा लेखीजवाब :-
2. सदर प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी लेखी जवाब दाखल केला असून, तक्रारीतील आरोप नाकबुल करुन असे नमुद केले की, हे म्हणणे खरे आहे की, विरुध्दपक्ष क्र. 1 हे सदर ॲटोचे उत्पादक असून विरुध्दपक्ष क्र. 2 हे अधिकृत विक्रेता आहेत. हे म्हणणे खरे आहे की, दि. 12/12/2010 रोजी विरुध्दपक्ष क्र 2 कडून तक्रारकर्त्याने ॲटोमध्ये 1 लिटर ऑईल टाकून नेला. तसेच दि. 21/12/2010 रोजी ॲटो ऑईल लिकेज, ह्या कारणामुळे विरुध्दपक्ष क्र. 2 कडे तक्रारकर्ता हे वाहन घेवून आले होते व तो ॲटो पुर्णपणे दुरुस्त करुन दि. 02/01/2011 रोजी तक्रारकर्त्यास परत देण्यात आला. तक्रारकर्त्याला विकलेले तिन चाकी ॲटो हे अत्यंत उंच दर्जाचे असून, मागील 10 वर्षापासून सतत विकल्या जात आहे. सदर ॲटो हे ॲटोमेटीव्ह रेग्युलेटरी ऑफ इंडिया यांनी सुध्दा पुर्णपणे तपासून प्रमाणीत केलेले आहे. तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 कंपनीमध्ये क्वॉलीटी कंट्रोल मॅकेनिझम असून, प्रत्येक ॲटोची पुर्ण तपासणी होवून सदर ॲटो प्लॉन्टच्या बाहेर विक्रीसाठी काढला जात असतो. त्यामुळे कोणत्याही ॲटोमध्ये बिघाड असल्याची शक्यता नसते. तक्रारकर्त्यास प्रत्येक वेळी अत्यंत उंच दर्जाची सेवा प्रदान करुन त्याचे ॲटोचे काम ताबडतोब करुन दिलेले आहे. तक्रारकर्त्याच्या वाहनामध्ये फक्त आईल कन्झमशन हाच किरकोळ दोष होता व तो विरुध्दपक्ष क्र. 1 ने पुर्णपणे दुरुस्त करुन दि. 02/01/2011 रोजी दुरुस्त करुन दिल्यामुळे, तक्रारकर्त्याच्या गाडीमध्ये कोणतेही दोष उदभवलेले नाहीत. रियाज अहमदखान हमीदखान यांना ॲटो दुरुस्ती बाबत कोणतेही तांत्रिक ज्ञान नाही. त्यांच्या रिपोर्ट मध्ये नमुद दोष पुर्ण खोटे आहेत व त्या दोषांबाबत तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे कधीही तक्रार नोंदवलेली नाही. जे सुटे भाग वारंटी मॅन्युअल मध्ये कव्हर होत नाहीत, त्या बद्दलच विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी बिल आकारणी केलेली आहे. तक्रारकर्त्याची सदर तक्रार चुकीची असून ती खर्चासह खारीज करण्यात यावी
विरुध्दपक्ष क्र 2 यांचा लेखीजवाब :-
विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी लेखी जवाब दाखल केला असून, तक्रारीतील आरोप नाकबुल करुन असे नमुद केले की, हे म्हणणे खरे आहे की, विरुध्दपक्ष क्र. 1 हे सदर ॲटोचे उत्पादक असून विरुध्दपक्ष क्र. 2 हे अधिकृत विक्रेता आहेत. हे म्हणणे खरे आहे की, दि. 12/12/2010 रोजी विरुध्दपक्ष क्र 2 कडून तक्रारकर्त्याने आपले ॲटोमध्ये 1 लिटर ऑईल टाकून नेला. तसेच दि. 21/12/2010 रोजी ॲटो, ऑईल लिकेज ह्या कारणामुळे विरुध्दपक्ष क्र. 2 कडे तक्रारकर्ता हे वाहन घेवून आले होते व तो ॲटो पुर्णपणे दुरुस्त करुन दि. 02/01/2011 रोजी तक्रारकर्त्यास परत देण्यात आला. तक्रारकर्त्याला विकलेले तिन चाकी ॲटो हे अत्यंत उंच दर्जाचे असून मागील 10 वर्षापासून सतत विकल्या जात आहे, सदर ॲटो हे ॲटोमेटीव्ह रेग्युलेटरी ऑफ इंडिया यांनी सुध्दा पुर्णपणे तपासून प्रमाणीत केलेले आहे. तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 कंपनीमध्ये क्वॉलीटी कंट्रोल मॅकेनिझम असून, प्रत्येक ॲटोची पुर्ण तपासणी होवून सदर ॲटो प्लॉन्टच्या बाहेर विक्रीसाठी काढला जात असतो. त्यामुळे कोणत्याही ॲटोमध्ये बिघाड असल्याची शक्यता नसते. तक्रारकर्त्याने दि. 05/10/2010 रोजी सदर ॲटो फक्त नियमित सर्व्हीसींग करिता विरुध्दपक्ष क्र. 2 कडे आणला होता, जे त्या दिवशीच्या जॉब कार्डवरुन स्पष्ट होते. त्या दिवशी कोणताही दोष असता तर तो जॉबकर्डवर नमुद केला असता. परंतु दि. 05/10/2010 व दि. 14/11/2010 रोजी तक्रारकर्त्याने नियमित सर्व्हीसींग साठी त्याचा ॲटो विरुध्दपक्ष क्र. 2 कडे आणला होता व तो चांगल्या प्रकारे सर्व्हीसिंग करुन त्याच दिवशी त्याला परत करण्यात आला होता. तक्रारकर्त्याने दि. 28/11/2010 रोजी पहील्यांदा ॲटो ऑईल जास्त खात आहे, या कारणामुळे विरुध्दपक्ष क्र. 2 कडे आणला. विरुध्दपक्ष क्र. 2 ने त्यावेळेस तक्रारकर्त्यास सर्व्हीस देवून वारंटी अंतर्गत काही पार्ट बदलून त्याला ॲटो त्वरीत परत केला. दि. 28/11/2010 रोजी तक्रारकर्त्याने दुपारनंतर ॲटो आणल्यामुळे व दुस-या दिवशी सुटी असल्यामुळे त्याला दि. 30/11/2010 रोजी ॲटो परत घेऊन जाण्यास सांगण्यात आले, परंतु तक्रारकर्ता स्वत:हून दि. 01/12/2010 रोजी ॲटो घेवून गेला. तक्रारकर्त्याने ॲटो घेण्यापुर्वी पुर्ण तपासून ॲटोचे काम सुव्यवस्थीत झाल्याची खात्री करुन ॲटो नेला होता. त्यानंतर दि. 14/12/2010 दि. 15/12/2010 व दि. 17/12/2010 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 कडून फक्त ऑईल विकत घेवून नेले होते, त्यावेळी विरुध्दपक्ष क्र. 2 ला ॲटो मधील कोणतेही दोष दुरुस्ती करिता सांगीतले नव्हते. तक्रारकर्त्याने शेवटी दि. 21/12/2010 रोजी पुन्हा गाडी जास्त आईल खात आहे, ह्या कारणामुळे ॲटो विरुध्दपक्ष क्र. 2 कडे आणला होता. त्यावेळी विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्त्याचे गाडीचे प्रॉब्लेम पुन्हा येवू नये म्हणून संपुर्ण काम करुन सर्व सुटे पार्टस् बदलून ॲटो पुर्णपणे दुरुस्त करुन दिला. यावेळी तक्रारकर्त्याकडून पैसे घेण्यात आले नाहीत. तक्रारकर्त्याच्या वाहनामध्ये फक्त ऑईल कन्झमशन हाच किरकोळ दोष होता व तो दि. 02/01/2011 रोजी पुर्णपणे दुरुस्त करुन दिल्यामुळे तक्रारकर्त्याच्या गाडीमध्ये कोणतेही दोष उदभवलेले नाहीत. रियाज अहमदखान हमीदखान यांना ॲटो दुरुस्ती बाबत कोणतेही तांत्रिक ज्ञान नाही. त्यांच्या रिपोर्ट मध्ये नमुद दोष पुर्ण खोटे आहेत व त्या दोषांबाबत तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे कधीही तक्रार नोंदवलेली नाही. जे सुटे भाग वारंटी मॅन्युअल मध्ये कव्हर होत नाहीत, त्या बद्दलच विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी बिल आकारणी केलेली आहे. तक्रारकर्त्याची सदर तक्रार चुकीची असून ती खर्चासह खारीज करण्यात यावी.
3. त्यानंतर तक्रारकर्त्यातर्फे प्रतिउत्तर, लेखी युक्तीवाद, शपथपत्रावर पुरावा (दोन), तसेच, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 तर्फे साक्षीदारांचा पुरावा, व लेखी युक्तीवाद दाखल केला.
:.:: का र णे व नि ष्क र्ष :::
4. सदर प्रकरणात उभय पक्षांचा लेखी युक्तीवाद, उभय पक्षांनी दाखल केलेले न्यायनिवाडे, व उभय पक्षांनी दाखल केलेल्या दस्तांचे अवलेाकन करुन, तसेच उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद ऐकून काढलेल्या मुद्दयांचा अंतीम आदेशाचे वेळी विचार करण्यात आला.
- सदर तक्रार याच मंचात दि. 02/05/2011 रोजी दाखल झाली होती व तिचा तक्रार क्र. 131/2011 असा होता. परंतु त्या वेळी सदर प्रकरण, तक्रारकर्ता विरुध्दपक्षाचा ग्राहक असल्याचे सिध्द न झाल्याने, अधिकार क्षेत्राअभावी तक्रारकर्त्याला परत करण्यात आले होते. त्यामुळे तक्रारकर्त्याने मा. राज्य आयोगात या मंचाच्या निकालाच्या विरोधात अपील दाखल केले, त्याचा क्रमांक F.A. No. A/11/312 असा हेाता. दि. 6/5/2014 रोजी तक्रारकर्त्याचे अपील मंजूर झाले व सुनावणीसाठी (Trial ) पुन्हा या मंचात पाठविण्यात आले.
मा. राज्य आयोगाने अपीलाच्या सुनावणीच्यावेळी तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक होतो किंवा नाही, हे तपासूनच तक्रारकर्त्याला विरुध्दपक्षाचा “ग्राहक” होत असल्याचे ग्राह्य धरले आहे. त्यामुळे वरिष्ठ मंचाच्या आदेशाचा मान राखुन, तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा “ग्राहक” आहे, असे सदर मंच ग्राह्य धरत आहे.
- तक्रारीत नमुद असलेले वाहन सदोष आहे किंवा नाही, हा मुख्य मुद्दा सदर प्रकरणात मंचाला आढळून येतो. सदर मुद्द्यावर उभय पक्षांनी दस्त दाखल केलेत, तसेच तक्रारकर्त्याने तज्ञाचा अहवालही मंचासमोर दाखल केला आहे. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 च्या म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याने दि. 5/10/2010 रोजी ॲटो फक्त नियमित सर्व्हीसींग करिता विरुध्दपक्ष क्र. 2 कडे आणला होता. तक्रारकर्त्याने पहील्यांदा दि. 28/11/2010 रोजी, ॲटो ऑईल जास्त खातो, या कारणाने विरुध्दपक्ष क्र. 2 कडे आणला. त्यानंतर पुन्हा याच कारणामुळे दि. 21/12/2010 रोजी तक्रारकर्त्याने सदर ॲटो विरुध्दपक्ष क्र. 2 कडे आणला, तेव्हा विरुध्दपक्ष क्र. 2 ने पुन्हा सदर तक्रार येऊ नये, यासाठी सर्व सुटे पार्टस् बदलून ॲटो पुर्णपणे दुरुस्त करुन तक्रारकर्त्याला दिला. दि. 2/11/2011 रोजी ॲटो पुर्णपणे दुरुस्त करुन दिल्यानंतर तक्रारकर्त्याच्या वाहनामध्ये कोणतेही दोष उदभवलेले नाही, यावर तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, ॲटो विकत घेतल्या पासून म्हणजे दि. 1/9/2010 पासून दि. 2/1/2011 पर्यंत ह्या 4 महिन्यांच्या कालावधीत अनेक वेळा दुरुस्ती करण्याकरिता द्यावा लागला व विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी एकूण रु. 5579/- ची आकारणी तक्रारकर्त्याकडून केली. तरीही सदर ॲटोमध्ये वारंवार बिघाड होत गेला व त्यामुळे तक्रारकर्त्याला कुठलाही रोजगार प्राप्त करता आला नाही
- उभय पक्षांचे म्हणणे ऐकल्यावर मंचाने संबंधीत दस्त तपासले, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचे म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याने सर्व प्रथम ‘ ॲटो जास्त ऑईल खातो ’ अशी तक्रार दि. 28/11/2010 रोजी केली. परंतु मंचाने विरुध्दपक्षानेच दाखल केलेल्या दस्तांचे अवलोकन केले असता, “Oil Consumption” ची तक्रार दि. 14/11/2010 रोजी केलेली दिसून येते ( पृष्ठ क्र. 80, दस्त क्र. 4 ) सदर दस्तावर “Job description” या सदराखाली 5 व्या क्रमांकावर “Oil Congection” असे नमुद केले दिसून येते व “Technician Name” समोर “Ashish Pandey” असे नमुद केलेले दिसून येते. “Oil Consumption” या ऐवजी चुकून “Oil Congection” असे नमुद केल्याचे मंचाच्या निदर्शनास आले. दि. 5/10/2010 रोजी “Engine Oil, Oil Filter” बदलून दिल्यावरही ( जॉबशिट पृष्ठ क्र. 77, दस्त क्र. 51) पुन्हा एक महिन्याच्या आत म्हणजे दि. 14/11/2010 रोजी “Engine Oil, Oil Filter, Diesel Filter” इत्यादी पुन्हा बदलल्याचे दिसून येते. त्यानंतर लगेच 14 दिवसात म्हणजे दि. 28/11/2010 रोजी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे सदर वाहन याच तक्रारीसाठी म्हणजे, “High Oil Conjection ( Consumption )” साठी नेल्याचे जॉबकार्ड वरुन दिसून येते ( पृष्ठ क्र. 86, दस्त क्र. 7 ) या दिवशीही Engine Oil, Oil Filter, Air Filter बदलल्याचे दिसून येते. तसेच ब्लॉक पिस्टन किट (B.P. Kit ) सुध्दा बदल्याचे दिसून येते. वादातील वाहनाची, दुरुस्ती वॉरंटीच्या कालावधीतील असल्याने विरुध्दपक्षाने सदर वाहनाचे भाग विना मोबदला दिले व तक्रारकर्त्याने तसे नमुद केले ( दस्त क्र. 8 ) यानंतर पुन्हा तक्रारकर्ता दि. 21/12/2010 ला विरुध्दपक्षाकडे “High Oil Consumption” चीच तक्रार घेऊन गेला. यावेळीही विरुध्दपक्ष क्र. 2 ने तक्रारकर्त्याच्या वाहनातील B.P. Kit बदलून दिले. या दिवशी सदर वाहनाचे जे भाग बदलले, यावरुन विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याच्या वाहनाचे इंजीन कव्हर सोबत अनेक महत्वाचे भाग बदलल्याचे मंचाच्या निदर्शनास आले. ( दस्त क्र. 13, पृष्ठ क्र. 94 ) यावेळी एकूण रु. 11,145/- चे नविन भाग वॉरंटी कालावधीत असल्याने विनामोबदला विरुध्दपक्ष क्र. 2 ने बदलून दिल्याचे दिसून येते. परंतु जे भाग वॉरंटी कालावधीतही दुरुस्त करुन दिले जात नव्हते, त्याची सर्व रक्कम तक्रारकर्त्याकडून वसुल केल्याचे मंचाच्या निदर्शनास आले आहे. या सर्व दस्तांवरुन वाहन विकत घेतल्यानंतर केवळ 3 महिन्याच्या कालावधीत तक्रारकर्त्याच्या नविन वाहनाचे अनेक महत्वाचे भाग केवळ “High Oil Consumption” याच तक्रारीवरुन विरुध्दपक्ष क्र. 2 ने बदलले. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी त्यांच्या जबाबात, तक्रारकर्त्याच्या वाहनात फक्त “Oil Comsuption” हाच किरकोळ दोष होता व तो विरुध्दपक्ष क्र. 2 ने पुर्णपणे दुरुस्त करुन दिला, असे नमुद केले आहे ( पृष्ठ क्र. 108, परि. क्र. 7 ) विरुध्दपक्षाचे सदर विधान, दाखल पुराव्यावरुन मंचाला मान्य नाही, कारण सदर दोष जर किरकोळ असता तर तक्रारकर्त्याला त्याचे वाहन एकाच कारणासाठी विरुध्दपक्षाकडे वारंवार न्यावे लागले नसते व विरुध्दपक्षालाही सदर वाहनातील किंमती, महत्वाचे भाग बदलून द्यावे लागले नसते.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांच्या जबाबानुसार दि. 2/1/2011 रोजी तक्रारकर्त्याची गाडी दुरुस्त करुन दिल्यानंतर तक्रारकर्त्याच्या गाडीमध्ये कोणतेही दोष उद्भवलेले नाही.
विरुध्दपक्षाच्या सदर विधानातील सत्यता तपासण्यासाठी मंचाने दाखल दस्तांचे अवलोकन कले असता, विरुध्दपक्षाच्या म्हणण्यात सत्यता आढळून आली नाही. कारण दि. 2/1/2011 नंतर तक्रारकर्त्याने सदर वाहन दि. 15/02/2011 रोजी “M.M. Automobiles” या “Authorise Service Point” वर तपासणीसाठी नेले ( दस्त क्र. अ-12, पृष्ठ क्र. 28,29) तिथे रियाझ अहमद खॉ यांनी सदर वाहनाची तपासाणी करुन अहवाल दिला. सदर अहवालात असे नमुद केले आहे की,
“ You have repaired your above said vehicle from your authorized dealer 5 to 6 times and your authorized dealer has already replaced various parts i.e. Engine Block, Piston Assy, Crank Case, its cover and also repaired the head. But Still the problem is not solved and the engine is consuming excess oil and becoming hot, the vehicle is not running in its normal speed and not giving proper average as well as engine is exhausting more smoke
I have gone through the bills you have submitted and also driven the vehicle and inspected the whole vehicle thoroughly. I found that, there is no engine number embossed on the engine body anywhere.
I am of the opinion that you have already replaced the important part of engine through authorized dealer still the vehicle is not giving satisfactorily performance and all the faults are as it is. It is the manufacturing defect and is not repairable.
As regards the complaints of uneven and undue wear of LHS rear tyre and imbalance of vehicle, I am of the opnion that LHS trailing arm is defective due to inherent manufacturing defect if it is not replaced in addition to above problem, it may caused accident to the vehicle.”
सदर वाहन तज्ञाकडे नेण्यापुर्वी दि. 2/2/2011 रोजी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 ला नोटीस पाठविल्याचेही दिसून येते ( दस्त क्र. अ-15, पृष्ठ क्र. 24 ) तज्ञाच्या अहवालानंतर तक्रारकर्त्याने त्याची तक्रार दि. 2/5/2011 रोजी मंचात दाखल केली. सदर घटनाक्रमावरुन तक्रारकर्त्याच्या वाहनातील दोष दूर न झाल्यानेच तक्रारकर्त्याने मंचात तक्रार दाखल केली, या निष्कर्षाप्रत मंच आल्याने, विरुध्दपक्षाचे, तक्रारकर्त्याचा ॲटो पुर्णपणे दुरुस्त केल्याचे विधान ग्राह्य धरता येणार नाही.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांच्या म्हणण्यानुसार रियाज अहमद खान हमीदखान यांचा रिपेार्ट पुर्णपणे खोटा आहे. कारण त्यांना ॲटो दुरुस्ती बाबत कसलेही तांत्रीक ज्ञान नाही व त्यांच्याकडे कोणत्याही कंपनीचे ट्रेनिंग प्रमाणपत्र सुध्दा नाही. त्यामुळे त्यांच्या रिपोर्टवर भिस्त ठेवता येणार नाही.
त्यावर सदर तज्ञाने मंचात साक्षीदार म्हणून शपथेवर पुरावा दिला. त्यानुसार त्यांचे शिक्षण एच.एस.सी. पर्यंत झाले असून ॲटोमोबाईलचा शासकीय डिप्लोमा कोर्स सन 1974 मध्ये उत्तीर्ण केलेला आहे. त्याच प्रमाणे त्यांनी बजाज ॲटो लिमिटेड यांचे “ॲटो मेकॅनिक” म्हणून प्रशिक्षण घेतले. सन 1974 पासून ते ॲटो मेकॅनिक म्हणून काम करीत असून, त्यांच्या मालकीचे एम.एम. ॲटोमोबाईल्स नावाचे वर्कशॉप आहे व त्यांना ॲटो मेकॅनिक कामाचा 38 वर्षाचा अनुभव आहे, असे नमुद केल्याचे दिसून येते. सदर साक्षीदार तज्ञाने बजाज ॲटो लिमिटेड यांच्याकडे ॲटो मेकॅनिक म्हणून प्रशिक्षण घेतल्याचे दोन प्रमाणपत्र सुध्दा मंचात दाखल केले आहेत. ( पृष्ठ क्र. 129, 130 ) तसेच या तज्ञाचा प्रश्नावली रुपात उलट तपासही विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी घेतला व सदर प्रश्नावलीची उत्तरे तज्ञाने मंचासमोर लिहीलीत ( पृष्ठ क्र. 160 ते 163) सदर तज्ञाच्या अनुभवाच्या आधारे त्यांनी दिलेला अहवाल मंचाने ग्राह्य धरावा अशी विनंती तक्रारकर्त्याने मंचला केली व त्याच्या पृष्ठयर्थ II (2015) CPJ 89 (Utta.) Apollo Tyres Ltd. Vs. Virk International Trading company & Ors. हा न्यायनिवाडा दाखल केला. त्यानुसार “ Complainants have adduced affidavit of expert having 20 years experience – Appellant has not adduced either any expert evidence or affidavit of any expert – Deficiency proved.” सदर न्यायनिवाड्यातील तथ्ये वरील मुद्दयाला लागु पडत असल्याने मंचाने ते ग्राह्य धरुन रियाज अहमद खॉ यांचा अहवाल तज्ञाचा अहवाल म्हणून स्विकारला आहे व सदर अहवालानुसार सदर वाहनात निर्मिती दोष असून ते दुरुस्त न करण्याजोगे आहे.
- सदर प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 1 तर्फे श्री पियुष कुळकर्णी रा. नागपुर यांनी शपथेवर पुरावा दिला व विरुध्दपक्ष क्र. 2 तर्फे निलेश गजंदेकर, रा. अकोला यांनी शपथेवर पुरावा दिला. सदर पुराव्या बद्दल आक्षेप घेतांना तक्रारकर्त्याने असे म्हटले आहे की, विरुध्दपक्ष क्र. 1 चे साक्षीदार हे नागपुर येथे एरिया मॅनेजर म्हणून काम करतात, त्यांनी कंपनीच्या कारभाराबाबत माहीती नमुद केली, परंतु तक्रारकर्त्याच्या ॲटो बद्दल व्यक्तीगत ज्ञान असल्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. तसेच विरुध्दपक्ष क्र. 2 यांचे साक्षीदार निलेश ज्ञानेश्वर गजंदेकर यांच्या तांत्रीक ज्ञानाबद्दलचे कुठलेही सर्टीफिकेट विरुध्दपक्ष क्र. 2 ने सादर केलले नाही. तसेच विरुध्दपक्ष क्र. 2 च्या जॉबकार्डवर टेक्नीशियन म्हणून राजू बने, सुनिल कथाके, आशीष पांडे, यांची नावे असून सुपरवायझर म्हणून ए.एम.पाटील यांच्या सह्या आहेत. त्या जॉब कार्डवर निलेश गजंदेकर यांचे नाव किंवा सही नाही.
संबंधीत दाखल दस्तांचे अवलोकन मंचाने केल्यावर विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांच्या पुराव्यातील बराचसा मजकुर सारखा आढळून आला. तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या साक्षीदाराने तक्रारकर्त्याच्या वादातील वाहनाची तपासणी स्वत: केल्याचे म्हटलेले नाही. तसेच विरुध्दपक्ष क्र. 2 च्या साक्षीदाराने त्याच्या देखरेखीखाली तक्रारकर्त्याच्या वाहनाच्या दुरुस्ती केल्याचा कुठलाच पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारकर्त्याने उल्लेखीत केलेल्या जॉब कार्डाचे अवलोकन केल्यावर कुठल्याच जॉबकार्डवर अथवा विरुध्दपक्ष क्र. 2 कडून दिलेल्या बिलांवर सुध्दा विरुध्दपक्ष क्र. 2 च्या साक्षीदाराची स्वाक्षरी अथवा नाव मंचाला आढळून आले नाही. या उलट तक्रारकर्त्याचे साक्षीदार रियाझ अहमदखॉ यांनी स्वत: वाहनाची तपासणी करुन अहवाल दिल्याचे मंचाच्या निदर्शनास येते. त्यामुळे तक्रारकर्त्याचा आक्षेप ग्राह्य धरुन, सदर दोन्ही पुराव्यातील तक्रारकर्त्याच्या विरोधातील विधाने ग्राह्य धरता येणार नाही, या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 तर्फे ॲटोमोटीव रिसर्च असोशिएशन ऑफ इंडिया, यांचे प्रमाणपत्र मंचासमोर दाखल करण्यात आले ( पृष्ठ क्र. 143 ते 154 ) यावर तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, दाखल केलेले प्रमाणपत्र हे 12 डिसेंबर 2007 रोजीचे आहे. सदरहू प्रमाणपत्र हे ह्या प्रकरणात पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. कारण तक्रारकर्त्याला विकण्यात आलेला ॲटो हा सन 2010 मध्ये निर्मित झालेला आहे. त्यामुळे सन 2007 सालच्या दाखल असलेल्या A.R.A.I. च्या प्रमाणपत्रावरुन दि. 2/9/2010 रोजी घेतलेला ॲटो हा दोषरहीत होता, असे सिध्द होत नाही.
दाखल दस्त बघता, तक्रारकर्त्याच्या विधानातील तर्कात तथ्य आढळल्याने विरुध्दपक्षाने दाखल केलेले A.R.A.I.चे प्रमाणपत्र पुरावा म्हणून मंच नाकारत आहे. त्याच प्रमाणे तक्रारकर्त्यानेही वादातील वाहन तज्ञाकडून तपासणी करुन अहवाल मागवण्याचा अर्ज दि. 10/6/2015 रोजी केला होता. त्यासाठी त्यांनी मा. राज्य आयोगाच्या “Authorised Representative Seva Automotive Ltd. Vs. Shri Anil Bansilal Chordiya & Ors [( 2012 (6) All MR (Journal) 28]” या न्यायनिवाड्याचा आधार घेतला. परंतु विरुध्दपक्षाने यावर आक्षेप घेऊन सदर वाहन साडेचार वर्ष जुने झाले असून, मागील चार वर्षापासून तक्रारकर्त्याच्या ताब्यात आहे. त्यामुळे सदर वाहनाच्या आजच्या स्थितीला विरुध्दपक्ष जबाबदार नसल्याचे म्हटले, त्यामुळे या मंचाने तक्रारकर्त्याने या पुर्वीच रियाज अहमद खान या तज्ञाचा अहवाल मंचासमोर दाखल केला असून, मंचासमोर त्यांचा प्रश्नावलीच्या स्वरुपात उलट तपासही घेण्यात आल्याने, तक्रारकर्त्याचा अर्ज नामंजुर केला होता.
- सदर प्रकरणात उभय पक्षांनी न्यायनिवाडे दाखल केले आहेत. तक्रारकर्त्यातर्फे खालील न्यायनिवाडे दाखल करण्यात आले.
- III (2013) CPJ 520 (NC), NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI.
SAS MOTORS LTD Vs. ANANT HARIDAS CHAUDHARY
- I (2015) CPJ 192 (NC) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,NEW DELHI.
ESS PEE AUTOMOTIVES LTD. HINDUSTAN MOTORS LTD, Vs.SPN SINGH & OTH.
- IV (2012) CPJ 87 RAJASTHAN STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION JAIPUR
TEREX VECTRA PVT. LTD. Vs. MEHARCHAND
- I (2014) CPJ 450 (NC) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,NEW DELHI.
TATA MOTORS LTD & ANR. Vs. DR. ANUJPAUL MAINI & ORS.
- II (2015) CPJ 89 UTTARAKHAND STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, DEHRADUN.
APOLLO TYRES LTD. Vs. VIRK INTERNATIONAL TRADING COMPANY & ORS.
- III(2014) CPJ 342 (NC) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,NEW DELHI.
MANOHAR LAL Vs. RAJ MOTORS & ANR.
यातील सर्व न्यायनिवाड्यातील तथ्ये या प्रकरणातील विविध तथ्यांशी संबंधीत असल्याने सदर मंचाने या प्रकरणातील तथ्यांच्या अनुषंगाने सदर न्यायनिवाडे विचारात घेतले आहेत.
त्याच प्रमाणे विरुध्दपक्षानेही खालील न्यायनिवाडे दाखल केले आहेत.
- I (1994) CPJ 165 (NC) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,NEW DELHI
PREMIER AUTOMOBILES Vs. S.B.GHOSH & ANR.
- IV (2014) CPJ 252 (NC) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI.
PIAGGIO GREAVES VEHICLE PVT. LTD. & ANR. Vs. RAMAKANTA SAMAL & OTH.
- I (2013) CPJ 47 (NC) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,NEW DELHI
SUKHVINDER SINGH Vs. CLASSIC AUTOMIBILE & ANR
- II (2013) CPJ 72 (NC) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI
GENERAL MOTORS INDIA Vs. G.S. FERTILIZERS (P) LTD. & ANR.
- 2012 (6) ALL MR (JOURNAL) 28 CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, MAHARASHTRA STATE MUMBAI
AUTHORISED REPRESENTATIVE, SEVA AUTOMOBILE LTD. Vs. ANIL BANSILAL CHORDIYA & ORS.
मात्र सदर न्यायनिवाड्यातील तथ्ये, ज्यावर आधारीत युक्तीवाद विरुध्दपक्षाने केला, त्या सर्व तथ्यांचा मंचाने आधीच उहापोह केलेला असल्याने व सदर तथ्ये या प्रकरणात लागु होत नसल्याने वा सिध्द होत नसल्याने या न्याय निवाड्यांचा विचार मंचाने अंतीम आदेशाच्या वेळी केलेला नाही.
- वरील सर्व कारणांवरुन व दाखल दस्तांवरुन मंच या निष्कर्षाप्रत आले आहे की, तक्रारकर्त्याचे वादातील वाहन, ज्याचा क्रमांक एच.एच. 30 एल 4429 आहे, ते सदोष असल्याने, व विरुध्दपक्ष क्र. 2 ने तक्रारकर्त्याच्या सदर वाहनाचे इंजीन कव्हर बदलल्यावर त्यावर नंबर न टाकल्याने तक्रारकर्ता त्या वाहनाचा उपयोग त्याच्य उदरनिर्वाहासाठी करु शकत नसल्याने, तक्रारकर्ता या वाहनाची संपुर्ण रक्कम म्हणजे रु. 1,53,000/- मिळण्यास किंवा दुसरा नविन दोषरहीत ॲटो मिळण्यास पात्र आहे. त्याच प्रमाणे तक्रारकर्त्याने सदर वाहनावर खर्च केलेले रु. 5589/- सुध्दा मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे.
सदर तक्रारीत तक्रारकर्त्याने त्याच्या उत्पन्नाच्या नुकसानीची भरपाई म्हणून रु. 2,00,000/- ची मागणी केली आहे. परंतु सदर नुकसान तक्रारकर्त्याने पुराव्यासह सिध्द न केल्याने तक्रारकर्त्याची सदर मागणी मंचाला मान्य करता येणार नाही, परंतु तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसान भरपाईपोटी व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 10,000/- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 ने तक्रारकर्त्याला देण्याचे आदेश सदर मंच देत आहे.
सदर आदेशाचे पालन विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी 45 दिवसात न केल्यास तक्रारकर्त्याला मंजुर झालेल्या संपुर्ण रकमेवर आदेश पारीत तारखेपासून देय तारखेर्यंत द.सा.द.शे 8 टक्के दराने व्याज आकारण्यात येईल.
सबब अंतीम आदेश पारीत केला तो येणे प्रमाणे.
:::अं ति म आ दे श:::
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे तक्रारकर्त्याने विकत घेतलेला ॲटो, ज्याचा क्र. एम.एच.30 एल 4429 परत घेऊन दुसरा दोषरहीत, नविन, त्याच मॉडेलचा, ॲटो बदलून द्यावा किंवा ॲटोची किंमत रु. 1,53,000/- ( रुपये एक लाख त्रेपन्न हजार फक्त ) तक्रारकर्त्याला परत करावी.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तपणे तक्रारकर्त्याला लागलेला वाहन दुरुस्तीचा खर्च रु. 5589/- ( पांच हजार पांचशे एकोणनव्वद ) व संपुर्ण नुकसान भरपाईपोटी व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 10,000/- ( रुपये दहा हजार ) द्यावे.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी सदर आदेशाचे पालन निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत करावे. मुदतीत सदर आदेशाचे पालन न केल्यास उपरोक्त संपुर्ण रकमेवर आदेश पारीत दिनांकापासून ( दि. 06/11/2015 ) ते प्रत्यक्ष रकमेच्या अदाई पर्यंत द.सा.द.शे. 8 टक्के दराने व्याजासह रक्कम देण्यास विरुध्दपक्ष जबाबदार राहतील.
- सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.