श्री. मनोहर चिलबुले, अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
- आ दे श -
(पारित दिनांक – 11 नोव्हेंबर, 2016)
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण खालीलप्रमाणे.
1. तक्रारकर्ता हा मौजा खैरीपट येथील राहिवासी असून त्याची तेथे गट क्र. 11, आराजी 0.67 हे.आर. व गट क्र. 494/1, आराजी 0.37 हे.आर. अशी संयुक्त मालकीची शेती असून त्यात विहिर आहे. सदर विहिरीवर विज पंप क्र. ए.जी.पी.32 आहे. तक्रारकर्त्याने वि.प.क्र.1 द्वारा निर्मित ‘ओम साई’ या जातीच्या धानाच्या प्रत्येकी 10 किलोच्या 4 बॅग दि.18.01.2015 रोजी वि.प.क्र. 2 कडून रु.2,680/- विकत घेतल्या. सदर बियाणे 120 ते 125 दिवसांच्या मुदतीत धानाचे पीक निघणारे असल्याचे वि.प.क्र. 1 ने माहिती पत्रकात नमूद केले होते व त्याप्रमाणे वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्त्यास सांगितले होते.
धानाच्या रोपणीकरीता तक्रारकर्त्याने शेतीची मशागत रु.1,000/- ट्रॅक्टर भाडे देऊन धानाचा प-हा भरला व त्यावर रु.200/- खर्चाचे औषध, रु.100/- युरीया व रु.200/- प्रमाणे मिश्र खते असा उपयोग प-ह्याकरीता करण्यात आला. चिखलनीकरीता रु.2500/- प्रती एकर असा रु.5,000/- खर्च आला. अशाप्रकारे मिश्र खते, युरिया, किटकनाशके, इलेक्ट्रीक बिल व किरकोळ खर्च याबाबत तक्रारकर्त्याला एकूण रु.30,000/- खर्च सदर धानाच्या लागवडीकरीता आला. प्रत्यक्षात मात्र 5 टक्के धान निसवले व पुढे धान तयार झाले नाही. सदर प्रकाराची सुचना वि.प.क्र. 2 ला दिली असता त्यांनी वि.प.क्र. 1 च्या एजंटला बोलावून सदर बाब समजावून सांगितली. त्यांनी तक्रारकर्त्याच्या शेतात जाऊन रितसर चौकशी केली परंतू नुकसान भरपाई देण्याचे नाकारले. तक्रारकर्त्याने पुढे कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती लाखांदूर यांचेकडे तक्रार केली असता त्यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. म्हणून तालुका कृषी अधिकारी लाखांदूर यांचेकडे तक्रार केली. त्यानुसार दि.19.06.2015 रोजी तालुका स्तरीय तक्रार निवारण समिती यांनी तक्रारकर्त्याच्या शेताला भेट दिली. चौकशी व पंचनामा करण्यात आला आणि जुलैमध्ये अहवाल सादर केला. सदर अहवालनुसार बियाणे सदोष असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. सदर निष्कर्षानंतरही वि.प.ने केवळ आश्वासने दिली मात्र नुकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रास सोसावा लागला. शेवटी नविन रोपणीची वेळ आल्याने ट्रॅक्टर चालवून अर्धवट निसवलेले धानाचे पीक मोडले. त्यामुळे त्या हंगामातील तक्रारकर्त्याचे धानाचे पूर्ण पीकाचे नुकसान झाले.
तक्रारकर्त्याने दि.06.11.2015 रोजी अधिवक्त्यामार्फत वि.प.क्र. 1 व 2 ला नोटीस पाठविली. सदर नोटीस तामिल होऊनही वि.प.क्र. 1 व 2 ने त्याची दखल घेतली नाही, म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
- तक्रारकर्त्याला लागवडीकरीता आलेला खर्च रु.30,000/-, अपेक्षित उत्पन्न रु.30,000/- असे एकूण रु.60,000/- या रकमेवर दि.07.07.2015 पासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह देण्याचा वि.प.ला विरुध्द आदेश व्हावा.
- शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.20,000/- मिळावी. नोटीस खर्च रु.5,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह देण्याचा वि.प.ला विरुध्द आदेश व्हावा.
- तक्रार खर्च रु.5,000/- मिळावा.
तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीसोबत खरेदीचे बिल, वि.प.क्र. 1 कंपनीचे माहितीपत्रक, विज बील, फोटोचे बिल, अंशतः निसवलेल्या धान पीकाचे फोटो, सोसायटीच्या कर्जाचा दाखला, तक्रार अर्ज, तालुका समितीचे पत्र व अहवाल, 7/12 चा उतारा, गाव नमुना ‘अ’, नोटीस, पोस्टाच्या पावत्या, परत आलेले नोटीस व पोचपावत्या अशा दस्तऐवजांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत.
2. वि.प.क्र. 1 ला नोटीस तामिल होऊनही ते मंचासमोर हजर न झाल्याने मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला.
3. वि.प.क्र. 2 ने लेखी जवाब दाखल केला असून तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे तक्रारकर्त्याने त्यांचेकडून बियाणे विकत घेतल्याची बाब मान्य केली आहे. मात्र त्यांचे म्हणणे असे की, त्याने सदर बियाणे वि.प.क्र. 1 कडून खरेदी करुन त्याची तक्रारकर्ता व इतर शेतक-यांना विक्री केली होती. मात्र तक्रारकर्ता सोडून कुणीही बियाणे सदोष असल्याबाबत तक्रार केली नाही. तक्रारकर्त्याकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याने वि.प.क्र. 1 या बियाणे उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी प्रदीप मेश्राम यांना माहिती दिली आणि त्यांचेबरोबर तक्रारकर्त्याच्या शेतात पाहणी केली. जे बियाणे तक्रारकर्त्याने खरेदी केले आहे ते 120 ते 125 दिवसांचे आहे असे वि.प.क्र. 1 ने मार्गदर्शक पत्रात नमूद केले आहे. त्याप्रमाणे दिलेल्या मुदतीत धान पीक तयार व्हावयास पाहिजे होते. कंपनी आपल्या स्तरावर काय करते याची वि.प.क्र. 2 ला माहिती नाही. कृषी विस्तार अधिकारी पंचायत समितीच्या चमुने तक्रारकर्त्याच्या शेतात पीक पाहणी केली असता त्यांचेबरोबर वि.प.क्र. 2 हजर असल्याने त्याचेकडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार झाला नसल्याने त्याचेविरुध्दची तक्रार खारीज करावी अशी विनंती केली आहे.
वि.प.क्र. 2 ने आपल्या लेखी जवाबासोबत तक्रारकर्त्याच्या नोटीसला दिलेले उत्तर, नोटीस पाठविल्याबाबत पोच मिळण्यासाठी पोस्टाला लिहिलेले पत्र, तक्रारकर्त्याला विकलेल्या बियाण्याचे बिल, बियाण्याबाबत माहिती पत्रक इ. दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
4. उभय पक्षांच्या परस्पर विरोधी कथनावरुन मंचाचे विचारार्थ खालील मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) वि.प.ने सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार केला आहे काय ? होय.
2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय ? अंशतः.
3) आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
5. मुद्दा क्र. 1 बाबत – सदरच्या प्रकरणात तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 1 मे. पाटरु अॅग्री-बायोटेक (प्रा.) लिमि., बेगमपेठ, हैद्राबाद निर्मित ‘ओम साई’ धानाचे वजन 10 किलोच्या चार बॅग एकूण रु.2,560/- मध्ये वि.प.क्र. 2 हिमान्या कृषी केंद्र, अंतरगांव यांचेकडून दि.18.01.2015 रोजी विकत घेतल्याबाबत मुळ बिलाची प्रत दस्तऐवज यादीसोबत दस्तऐवज क्र. 1 वर दाखल केली आहे. तसेच सदर बियाण्यांपासून धानाचे पीक 120 ते 125 दिवसांत परिपक्व व कापण्यायोग्य होणार असल्याबाबतचे माहिती पत्रक दस्तऐवज क्र. 2 वर दाखल केले आहे. तक्रारकर्त्याने वरीलप्रमाणे बियाणे खरेदी केल्याचे वि.प.क्र. 2 ने आपल्या लेखी जवाबात कबुल केले आहे. तक्रारकर्त्याने सदरील बियाणे जानेवारी 2015 मध्ये खरेदी केले असल्याने ते वि.प.क्र. 2 ने उन्हाळी धान पीकासाठी विकल्याचे स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने वरीलप्रमाणे धानाचे बियाणे खरेदी केल्यानंतर आपल्या शेतात त्याची लावणी केली. मात्र माहितीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे सदर बियाण्यापासून तयार झालेले धानाचे पीक पूर्ण निसवून 120 ते 125 दिवसांत परिपक्व व कापणीयोग्य झाले नाही म्हणून तक्रारकर्त्याने कृषी विस्तार अधिकारी, पंचायत समिती लाखांदूर यांना तक्रार केली. परंतू त्यांनी काहीही कारवाई केली नाही म्हणून दि.04.06.2015 रोजी तालुका कृषी अधिकारी लाखांदूर यांचेकडे तक्रार केल्यानंतर तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीने दि.19.06.2015 रोजी तक्रारकर्त्याच्या शेतात येऊन धान पीकाची पाहणी केली आणि धान पीकाच्या स्थितीचा पंचनामा केला तसेच बियाणे सदोष असल्यामुळे मुदतीत धान पीक निसवले नाही आणि कापणीयोग्य झाले नाही त्यामुळे तक्रारकर्त्याचे नुकसान झाल्याचा अहवाल दिला.
वि.प.क्र. 1 व 2 यांनी विकलेल्या बियाण्यापासून तयार होणारे धान पीक 120 ते 125 दिवसांत कापणीयोग्य होईल अशी खात्री देऊन तक्रारकर्त्यास बियाण्याची विक्री केली. मात्र प्रत्यक्षात 150 ते 160 दिवसांचा कालावधी लोटूनही सदर बियाण्यांपासूनचे धान पीक परीपक्व झाले नाही हे दर्शविण्यासाठी तक्रारकर्त्याने दि.30.06.2015 रोजी धान पीकाचा काढलेला फोटो व बिल दस्तऐवज क्र. 4 व 5 वर दाखल केलेले आहेत. तसेच सेवा सहकारी सोसायटी खैरीपट यांचेकडून रु.15,000/- पीक कर्ज घेतल्याबाबतचा दाखला दस्तऐवज क्र. 6 वर सादर केला आहे, तालुका स्तरीय तक्रार समिती लाखांदूर तथा उपविभागीय कृषी अधिकारी साकोली यांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारी संबंधाने दि.16.06.2015 रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत दि.09.06.2015 रोजी दिलेल्या पत्राची प्रत दस्तऐवज क्र. 9 वर आणि दि.19.06.2015 रोजी तक्रारकर्त्याच्या पीकाच्या केलेल्या पाहणीचा अहवाल दस्तऐवज क्र. 10 वर दाखल केला आहे. तसेच तक्रारकर्त्याने त्याच्या मौजा खैरीपट, त.सा.क्र.27, ता. लाखांदूर येथील भुमापन क्र. 11, क्षेत्रफळ 0,67 हे. मध्ये विहिर पंपाचे ओलित करुन 2014-2015 च्या उन्हाळी हंगामात धान पीक घेतल्याबाबत 7/12 ची प्रत, तसेच गाव नमुना 8 ची प्रत दस्तऐवज क्र. 11, 12 व 13 वर दाखल केलेले आहेत.
तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीच्या दि.19.06.2015 च्या क्षेत्रिय भेटीचा अहवाल व पंचनामा यात तक्रारकर्त्याने मे. हिमान्या कृषी केंद्र, लाखांदूर यांचेकडून बिल क्र. 6 दि.18.01.2015 अन्वये मे. पाटुरु अॅग्रो प्रा. लि. निर्मित भाताचे बियाणे (ओम साई) लॉट नं. APR/2006 खरेदी केले त्याची पेरणी दि.20.01.2015 रोजी आणि पुर्नलागवड 20.02.2015 रोजी 0.80 हे. मध्ये केली असल्याचे नमूद आहे. पीक पाहणीचा निष्कर्ष खालीलप्रमाणे नमूद केला आहे.
- कंपनीच्या माहितीपत्रकानुसार ‘ओम साई’ यावाणाचा कापणीला येण्याचा कालावधी 120 ते 125 दिवसांचा आहे. परंतू शेतामध्ये या वाणाचा कालावधी 140 ते 150 दिवसांचा आढळून आला.
- सदर वाण हे उन्हाळी हंगामासाठी शिफारस केलेले दिसून आले नाही.
- शेतक-याकडून प्राप्त माहितीनुसार जानेवारी महिन्यात प-हे टाकलेले असून फेब्रुवारीमध्ये रोवणी झालेली आहे, त्यामध्ये खोडकीडीचा प्रादुर्भाव, रोवणीनंतर मुख्य भात शेतात पाण्याचा ताण व फुलोरा अवस्थेत उष्ण तापमानाचा परिणाम या कारणाने 10 ते 15 टक्के घट अपेक्षित आहे.
वि.प.क्र. 1 मे. पाटुरु अॅग्रो बायोटेक लिमि. यांना नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही आणि तक्रारकर्त्याने तक्रारीत केलेले कथन खोटे असल्याचे दाखवून दिले नाही. तक्रारकर्त्याने दि.03.06.2015 रोजी त्याच्या शेतातील उभ्या धान पीकाची स्थिती दर्शविणारा फोटो दाखल केलेला आहे. त्याचे अवलोकन केले असता 80 टक्केच्या वर धान पीकाचा निसवा झाला नसल्याचे दिसून येते. तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीने तक्रारकर्त्याच्या शेताची पाहणी 19.06.2015 रोजी केलेली आहे. त्यावेळी देखील पीक कापणीयोग्य झालेले नव्हते. एकंदरीत तक्रारकर्त्याने 18.01.2015 रोजी खरेदी केलेल्या बियाण्याचे प-हे 20.01.2015 रोजी टाकले आणि रोवणी 20.02.2015 रोजी केली असल्यामुळे 120 दिवसाचे पीक 20.05.2015 पर्यंत परिपक्व होऊन कापणीस तयार व्हावयास पाहिजे होते. परंतू ते 19.06.2015 पर्यंत म्हणजे 150 दिवसांपर्यंतदेखील कापणीस तयार झालेले नव्हते. पावसाची सुरुवात मे च्या शेवटच्या आठवड्यात (रोहिणी नक्षत्र) किंवा 7 जून (मृग नक्षत्र) होते, त्यामुळे शेतातील उन्हाळी धानाचे 120 ते 125 दिवसांचे पीक मे च्या तिस-या आठवडयापर्यंत कापून त्याची मळणी करणे आवश्यक असते. वि.प.क्र. 1 ने सदर धानाचे बियाणे हे उन्हाळी किंवा पावसाळी पीकासाठी असल्याचे स्पष्टपणे नमूद केले नाही. तक्रारकर्त्याने बियाणे 18.01.2015 रोजी खरेदी केले त्याअर्थी ते उन्हाळी पीकासाठीच खरेदी करीत असल्याची पूर्ण कल्पना वि.प.क्र. 2 ला होती आणि वि.प.क्र. 2 ने ते उन्हाळी पीकासाठी विकले होते. मात्र उन्हाळी पीकासाठी विकलेले बियाणे 120 ते 125 दिवसाचे आहे असे वि.प.क्र. 1 ने माहिती पत्रकात खोटे छापून व वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्त्यास बियाणे विक्रीचे वेळी खोटे सांगून बियाण्यांची विक्री केली. त्यामुळे दिलेल्या मुदतीत धानाचे पीक परिपक्व होऊन कापणी करता आली नाही आणि पावसाळी हंगाम सुरु झाल्याने अर्धवट निसवलेले धानाचे पीक कापणी न करता ट्रॅक्टरद्वारे मोडून टाकावे लागले. वि.प.ची सदरची कृती ही निश्चितच सेवेतील न्युनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे, त्यामुळे मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविला आहे.
6. मुद्दा क्र. 2 व 3 बाबत – वि.प.क्र. 1 ने निर्मित आणि वि.प.क्र. 2 ने विक्री केलेले बियाणे वि.प.क्र. 1 व 2 यांनी हमी दिल्याप्रमाणे 120 ते 125 दिवसांत परिपक्व होऊन कापणीसाठी तयार झाले नाही व 19 जून 2015 रोजी तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीने प्रत्यक्ष मौक्यावर पिक पाहणी केली तेव्हाही पूर्णपणे परिपक्व होऊन कापणीयोग्य झालेले नसल्याने व नविन पावसाळी हंगाम सुरु झाल्याने अपरिपक्व अवस्थेतील धान पिक शेतात ठेवणे शक्य नसल्याने तक्रारकर्त्यास ट्रॅक्टरद्वारे ते मोडून नष्ट करावे लागले. त्यामुळे उन्हाळी हंगामातील पूर्ण धानाच्या पिकाचे नुकसान झाले आहे.
तक्रारकर्त्याच्या अधिवक्त्यांनी आपल्या युक्तीवादात सांगितले की, तक्रारकर्त्याने 0.80 हे. जमिनीत सदर उन्हाळी धानाचे पिक लावले होते. योग्यवेळी संपूर्ण धान निसवून 120-125 दिवसांत पिक परिपक्व होऊन कापणी व मळणी झाली असती तर तक्रारकर्त्यास एकरी 20 क्विंटल म्हणले 2 एकरात 40 क्विंटल धानाचे पिक झाले असते. प्रति क्विंटल रु.1,500/- प्रमाणे धानाचा शासकिय हमी भाव गृहित धरुनही तक्रारकर्त्यास सदर पिकापासून रु.60,000/- उत्पन्न मिळाले असते. परे पेरण्यापासून धान कापणी व मळणीपर्यंतचा प्रती एकरी रु.15,000/- प्रमाणे 2 एकराचा खर्च रु.30,000/- वजा जाता तक्रारकर्त्यास निव्वळ रु.30,000/- उत्पन्न मिळाले असते. वि.प.क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास उन्हाळी पिकासाठी 120-125 दिवसांत निघणा-या पिकाचे सांगून त्या मुदतीत कापणीस तयार न होणारे सदोष बियाणे विकल्याने तक्रारकर्त्याचे रु.30,000/- चे निव्वळ नुकसान झाले. तक्रारकर्त्याने सदर नुकसान भरपाई मागणीसाठी वि.प. पाठविलेला नोटीस प्राप्त होऊनही वि.प.ने नुकसान भरपाई दिली नाही, म्हणून सदर नुकसान भरपाई द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह मिळावी, तसेच शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.20,000/- आणि तक्रार खर्च रु.5,000/- मिळणे न्याय्य होईल.
वरीलप्रमाणे वि.प.क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास विकलेले बियाणे सदोष असल्याने दिलेल्या 120-125 दिवसांच्या कालावधीत धानाचा निसवा होऊन पिक परिपक्व झाले नाही व त्यामुळे अपरिपक्व धान पिक पावसाळी हंगाम सुरु झाल्याने मोडावे लागल्याने तक्रारकर्त्याचे एकरी रु.15,000/- चे निव्वळ नुकसान झालेले आहे. तक्रारकतर्याने दाखल केलेल्या 7/12 वरुन त्याचे उन्हाळी धानाचे क्षेत्र भु.क्र. 11, क्षेत्रफळ 0.65 हे. आहे. त्या प्रमाणात सदर नुकसान भरपाई रु.24,375/- इतकी येते. तक्रारकर्त्याने वि.प.ला सदर नुकसान भरपाई मिळावी म्हणून दि.05.11.2015 रोजी नोंदणीकृत डाकेने पाठविलेली नोटीस मिळूनही वि.प.ने नुकसान भरपाई दिली नाही, म्हणून तक्रारकर्ता वरील नुकसानावर दि.05.11.2015 पासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याज मिळण्यास पात्र आहे. याशिवाय, शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.10,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.5,000/- मंजूर करणे न्यायोचित होईल, म्हणून मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यांत येत आहे.
- आ दे श -
तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालिल तक्रार वि.प.क्र. 1 व 2 विरुध्द संयुक्त व वैयक्तीकरीत्या खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्यांत येते.
1) वि. प. क्र. 1 व 2 यांनी संयुक्त व वैयक्तीकरीत्या तक्रारकर्त्यास पिकाच्या नुकसान भरपाईची रक्कम रु.24,375/- दि.05.11.2015 पासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह अदा करावी. 2) वि.प.नी तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसिक त्रासाबाबत रु.10,000/- द्यावेत. 3) वि.प.ने तक्रारकर्त्यास तक्रारीचा खर्च रु.5,000/- द्यावा. 4) वि.प.क्र. 1 व 2 यांनी संयुक्त व वैयक्तीकरीत्या सदर आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आत करावी. 5) तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यास परत करावी.
6) आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरवावी.