तक्रारदार : स्वतः हजर.
सामनेवाले : गैरहजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर, सदस्या, ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालील प्रमाणे आहे.
2. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांनी त्यांच्या लग्नाच्या स्वागत समारंभासाठी सा.वाले यांचेकडून GIVO SUIT रु.6000/- मोबदला देवून खरेदी केला.
3. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार खरेदी केलेला सुट(पोशाख)हा परीधान करताना फाटला. तो निकृष्ट दर्जाचा होता.
4. सा.वाले यांनी तक्रारदारांना ब्रॅन्डेड प्रतीचा सुट दिला असे सांगून त्याबद्दल संपूर्णपणे खात्री देवून तक्रारदारांची दिशाभूल केली. म्हणून सा.वाले यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
5. तक्रारदारांनी सदर सुट सा.वाले यांना त्यांचेकडे परत करुन दुस-या सुटची मागणी किंवा सुटचे पैसे परत करावे अशी मागणी केली असता सा.वाले यांनी तो परत घेण्यास नकार दिला. म्हणून तक्रारदार यांनी सा.वाले यांना इंटरनॅशनल कंझुमर राईट प्रोटेक्टशन यांचे तर्फे नोटीस बजावली व सदर सुट परत घेवून रु.6000/-, 7 दिवसाचे आत परत करण्याची मागणी केली.
6. परंतु सा.वाले यांनी सुटची किंमत परत केली नाही. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतचा तकार अर्ज दाखल करुन रु.6000/-,सुटची किंमत व नुकसान भरपाई म्हणून 30,000/-, व तक्रार अर्ज खर्च रु.3000/-, असे एकूण रु.39,000/- 18 टक्के व्याज दराने व्याजासह द्यावेत अशी मागणी केली आहे.
7. तक्रार अर्ज शपथपत्र व अनुषंगीक कागदपत्रासह दाखल केले आहेत. तक्रारदारांनी सुट पैकी पॅन्ट मंचात जमा केला आहे.
8. सा.वाले यांनी हजर राहून तक्रार अर्जास उत्तर द्यावे अशी मंचाकडून नोटीस पाठविण्यात आली. नोटीसीस अनुसरुन सा.वाले हजर झाले. व त्यांनी आपली अप्रमाणीत कैफीयत दाखल केली.
9. सा.वाले यांचे म्हणण्यानुसार तक्रारदारांनी खरेदी केलेला सुट हा सवलतीच्या दराखाली खरेदी केला होता. व सदर सुट तक्रारदारांच्या फीटींगचा नव्हता. तो त्यांना घट्ट होत होता. परंतु तक्रारदारांनी तोच सुट घेण्याचा आग्रह धरला व तो त्यांनी अर्ल्टर करुन घेतला. तक्रारदारांच्या सुचने नुसार सा.वाले यांनी तो अर्ल्टर करुन दिला. सा.वाले यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांनी तो सदर सुट वापरला. तो खराब अवस्थेत सा.वाले यांना 24 दिवसांनी परत केला. व पैसे परत करण्याची मागणी केली. तक्रारदारांनी सदर सुट खराब अवस्थेत आणल्यामुळे सा.वाले यांनी तो परत घेण्यास व पैसे परत करण्यास नकार दिला.
10. तक्रार अर्ज, शपथपत्र, व त्या सोबत जोडण्यात आलेली अनुषंगीक कागदपत्रांचे व कैफीयत यांची पडताळणी करुन पाहीले असता तक्रार निकालासाठी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रारदार सा.वाले यांच्या सेवेतील कमतरता सिध्द करतात काय ? | नाही. |
2 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून तक्रार अर्जात नमुद केलेल्या मागण्या मागण्यास पात्र आहेत काय ? | नाही. |
3. | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
11. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून रु.6000/-, मोबदला देवून GIVO SUIT खरेदी केला. त्या बाबतची पावती तक्रार अर्जात पृष्ट क्र.7 वर दाखल केली आहे.
12. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार सदर सुट परीधान करतांना तो फाटला.
13. तक्रारदारांनी सदर सुट फाटल्यामुळे सा.वाले यांचेकडून पैसे परतीची मागणी केली असता सा.वाले यांनी पैसे परत देण्यास नकार दिला. म्हणून प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल केले. सा.वाले यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांनी तो सुट 24 दिवसांनी आणून दिला. तसेच सुट हा तक्रारदारांच्या फीटींगचा नव्हता. तो अल्टर केला होता. तो वापरून खराब स्थितीत परत आणल्याने सा.वाले यांनी सुट परत घेण्यास नकार दिला.
14. तक्रारदारांनी सदर सुट ग्राहक मंचासमोर जमा केलेला आहे. जमेबाबतचे शपथपत्र अभिलेखात दाखल आहे.
15. तक्रारदारांनी तक्रार अर्जात GIVO SUIT असे म्हटले आहे. परंतू सुट पैकी फक्त पॅन्टच जमा केलेली आहे. परीधान करतांना सुटमधील कोट फाटले का? पॅन्ट फाटले किंवा जॉकीट फाटले याबद्दल विशेष करून काही खुलासा केला नाही. तक्रारदारांनी जमा केलेल्या पॅन्टची संपूर्ण पाहणी केली असता प्रस्तुत मंचास असे निर्दशनास आले की, पॅन्ट कुठेही फाटलेले नाही. ते संपूर्णपणे चांगल्या स्थितीत आहे यावरून तक्रारदारांनी सा.वाले यांचे विरूध्द खोटी तक्रार दाखल केली हे स्पष्ट होते.खोटी तक्रार दाखल करून सा.वाले यांचेकडुन पैसे उकळण्याचा तक्रारदारांचा उद्देश स्पष्ट होतो.
16. वरील परिस्थितीत खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 682/2009 रद्द करण्यात येते.
2. खर्चाबद्दल आदेश नाही.
3. तक्रारदारांनी मंचात जमा केलेली पॅन्ट आदेशाची प्रत मिळाल्यापासून 3 महिण्याच्या आत परत घेऊन जावे. तक्रारदारांनी जर विहित कालावधीत पॅन्टचा ताबा घेतला नाही तर प्रबंधकाने ते नष्ट करावेत.
4. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात.