ग्राहक तक्रार क्र. 97/2014
अर्ज दाखल तारीख : 09/06/2014
अर्ज निकाल तारीख: 12/05/2015
कालावधी: 0 वर्षे 11 महिने 04 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) दिपककुमार पि. धन्यकुमार गंभीर,
वय - 40 वर्ष, धंदा – शेती,
रा. कारी, ता.बार्शी, जि. सोलापूर. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) व्यवस्थापकीय संचालक,
महिन्द्रा टु व्हीलर्स लि.,
दिवान ब्लॉक, प्लॉट क्र. 18/2 ( भाग)
एम.आय.डी.सी. चिंचवड पुणे – 411019.
2) व्यवस्थापक,
सुमा अॅटो,
वीटराग वरटेक्स, डफरीन चौकाजवळ,
रेल्वेलाईन, सोलापूर-413001.
3) व्यवस्थापक,
महिंन्द्रा टु व्हीलर्स लि.,
सुमा अॅटो, बार्शी नाका,
उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.आर.एस.मुंढे.
विरुध्द पक्षकारा क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री. ए.एस. गायकवाड.
विरुध्द पक्षकारा क्र.2 व 3 तर्फ विधीज्ञ : श्री. एस.व्ही. नन्नावरे.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्री.मुकुंद बी.सस्ते यांचे व्दारा :
अ) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
1) तक्रारदार यांनी विप क्र.3 यांचेकडून दि.23/04/2013 रोजी विप क्र.1 यांचे कंपनीची महिन्द्रा पॅन्टेरो’’ या मॉडेलची मोटरसायकल ज्याचा फ्रेम / चेसीस क्र.MCDKM1B 14D2B00127 व इंजिन क्र.VNE-DB005478 कलर काळा / नारंगी ही मोटर सायकल विकत घेतली. सदरची मोटरसायकल विकत घेतल्यानंतर सुरवातीपासूनच चालू होत नव्हती, त्यामुळे तक्रारदार यांनी विप क्र.3 यांचेकडे वारंवार जाऊन गाडी चालू होत नसलेबाबतची तक्रार केली. सदर वाहन विप ने दि.11/07/2013 रोजी दुरुस्तीसाठी ताब्यात घेतले परंतू उत्पादानातील दोष असल्याचे सांगितले व विप क्र. 2 कडे दुरुस्ती करीता आठ दिवस ठेऊन घेतली व तात्पूरत्या स्वरुपात दुरुस्त करुन दिल्याचे सांगितले व विप क्र.1 यांचेकडून उत्तर आल्यानंतर दुरुस्त करुन देऊ असे सांगितले मात्र विचारणा केल्यावर त्याकडे दुर्लक्ष केले. तसेच सदर वाहनाचा 79 कि.मी. प्रती लिटर अॅव्हरेज असे सांगितले असतांना केवळ 30 कि.मी. अॅव्हरेज मिळत होता त्यामुळे तक्रारदारास आर्थिक त्रास सहन करावा लागला तसेच मोटर सायकल एका जागी बंद अवस्थेत असल्याने एम.आय.डी.सी. उस्मानाबाद येथील कामास व त्याव्दारे मिळणारे उत्पन्नास मुकावे लागले. म्हणून विप क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक किंवा संयक्तिकरित्या तक्रारदार यांची पुर्वीची महिन्द्रा अॅन्ड महिन्द्रा कंपनीची ‘’महिन्द्रा पॅन्टेरो’’ या मॉडेलची मोटारसायकल परत घेऊन त्याच मॉडेलची विनादोष मोटरसायकल देणेबाबत आदेश व्हावा, झालेल्या आर्थिक व मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- देण्याचा हुकूम व्हावा व तक्रारीचा खर्च रक्कम रु.5,000/- देणेचा हुकूम व्हावा अशी विनंती केली आहे.
ब) 1) सदर प्रकरणात विप क्र.1 यांना नोटीस पाठविले असता त्यांनी आपले म्हणणे दि.04/09/2014 रोजी दाखल केले ते खालीलप्रमाणे
2) तक्रारदार यांची तक्रार अमान्य आहे. तक्रारदार यांनी स्वत: वाहन पाहून, तपासून घेऊन त्याच्य वैशिष्टयांबद्दल खात्री करुन व टेस्ट डाईव्ह (गाडी चालवून) घेऊन स्वत:च्या मर्जीनुसार तक्रारदाराने सदर वाहन खरेदी केले. सदर वाहन खरेदी केल्यानंतर आमचे कंपनीचे सेन्ट्रो नांवाचे नविन दुचाकी वाहन बाजारात अणले गेले. सदर वाहन तक्रारदारास आवडले व त्यांनी विप स त्याने खरेदी केलेल्या वाहनाच्या बदल्यात नवीन सेन्ट्रो नांवाच्या दुचाकी वाहनाची मागणी केली व सदर बेकायदेशीर मागणी विप क्र.2 व 3 हे पुर्ण करु शकले नाहीत कारण तक्रारदाराने खरेदी केलेले वाहन पुरेपुर प्रमाणात वापरले गेले होते म्हणून हेतूपूरस्सर ही तक्रार दाखल केली. वाहन वापरतांना ‘’ओनर्स गाईड’’ नांवाचे पुस्तकातील नियमाचे पालन न करता गाडीचा वापर केला. फ्रि सर्व्हीसिंगचे एकूण सहा कूपन दिले होते नियमाप्रमाणे त्यांचा वापर करण्यात आलेला नाही तसेच सदर वाहन 20,000/- कि.मी. चालले आहे. दि.20/05/2014 रोजी तक्रारदारास विप क्र.2 व 3 यांनी सदर वाहनाचा 70 किमी. प्रती लिटरचा मायलेज तक्रारदारास काढून दिलेले आहे. त्याची नोंद जॉब कार्डवर केलेली आहे व त्यावर तक्रारदाराची सही सुध्दा आहे. सदर वेळी वाहन 17438 की.मी. चालवले गेले होते. जर वाहनात ऐवढा दोष असता तर वाहन एवढे चालविले गेले नसते. तक्रारदार हा स्वच्छ हाताने मा. मंचात समोर आलेला नाही. तक्रारदाराने कोणत्याही शासकीय तज्ञांचा अहवाल अथवा दोष असल्याबाबतचे प्रमाणपत्र दाखल केलेले नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार हेतूपुरस्सर मानसिक त्रास दिल्याबद्दल तक्रारदारास दंड करुन त्याचा तक्रारी अर्ज फेटाळण्यात यावा असे नमूद केले आहे.
क) 1) सदर प्रकरणात विप क्र.2 व 3 यांना नोटीस पाठविले असता त्यांनी एकत्रीतरित्या आपले म्हणणे दि.03/12/2014 रोजी दाखल केले ते खालीलप्रमाणे..
2) तक्रारदाराने सदरचे वाहन स्वत:च्या पसंतीनुसार निवडले होते. तक्रारदाराने वाहनाच्या सर्व्हीसींग व घ्यावयाची काळजीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. विप ने सदर वाहनाची दुरुस्ती वेळोवेळी करुन दिलेली आहे तसेच मायलेजही काढून दिलेले आहे. तक्रारदाराकडे मनूष्यबळ असून त्या जोरावर विप क्र. 2 व 3 यांचे कार्यालयासमोर येऊन सतत वेडी वाकडी भाषा करीत आहे. तक्रारदारास जुन्या वाहनाच्या बदल्यात सेन्ट्रो नवीन दुचाकी वाहन पाहिजे असल्याने सदरची तक्रार दाखल केली असून नामंजूर व्हावी असे नमूद केले आहे.
ड) तक्रारदाराची तक्रार त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, विप यांचे म्हणणे त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे व उभयतांचा युक्तिवाद यांचा विचार केला असता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्या समोर खालील कारणांसाठी लिहली आहेत.
मुद्दे उत्तरे
1) तक्रारदार हा विप चा ग्राहक आहे काय ? होय.
2) विप ने तक्रारदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? नाही.
3) तक्रारदार अनुतोषास पात्र आहे काय ? नाही.
4) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
इ) कारणमीमांसा.
1) तक्रारदाराने विप कडून मोटारसायकल विकत घेतली ही बाब विप ने अमान्य केली नाही तथापि ही मोटारसायकल सोलापूर येथील एजन्सीकडून घेतलेली दिसते. जॉब कार्डावरील पत्ता सोलापूर येथील आहे त्याचबरोबर एक शपथपत्र उस्मानाबाद येथील मेकॅनिकचे आहे त्यामुळे कलम 11 (सी) नुसार विप हे कार्यक्षेत्राबाहेरील असलेली अंशत: वादोप्तीचे कारण हे विप उस्मानाबाद येथील वर्कशॉपमध्ये भरले आहे. त्यासाठी या न्यामंचास हे कार्यक्षेत्र आहे तसेच विप चा तक्रादार हा ग्राहक आहे. म्हणून मुद्दा क्र.1 चे उत्तर होय असे आहे.
2) उत्पादनातील दोष हा सिध्द करण्याची जाबादारी ही तक्रारकर्त्यावर आहे / असते व तो ती मंचामार्फत एखाद्या तज्ञ व्यक्तिची / संस्थेची नेमणूक करुन कलम 13/ सी नुसार दोष निचिती करुन शकतो. प्रस्तुत प्रकरणात तक्रारदाराची मुख्य तक्रार ही अॅव्हरेजबाबत असून इतर अनूषंगीक किरकोळ तक्रारीबाबत आहे. याबाबत या न्यामंचातील एक सदस्य म्हणून त्याच सोबत यांत्रिकी अभियांत्रिकी पदविका या पुर्वीच्या स्वत:च्या तांत्रीक शिक्षणाच्या मदतीने मी जॉब कार्डचे वाचन तसेच मेकॅनिकडून अॅव्हरेज काढण्याच्या पध्दतीची शास्त्रशुध्दता तपासून व त्याचे अॅफीडेव्हिट याचा तांत्रीक अंगाने विचार केला असता तक्रारदाराची तक्रार ही तांत्रीक मुद्दयावर यशस्वी होऊ शकत नाही. कारबुरेटर जे इंजिनला फयूअल व ऐअर चा मिक्टरचा पुरवठा करते ते पुर्णपणे रिकामे करुन त्यात 100 एम. एल. पेट्रोल टाकून 7 की.मी. चा प्रवास पेट्रोल संपूर्ण संपेपर्यंत केला व त्याव्दारे 70 की.मी./ ली. अॅव्हरेज भरले हे मेकॅनिकचे म्हणणे बरोबर आहे. अर्थात पेट्रोल नसतांना व फेरीमारतांना तक्रादारा बरोबर होता हे त्यांचे म्हणणे तक ने अमान्य केलले नसल्याने पेट्रोलची कॉन्टीटी व की. मी. हे बरोबरच आहे हे म्हणण्याशिवाय पर्याय नाही. जॅाब्कार्ड मधील ट्रान्समीशन सिष्टममधील इतर दोष जसे की क्लच प्लेट, क्लच वायर हे सर्व सामान्य व नियमीत दोष आहेत व ते सदोष वापरामुळे किंवा प्रदीर्घ वापरामुळे सुध्दा खराब होतच असतात त्याचा उत्पादनातील दोषाशी काहीही संदर्भ नाही.
3) विप ने वाहन आवडले नसल्याने दुस-या वाहनाची मागणी तक करत असल्याने व ती पुर्ण न केल्याने ही तक्रार दिली आहे हे म्हणणे चुकीचे आहे कारण तक्रारीतही तक चे म्हणणे त्याच मॉडेलचे दुसरे वाहन दयावे अशी मागणी आहे.
4) तक ने ही अक्षय मेटल मध्ये वाहनाच्या सहाय्याने कामावर जात हाता व आता वाहन बंद असल्याने बसून आहे हे म्हणजे हास्यास्पद आहे व नौकरीसाठी कामावर पोहचणे ही व्यक्तिची व्यक्तिश: जबाबदारी आहे ती वाहनाची जबाबदारी नाही त्या वाहनाव्यतीरिक्त अनेक पर्याय उपलब्ध असतात / असू शकतात / तथापि त्यासाठी नुकसान भरपाई तक ला मागता येणार नाही.
5) तक्रारदाराने स्वच्छ हाताने ही तक्रार दाखल केलली नाही हे विप चे म्हणणे सत्य आहे. तक्रारदाराने जवळपास 25,000 की.मी. गाडी चालवली आहे हे जॉब कार्डवर नमूद आहे. मोटारसायकल चे की.मी. हे जास्त आहेत तसेच सर्व्हींसींग शेडयूलचेही पालन करतांना टाळाटाळ केलेली आहे. मेन्टनंन्समध्ये 1) ब्रेकडाऊन मेन्टनंन्स व 2) प्रिव्हेंटीव्ह मेंन्टनंन्स असे दोन प्रकार असतात त्यामध्ये सव्हीसींग शेडयूल हे प्रिव्हेन्टीव्ह मेन्टनंन्स प्रकारात मोडते ज्यायोगे वाहन हे सुस्थितीत राहते व कार्यक्षमता वाढते व ब्रेकडाऊन मेन्टनंन्स मध्ये बिघडल्यावर दुरुस्ती असते याचा अर्थ देखाभाल उत्तम असेल तर दुरस्तीची वेळ विनाकारण येऊ शकत नाही किंवा उत्पादनातील दोष असेल तरच देखभाल करुनही दुरुस्तीची वेळ येते तथापि देखाभालीबाबत तक हा निष्काळजी दिसुन येतो म्हणून उत्पादनातील दोषबाबत हे मंच नकारात्मक मत देत आहे.
6) म्हणून विप ने तक च्या सेवेत कोणत्याही प्रकारची त्रुटी केली नसून No one can take benefit for his own wrong या उक्ती प्रमाणे स्वत:च्या निष्काळजीपणाचा फायदा स्वत: घेता येणार नाही तसेच वाहनाचे अॅव्हरेजही तक ला समाधानाकरीता विप ने योग्यरित्या काढून दिले असल्याने तक ची तक्रार ही नामंजूर करण्यात येते.
आदेश
1) तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
3) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.