रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
तक्रार क्रमांक 52/2014
तक्रार दाखल दि. 29/03/2014
न्यायनिर्णय दि- 10/03/2015
श्री. अजय कुमार एस.
रा. बी – 28, वर्षा, न्यू मंडला,
अणुशक्ती नगर, मुंबई 400094. ...... तक्रारदार
विरुध्द
मॅनेजिंग डायरेक्टर,
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्युशन कं. लि.,
कळंबोली सब स्टेशन, रायगड जिल्हा, ...... सामनेवाले
समक्ष - मा. अध्यक्ष, श्री. उमेश वि. जावळीकर,.
मा. सदस्या, श्रीम. उल्का अं. पावसकर,
मा. सदस्य, श्री. रमेशबाबू बी. सिलीवेरी,
उपस्थिती – तक्रारदार स्वत:
सामनेवाले तर्फे ॲड अजिथ नायर
न्यायनिर्णय
द्वारा- मा. सदस्या, श्रीम. उल्का अं. पावसकर,
1. सामनेवाले यांनी कराराप्रमाणे तक्रारदार यांना सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याने तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून घरगुती विद्युत पुरवठ्याची सेवा सुविधा घेतली होती. तक्रारदारांचा विद्युत मीटर क्र. GGN 201211356914421 चे माहे नोव्हेंबर 2012 चे 197 युनिटचे विद्युत देयक रु. 980/- तक्रारदारांना देण्यात आले. त्यानंतर माहे डिसेंबर 2012 चे 100 युनिटचे विद्युत देयक रु. 499/- व माहे जानेवारी 2013 चे 100 युनिटचे विद्युत देयक रु. 475/- तक्रारदारांना देण्यात आले. तक्रारदारांची सदनिका माहे जानेवारी 2013 पर्यंत विनावापर होती. त्यामुळे माहे जानेवारी पर्यंतची वीज आकारणी सामनेवाले यांनी करणे न्यायोचित नाही. तक्रारदारांनी दि. 14/01/13 रोजी सदनिका भाडेतत्वावर दिली होती. त्यानंतर दि. 15/02/13 रोजी सामनेवाले यांनी तक्रारदारांचा विज पुरवठा खंडीत केला. त्यामुळे सामनेवाले यांनी विज पुरवठा सुरु करण्यासाठी तक्रारदारांस रक्कम रु. 1960/- भरावयास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदाराने दि. 16/02/13 रोजी सदर रक्कम अदा केली व विज पुरवठा सुरु करुन घेतला. त्यानंतर तक्रारदारांनी सदनिकेचा वापर नसल्यामुळे व वीज वापरही झालेला नसल्याने सामनेवाले यांनी मागणी केल्याप्रमाणे अदा केलेली अतिरिक्त रक्कम रु. 1,960/-, वीज पुरवठा सुरु करण्यासाठी स्विकारलेले रु. 100/- तसेच तक्रार खर्च व नुकसानभरपाईची रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदारांस व्याजासहीत अदा करावी अशी विनंती तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रारीत केलेली आहे.
3. तक्रारदारांची तक्रार दाखल झाल्यानंतर मंचाने सामनेवाले यांना लेखी जबाब दाखल करण्यासाठी नोटीस पाठविली. मंचाचीनोटीस प्राप्त झाल्यावर सामनेवाले यांनी मंचासमक्ष हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला. सामनेवाले यांनी जबाबात तक्रारीमधील मुद्दयांचे खंडन करुन तक्रारदारांचा वीज मीटर बंद अवस्थेत असल्याने माहे डिसेंबर 2012 व जानेवारी 2013 मध्ये सरासरी 100 युनिटचे वीज देयक अदा करण्यात आले. सदर देयक तक्रारदारांनी थकबाकीसह अदा न केल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे तक्रारदारांनी विज देयक अदा केले व वीज पुरवठा सुरु करुन घेतला आहे. तक्रारदारांचे वीज मीटर बंद अवस्थेत असल्याने सामनेवाले यांचया प्रचलित नियमानुसार सरासरी 100 युनिटचे विज देयक तक्रारदारांस अदा करण्यात आले. सदर देयक तक्रारदारांनी भरणा केलेले असल्याने त्याबाबत कोणताही वाद तक्रारदारांस उपस्थित करता येणार नाही. तक्रारदारांनी माहे एप्रिल 2013 पासून दिलेले विज देयक भरणा केलेले आहे. त्याबाबत तक्रारदारांचा कोणताही आक्षेप नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार खर्चासह अमान्य करण्यात यावी अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.
4. तक्रारदारांची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले यांचा लेखी जबाब, तक्रारदारांचे व सामनेवाले यांचे पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व उभयपक्षांची वादकथने यावरुन तक्रार निकालकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दा क्रमांक 1 - सामनेवाले यांनी तक्रारदारांस कराराप्रमाणे सेवा सुविधा
पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारदार सिध्द करतात काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 2 - सामनेवाले तक्रारदारांस नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 3 - आदेश ॽ
उत्तर - तक्रार अंशतः मान्य.
कारणमीमांसा-
5. मुद्दा क्रमांक 1- सामनेवाले यांनी तक्रारदारांस माहे डिसेंबर 2012 व जानेवारी 2013 या महिन्यांचे विज देयक वीज मीटर बंद असल्याने विनावापरा व्यतिरिक्त अदा केल्याची बाब कबूल केली आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारांस सरासरी 100 युनिटचे वीज देयक कोणत्या नियमानुसार व परिस्थीतीत अदा केले होते, याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा मंचात दाखल केलेला नाही. तसेच तक्रारदारांनी अनेकवेळा सामनेवाले कडे चौकशी करुन देखील सामनेवाले यांनी त्याबाबत कोणताही प्रतिसाद दिला नाही. सामनेवाले यांनी तक्रारदारांस सेवासुविधा पुरविलेले वीज मीटरला, मीटर वाचन ठिकाण नव्हते. ही बाब सामनेवाले यांनी दि. 07/03/13 रोजी तक्रारदारांना लिहिलेल्या पत्र दि. 7/3/11 रोजीच्या पत्रात नमूद आहे. त्यावरुन सामनेवाले यांनी वापराप्रमाणे बिल देण्यात यावे असा शेरा नोंदवून तक्रारदारांचे विज मीटर बदलून दिले. एकंदरीत सामनेवाले यांनी तक्रारदारांचे विज मीटर बंद अवस्थेत असल्यानेच नवीन बसवून देण्यात आले ही बाब कबूल केली आहे. कागदोपत्री पुराव्यावरुन सामनेवाले यांनी बंद अवस्थेत असलेल्या विज मीटरचे विज देयक सरासरी पध्दतीने आकारुन तक्रारदारांस सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब सिध्द होते. सबब, सामनेवाले यांनी तक्रारदारांकडून विना विज वापर कालावधीची रक्कम वसूल केल्याने सदर रक्कम सामनेवाले तक्रारदारास परत करण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्रमांक 1 चेउत्तर होकारार्थी देण्यात येते.
6. मुद्दा क्रमांक 2 सामनेवाले यांनी तक्रारदारास विना विज वापर कालावधीसाठी सरासरी पध्दतीने विज आकारणी करुन सदर रक्कम जमा करुन घेऊन तक्रारदारांचे आर्थिक नुकसान होईल अशी कृती केल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. सामनेवाले यांनी तक्रारदारांची विज आकारणी अयोग्य पध्दतीने केल्याने तक्रारदारांचे आर्थिक नुकसान झाल्याची बाब सिध्द होते. सबब, सामनेवाले तक्रारदारांस नुकसान भरपाई देण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्रमांक 2 चेउत्तर होकारार्थी देण्यात येते.
7. उपरोक्त निष्कर्षावरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
-: अंतिम आदेश :-
1. तक्रार क्र. 52/2014 अंशत: मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांस कराराप्रमाणे सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी कराराप्रमाणे तक्रारदार यांना अतिरिक्त विज देयक शुल्क व विज जोउणी शुल्कापोटी स्विकारलेली एकत्रित रक्कम रु. 2,060/- (रु. दोन हजार साठ मात्र) या आदेशप्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत अदा करावी.
4. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्च, मानसिक व शारिरिक त्रासापोटी एकत्रित रक्कम रू. 50,000/- (रु.पन्नास हजार मात्र) या आदेशप्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत अदा करावेत.
5. न्याय निर्णयाच्या सत्यप्रती उभयपक्षांना तात्काळ पाठविण्यात याव्यात.
ठिकाण- रायगड - अलिबाग.
दिनांक – 10/03/2015.
(रमेशबाबू बी. सिलीवेरी) (उल्का अं. पावसकर) (उमेश वि. जावळीकर)
सदस्य सदस्या अध्यक्ष
रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.