न्यायनिर्णय
सदरचा न्यायनिर्णय मा.सौ. सविता भोसले, अध्यक्षा यांनी पारित केला
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे मिरज, जि.सांगली येथील कायमस्वरुपी रहिवासी आहेत तर जाबदार क्र.1 हे हिरोहोंडा एक्स्पोर्टस या कंपनीचे उत्पादक असून जाबदार क्र.2 हे या जाबदार क्र. 1 चे डिस्ट्रिब्यूटर आहेत, तसेच जाबदार क्र.3 हे सदर कंपनीचे वतीने सर्व्हीस देणेचे काम करतात.
यातील तक्रारदारानी जाबदारांकडून दि.22-8-2008 रोजी हिरो अॅल्टस मॅक्स या कंपनीचे वाहन खरेदी केले, त्याचा चेसीस क्र. H-0770-4891 चार्जर क्र. 0707002471, मोटर क्र.07070418, कंट्रोलर क्र. 707001124, बॅटरी क्र. 34751-34754 असे आहेत. सदरचे वाहन हे जाबदार क्र.1 ने उत्पादित केले असून जाबदार क्र.2 हे ग्राहकांना सदर वाहनाची विक्री करतात आणि त्याची संपूर्ण जबाबदारी वॉरंटी गॅरंटी ही जाबदार क्र.2 स्विकारतात. तक्रारदारानी जाबदाराकडून रक्कम रु.28,500/- या रकमेस सदरचे वाहन खरेदी केले व दि.22-8-2008 रोजी जाबदार क्र.2 याचेकडून सदर वाहन खरेदी केले तेव्हापासून तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत. प्रस्तुत वाहन खरेदी केलेनंतर आठच दिवसात वाहनाच्या चाकाचा आवाज येऊ लागला व प्रस्तुत चाक जाम होऊन फिरणेचे बंद झाले त्यामुळे गाडी रेज करुनही वेगाने पळत नव्हती आणि त्या त्या ठिकाणी अचानक थांबत होती. त्यामुळे तक्रारदारांनी जाबदारांकडे तक्रार केली, त्यानंतर जाबदाराने सदर वाहनात जुजबी स्वरुपाचे रिपेअरिंग करुन दिले आणि पहिल्या सर्व्हीसिंगच्या वेळेस सदर गाडीची दुरुस्ती करुन देतो किंवा चाक बदलून देतो असे जाबदार क्र.2 यांनी तक्रारदाराना सांगितले, परंतु जाबदाराने पहिले सर्व्हीसिंग करुन देताना चाकातील दोष काढला नाही, त्यामुळे तक्रारदाराने कसेबसे महिनाभर सदर वाहन चालवले, परंतु मागील चाकातील दोष काढला नाही त्यामुळे तक्रारदाराने कसेबसे महिनाभर सदरचे वाहन चालवले, परंतु मागील चाकातील दोष दूर झाला नाही. त्यानंतर दोन ते तीन महिने तक्रारदाराने कसे तरी सदर वाहन चालवले परंतु जाबदारांना दाखवले त्यावेळी जाबदार क्र. 2 ने कंपनीचे मेकॅनिक येणार म्हणून प्रस्तुत गाडी जाबदार क्र.2 कडे ठेवून घेतली परंतु तक्रारदारास दिड महिना गाडी ठेवून घेऊन हेलपाटे मारणेस भाग पाडले, त्यानंतर मात्र जाबदार क्र.2 ने भागीदारी फर्म विभक्त झाल्या आहेत असे सांगून श्री.गजानन पाटील, जाबदार क्र.3 यांचेकडे सदर वाहन सोडणेस सांगितले व प्रस्तुत वाहनातील सर्व दोष जाबदार क्र.3 हे काढून देतील असे सांगितले. त्यामुळे जाबदार क्र.2 यांचे सांगणेवरुन मार्च 2009 मध्ये सदर वाहन जाबदार क्र.3 कडे सोडले आणि तेव्हापासून तक्रारदार हे जाबदार क्र.2 व 3 कडे वाहन सुस्थितीत दुरुस्त होऊन मिळणेसाठी हेलपाटे मारत आहेत, परंतु जाबदार हे नुसती चालढकल करीत आहेत, त्यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे तक्रारदाराने दि.30-5-2009 रोजी वकीलांमार्फत तक्रारदारास नोटीस पाठवली व सदर वाहन दुरुस्त करुन देणेबाबत कळवले, परंतु जाबदाराने नोटीस मिळूनही प्रस्तुत वाहन दुरुस्त करुन दिले नाही, त्यामुळे तक्रारदाराने जाबदाराविरुध्द अर्ज क्र.2110/2009 चे काम दाखल केले होते. सदर काम दाखल केलेनंतर जाबदाराने तक्रारदारास नवीन गाडी देतो असे सांगून सदरचा अर्ज निकाली काढला. तक्रारदाराने दि.2-4-2013 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवून नवीन गाडी दया किंवा रक्कम रु.28,500/- परत दया अशी नोटीस जाबदाराला पाठवली, परंतु नोटीस मिळूनही जाबदाराने प्रस्तुत रक्कम किंवा नवीन गाडी तक्रारदारास दिली नाही किंवा नोटीसीला उत्तरही दिले नाही, त्यामुळे तक्रारदाराने प्रस्तुत जाबदाराकडून नवीन गाडी किंवा गाडीची रक्कम परत मिळावी म्हणून सदर तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदारानी सदर कामी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.4 चे कागदयादीसोबत नि.4/1 ते 4/13 कडे अनुक्रमे तक्रारदारानी जाबदाराकडे पैसे जमा केलेची पावती, जाबदाराकडील डिलीव्हरी चलन, तक्रारदाराने जाबदाराकडे रक्कम जमा केलेची पावती, हिरो इलेक्ट्रीकची सर्व्हीस बुक झेरॉक्स प्रत, जाबदाराला पाठवलेल्या नोटीसची मूळ प्रत, जाबदार क्र.1 ला नोटीस मिळालेची पोहोचपावती, जाबदार क्र.2 लानोटीस मिळालेची पोहोच पावती, जाबदार क्र.3 ने नोटीस न स्विकारलेमुळे परत आलेला लखोटा, तक्रारदाराने जाबदाराला वकीलातर्फे पाठवलेली नोटीस, तक्रारदाराने जाबदार क्र.1 ते 3 याना पाठवलेल्या नोटीसची पोहोचपावती, जाबदार क्र.2 ला पाठवलेल्या नोटीसचा लखोटा, जाबदार क्र.2 ला पाठवलेल्या नोटीसचा परत आलेला लखोटा, नि.12 कडे प्रस्तुत नि.1 सोबत दाखल केलेले प्रतिज्ञापत्र हेच पुराव्याचे प्रतिज्ञापत्र समजणेत यावे म्हणून तक्रारदारानी दिलेली पुरसीस, नि.13 कडे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र, नि.14 कडे पुरावा संपलेची पुरसीस वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने सदर कामी दाखल केली आहेत.
3. तक्रादाराने सदर कामी जाबदार क्र.1 ते 3 यांचेकडून तक्रारदाराची तक्रारअर्जात नमूद वर्णनाच्या गाडीच्या बदल्यात त्याच मॉडेलची नवीन गाडी तक्रारदारास मिळावी किंवा सदर गाडीची किंमत रु.28,500/- जाबदाराकडून परत मिळावेत, तक्रारदाराना मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्क्कम रु. 10,000/- जाबदाराकडून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर कामी केली आहे.
4. सदर कामी जाबदार क्र.1 ते 3 हे नोटीस मिळूनही ते मंचात हजर राहिले नाहीत किंवा त्यांनी म्हणणेही दाखल केलेले नाही. सबब जाबदार क्र.1 ते 3 विरुध्द एकतर्फा आदेश नि.1 वर पारित झालेला आहे.
5. वर नमूद तक्रारदारानी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे.मंचाने सदर तक्रारअर्जाचे निराकरणार्थ खालील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार व जाबदारांचे दरम्यान ग्राहक व सेवादेणार असे नाते आहे काय? होय.
2. जाबदारानी तक्रारदाराना सदोष सेवा पुरवली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? शेवटी नमूद केलेप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराने जाबदाराकडून रक्कम रु.28,500/- ला दि.22-8-2008 रोजी हिरो अॅल्टस मॅक्सी या कंपनीचें वाहन खरेदी केले आहे. ही बाब तक्रारदाराने नि.4/1 व 4/2 कडील दाखल रक्कम जमा केलेची पावती व डिलीव्हरी चलन यावरुन स्पष्ट होते म्हणजेच तक्रारदार व जाबदरांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणार असे नाते असल्याचे स्पष्ट होते. तसेच तक्रारदाराची सदरची गाडी खरेदी केलेनंतर आठच दिवसात वाहनाच्या मागील चाकामध्ये आवाज येऊन चाक जाम होऊन फिरणेचे बंद झाले. त्यामुळे गाडी रेस करुनही वाहन वेगाने पळत नव्हते आणि अचानक त्याच ठिकाणी थांबू लागले. तक्रारदाराने सदर बाबतीत जाबदारांकडे तक्रार केली परंतु जाबदाराने जुजबी दुरुस्ती करुन पहिल्या पासिंगवेळी गाडी दुरुस्त करुन देऊ असे सांगितले परंतु पहिल्या सर्व्हीसिंग वेळीही गाडीतील दोष जाबदाराने काढून दिला नाही व चाकही बदलून दिले नाही, त्यानंतरही वारंवार तक्रारदाराने जाबदार क्र.2 व 3 यांचेकडे गाडी दुरुस्त करुन देणेसाठी हेलपाटे मारले व गाडी दुरुस्त करुन देणेची विनंती केली, परंतु जाबदार क्र.2 व 3 यांनी गाडी दुरुस्त करुन दिली नाही. दुरुस्तीसाठी म्हणून गाडी ताब्यात ठेवून घेतली. वकीलातर्फे नोटीस देऊनही जाबदाराने गाडी दुरुस्त करुन दिली नाही व नोटीसीला उत्तरही दिलेले नाही. प्रस्तुत वकीलातर्फे पाठवलेली नोटीस नि.4/5, नि.4/6 कडे पोहोचपावती, नि.4/7 कडे जाबदार क्र.2 ला नोटीस मिळालेची पोहोचपावती, नि.4/8 कडे जाबदार क्र.3 यांनी नोटीस न स्विकारता परत पाठवली म्हणून आलेला लखोटा वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत, म्हणजेच तक्रारदाराला जाबदाराने गाडी किंवा त्याचे पैसेही परत केले नाहीत म्हणजेच जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा दिल्याचे स्पष्ट होते म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
7. प्रस्तुत कामी जाबदार क्र.1 ते 3 हे हजर झालेले नाहीत किंवा म्हणणेही दाखल केलेले नाही, तसेच जाबदार क्र.1 ते 3 यांनी तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही त्यामुळे जाबदार क्र. 1 ते 3 यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारित झाला आहे. त्यामुळे जाबदाराने तक्रारदाराने तक्रारअर्जात केलेली कथने खोडून काढलेली नाहीत.
8. सबब प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदाराना वादातीत वाहनाच्या मॉडेलचे दुसरे नवीन वाहन परत करावे किंवा ते शक्य नसल्यास प्रस्तुत जाबदार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक वा संयुक्तीकरित्या सदर वाहनाची तक्रारदाराने जाबदाराकडे जमा केलेली रक्कम रु.28,500/- (रु.अठ्ठावीस हजार पाचशे मात्र) तक्रारदारास परत करणे न्यायोचित होणार आहे असे आमचे स्पष्ट मत आहे.
9. सबब आम्ही प्रस्तुत कामी खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत.
-ः आदेश ः-
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदार क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारास तक्रारदाराच्या वादातीत वाहनाच्या मॉडेलचे दुसरे नवीन वाहन परत करावे व जुने नादुरुस्त झालेले वाहन जाबदारांचे ताब्यात असलेने जाबदारांनी स्वतःकडेच ठेवावे.
3. जाबदारांना तक्रारदारास नवीन वाहन देणे अशक्य झालेस जाबदार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक वा संयुक्तीकपणे तक्रारदाराचे गाडीची किंमत रक्कम रु.28,500/- (रु.अठ्ठावीस हजार पाचशे मात्र) तक्रारदारास अदा करावेत.
4. तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी व नोटीसीचा खर्च जाबदार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे रक्कम रु.8,000/- (रु.आठ हजार मात्र) तक्रारदारास अदा करावेत.
5. वरील सर्व आदेशांचे पालन जाबदारांनी आदेश पारित तारखेपासून 45 दिवसात करावे.
6. वर नमूद आदेशाचे पालन जाबदारानी विहीत मुदतीत न केलेस ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 नुसार कारवाई करणेची मुभा तक्रारदारास राहील.
7. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
8. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सांगली.
दि. 23-4-2015.
(सौ. सुरेखा हजारे) (श्री. श्रीकांत कुंभार) (सौ. सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
अति. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली.