(पारित दिनांकः 19/06/2020)
आदेश पारीत व्दाराः श्री. अविनाश वि. प्रभुणे, मा. सदस्य.
सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये विरुध्द पक्षांच्या सेवेतील त्रुटि व अनुचित व्यापार पद्धतीबाबत असुन तक्रारकर्त्याचे कथनानुसार तक्रारकर्ता क्र.1 ने तक्रारकर्ता क्र.2 ते 10 चे प्रतिनिधीत्व करीत दाखल केली आहे. सदर तक्रारीतील तक्रारकर्त्यांचे तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे.
1. तक्रारकर्तीचे कथनानुसार विरुध्द पक्ष क्र.1 हे ‘माझा’(MAAJA) सॉफ्ट ड्रींकचे निर्माते असुन विरुध्द पक्ष क्र.2 व 3 हे त्यांचे विक्रेते आहेत. विरुध्द पक्ष क्र.1 ने ‘गोल्डन मॅंगो हर मौसम आम’ योजना जाहीर करून माझा सॉफ्ट ड्रींक 200 मि.ली. आणि 250 मि.ली. बाटल्या विकत घेतल्यानंतर त्यांची झाकणांवर नमूद बक्षीस रक्कम (रु 1,रु 2, गोल्ड व्हाऊचर झाकण रु.1,000/- व रु.2,000/- आणि 10 ग्रॅम सोन्याचे नाणे, इत्यादी) झाकणे जमा केल्यावर देण्याची जाहीरात दिली. सदर योजना ही 5 मार्च-2013 ते 20 एप्रिल-2013 चे दरम्यान वैध होती. योजनेच्या तरतुदींनुसार माझा सॉफ्ट ड्रींकची बाटलीचे झाकणे ही 30 मे.2013 पर्यंत विक्रेत्याकडे जमा करणे आवश्यक होते. सदर योजनेच्या कालावधीत तक्रारकर्त्यांनी जवळपास रु.21,700/- चे माझा सॉफ्ट ड्रींक बाटल्या विकत घेतल्या होत्या. योजनेनुसार बाटल्यांची झाकणे विरुध्द पक्ष क्र.3 कडे जमा केली. परंतु विरुध्द पक्ष क्र.3 ने योजनेनुसार तक्रारकर्त्यांना कुठलाही फायदा देण्यांस नकार दिला त्यामुळे दि.19.08.2013 रोजी तक्रारकर्त्याने वकीलामार्फत नोटीस पाठविली. परंतु विरुध्द पक्षांनी कुठलेही उत्तर न दिल्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करुन रु.1,86,700/- रक्कमेची मागणी केली. विरुध्द पक्षांनी अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला व जाहीरात करुन तक्रारकर्त्यांची फसवणूक केल्याचा आक्षेप घेतला, तसेच तक्रारकर्त्यांनी तक्रारीचे समर्थनार्थ 9 दस्तावेज दाखल केले.
2. विरुध्द पक्ष क्र.1 ने उत्तर सादर करून प्रस्तुत तक्रारीशी त्यांचा कुठलाही संबंध नसल्याचे निवेदन दिले तसेच तक्रारकर्त्यांची मागणी व जाहीरात ही सुपेरियल ड्रींक प्रा.लि., नागपूर यांनी केलेल्या जाहीरातीबद्दल असल्याचे निवेदन दिले. सदर जाहीरातीशी विरुध्द पक्ष क्र.1 चा कोणताही संबंध नाही. तसेच तक्रारकर्त्यांनी सुपेरियल ड्रींक प्रा.लि., यांना आवश्यक पक्ष असुन देखिल तक्रारीत समाविष्ट केले नाही म्हणून प्रस्तुत तक्रार खारीज करण्याची मागणी केली.
3. विरुध्द पक्ष क्र.2 ने, कोका कोला (नागपुर सिटि ऑफिस) यांनी लेखीउत्तर दाखल करुन प्रस्तुत प्रकरणी सुपेरियल ड्रींक प्रा.लि.,यांना समाविष्ट केले नसल्याने व आश्वासीत जाहीरात ही सुपेरियल ड्रींक प्रा.लि., ने दिलेली असल्याने त्या संबंधीची संपूर्ण जबाबदारी ही त्यांची असल्याने प्रस्तुत तक्रारीशी त्यांचा कुठलाही संबंध नसल्याचे आग्रही निवेदन दिले. तसेच आश्वासीत जाहीरात ही केवळ विक्रेत्यांकरीता लागू होती, ती सामान्य नागरीकांकरीता लागू नव्हती, त्यामुळे सदर योजनेचा लाभ मिळण्या तक्रारकर्ते पात्र नाही. तक्रारकर्त्यांनी विरुध्द पक्षांना पाठविलेल्या नोटीसमध्ये खरेदी केलेले कोल्ड ड्रींकची रक्कम रु.52,800/- दर्शविलेली आहे मात्र प्रस्तुत तक्रारीत ती रु.21,700/- दर्शविलेली आहे. तसेच तक्रारकर्त्याने सादर केलेले बिल हे अयोग्य असुन विरुध्द पक्षांना त्रास देण्याचे दृष्टीने तयार केलेले दिसते. मंचाची दिशाभुल करुन कायदेशिर प्रक्रियाचा दुरुपयोग करुन विरुध्द पक्षांना त्रास देण्याचे उद्देशाने दाखल केलेली तक्रार खारीज करण्याची मागणी केली आहे. तसेच तक्रारीसोबत दाखल दस्तावेज क्र.1 नुसार हे स्पष्ट होते की, सदर योजना ही केवळ विक्रेत्यांसाठी लागू होती व त्याचा फायदा सामान्य नागरीक म्हणून तक्रारकर्ते घेऊ शकत नाही, त्यामुळे प्रस्तुत तक्रार खारीज करण्याची मागणी केली.
4. विरुध्द पक्ष क्र.3 ला नोटीस मिळूनही ते मंचासमक्ष उपस्थित झाले नाही, त्यामुळे त्यांची विरुध्द प्रकरण एकतर्फी कारवाई करण्याचा आदेश देण्यांत आला.
5. तक्रारकर्त्याने तक्रारीत सुधारणा करुन सुपेरियल ड्रींक प्रा.लि., यांना समाविष्ट केले पण त्यांचे विरुध्द नोटीस बजावण्याकरीता कुठलीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष्ज्ञ क्र. 2 मे. सुपेरियल ड्रींक प्रा.लि., नागपूर व जबलपूर यांचे विरुध्द तक्रार दि.24.06.2019 रोजीच्या आदेशानुसार खारीज करण्यांत आली.
6. मंचातर्फे तक्रारीसोबत दाखल केलेले निवेदन व दस्तावेज तसेच विरुध्द पक्षांचे लेखीउत्तर व दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले, तसेच उभय पक्षांचे वकीलांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्यांत आला असता मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे.
- // निष्कर्ष // -
7. तक्रारकर्ता क्र.1 ने तक्रारकर्ता क्र. 2 ते 10 चे प्रातीनिधिक स्वरुपात प्रस्तुत तक्रार दाखल केल्याचे दिसते. तक्रारी सोबत दाखल केलेल्या दस्तावेज क्र.1 चे निरीक्षण केले असता विरुध्द पक्ष क्र. 2 ची ‘गोल्डन मॅंगो हर मौसम आम’ योजना माझा सॉफ्ट ड्रींक 200 मि.ली. आणि 250 मि.ली. बाटल्या विकत घेतल्यानंतर त्यांची झाकणांवर नमूद बक्षीस रक्कम (रु 1,रु 2, गोल्ड व्हाऊचर झाकण रु.1,000/- व रु.2,000/- आणि 10 ग्रॅम सोन्याचे नाणे, इत्यादी) झाकणे जमा केल्यावर देण्याची जाहीरात होती. सदर योजना कालावधी 5 मार्च-2013 ते 20 एप्रिल-2013 चे दरम्यान लागू असल्याचे व केवळ विक्रेर्त्यांकरीता लागू असल्याचे स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने संपूर्ण तक्रारीत सदर योजनेअंतर्गत कोल्ड ड्रींक खरेदी करुन वापर केल्याचा उल्लेख केला तरी तक्रारकर्त्याने विक्रेता म्हणून सदर कोल्ड ड्रींक विकत घेतल्याचा कुठलाही दस्तावेज दाखल केला नाही उलट तक्रार परिच्छेद 3 मध्ये नमूद कोल्डड्रिंक विकत घेऊन प्राशन (Consume) केल्याचे व ग्राहक म्हणून योजनेचा फायदा मिळण्यास पात्र असल्याचे निवेदन दिल्याचे दिसते. दस्तावेज क्र.1 मध्ये नमूद असल्यानुसार सदर योजना ही केवळ विक्रेत्यांसाठी असून सामान्य ग्राहकासाठी म्हणजे पर्यायाने तक्रारकर्त्यांस लागू नसल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज क्र. 2 मध्ये (तक्रार पृष्ठ क्र.14 ते 16) सादर केलेल्या कोल्ड ड्रींक खरेदीचे बिले हे देखील कायदेशिरदृष्ट्या वैध ठरु शकत नाही. पृष्ठ क्र.15 मध्ये हिना डिलक्स बार अॅन्ड रेस्टॉरेंट यांचेकडून कोल्ड ड्रींक खरेदी केल्याचे जे बिल सादर केले आहे त्यावर इस्टीमेट असे स्पष्टपणे लिहील्याचे दिसते. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 कडून कोल्ड ड्रींक खरेदी केल्याबद्दल कुठलेही वैध बिल सादर केलेले नाही. तक्रारकर्त्याने सादर केलेले सर्व बिले वैध प्रदान म्हणून मान्य करता येणार नाहीत. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणी तक्रारकर्ते ‘ग्राहक’ असल्याचे मान्य करता येणार नाही.
8. तक्रारकर्त्याने आपल्या शपथपत्रात माझा कोल्ड ड्रींक हे अंकुश प्रोव्हिजनतर्फे खरेदी केल्याचे नमुद केले व अंकुश प्रोव्हिजन हे विक्रेता असल्याचे नमुद केले. तक्रारकर्त्याचे हे कथन तात्पुरते जरी ग्राह्य धरले तरी ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1)(d)(i) नुसार पुर्नविक्रीकरीता खरेदी केलेल्या वस्तूचा खरेदीदार हा ‘ग्राहक’ ठरत नाही त्यामुळे या कारणास्तव तक्रारकर्ता ग्राहक ठरत नसल्यामुळे प्रस्तुत तक्रार मंचासमोर चालविण्यायोग्य नसल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे.
9. विरुध्द पक्ष क्र. 2 व 2 अ, विरुध्द नोटीस बजावण्याची कारवाई न केल्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्याचा आदेश मंचाने यापुर्वीच दिला असल्याने व विरुध्द पक्ष क्र.1 चा प्रस्तुत तक्रारीशी कुठलाही थेट संबंध येत नसल्यामुळे तक्रारकर्ता प्रस्तुत तक्रारीत कुठलाही आदेश मिळण्यांस पात्र ठरत नाही. योजनेच्या तरतुदींनुसार माझा सॉफ्ट ड्रींकची बाटलीचे झाकणे ही 30 मे.2013 पर्यंत विक्रेत्याकडे जमा करणे आवश्यक होते.
10. सदर योजनेच्या कालावधीत तक्रारकर्त्यांनी जवळपास रु.21,700/- चे माझा सॉफ्ट ड्रींक बाटल्या विकत घेतल्याचे व योजनेनुसार बाटल्यांची झाकणे विरुध्द पक्ष क्र.3 कडे जमा केल्याचे निवेदन दिले पण त्यासंबंधी प्रत्यक्ष व्यवहार झाल्याबद्दल आणि झाकणे जमा केल्याबद्दल कुठलाही दस्तऐवज मंचासमोर सादर केलेला नाही. विरुध्द पक्ष क्र. 3 विरुद्ध एकतर्फा कारवाईचे आदेश असले तरी विरुध्द पक्ष क्र. 3 ने सेवेत त्रुटि दिल्याचे अथवा अनुचित व्यापार पद्धत अवलंबल्याचे सिद्ध होत नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 3 विरुद्धचे तक्रारकर्त्याचे निवेदन स्विकारण्यायोग्य नसल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे.
11. वरील परिच्छेदात नमूद केलेल्या कारणांमुळे तक्रार खारीज करण्यात येत असल्याने विरुध्द पक्षाच्या इतर निवेदना विषयी ऊहापोह करणे मंचास आवश्यक वाटत नाही. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- // अंतिम आदेश // -
1. तक्रारकर्त्यांची तक्रार खारीज करण्यांत येते.
2. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क देण्यांत यावी.
3. तक्रारीच्या खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाहीत.
4. तक्रारकर्त्यास तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत परत करावी.