(मंचाचा निर्णय : श्री. मनोहर चिलबुले - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये)
- आ दे श -
(पारित दिनांकः 15/12/2014)
- तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण येणेप्रमाणे...
तक्रारकर्ता हा बजाज ट्रॅक्स क्रुझर नोंदणी क्र. एमएच-29 जे इंजिन क्र.140019853 चेसिस क्र. 7057021027 सी 04 चा मालक आहे. त्याने विरुध्द पक्षाकडे रु.12,130/- देवून वरील वाहनाचा दि.24.06.2011 ते 23.06.2012 या कालावधीसाठी एजंसी कोड एफसी-030473 च्या अंतर्गत कव्हरनोट क्र. 8488621 व्दारे एक वर्षाचा विमा काढला. त्याबाबतची विमा पॉलीसी क्र. 3362/00678987/000/00 दि. 23.09.2011 प्रमाणे तक्रारकर्त्यास देण्यांत आली. सदर पॉलीसीमध्ये विमा प्रिमियम राशी रु.11,075/- दर्शविली आहे. म्हणजेच वि.प.ने तक्रारकर्त्याकडून विमाप्रिमियम पेक्षा रु.1,055/- अधिकचे घेवून तक्रारकर्त्याची फसवणूक केली आहे. तक्रारकर्त्याने सदरची फसवणूक वि.प.च्या लक्षात आणून दिली आणि अधिकची रक्कम परत करण्याची विनंती केली, परंतु वि.प.ने ती परत केली नाही.
2. वि.प.ने दि. 13.10.2011 रोजी तक्रारकर्त्यास पत्र पाठवून कळविले कि, तक्रारकर्त्याने वि.प.ला दिलेला रु. 28,025/- चा धनादेश क्र. 368226 अनादरित झाला आहे म्हणून सदर रक्कम व अधिकोष टपाल शुल्काचे रु. 250/- अशी एकुण रु. 28,275/- एवढी रक्कम वि.प.कडे भरणा करावी.
3. तक्रारकर्त्याने दि.14.01.2012 रोजी वि.प.ला अधिवक्त्यामार्फत नोटीस पाठवून दि.13.10.2012 रोजीची बेकायदेशीर नोटीस परत घेण्यास विनंती केली, तसेच तक्रारकर्त्याकडून अधिकची घेतलेली रक्कम रु.1,055/- परत करण्याची आणि विमा पॉलीसी सुरु ठेवण्याची विनंती केली. तसेच वि.प.कडून सेवेतील न्युनतापूर्ण व्यवहार व अनुचित व्यापार पध्दतीच्या अवलंबामुळे तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारिरिक व आथर्क नुकसान भरपाईपोटी रु.15,00,000/- ची मागणी केली. सदर नोटीस प्राप्त झाल्यावर वि.प.ने तक्रारकर्त्याच्या विनंतीचा विचार तर केला नाहीच पण धनादेश अनादरित झाल्यामुळे विमा पॉलीसी रद्द करण्यांत आल्याबाबत दि.17.01.2012 रोजीचे पत्रान्वये कळविले. म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रारीत खालील प्रमाणे मागणी केली आहे.
1) वि.प.ने तक्रारकर्त्यास नुकसानभरपाई म्हणून एकुण रुपये18,00,000/- देण्याचा आदेश व्हावा.
2) वि..प.ने तक्रारकर्त्याच्या वाहनाची बेकायदेशीररित्या रद्दविमा केलेली विमा पॉलीसी पुर्ण मुदतीसाठी सुरु ठेवावी.
4. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत खालील दस्तावेज दाखल केले आहेत.
1. तक्रारकत्याने अधिवक्त्यामार्फत वि.प.ला दिनांक 14.01.2012
रोजी दिलेल्या नोटीसची प्रत.
2. रजिस्ट्रेशन पावती
3. वि.प.क्र.1 ला नोटीस मिळाल्याबाबत पोच.
4. वि.प.क्र. 2 ने दि. 23.06.2011 चा रु. 28,025 चा
धनादेश क्र.368226 अनादरित झाल्यामुळे रु. 28,275 ची
मागणी केल्याबाबत पत्र.
5. वि.प.क्र.1ने दि.17.01.2012 रोजी तक्रारकर्त्याने दिलेला धनादेश
अनादरित झाल्यामुळे विमा पॉलीसी रद्द करण्यांत आल्याचे
तक्रारकर्त्यास कळविले ते पत्र.
6. दि.23.09.2011 रोजी वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्त्याकडून
पावती क्र.1001363361 दि.23.06.2011 प्रमाणे रु.11,075
मिळाल्यावरुन तक्रारकर्त्यास पाठविलेली विमा पॉलीसी.
5. विरुध्द पक्षाने लेखीउत्तर दाखल करुन तक्रार अर्जास सक्त विरोध केला. वि.प.चे म्हणणे असे कि, तक्रारकर्त्याने विमा पॉलीसी काढतांना वि.प.ने त्यांच्याकडून विमा हप्त्याची रक्कम रुपये 12,130/- म्हणजे पॉलीसीत नमुद रु. 11,075/- विमा हप्त्यापेक्षा रु.1,055/- अधिक तक्रारकर्त्याची फसवणूक करुन उकळल्याचे नाकबुल केले आहे. त्यांचे म्हणणे असे कि, तक्रारकर्त्याकडून रु. 11,075/- एवढीच विमा हप्त्याची रक्कम घेतली होती व तेवढया रकमेची विमा पॉलीसी दिली होती. वि.प. कडून दि. 13.10.2011 रोजी तक्रारकर्त्याने दिलेला रु.28,025/- चा धनादेश अनादरित झाल्यामुळे रु. 28,275/- ची मागणी करणारे तसेच दि.17.01.2012 रोजी तक्रारकर्त्याचा धनादेश अनादरित झाल्यामुळे तक्रारकर्त्याच्या बजाज क्रुझर नोंदणी क्र.एमएच-29-जे-0669 ची विमा पॉलीसी क्र. 3362/00678987/000/00 रद्द करण्यांत आल्याचे कळविले होते हे कबुल केले आहे. त्यांचे म्हणणे असे कि, सदर पॉलीसीबरोबर अन्य पॉलीसी जोडण्यांत आल्याची शक्यता नाकारता येत नाही. वि.प.कडून सेवेत कोणताही न्युनतापूर्ण व्यवहार किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब झाला नसल्याने सदर तक्रारीस कारण घडलेले नाही. तक्रारकर्त्याने काल्पनीक स्वरुपात तक्रार दाखल केली असून नुकसान भरपाईची अवास्तव मागणी केली आहे म्हणून तक्रार खारीज करावी. वि.प.ने लेखिबयानातील कथनाचे पुष्टयर्थ कोणतेही दस्तावेज दाखल केले नाही.
6. तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी विधानांवरुन खालिल मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यांत आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा पुढील प्रमाणे...
मुद्दे निष्कर्ष
1) विरुध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार किंवा
अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे काय ? होय.
2) तक्रारकर्ता मागणी प्रमाणे दाद मिळण्यांस
पात्र आहे काय ? अंशतः
3) अंतिम आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
7. मुद्दा क्र.1 बाबतः- सदरच्या प्रकरणात तक्रारकर्त्याचे म्हणणे असे कि, त्याने त्याच्या मालकीची बजाज ट्रॅक्स क्रुझर नोंदणी क्र. एमएच-29 जे 669-टी-0669, विरुध्द पक्षाकडे रु.12,130/- रोख देवून दि.24.06.2011 ते 23.06.2012 या कालावधीसाठी एजंसी कोड एफसी-030473 च्या अंतर्गत कव्हरनोट क्र. 8488621 व्दारे एक वर्षासाठी विमाकृत केली. त्याबाबतची विमा पॉलीसी क्र. 3362/00678987/000/00 दि. 23.09.2011 प्रमाणे तक्रारकर्त्यास देण्यांत आली परंतु विमा पॉलीसी मध्ये प्रिमियम राशी रु.11,075/- दर्शविली आहे. म्हणजेच वि.प.ने तक्रारकर्त्याकडून विमाप्रिमियम पेक्षा रु.1,055/- अधिकचे घेवून तक्रारकर्त्याची फसवणूक केली आहे. तक्रारकर्त्याने सदरची फसवणूक वि.प.च्या लक्षात आणून दिली आणि अधिकची रक्कम परत करण्याची विनंती केली, परंतु वि.प.ने ती परत केली नाही. तक्रारकर्त्याने विमा पॉलीसी काढण्यासाठी वि.प.ला रोख रु.12,130/- दिल्याचा कोणताही पुरावा दाखल केला नाही. म्हणून वि.प.ने तक्रारकर्त्याकडून अधिकचे रु.1,055/- घेवून त्याची फसवणूक केली हे म्हणणे कोणत्याही पुराव्याअभावी स्विकारणे अशक्य आहे.
वि.प.ने निर्गमित केलेली विमा पॉलीसी 3362/00678987/000/00 दि. 23.09.2011 तक्रारकर्त्याने दाखल केली असून त्यात रु. 11,075/- विमा प्रिमियम घेवून रु.2,30,000/- मुल्यासाठी वाहन विमाकृत केल्याचे नमुद आहे. तसेच पावती क्र. 1001363361 दि.23.06.2011 प्रमाणे विमा प्रिमियम मिळाल्याचे नमुद आहे व पॉलीसीतील मजकूर बरोबर असल्याचे वि.प.ने कबुल केले आहे.
8. तक्रारकर्त्याची वरील पॉलीसी अस्तित्वात असतांना वि.प.ने दि. 13.10.2011 रोजी तक्रारकर्त्यास पत्र पाठवून तक्रारकर्त्याने वि.प.ला पॉलीसीपोटी दिलेला रु. 28,025/- चा धनादेश क्र. 368226 अनादरित झाला असल्याने सदर रक्कम व अधिकोष टपाल शुल्काचे रु. 250/- अशी एकुण रु. 28,275/- एवढी रक्कम वि.प.कडे भरणा करावी असे कळविले. सदरचे पत्र तक्रारकर्त्याने दाखल केले असून ते पाठविल्याचे वि.प.ने कबुल केले आहे. सदर पत्र प्राप्त झाल्यावर तक्रारकर्त्याने दि. 14.01.2012 रोजी अधिवक्ता श्री ए.पी.जे.पी. दुबे मार्फत नोटीस पाठवून दि. 13.10.2012 रोजीची बेकायदेशीर नोटीस परत घेण्यास विनंती केली, तसेच तक्रारकर्त्याकडून अधिकची घेतलेली रक्कम रु. 1,055/- परत करण्याची आणि विमा पॉलीसी सुरु ठेवण्याची विनंती केली. तसेच वि.प.कडून सेवेतील न्युनतापूर्ण व्यवहार व अनुचित व्यापार पध्दतीच्या अवलंबामुळे तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारिरिक व आथर्क नुकसान भरपाईपोटी रु.15,00,000/- ची मागणी केली. सदर नोटीस, पोष्टाची रजिस्ट्रेशन पावती व वि.प.क्र. 1 ला नोटीस मिळाल्याबाबच पोच तक्रारकर्त्याने दाखल केली आहे. नोटीस प्राप्त झाल्यावर वि.प.ने तक्रारकर्त्याच्या विनंतीचा विचार न करता धनादेश अनादरित झाल्यामुळे विमा पॉलीसी रद्द करण्यांत आल्याबाबत दि. 17.01.2012 रोजीचे पत्रान्वये कळविले. सदरपत्र तक्रारकर्त्याने दाखल केले आहे व ते वि.प.ने कबुल केले आहे. वि.प.ला पुरेशी संधी देवूनही तक्रारकर्त्याने विमा पॉलीसी क्र. 3362/00678987/000/00 पोटी रु.28,025/- चा धनादेश क्र.368226 दि. 23.06.2011 दिला होता आणि तो वटविण्यास पाठविण्यात आला असता अनादरीत झाला हे वि.प.ने सिध्द केलेले नाही.
9. वरील सर्वबाबींवरुन हे स्पष्ट आहे कि, तक्रारकर्त्याकडून विमा प्रिमियम रु. 11,075/- स्विकारुन वि.प.ने तक्रारकर्त्याच्या वाहनाची विमा पॉलीसी निर्गमित केली, परंतु तक्रारकर्त्याने सदर विमा प्रिमियमच्या भुगतानाबाबत रु. 28,025/- चा धनादेश क्र.368226 दि. 23.06.2011 दिला नसतांना सदर धनादेश अनादरित झाला म्हणून दि.13.10.2011 रोजी रु.28,275/- ची मागणी करणे व तक्रारकर्त्याने दिलेल्या विमा रकमेचा खुलसा करुनही व सदर धनादेश दिला नसल्याचे सांगूनही दि.17.01.2012 च्या पत्राप्रमाणे तक्रारकर्त्याच्या बजाज ट्रॅक्स क्रुझर नोंदणी क्र.एमएच-29 जे-0669 ची विमा पॉलीसी क्र. 3362/00678987/000/00 रद्द करण्यात आल्याचे कळविणे ही निश्चितच सेवेतील न्युनता आहे. म्हणून मुद्या क्र.1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
10. मुद्दा क्र. 2 बाबतः- मुद्या क्र. 1 वरील विवेचनावरुन हे स्पष्ट आहे कि, तक्रारकर्त्याने वि.प.ला पॉलीसी प्रिमियमपोटी रु. 28,025/- चा धनादेश क्र.368226 दि. 23.06.2011 दिला नसतांना सदर धनादेश अनादरित झाला म्हणून दि.17.01.2012 च्या पत्राप्रमाणे तक्रारकर्त्याच्या बजाज ट्रॅक्स क्रुझर नोंदणी क्र. एमएच-29 जे -0669 ची विमा पॉलीसी क्र. 3362/00678987/000/00 रद्द करण्याची कृती बेकायदेशीर आहे. म्हणून सदर रद्दीकरण रद्द करुन सदर विमा पॉलीसी तिच्या पूर्ण कालावधीसाठी वैध असल्याचे जाहीर करण्यांत येते.
याशिवाय तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरिक,मानसिक व आर्थीक त्रासाबाबत रु. 25,000/- नुकसानभरपाई आणि तक्रारीचा खर्च रु. 5,000 मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. म्हणून मुद्या क्र. 2 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविण्यांत येत आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अं ति म आ दे श //-
तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालिल तक्रार वि.प.क्र. 1 व 2 विरुध्द संयुक्त व वैयक्तिकरित्या खालिल प्रमाणे अंशतः मंजूर करण्यांत येते.
- दि.17.01.2012 च्या पत्राप्रमाणे वि.प.ने तक्रारकर्त्याच्या बजाज ट्रॅक्स क्रुझर नोंदणी क्र.एमएच-29 जे-0669 ची विमा पॉलीसी क्र. 3362/00678987/000/00 रद्द करण्याची कृती बेकायदेशीर असल्याचे जाहिर करण्यांत येत असून सदररद्दीकरण रद्द करुन सदर विमा पॉलीसी तिच्या पूर्ण कालावधीसाठी म्हणजे दि.24.06.2011 ते 23.06.2012 या कालावधीसाठी वैध असल्याचे जाहीर करण्यांत येते.
2) वि.प.नी तक्रारकर्त्यास शारीरिक व मानसिक त्रासाबाबत रु.25,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- द्यावा.
3) आदेशाची पूर्तता आदेशाच्या तारखेपासून 30 दिवसांचे आंत करावी.
4) उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
5) तक्रारकर्त्यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.