ग्राहक तक्रार क्र. 135/2014
अर्ज दाखल तारीख : 08/07/2014
अर्ज निकाली तारीख : 03/07/2015
कालावधी: 0 वर्षे 11 महिने 26 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. बाळासाहेब आत्माराम नाईकनवरे,
वय-55 वर्षे, धंदा – शेती,
रा. हिंगळजवाडी, ता. जि. उस्मानाबाद.
2. शामकांत ऊर्फ शाम बाळासाहेब नाईकनवरे,
वय- 23 वर्षे, धंदा – शेती,
रा. हिंगळजवाडी, ता.जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. व्यवस्थापकीय संचालक,
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित,
महाबीज भवन, कृषीनगर अकोला- 444101.
2. जिल्हा व्यवस्थापक,
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित,
नाईकवाडे बिल्डींग, बी. अॅण्ड सी.
ऑफीस जवळ, समता नगर, उस्मानाबाद.413501
3. मे. हिंन्दुस्थान कृषी सेवा केंद्र,
बी.एस.एन.एल. ऑफिस समोर,
सांजा रोड, उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधिज्ञ : श्री.एन.एच.पडवळ.
विप क्र. 1 व 2 तर्फे विधिज्ञ : श्री.ए.एन.देशमूख.
विरुध्द पक्षकार क्र. 3 तर्फे विधिज्ञ : गैरहजर.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्रीमती विद्युलता जे.दलभंजन यांचे व्दारा :
अ) अर्जदार बाळासाहेब आत्माराम नाईकनवरे आणि शामकांत बाळासाहेत नाईकनवरे हे मौजे हिंगणवाडी ता.जि. उस्मानाबाद येथील रहिवाशी आहेत त्यांना विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांचे विरुध्द नुकसान भरपाईची तक्रार दाखल केलेली आहे.
1. अर्जदारांनी हिंगजवाडी येथे जमिन गट नं.221 क्षेत्र 3 एकर 14 आर व गट नं.262 मध्ये 1 हे.25 आर एवढे क्षेत्र अर्जदार क्र. 1 च्या नावे आहे व त्यांची उपजिविका शेतीवरच अवलंबून आहे त्यांचे एकत्र कुटूंब असून शेतीवरच उदरनिर्वाह अवलंबून आहे.
2. विप क्र.3 हे बियाणे विक्रीचे दुकान आहे व विप क्र. 1 व 2 हे बियाणांची उत्पादक कंपनी आहे.
3. अर्जदाराने दि.08/11/2013 रोजी विप क्र.3 यांचे कडून ज्वारी परभणी मोती महाबीज सिडस या कंपनीचे 7 बँग बियाणे खेरदी केले त्याचा लॉट क्र.2501 व 1052 असा आहे. प्रत्येक बॅग 4 किलो वजनाची होती व रक्कम रु.200/- प्रमाणे 7 बॅगचे रु.1,400/- रोख देऊन खरेदी केले व पावती घेतली.
4. अर्जदाराने पाऊस पडल्यावर योग्य ओल असतांना दि.09/11/2013 रोजी गट क्र. 221 मध्ये 1 हे. 20 आर व गट क्र.262 मध्ये 1 हे. 60 आर एकूण क्षेत्र 7 एकर मध्ये पेरणी केली त्यासाठी 10, 26, 75 किलो प्रति एकर वापरले. जमिनीत एकरी 20 गाडया शेणखत वापरुन मशागत केली होती.
5. पेरणी नंतर बियाणाची उगवण गाजर गवताप्रमाणे झाली व ज्वारीस 2 ते 3 फुटावर संकरीत ज्वारीप्रमाणे कणसे दिसू लागल्याने अर्जदाराने दि.07/01/2014 रोजी जिल्हा व तालूका कृषी अधिकारी यांचेकडे तक्रार अर्ज दिला व दि.23/01/2014 रोजी समक्ष भेट घेऊन पाहणी केली त्यावेळेस सदरचे ज्वारीचे पिक हे संकरीत ज्वारीसारखे दिसून आले सदर पिकाची वाढ 2 ते 2 ½ फुट झालेली असून 3 ते 4 फुटवे आहेत. सदर बियाणे हे परभणी मोतीचे नसून इतर संकरीत ज्वारीचे 100% भेसळयुक्त असल्याचे तपासणी अहवालात दिसुन आले असे अर्जदाराचे म्हणणे आहे.
6. अर्जदाराने एकरी 20 गाडया शेणखत टाकून प्रत्येक एकरी 75 किलो 10:26:26 रासायनिक खत पेरणीच्या वेळी दिलेले आहे. त्यानंतर कोळपणी, खुरपणी केली व त्यासाठी रु.5,700/- खर्च झालेला आहे.
7. अर्जदाराला जमीनीतून एकरी 15 क्विंटल ज्वारीचे उत्पादन मिळत होते. विप ने निकृष्ट प्रतिचे बियाणे पुरवल्यामुळे अर्जदाराचे ज्वारीचा भाव प्रति क्विंटल रु.1,500/- प्रमाणे एकरी रक्कम रु.28,200/- चे नुकसान झालेले आहे. असे एकूण अर्जदाराचे 7 एकर क्षेत्राचे रक्कम रु.1,97,400/- चे नुकसान झाले त्यास विप जबाबदार आहेत असे तक चे म्हणणे आहे. निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे उत्पन्न न आल्याने शारीरिक व मानसिक त्रास झालेला आहे. त्या शारीरिक व मानसिक त्रासोपोटी रक्कम रु.10,000/- द्यावेत व नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.1,97,400/- तक्रारीचा खर्च रक्कम रु.5,000/- विप क्र.1 ते 3 यांचेकडून वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या द्यावा अशी विनंती अर्जदाराने केलेली आहे.
ब) विप क्र.1 ते 3 यांना अनेक वेळा संधी देऊनही त्यंनी प्रकरणात त्यांचे म्हणणे न दिल्याने त्यांचे विरुध्द नो से आदेश दि.14/10/2014 रोजी पारीत करण्यात आला.
क) अर्जदाराने तक्रारीसोबत जमीन गट नं.221 चा पीक पेरा प्रमाणपत्र, जमीन गट नं.262 चा पीक पेरा प्रमाणापत्र, बियाणे खरेदी पावती, सातबारा गट क्र.221 चा, सातबारा गट क्र.262 चा, कृषी अधिकारी उस्मानाबाद यांना तक्रारी अर्ज, (2) कृषी अधिकारी उस्मानाबाद यांनी अर्जदारास दिलेले पत्र, क्षेत्र भेटीचा तपासणी अहवाल, इ. कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले. अर्जदाराचा लेखी युक्तिवाद वाचला असता सदर प्रकणात खालीप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1) विप क्र.1,2 यांनी सदोष बियाणे विक्री करुन अर्जदारास
देण्यात येणा-या सेवेत त्रुटी केली का ? होय.
2) अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे का ? होय.
3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
ड) कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1.
1. अर्जदाराने विप क्र. 1 व 2 हे बियाणे उत्पादित कंपनी आहे त्यांचे बियाणे पेरले परंतू ते उगवून आले नाही ही अर्जदाराची प्रमुख तक्रार आहे.
2. अर्जदाराने अभिलेखावर तपासणी अहवाल दाखल केलेला आहे त्यामध्ये 100 % सं. ज्वारी दिसून आली, ती मोती ज्वारी नसून संकरीत ज्वारी आहे. एकूण पेरणी क्षेत्र सात एकर आहे. निरीक्षण व निष्कर्षामध्ये पेरणी केलेल्या पिकाची पाहणी केली असता पिकाची वाढ 2 ते 2.50 फुट वाढलेले व फुटलेली संख्या 4 ते 5 दिसुन आली तसेच कणसाचा आकार सं. ज्वारी सारखे दिसून आले यावरुन सदर बियाणे हे परभणी मोतीचे नसून इतर संकरीत ज्वारीचे 100 टक्के दिसून आले हयावरुन सदर बियाणे 100 टक्के भेसळयुक्त असलेले प्रथम दर्शनी दिसुन आलेले आहे तसेच पुढे असे ही म्हंटलेले आहे की, तालूका स्तरीय समितीने पहाणी केलेल्या शेतातील ज्वारी मोतीचे बियाणे नसुन सं. ज्वारी असलेले दिसून आले. यावरुन सदर बियाणे 100 टक्के भेसळयुक्त असलेले दिसून आले. यावरुन विप क्र. 1 व 2 यांनी उत्पादित केलेले बियाणे 100 टक्के भेसळ आहे हे स्पष्ट होते.
3. वास्तविक पाहता हिंदुस्तान कृषी सेवा केंद्र यांची बियाणे विक्री केल्याची पावतीचे सुक्ष्म अवलोकन केले तर Jawar moti 4 kg. असे स्पष्ट उल्लेख आहे. म्हणजे बियाणे पेरल्यानंतर “ज्वारी मोतीच” उगवून आली पाहिजे. परंतु अर्जदाराने सदर बियाणांची पेरणी केल्यानंतर संकरीत ज्वारी उगवून आलेली आहे. ही सेवेतील त्रुटी आहे हे स्पष्ट होते.
4. विप यांनी सदर प्रकरणात हजर झालेले आहेत परंतू त्यांनी बियाणांबद्दल कोणतेही समर्थनीय कागदपत्रे दाखल करुन अर्जदाराच्या तक्रारीचे खंडन केलेले नाही. याचाच अर्थ विप क्र. 1, 2 व 3 यांना बियाणे 100 टक्के सदोष व भेसळयुक्त आहे हे मान्य आहे हे ग्राह्य धरावेच लागेल.
5. अर्जदाराने त्यांचे 7 एकर जमीनीत उत्पादन 15 क्विंटल मिळत होते व एकरी रु.28,200/- चे नुकसान झाले असे म्हंटले आहे. अर्जदाराने 20 गाडया शेणखत व रासयनिक खताचे रु.5,700/- ची मागणी केलेली आहे पंरतू 20 गाडया शेणखत टाकल्याचा सबळ पुरावा अभिलेखावर दाखल नाही. रासायनिक खत टाकल्याचा पुरावा अभिलेखावर दाखल नाही त्यामुळे शेणखत, रासायनिक खत, कोळपणी खुरपणी याचा खर्च देता येणार नाही.
6. अर्जदाराचे 100 टक्के नुकसान झालेले आहे. त्याचे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे अर्जदाराने 7 एकराचे एकरी रु.28,200/- नुकसान भरपाई मागितलेली आहे. आमच्या मते एकरी 7 क्विंटल प्रमाणे 7 एकराचे 49 क्विंटल होतात त्या वेळच्या बाजारभावाप्रमाणे एकरी रु.1,200/- क्विंटल प्रमाणे रु.58,800/- (रुपये अठठावन्न हजार आठशे फक्त) मिळण्यास तक्रारदार पात्र आहे. म्हणून मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
अर्जदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
1) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी सदोष बियाणे व भेसळयुक्त बियाणांचे उत्पादन केले. त्या नुकसान भरपाई पोटी रु.58,800/- (रुपये अठठावन्न हजार आठशे फक्त) तक्रार दाखल दि.08/07/2014 पासून 9 टक्के व्याज दराने आदेश पारीत दिनांकापासून 30 दिवसात तक्रारदार क्र.1 व 2 यांना समान विभागून द्यावे.
2) विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारदार यांना बियाणे खरेदीचे रु.1,400/- (रुपये चौदाशे फक्त) द्यावे.
3) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रार खर्चाचे तसेच आर्थिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) आदेश पारीत दिनांकापासून 30 दिवसात द्यावेत.
4) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत
मंचात अर्ज द्यावा.
6) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही.कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकुंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद..