Exh.No.15
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 29/2013
तक्रार दाखल झाल्याचा दि.07/10/2013
तक्रार निकाल झाल्याचा दि.29/05/2014
श्री उत्तम तुकाराम सावंत
वय 57 वर्षे, धंदा- नोकरी
मु.पो.माजगाव, ता.सावंतवाडी,
जि.सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
1) मॅनेजर,
व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लि.,
14 किमी स्टोन औरंगाबाद पैठण रोड
चितेगाव, ता.पैठण, जि. औरंगाबाद
2) मेसर्स माने सेल्स इंटरप्राइझेस तर्फे
श्री वसंत माने ओल्ड बॅंक ऑफ महाराष्ट्र,
मेन रोड सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग. ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्रीम. अपर्णा वा. पळसुले. अध्यक्ष
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्य
तक्रारदारतर्फे – व्यक्तीशः
विरुद्ध पक्ष क्र.2 तर्फे विधिज्ञ – श्री एस.एन. सावंत
निकालपत्र
(दि. 29/05/2014)
द्वारा : मा.अध्यक्ष, श्रीम. अपर्णा वा. पळसुले.
1) सदरची तक्रार सामनेवाला नं.1 व 2 यांनी टि.व्ही. बरोबर खरेदी केलेल्या बॉंडमधील अटींची पुर्तता केली नाही म्हणून सामनेवाला नं.1 व 2 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला व ग्राहकांस देण्यात येणा-या सेवेमध्ये न्युनता व त्रुटी ठेवली म्हणून नुकसान भरपाई मिळावी म्हणून दाखल केलेली आहे.
- तक्रारीचा थोडक्यात सारांश –
तक्रारदार हे सावंतवाडी तालुक्यातील माध्यमिक शिक्षक आहेत. विरुध्द पक्ष क्र.1 ही उत्पादक कंपनी व विरुध्द पक्ष क्र.2 हे कंपनीचे डिलर आहेत. तक्रारदारांने विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकडून व्हिडिेओकॉन जंबो 34 इंची फ्लॅट टी.व्ही. मॉडेल नं.8600QS Set Sr. No.307327 कॅश मेमो नं.2939 दि.7/4/2008 रोजी रोखीने विकत घेतला. त्याचबरोबर सदर कंपनीच्या ऑफरप्रमाणे “ मानो या न मानो ऑफर 2008” या स्किमप्रमाणे याच कॅशमेमोमध्ये बॉंड स्किम प्लाझ्मा टी.व्ही. साठी रु.7,000/- रोख तसेच जम्बो 34 इंची फ्लॅट टी.व्ही.ची किंमत रु.12,290/- अशी एकूण रु.19,990/- रोख रक्कम दिली. बॉंड स्किमप्रमाणे 2 वर्षे 11 महिन्यानंतर म्हणजेच 35 महिन्यानंतर Plasma Entitlement Certificate Sr. No.155608 यातील आश्वासनाप्रमाणे कंपनीने तक्रारदार यांस प्लाझ्मा 32 इंची (81 सेंमी) टी.व्ही. देणे बंधनकारक होते. पण कंपनीने प्लाझ्मा टी.व्ही. दिलेला नाही. तक्रारदार विरुध्द पक्ष क्र.2 यांना वारंवार भेटले असता “ बॉंड कंपनीने दिलेला आहे, मी नाही. त्यामुळे मी तुम्हाला प्लाझ्मा टी.व्ही. देऊ शकत नाही. तुम्हाला काय करावयाचे ते तुम्ही करा” अशी विरुध्द पक्ष क्र.2 ची उत्तरे मिळाली. त्यानंतर भ्रमणध्वनीद्वारे कंपनीकडे अनेक वेळा चौकशी केली परंतु थातूर मातुर उत्तरे दिली, परंतु प्लाझ्मा टी.व्ही दिला नाही. तक्रारदाराने दि.7/3/2011 रोजी पत्र पाठवले परंतु सदर पत्राचे उत्तर दिले नाही. पुन्हा 31/03/2012 ला नोटीस पाठवले त्याचे देखील उत्तर दिलेले नाही. तक्रारदार हे 35 महिन्यानंतर प्लाझ्मा टी.व्ही. मिळणार या आशेवर होते परंतु विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारदारांची फसवणूक केली व टी.व्ही. देणेस टाळाटाळ केली त्यामुळे तक्रारदाराना प्रचंड शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. म्हणून तक्रारदाराने सामनेवाला कंपनीकडून प्लाझ्मा टी.व्ही. गॅरेंटी व वॉरंटीसह देण्याबाबत आदेश करावेत तसेच डिपॉझिटची रक्कम 35 महिन्यापेक्षा जास्त काळ वापरल्यामुळे व्याज तसेच 25,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्च रु.10000/- वसुल होऊन मिळणेसाठी सदरची तक्रार दाखल केली आहे.
3) विरुध्द पक्ष क्र.1 या कामी नोटीस बजावूनही गैरहजर राहिल्यामुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश ता.17/12/2013 रोजी पारीत करणेत आले.
4) विरुध्द पक्ष क्र.2 हे या कामी वकीलांमार्फत हजर झाले परंतु 4 ते 5 वेळा मुदतीचे अर्ज देऊन म्हणणे देण्यास मुदत मागितली. तथापि पुरेशी संधी देऊन देखील विरुध्द पक्ष यांनी या कामी म्हणणे देण्यास टाळाटाळ केली. सबब विरुध्द पक्ष क्र.2 यांचेविरुध्द ‘म्हणणे नाही’ असा आदेश पारीत करणेत आला.
5) त्यानंतर तक्रारदाराने नि.14 कडे अर्ज देऊन तक्रारदारांने दाखल केलेल्या पुराव्याशिवाय आणखी पुरावा सादर करावयाचा नाही असे कळवले. सबब. तक्रारदाराने दाखल केलेले शपथपत्र व इतर कागदपत्रे यांचा विचार करुन निवाडा करावा लागेल.
6) तक्रारदाराने नि.4 कडे एकूण 5 कागद दाखल केलेले आहेत. नि.1 कडे तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र.2 कडे रक्कम रु.12,990/- व्हिडिओकॉन कलर टी.व्ही 34 इंची याची किंमत तसेच बॉंड्स स्कीम प्लाझ्मा टी.व्ही.साठी असे एकूण 19990/- भरल्याची पावती दाखल केलेली आहे. तसेच व्हिडिओकॉन कंपनीने दिलेला बॉंड व एंटायटलमेंट सर्टिफिकेट नि.4 सिरियल नं.2 व 3 येथे दाखल केलेले आहे. तक्रारदाराने कंपनीला पाठवलेली नोटीस व सदर नोटीस कंपनीला पोचलेबाबतची पोस्टाची परत पावती नि.4/4 व नि.4/5 वर दाखल केलेली आहे. या सर्व कागदपत्रांवरुन तक्रारदाराने सामनेवाला नं.2 यांचेकडून व्हिडिओकॉन कंपनीचा टि.व्ही खरेदी केल्याचे दिसून येते. सबब तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते.
7) विरुध्द पक्ष क्र.2 हे विरुध्द पक्ष क्र.1 कंपनीचे अधिकृत डिलर आहेत ही बाब विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी नाकारलेली नाही. तसेच तक्रारदारांनी विरुध्द पक्ष क्र.1 कंपनीचा बॉंड विरुध्द पक्ष नं.2 मार्फत खरेदी केलेला आहे. सदरच्या बॉंडमधील अटी पाहता सिरियल नं.3 नुसार सदरचे सर्टीफिकेट हे व्हिडिओकॉन प्लाझ्मा टि.व्ही.35 महिन्यानंतर ‘मानो या न मानो’ या ऑफरखाली मिळणेस तक्रारदार पात्र आहेत तसेच तक्रारदारानी सदर सर्टिफिकेट खरेदी करतांना जम्बो टि.व्ही. विरुध्द पक्ष नं.2 यांचेकडून खरेदी केल्याचे दिसून येते. सबब सदरचा बॉंड हा कंपनीतर्फे विरुध्द पक्ष क्र.2 यांचेमार्फत तक्रारदारांनी खरेदी केल्याचे दिसून येते. सबब तक्रारदाराने दाखल केलेला कागदोपत्री पुरावा पाहता विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी बॉंडमधील अटी व शर्तींचा भंग करुन प्लाझ्मा टि.व्ही 35 महिन्यानंतर देणेस टाळाटाळ केली ही बाब सिध्द होते. तथापि सामनेवाला कंपनीने रक्कम रु.7000/- बॉंड स्कीमखाली वसुल केलेले आहेत. सदरचे पैसे सामनेवाला कंपनीने बिनाव्याजी वापरलेले आहेत. सबब तक्रारदारांना आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागला. सबब विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी कराराप्रमाणे प्लाझ्मा टि.व्ही. 35 महिन्यांच्या आत न देऊन फसवणूक केल्याचे सिध्द होते. सबब तक्रारदार हे मागणी केल्यानुसार अनुतोष मिळणेस पात्र आहेत या निर्णयाप्रत हे मंच येत आहे.
सबब खालीलप्रमाणे आदेश पारीत करणेत येतात.
आदेश
- तक्रारदारांचा तक्रार अर्ज मंजूर करणेत येतो.
2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी प्लाझ्मा 32 (81 सेंमी) टि.व्ही. योग्य त्या वॉरंटी व गॅरेंटीसह तक्रारदारास 1 महिन्याच्या आत दयावा.
3) तक्रारदारांची रक्कम रु.7000/- (रुपये सात हजार मात्र) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी 35 महिन्यांपेक्षा जास्त वापरल्यामुळे सदर रक्कमेवर दि.7/3/2011 पासून 9 % दराने व्याज दयावे.
4) तक्रारदारांना झालेल्या शारीरिक, मानसिक आर्थिक त्रासापोटी खर्च रु.10,000/- (रुपये दहा हजार मात्र) व तक्रार खर्च रु.5000/- (रुपये पाच हजार मात्र) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी दयावा.
5) सदर आदेशाची पुर्तता विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी 1 महिन्याच्या आत करणेची आहे. न केल्यास तक्रारदार विरुध्द पक्ष यांचेविरुध्द कलम 25 व 27 खाली कार्यवाही करु शकतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 29/05/2014
Sd/- Sd/-
(अपर्णा वा. पळसुले) (वफा ज. खान)
अध्यक्ष, सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.