जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/147 प्रकरण दाखल तारीख - 12/05/2010 प्रकरण निकाल तारीख – 28/09/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते, - सदस्य. सिध्देश्वर गुरुबसअप्पा देवणे वय 39 वर्षे, धंदा व्यवसाय अर्जदार रा.जोशी गल्ली,देगलूर ता.देगलूर, जि. नांदेड विरुध्द. मा.व्यवस्थापक, व्यकंटेश्वरा हायर परचेस लि. खतगांवकर कॉम्पलेक्स, देगलूर ता. देगलूर जि. नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.ए.व्ही.चौधरी गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.दिलीप मनाठकर निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार यांनी ञूटीची सेवा दिली म्हणून अर्जदारानी सदर तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की, अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे दि.30.07.1998 रोजी योजनेमध्ये प्रत्येकी रु.100/- चे रजिस्ट्रर्ड फोलीयो क्र.29/98 अंतर्गत सर्टीफिकेट क्र.307 व 308 या क्रमांकावर प्रत्येकी 50 व 50 असे मिळून 100 शेअर्स खरेदी केले. अर्जदार यांना दि.30.07.1998 रोजी वरील शेअर्स प्रमाणपञ मिळाले. दोन तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर अर्जदार यांना 03.10.2001 रोजी गैरअर्जदार यांच्या सहाव्या वर्धापन दिन सोहळा यांची निमञण पञिका आली. त्यानुसार गैरअर्जदार यांचे कार्यालयाचे नांव बदलून व्यकंटेश्वरा हायर परचेस लि. असे
ठेवण्यात आले.त्यांचे सर्व व्यवहार आता वरील नांवाने चालविले जातील असे सांगण्यात आले. अर्जदार यांना आपले जूने प्रमाणपञ जमा करावे व आपल्याला नवीन शेअर्स प्रमाणपञ देण्यात येतील असे सांगितले त्याप्रमाणे अर्जदाराने जूने शेअर्स प्रमाणपञ जमा केले. पंरतु बराच काळ लोटल्यानंतर ही गैरअर्जदाराने अर्जदार यांना नवीन प्रमाणपञ दिले नाही व जूनेही वापस केले नाहीत. गैरअर्जदार आज ना उद्या प्रमाणपञ देतील या भरोशावर बरेच वर्षे लोटले तरी गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना प्रमाणपञ दिले नाही.शेवटी हताश होऊन अर्जदार यांनी त्यांचे वकीलामार्फत नोटीस दिली. वरील सर्व प्रकारामूळे अर्जदार यांना आपली फसवणूक झाली असे लक्षात आले. गैरअर्जदार यांच्या चूकीच्या सेवेमूळे व निष्काळजीपणामूळे अर्जदार यांना मानसिक, शारीरिक व आर्थीक ञास झाला आहे. त्यामूळे अर्जदाराने सदर तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, अर्जदार यांस दि.30.07.1998 रोजी रजि.फोलीयो क्र.2998 तसेच सर्टीफिकेट क्र.308 इक्वीटी शेअर्स प्रमाणपञ ओरिजनल गैरअर्जदार यांच्याकडे जमा केलेले परत देण्याचे आदेश व्हावेत, तसेच मानसिक,शारीरिक व आर्थीक ञासापोटी रु.50,000/- व दावा खर्च रु.5000/- देण्याचे आदेश करण्यात यावे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. तक्रार ही पूर्णत खोटी तसेच निराधार असून गैरअर्जदाराला जाणूनबूजून ञास देण्यासाठी दाखल केलेली आहे. गैरअर्जदार संस्थेचे दि.30.07.1998 रोजी रजिस्ट्रर्ड फोलीओ क्र.29/1998 अंतर्गत प्रमाणपञ क्र.307 व 308 इक्वीटी शेअर्स प्रत्येकी 50 असे एकूण 100शेअर्स खरेदी केले. दि.30.07.1998 रोजी असणा-या 100 शेअर्सची बाजारु किंमत एकूण रु.15,000/- आहे व त्यांची नोंद गैरअर्जदार कंपनीच्या नोंदणी रजिस्टरमध्ये घेतलेली आहे. गैरअर्जदार कंपनीच्या नांवाचा बदल व्यकंटेश्वरा हायर परचेस लि. या नांवाने कंपनी कायदयाच्या तरतूदीप्रमाणे तसेच रजिस्टर कंपनी यांच्या परवानगीने झालेला आहे. अर्जदाराने त्यांच्याकडे असणारे मूळ शेअर्स प्रमाणपञ गैरअर्जदाराकडे नोंदवून घेण्यासाठी कधीच दिलेले नाहीत तसेच गैरअर्जदार यांनी ते कधीही मागितलेले नाहीत. सदर शेअर्स प्रमाणपञाची नोंद दि.30.07.1998 रोजी गैरअर्जदार कंपनीच्या रजिस्टर मध्ये घेतलेली आहे. सदर शेअर्स प्रमाणपञ अर्जदार यांनी गैरअर्जदार कंपनीला दिल्याची कोणतीही पोहच पावती अर्जदाराने दाखल केलेली नाही. गैरअर्जदाराचे सर्व व्यवहार हे लेखी रजिस्टर्ड नोंदणीकृत असल्यामूळे अर्जदाराचे प्रमाणपञ पावती न देता घेण्याचा प्रश्नच येत नाही.अर्जदाराचे शेअर्स प्रमाणपञ त्यांच्या स्वतःच्या सही शिवाय कोणीही घेऊ शकत नाही.अर्जदाराच्या मूळ प्रमाणपञाचा गैरअर्जदार कंपनीस कोणताही गैरफायदा घेता येत नाही व गैरअर्जदार कधी घेणारही नाही.अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीस दि.21.10.2008 रोजी लेखी अर्ज दिला त्यांस गैरअर्जदार कंपनीने दि.21.11.2008 रोजी उत्तर दिले आहे.अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीस त्यांच्या वकिलामार्फत कधीच नोटीस पाठविलेली नाही. गैरअर्जदार कंपनीने कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही म्हणून रु.50,000/- देण्याचा प्रश्नच येत नाही. अर्जदाराकडे मूळ शेअर्स प्रमाणपञ नसल्यास कंपनी कायदयाच्या तरतूदी प्रमाणे डयूप्लीकेट शेअर्स प्रमाणपञ मागण्याची तरतूद आहे.त्यासाठी अर्जदाराने संबंधीत कागदपञ, पोलिसचा एफ.आय.आर., शपथपञ मूळ शेअर्स धारकाची सही करुन कार्यवाही पूर्ण केल्यास परत डयूप्लीकेट प्रमाणपञ देता येईल.अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीकडहून रु.25,000/- गैरअर्जदार कंपनीच्या नियमाप्रमाणे व्याजाने कर्ज दि.4.2.2002 रोजी घेतलेले आहेत, तेव्हापासून अर्जदार गैरअर्जदार कंपनीकडून घेतलेली रक्कम व त्यावरील व्याज ब-याच वेळा मागणी करुन परत देण्यास तयार नाही.म्हणून अर्जदाराची तक्रार ही खर्चासह नामंजूर करावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 व 2 ःः- अर्जदार यांनी आपल्या तक्रार अर्जात त्यांचे इक्वीटी शेअर्स प्रमाणपञ नंबर 307 व 308 गेरअर्जदार यांचे मूळ प्रमाणपञ दिले होते. परंतु त्यांनी ते परत मागितले नाही असा उल्लेख केलेला आहे. यात अर्जदार यांनी दि.30.07.1998 रोजी गैरअर्जदार यांचेकडून प्रत्येकी रु.100/- किंमतीचे इक्वीटी शेअर्स रु.15,000/-रक्कम भरुन घेतले होते. त्यांना रजिस्ट्रर पावती नंबर 29/1998 या अंतर्गत प्रमाणपञ नंबर 307 व 308 प्रत्येकी 50-50 शेअर्स मिळून असे 100 शेअर्स अलाऊट झाले होते व त्यांचे प्रमाणपञही मिळाल्याचे अर्जदार यांनी कबूल केले आहे. परंतु 2001 च्या नंतर त्यांनी मूळ प्रमाणपञ हे गैरअर्जदार यांनी दिले व ते आजपर्यत त्यांनी वापस केले नाही. यावीषयी गैरअर्जदार यांचेकडे मूळ प्रमाणपञ दिल्याची पोहच अर्जदार यांचेकडे नाही. म्हणजे दिल्याचा कोणताही पूरावा ते दाखल करुन शकलेले नाहीत. दि.03.10.2001 ला सहाव्या वर्धापन दिनाची गैरअर्जदार यांची पञिका मिळाली त्यानुसार त्याचे कार्यालयाचे नांव व्यकंटेश्वरा हायर परचेस असे झाले. त्यावेळेस गैरअर्जदार यांचे सूचनेवरुन त्यांनी मूळ प्रमाणपञ नांव बदलून देण्यावीषयी त्यांचे कडे दिले असा यूक्तीवाद केला आहे. गैरअर्जदार यांचेवर विश्वास ठेऊन ते मूळ प्रमाणपञ देतील म्हणून वाट बघत राहीले असे म्हटले आहे. आपल्या तक्रार अर्जात अर्जदार यांनी हे प्रमाणपञ गैरअर्जदार यांचेकडे कोणत्या तारखेला दिले यांचा ऊहापोह केला नाही. परंतु दि.03.10.2001 रोजी ला वर्धापन दिनाच्या नंतर हे प्रमाणपञ दिले असे म्हटले आहे. साधारणतः 2001 ला जर प्रमाणपञ दिले असेल तर त्यांची तक्रार ही आता 2010 मध्ये करतात. यांचा अर्थ आठ वर्ष त्यांनी वाट पाहिली असा होतो. फार तर कोणीही एक ते दोन वर्षापर्यत वाट बघेल, इतके वर्ष वाट बघण्याचे काही कारण नाही. या कारणास्तव वर्धापन दिनाचे जे त्यांनी कारण सांगितले ते खरे वाटण्यासारखे नाही.कोणतेही मूळ प्रमाणपञ दिल्याचे नंतर ताबडतोब समोरच्या कंपनीकडून त्यांची पोहच घेतील. पोहच न घेता असे प्रमाणपञ देणार नाही. गैरअर्जदार यांनी स्पष्टीकरणात हे स्पष्ट केले आहे की, आम्ही वर्धापन दिनाची पञिका पाठविली. त्यात त्यांनी गैरअर्जदारांनी असे इक्वीटी शेअर्स त्यावेळी त्यांची मागणीप्रमाणे दिले हे त्यांचे म्हण्णे खोटे आहे असे म्हटले आहे. गैरअर्जदार यांची कंपनी ही रजिस्टर कंपनी आहे. त्यामूळे एखादे प्रमाणपञ जारी केल्याचे नंतर कंपनीचे नांव जरी बदलले असले तरी प्रमाणपञ वापस करण्याचे काही एक कारण नाही. ते प्रमाणपञ शेवटपर्यत कामी येते. अर्जदाराच्या नांवे शेअर्सवर त्यांची स्वाक्षरी असल्याशिवाय त्यांचा फायदा होऊ शकत नाही. गैरअर्जदार यांनी त्यांचे शेअर्स प्रमाणपञ ठेऊन घेतले तरी अर्जदाराची स्वाक्षरी शिवाय त्यांचे काहीही फायदा होत नाही, मूळ प्रमाणपञ जर हरवले असेल तर असे प्रमाणपञ हरवल्यास अर्जदाराचा हक्क जात नाही. त्यांला डयूप्लीकेट प्रमाणपञ मागण्याची तरतूद आहे परंतु यासाठी अर्जदाराने हरवल्यासंबंेधी पोलिसाचा एफ.आय.आर., त्यांचे शपथपञ, मूळ शेअर्स धारकांची सही करुन कारवाई पूर्ण केल्यास असे प्रमाणपञ देता येते. हे एवढे सरळ असताना अर्जदार हे डयूप्लीकेट शेअर्स मागू शकले असते, असे न करता अर्जदार हे ग्राहक मंचात आले. यात अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून रु.25,000/- व्याजाने दि.04.02.2002 रोजी घेतले आहेत व गैरअर्जदार यांचे म्हणण्याप्रमाणे घेतलेली रक्कम व व्याज अर्जदार परत करण्यास तयार नाहीत म्हणून अशी खोटी तक्रार केलेली आहे. या त्यांचे म्हणण्यात तथ्य वाटते, असे वाटते की, अर्जदार हा स्वच्छ हाताने मंचात आलेला नाही. गैरअर्जदारांनी फॉरमॅलिटी पूर्ण केल्यास आजही डयूप्लीकेट शेअर्स देण्याची तयारी दर्शविलेली आहे. या त्यांचे म्हणण्यावरुन व आमच्या सुचनेवरुन अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचे नांवे शेअर्स प्रमाणपञ मिळण्यासाठी स्वतःच अर्ज, शपथपञ, पोलिस स्टेशनला दिलेले एफ.आय.आर., वर्तमान पञात शेअर्स हरवल्या संबंधीची जाहीरात, इन्डेमनिटी बॉंड इत्यादी कागदपञ बंचसह गैरअर्जदार यांचेकडे डयूप्लीकेट प्रमाणपञ मिळण्यासाठी प्रोसिजर पूर्ण केलेली आहे व गैरअर्जदार यांनी त्यांचे शेअर्स प्रमाणपञ तयार आहेत असेही सांगितले आहे. पण मूळात अर्जदार यांनी मूळ शेअर्स प्रमाणपञ गैरअर्जदार यांचेकडे दिलेच नाही व तसे सिध्द ही झालेले नाही व त्यांचे यात गैरअर्जदार यांची काहीही चूक नाही म्हणून त्यांना या मंचात अर्जदाराने तक्रार दाखल केल्यामूळे चूक नसताना भूर्दड झाला तो मला मिळावा व गैरअर्जदार यांनी असेही म्हटले आहे की, दि.12.11.2008 रोजी आम्ही अर्जदार यांना जेव्हा आमच्याकडे शेअर्सची रक्कम व डिव्हीडंट ची मागणी केली तेव्हा त्यांला पञ लिहून अर्जदार यांचे दि.21.10,2008 रोजीच्या पञाप्रमाणे मूळ शेअर्स प्रमाणपञ व शेअर्स हस्तातंरण बाबतचा फॉर्म भरुन संस्थेस सादर केल्यास शेअर्सची जी बाजारात किंमत असेल व मंजूर केलेला लाभांश पूर्ण देण्यास तयार आहेत तेव्हा कागदपञाची पूर्तता करावी व शेअर्सचा लाभांशाची रक्कम घ्यावी.जर खरच अर्जदार यांनी मूळ प्रमाणपञ दिले नसते तर त्यांच वेळेस गैरअर्जदार यांना मूळ प्रमाणपञ तूमच्याकडेच आहे असे सांगितले असते. 2001 पासून 2008 पर्यत अर्जदार गप्पच राहीले व 2010 ला गैरअर्जदाराचे पञ मिळाल्यावर यानंतरही गप्पच राहीले व 2008 मध्ये त्यांना तक्रार करण्याचे सूचले. हया पञाचे आधारे असे म्हणता येईल की, अर्जदार यांचे तक्रारीत तथ्य नाही व त्यांनी ब-याच गोष्टी लपवून ठेवलेल्या आहेत म्हणून ही तक्रार खोटी आहे. अर्जदाराला अगदी सरळ मार्गाने डयूप्लीकेट प्रमाणपञ मिळू शकले असते त्याकरिता त्यांनी एवढा वाकडा मार्ग का स्विकारला ? व गैरअर्जदार यांना नाहक न्यायमंचात ओढून त्यांना न्यायालयीन खर्च करण्यास भाग पाडले व शिवाय मानसिक ञास दिला म्हणून अर्जदार यांनी Compensatory Cost गैरअर्जदार यांना दयावी या मतापर्यत आम्ही आलेलो आहोत. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात येते. 2. गैरअर्जदार यांनी शेअर सर्टीफिकेट क्र.307 व 308 डयुप्लीकेट अर्जदार यांना द्यावेत. 3. अर्जदार यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार यांना Compensatory Cost म्हणून रु.3,000/- दयावेत. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य. जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] PRESIDING MEMBER | |