श्री. मनोहर चिलबुले - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
- आ दे श -
(पारित दिनांकः 16/08/2014)
1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण येणेप्रमाणे.
तक्रारकर्त्याने वि.प. क्र. 1 युटीआय यांचेकडून दि.14.12.2007 रोजी युटीआय इन्फ्रास्ट्रक्चर ऍडव्हान्टेज ग्रोथ फंड या योजनेचे रु.10,000/- किंमतीचे 1,000 युनिटस् चंद्रपूर येथे राहात असतांना खरेदी केले. त्यासाठी वि.प.क्र. 2 कारवी कॉम्पुटर शेअर प्रा.लि.(युटीआय म्युच्युअल फंड) यांच्या नावाने स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा चंद्रपूरचा धनादेश क्र. 998688 दि.14.12.2007 चा दिला होता. त्याबाबत मख्य प्रतिनिधी युटीआय म्युच्युअल फंड चंद्रपूर यांनी सही शिक्यानीशी पावती क्र.0094100 दिली ती दस्तऐवज क्र.1 वर दाखल केली आहे. तक्रारकर्त्याचा इन्व्हेस्टर आय.डी. क्र. 526217603167 असा आहे. वरील योजनेची मुदत 23.01.2008 पासून 3 वर्षे होती.
तक्रारकर्त्याला त्याचे वरील युनीट डिव्हिडंड फंड ग्रोथ ऑप्शनमध्ये स्विचओव्हर करावयाचे होते. त्यासाठी तक्रारकर्त्याने 12.01.2011 रोजी सर्व आवश्यक कागदपत्रांसह ऑप्शन वि.प.क्र.2 ला कळविला, तसेच बदललेल्या पत्याची माहिती सुध्दा कळविली.वि.प.ने तक्रारकर्त्याचा बदलेला पत्ता त्यांच्या रेकार्डमध्ये नोंद घेतल्याबाबत तसेच के.वाय.सी. फॉर्म मिळाल्याबाबत तक्रारकर्त्यास कळविले, ते दस्तऐवज क्र. 2 व 3 वर दाखल केले आहेत. वि.प.क्र. 2 ने दि.13.01.2011 च्या पत्राप्रमाणे तक्रारकर्त्याकडून बॅंकेचे दस्तऐवज मागितले, ते तक्रारकर्त्याने दि.09.02.2011 रोजी पाठविले सदर दस्तऐवज क्र. 4, 5 व 6 वर जोडले आहेत.
तक्रारकर्त्याने त्याचा वि.प.कडील गुंतवणूकीचा खातेउतारा दि.17.02.2011 आणि 08.04.2011 रोजी काढला असता, त्यांत बाकी रक्कम शुन्य दर्शविण्यांत आली, परंतु वि.प.कडून स्विचओव्हर केलेल्या रकमेचे स्टेटमेंट पाठविण्यांत आले नाही. तक्रारकर्त्याने वि.प.क्र.1 कडे चौकशी केली असता वि.प.क्र. 2 कडे चौकशी करा असे सांगण्यांत आले. वरील खाते उता-याचे दस्तऐवज क्र. 7 व 8 वर दाखल आहेत.
तक्रारकर्त्याने वि.प.ला दि.12.01.2011, 06.11.2011 आणि 28.02.2011 रोजी पत्र पाठवून त्याच्या 1000 युनिटच्या स्विचओव्हर बाबत वि.प.ने केलेली कारवाई कळवावी म्हणून विचारणा केली, परंतु वि.प. माहिती देण्याची या ना त्या कारणाने टाळाटाळ करीत आहेत. शेवटी तक्रारकर्त्याने 02.03.2012 रोजी वि.प.ला पत्र पाठवून त्याचे पैसे परत मागितले, परंतु वि.प.ने त्याला दाद दिली नाही. सदर पत्रव्यवहार दस्तऐवज क्र. 9 ते 11 वर दाखल आहे.
शेवटी तक्रारकर्त्याने दि.02.04.2012 रोजी पत्र पाठवून त्याची मागणी पूर्ण न झाल्यास ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे जाईल असे कळविले. वि.प.ला सदर पत्र प्राप्त झाल्याबाबत पोष्टखात्याचा दाखल दाखल केला आहे. सदर पत्र व दाखल्याबाबत पत्रव्यवहार आणि पोष्टाचा दाखल दस्तऐवज क्र. 12 ते 14 वर दाखल आहेत. सदर पत्र प्राप्त होऊनही वि.प.ने तक्रारकर्त्याची मागणी पुर्ण केली नाही. म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
1) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास युनीटची रक्कम रु.10,000/- व्याजासह 30 दिवसांचे आंत परत करण्याचा आदेश व्हावा.
2) शारिरिक व मानसिक त्रासाबाबत रु.50,000/- नुकसान भरपाई मिळावी.
3) तक्रारखर्च रु.5,000/- मिळावा.
2. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना मंचातर्फे रजिस्टर पोष्टाने पाठविलेली तक्रारीची नोटीस प्राप्त होऊनही ते हजर न झाल्याने प्रकरण त्यांच्याविरुध्द एकतर्फा चालविण्यांत आले.
3. तक्रारीच्या निर्णयासाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यांत आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा खालिलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) विरुध्द पक्षाने सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार
केला आहे काय ? होय.
2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यांस
पात्र आहे काय ? अंशतः.
3) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
तक्रार अंशतः मंजूर.
- कारणमिमांसा -
4. मुद्दा क्र.1 ते 3 बाबतः- सदरच्या प्रकरणात तक्रारकर्त्याने वि.प. क्र. 1 युटीआय यांचेकडून दि.14.12.2007 रोजी युटीआय इन्फ्रास्ट्रक्चर ऍडव्हान्टेज ग्रोथ फंड या योजनेचे रु.10,000/- किंमतीचे 1,000 युनिटस् खरेदी केले व त्यासाठी वि.प.क्र.2 कारवी कॉम्पुटर शेअर प्रा.लि.(युटीआय म्युच्युअल फंड) यांच्या नावाने स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा चंद्रपूरचा धनादेश क्र. 998688 दि.14.12.2007 चा दिला हे दर्शविण्यासाठी दस्तऐवज क्र. 1 प्रमाणे मुख्य प्रतिनिधी युटीआय म्युच्युअल फंड, चंद्रपूर यांनी सही शिक्यानीशी दिलेली पावती क्र.0094100 दाखल केली असून वि.प.ने ती नाकारलेली नाही.
तक्रारकर्त्याचे दि.27 मे 2009 चे युनिट स्टेटमेंट दस्तऐवज क्र. 2 वर आहे. त्यांत तक्रारकर्त्याच्या नावाने त्याने दि.23.01.2008 रोजी खरेदी केलेले युनिटस् 1,000 प्रति युनिट मुल्य रु.10/- प्रमाणे एकुण मुल्य रु.10,000/- दर्शविले आहे. तसेच 27.05.2009 चे सदर युनिटचे मुल्य (NAV) प्रती युनिट रु.7.78 प्रमाणे एकुण रु.7,780/- दर्शविले आहे. तक्रारकर्त्याने दि.12.01.2011 रोजी त्याचे युटीआय इन्फ्रास्टक्चर ऍडव्हान्टेज ग्रोथ प्लॉन मधील युनीट युटीआय डिव्हिडंड यिल्ड फंड ग्रोथ ऑप्शन मध्ये स्विच ओव्हर करण्यासाठी अर्ज केला होता व सोबत के.वाय.सी. फॉर्म पाठविला होता, हे वि.प.ने तक्रारकर्त्यास पाठविलेल्या दस्तऐवज क्र. 3 व 4 वरुन दिसून येते. वरील पत्राप्रमाणे वि.प.क्र. 2 ने केवायसी फॉर्मची तपासणी केल्यावर तो स्विकारण्यांत येईल असे कळविले. तसेच स्विच ऑप्शनसाठी राष्ट्रीयकृत बॅकेच्या शाखा व्यवस्थापकाने प्रमाणित केलेली सही, स्वतः प्रमाणित केलेले फोटो ओळखपत्र आणि गुंतवणूक केल्याबाबतचा पुरावा इत्यादि पुरविण्यास सांगितले. तक्रारकर्त्याने भारतीय स्टेट बॅंक, दिनदयाल नगर शाखा, नागपूरच्या व्यवस्थापकाने दि.09.02.2011 रोजी प्रमाणित केलेली त्याची सही वि.प.ला पाठविली त्याची प्रत दस्तऐवज क्र. 5 वर आहे. तक्रारकर्त्याच्या बदललेल्या पत्त्याची नोंद घेतल्याबाबत वि.प.ने तक्रारकर्त्यास पाठविलेले पत्र दस्तऐवज क्र. 6 वर आहे.
तक्रारकर्त्याने त्याचा वि.प.कडील गुंतवणूकीचा दि.17.02.2011 रोजी काढलेला खाते उतारा दस्तऐवज क्र. 7 व 8 वर आहे. 12.01.2011 रोजीच्या नोंदीप्रमाणे 1,000 युनीट चे मुल्य रु.8,800/- दर्शविले असून Transaction Type - Lateral Shift Out Rejection “Signature does not tallied with the specimen in our records” असे नमुद आहे. तसेच दि. 14.01.2011 रोजी “Switch Out Merged to UTI-INF- 526217603167” असे नमुद आहे. दि. 16.02.2011 रोजी “Net Lateral Out ** To DY GP Folo No. 526217603167” रु.8,069.50 अशी नोंद आहे, परंतु शिल्लक युनीट 0 आणि चालु किंमत 0 दर्शविली आहे.
तक्रारकर्त्याने दि.06.11.2011 रोजी वि.प.ला पाठविलेले पत्र दस्तऐवज क्र. 10 वर आहे. त्यांत तक्रारकर्त्याने वि.प.च्या मागणीप्रमाणे सर्व दस्तऐवज दाखल केले आहेत, परंतु तेच दस्तऐवज पुन्हा पुन्हा मागून वि.प. त्रास देत असल्याचे नमुद केले आहे. तसेच तो शासकिय सेवेतून निवृत्त झाल्यावर नागपूर येथे स्थायिक झाला असून युनिट खरेदी केले तेंव्हा जेथे राहात होता त्या जुन्या पत्त्याचा कागदोपत्री पुरावा देणे अशक्य असल्याचे म्हटले आहे. त्यानंतरही वि.प.ने तक्रारकर्त्यास जुन्या बॅंक खात्याच्या पासबुकची प्रत किंवा खाते बंद झाले असल्यास बॅंकेच्या अधिका-याचे प्रमाणपत्र पाठविण्यासाठी दि.17.11.2011 च्या पत्राप्रमाणे मागणी केली. सदरचे पत्र दस्तऐवज क्र. 11 वर आहे. त्यानंतर तक्रारकर्त्याने दि.28.02.2011 रोजी पत्र पाठवून त्याच्या 1000 युनिटच्या स्विचओव्हरबाबत वि.प.ने केलेली कारवाई कळवावी म्हणून विचारणा केली. वि.प.ने दि.23.01.2012 रोजी त्यास उत्तर पाठवून प्रकरण पडताळणीसाठी संबंधीतांकडे पाठविल्याचे व त्याबाबतची माहिती लवकरच कळविण्यांत येईल असे कळविले. सदरचे पत्र दस्तऐवज क्र. 13 वर आहे. परंतु त्यानंतर वि.प.कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून तक्रारकर्त्याने दिलेले दि.02.03.2012, 02.04.2012 आणि 04.05.2012 रोजी पत्र पाठविले ते दस्तऐवज क्र. 14 ते 16 वर आहेत. सदर पत्र प्राप्त होऊनही वि.प.ने तक्रारकर्त्याची युटीआय इन्फ्रास्टक्चर ऍडव्हान्टेज ग्रोथ प्लॉनमधील युनीट युटीआय डिव्हिडंड यिल्ड फंड ग्रोथ ऑप्शनमध्ये स्विच ओव्हर करण्याची व त्याबाबतचे स्टेटमेंट पाठविण्याची कार्यवाही केली नाही. सदरची बाब ही निश्चितच सेवेतील न्युनता आहे.
तक्रारकर्ता चंद्रपूर येथे नोकरीस असतांना वि.प.कडे रु.10,000/- युटीआय इन्फ्रास्टक्चर ऍडव्हान्टेज ग्रोथ प्लॉनमध्ये गुतविले आणि ती रक्कम युनीट युटीआय डिव्हिडंड यिल्ड फंड ग्रोथ ऑप्शनमध्ये स्विच ओव्हर करण्याची विनंती केल्यावर वि.प.ने तक्रारकर्त्याच्या सहीत तफावत आहे, म्हणून स्विच ओव्हर ऑप्शन नामंजूर केल्यावर ती रक्कम त्याच्या मुळ गुंतवणूक खात्यात जमा दाखवावयास पाहिजे होती आणि त्याबाबतची अद्यावत स्थिती दर्शविणारे स्टेटमेंट तक्रारकर्त्यास द्यावयास पाहिजे. परंतु वि.प. ने तक्रारकर्त्याच्या मुळ गुंतवणूक खात्यात शिल्लक बाकी ‘0’ दाखविली आहे. म्हणून तक्रारकर्ता त्याच्या युटीआय इन्फ्रास्टक्चर ऍडव्हान्टेज ग्रोथ प्लॉनमधील 1,000 युनीटचे सध्या असलेले मुल्य मिळण्यास पात्र आहे. याशिवाय शारिरिक व मानसिक त्रासाबाबत रु.3,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.2,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. म्हणून मुद्दा क्र. 1 ते 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- आ दे श -
तक्रारकर्त्याची तक्रार वि.प.क्र.1 व 2 विरुध्द संयुक्त व वैयक्तिक रित्या खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्यांत येत आहे.
1) तक्रारकर्त्याचा युटीआय इन्फ्रास्टक्चर ऍडव्हान्टेज ग्रोथ प्लॉन मधील 1,000 युनीटचे मुल्य परत करण्याचा अर्ज ज्या दिवशी वि.प.ला प्राप्त होईल त्या दिवशी असलेल्या NAV प्रमाणे युनीटचे मुल्य अर्ज प्राप्त तारखेपासून 7 दिवसांचे आंत वि.प.नी तक्रारकर्त्याचे बॅंक खात्यात जमा करावे. यांत कसूर केल्यास अर्ज मिळाल्याचे तारखेपासून प्रत्यक्ष भूगतान करेपर्यंतच्या कालावधीसाठी सदर रकमेवर द.सा.द.शे. 12 टक्केप्रमाणे व्याज मिळण्यास तक्रारकर्ता पात्र राहील.
2) वरील रकमेशिवाय वि.प.क्र. 1 व 2 यांनी संयुक्त व वैयक्तिकरित्या तक्रारकर्त्यास शारिरिक व मानसिक त्रासाबाबत रु.3,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.2,000/- द्यावा.
3) आदेशाची पुर्तता 30 दिवसांचे आंत न केल्यास वि.प. ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 27 खालील कारवाईस पात्र राहतील.
4) आदेशाची प्रत उभयपक्षांना निशुल्क पुरवावी.
5) प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल तक्रारकर्त्यास परत करावी.