निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 14/12/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 16/12/2010 तक्रार निकाल दिनांकः- 11/01/2012 कालावधी 01 वर्ष. 26 महिने. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. जितेंद्र पिता माणिकचंद जैन. अर्जदार वय 37 वर्ष.धंदा.- व्यापार. अड.एस.बी.धुळे. रा.गव्हाणे रोड.परभणी ता.जि.परभणी. विरुध्द व्यवस्थापक. गैरअर्जदार. युनायटेड इंडीया इन्शुरन्स कं.लि. अड.आर.बी.वांगीकर. दयावान कॉम्पलेक्स.स्टेशन रोड.परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – सौ.सुजाता जोशी. सदस्या.) अर्जदाराचा विमा दावा नाकारुन गैरअर्जदाराने दिलेल्या त्रुटीची सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा परभणी येथील रहिवासी असून दालमिलचा व्यवसाय करतो.अर्जदाराचा व्यापार मोठा असल्यामुळे मोठी रक्कम बँकेतून ने – आण करावी लागते त्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदाराकडून “ रोख रक्कम ने – आण नुकसान ” ची विमा पॉलिसी उतरविलेली होती त्याचा क्रमांक 230601/48/09/07/00001284 असा होता.अर्जदाराला स्वतः प्रत्येक ठिकाणी हजर राहून रक्कम वसुली करणे व इतर बँकेची कामे करणे शक्य नसल्यामुळे त्याने त्याचा भाऊ मनोजकुमार जैन यांना दिनांक 13/04/2009 रोजी कुलमुखत्यारपत्र देवुन मिलचे आर्थिक व्यवहार पाहण्याचे अधिकार दिलेले होते. दिनांक 25/05/2010 रोजी रु.1,65,000/- व इतर महत्वाची कागदपत्रे घेवुन स्टेट बँक ऑफ हैद्राबाद ए.डी.बी.शाखेत मनोजकुमार गेलेले असतांना एका व्यक्तीने धक्का देवुन रोख रक्कमेची बॅग पळवुन नेली.त्यानंतर सदरील घटनेची तक्रार पोलिस स्टेशन कोतवाली येथे गुन्हा क्रमांक 9712010 खाली नोंदवली गेली तसेच अर्जदाराने ही घटना गैरअर्जदाराला सांगीतली व सोबत आवश्यक ते सर्व कागदपत्र देण्यात आले. दिनांक 07/08/2010 रोजी गैरअर्जदाराने अर्जदारास पत्र पाठवुन “ सर्व्हेअरच्या अहवाला नुसार पैसे नेणारा मनोज जैन हा विमाकृताचा नोकर नव्हता अथवा मालकही नाही या सबबीखाली अर्जदाराचा दावा नामंजूर करण्यात येत आहे ” असे कळवले वास्तविक अर्जदाराने दिनांक 13/04/2009 रोजीच त्याच्या भावास कुलमुखत्यारपत्र दिले हाते व गैरअर्जदारास ही त्याची प्रत देण्यात आली होती,परंतु गैरअर्जदाराने हेतुपुरस्सर अर्जदाराचा दावा नाकारुन त्रुटीची सेवा दिलेली आहे.म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे व रु.1,65,000/- द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने द्यावेत व मानसिक त्रास,त्रुटीच्या सेवेबद्दल रु.25,000/- व दाव्याचा खर्च रु.5,000/- मिळावा अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत त्याचे शपथपत्र, फीर्याद, अंतिम अहवाल, घटनास्थळ पंचनामा, पॉवर ऑफ अटर्नी, रेप्युडेशन लेटर इ. कागदपत्र दाखल केलेले आहेत. गैरअर्जदाराने त्याच्या लेखी जबाबात रक्कमेची ने आण करणारा हा तक्रारदार ह्यांचा नियमित व अधिकृत नोकर नाही तो त्यांचा भाऊ आहे व विम्यातील नियम अटीनुसार रक्कमेंची ने आण केवळ विमाधारक अथवा त्याचा अधिकृत नोंदणीकृत नियमित नोकरच करु शकतो, परंतु विमा धारकाच्या भावाने येथे काम केल्यामुळे विम्यातील अटी व नियमांचा भंग झाला आहे म्हणून गैरअर्जदाराने विमा दावा कायदेशिररित्या नाकारला आहे.म्हणून गैरअर्जदाराने अर्जदारास कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही म्हणून अर्जदाराची तक्रार रु.5,000/- च्या नुकसान भरपाईसह फेटाळण्याची विनंती केलेली आहे. गैरअर्जदाराने लेखी जबाबासोबत त्याचे शपथपत्र, दाखल केलेले आहेत. तक्रारीत दाखल कागदपत्र व वकीलांच्या युक्तीवादावरुन तक्रारीत खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदारास त्याचा विमादावा फेटाळून गैरअर्जदाराने 1त्रुटीची सेवा दिलेली आहे काय ? होय. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून रोख रक्कम ने आण करण्यासाठीचा विमा उतरविलेला आहे व त्याचा क्रमांक 230601/48/09/07/00001284 आहे ही बाब सर्वमान्य आहे.मनोजकुमार जैन हे दिनांक 25/05/2010 रोजी रोख रक्कम रु.1,65,000/- बँकेत भरण्यासाठी घेवुन जात असताना अनोळखी इसमाने त्यांची बँग चोरुन नेली हे नि.5/1 वरील फीर्याद, नि.5/2 वरील दोषारोप पत्र, नि.5/3 वरील घटनास्थळ पंचनामा वरुन सिध्द होते. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे विमादावा दाखल केला,परंतु पॉलिसी अटी – नियमांचा भंग होत असल्याकारणाने विमादावा फेटाळल्याचे नि.5/6 वरील रेप्युडेशन लेटरव्दारे अर्जदारास कळवले कारण मनोजकुमार जैन हे अर्जदाराचे नोकर ही नाहीत व ते स्वतः मालकही नाहीत गैरअर्जदारांनी तक्रारीत पॉलिसीचे नियम व अटीच दाखल केलेल्या नसल्यामुळे पॉलिसीच्या कोणत्या नियम व अटींचा भंग झाला आहे हे सिध्द होत नाही तसेच नि.5/5 वर अर्जदाराने मनोजकुमार जैन यांच्या नावे दिलेली “ जनरल पॉवर ऑफ अटर्नी ” आहे “ पॉवर ऑफ अटर्नी ” विम्याच्या अटी व नियमांत बसत नाही हे दाखवण्यासाठीही कोणताही पुरावा तक्रारीत दाखल नाही त्यामुळे अर्जदाराचा विमा दावा फेटाळून अर्जदारास गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिलेली आहे.असे आम्हास वाटते.म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 अर्जदारास गैरअर्जदाराने रु.1,65,000/- तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदराने संपूर्ण रक्कम देय होईपर्यंत निकाल समजल्यापासून 30 दिवसांचे आत द्यावी. 3 गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रारीचा खर्च रु.1,000/- आदेश मुदतीत द्यावेत. 4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |