जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –55/2011 तक्रार दाखल तारीख –05/04/2011
शारदाबाई भ्र.गोरख ढेंगे
वय 42 वर्षे धंदा शेती .तक्रारदार
रा.मौज ता. जि.बीड
विरुध्द
1. शाखाधिकारी,
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
छत्रपती संकूल, साठे चौक, बीड,
तेलगांव रोड,बीड
2. कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीस लि.
भास्कर नारायण प्लॉट नं.7 सेक्टर
द्वारा एच.डी.एफ.सी.लाईफ इं.कं.लि.जवळ
कॅनॉट गार्डन,टाऊन सेंटर,सिडको,औरंगाबाद .सामनेवाला
3. तालुका कृषी अधिकारी,
तालुका कृषी कार्यालय, धानोरा रोड,बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.सी.एन.वीर
सामनेवाले क्र.1 तर्फे :- अँड.व्ही.एस.जाधव
सामनेवाले क्र.2 तर्फे ः- स्वतः
सामनेवाले क्र.3 तर्फे ः- स्वतः
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराचे पती नामे गोरख साधु ढेंगे हे शेतकरी होते. त्यांचें नांवे मौज ता.जि. बीड येथे गट नंबर 18 मध्ये 21 आर, जमिन होती.
तक्रारदाराचे पती गळीत हंगाम 2009-10 साठी अकलूज येथे उपजिविका भागविण्यासाठी अकलून जि.सोलापूर येथील कारखान्यावर ट्रॅक्टर क्र.एम.एच.-13-जे-5577 मध्ये बसून दि.21.10.2009 रोजी जात होते. सदरचा ट्रॅक्टर हा दुपारी 12.30 च्या दरम्यान अकलूज जवळ आला असता त्यांचा अपघात झाला त्यामुळे गोरख ढेंगे हा खाली पडला व त्यांस गंभीर मार लागल्यामुळे त्यांस अकलूज येथील सरकारी दवाखान्यात नेले असता त्यांस डॉक्टरांनी मृत घोषित केले. सदरच्या घटनेची फिर्याद रामचंद्र बैजू भोसले यांनी दि.24.10.209रोजी गू.क्र.164/2009 कलम 304 अ,279 भादवि नुसार ट्रॅक्टरच्या ड्रायवव्हर विरुध्द गून्हा नोंदविण्यात आला.
पतीच्या दुःखद निधनानंतर तक्रारदारांनी विमा रक्कम मिळण्यासाठी दि.12.05.2010 रोजी प्रस्ताव अर्ज तक्रारीत नमूद केलेल्या कागदपत्रासह तालूका कृषी अधिकारी यांचेकडे दाखल केला.त्यानंतर दि.3.6.2010 रोजी सामनेवाला क्र.2 चे पत्र तक्रारदारास दि.30.06.2010 रोजी सामनेवाला क्र.3 यने दिले. सदरचे पत्र पाहता त्यात तक्रारदारांनी जी कागदपत्रे सूरुवातीला दिली होती तिच कागदपत्रे बँक खात्याचा तपशील, 8 अ, 6ड फेरफार, एफआयआर, घटनास्थळ पंचनामा, पी.एम.रिपोर्ट इत्यादी कागदपत्राची मागणी केली.
प्रस्ताव अर्जावर प्रियदर्शनी म.नागरी सह.बँकेचा खाते नंबर 16212 टाकलेला होता. पासबूक प्रत नसल्यामुळै त्यांची प्रत सुध्दा दि.26.7.2010 रोजी सामनेवाला क्र.3 कडे तक्रारदाराने दाखल केली आहे. दि.30.01.2011रोजी पत्र देऊन सामनेवाला क्र.1 यांनी नूकसान भरपाईची मागणी फेटाळून लावली. सदरचे पत्र पाहता कोणतेही कागदपत्र अथवा दावा फेटाळला यांचा बोध होत नाही. सामनेवाला यांनी दावा फेटाळून तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केला आहे.
विनंती की,तक्रारदारास सामनेवाला क्र. 1 ते 3 यांचेकडून एकत्रित नूकसान भरपाई रु.1,00,000/- प्रस्ताव दाखल दि.12.05.2011 रोजी पासून 12 टक्के व्याजासह मंजूर करावेत. मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व अर्जाचा खर्च रु.10,000/- मंजूर करण्यात यावा.
सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचा खुलासा दि.27.6.2011 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्वआक्षेप नाकारलेले आहेत. सामनेवाला यांना अपघात मान्य नाही. सामनेवालाकडे तक्रारदारांनी मूदतीत कागदपत्र दाखल केलेले नाहीत. त्यामुळे तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण नाही. तरी तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचा खुलासा दि.27.6.2011 रोजी दाखल केला की, श्री.गोरख साधु ढेंगे रा. मौज यांचा अपघात दि.21.10.2009 रोजी झाला. त्यांचा दावा दि.01.07.2010 रोजी मिळाला. सदरचा दावा हा अपूर्ण कागदपत्रासह म्हणजे वयाचा दाखला, पोलिस पेपर आणि पी.एम.रिपोर्ट, पोलिस अधिकारी यांनी सांक्षाकीत केलेल्या कागदपत्रासह मिळाला. त्या बाबत सामनेवाला यांनी दि.3.6.2010 रोजी तक्रारदारांना कळविले, त्याचे स्मरणपत्र दि.2.10.2010, 3.11.2010, 6.12.2010 दिले. सदरचे कागदपत्र तक्रारदारांनी दाखल न केल्याने सदरचा दावा विमा कंपनीकडे दि.21.12.2010 रोजी अपूर्ण प्रस्ताव या शे-याने पाठविला. विमा कंपनीने दि.31.12.2010 रोजी सदरचा दावा बंउ केला.
सामनेवाला क्र.3 यांनी त्यांचा खुलासा दि.12.05.2011 रोजी दाखल केला. तक्रारदारांना वारंवार सुचना देऊनही दि.14.11.2010 रोजी पर्यत चूकीच्या कागदपत्राची पूर्तता न केल्यामुळे प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे. लाभार्थीस योजनेचा लाभ मिळण्यास विलंब होत आहे. त्यासाठी सर्वस्वी स्वतःलाभार्थी जबाबदार आहे.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला क्र.1 चा खुलासा,शपथपत्र, सामनेवाला क्र.2,3 चा खुलासा यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.विर, सामनेवाला क्र.1 चे विद्वान वकील श्री.व्ही.एस.जाधव, यांचा यूक्तीवाद ऐकला. सामनेवाला क्र.2 व 3 यूक्तीवादाचे वेळी गैरहजर.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता गोरख सांधू ढेंगे हे शेतकरी होते ही बाब फेरफार नोंदीवरुन स्पष्ट होते.
दि.21.10.2009 रोजी ट्रॅक्टर वरुन जात असताना अकलूज जवळ त्यांचा अपघात झाला व त्यात त्यांचा मृत्यू झाला.
त्या संदर्भात दि.24.10.2009 रोजी गून्हा नंबर164/2009 कलम 304 अ, 279 भादवि नुसार ट्रॅक्टर ड्रायव्हरचे विरुध्द गून्हा नोंदविला गेला.
त्यानंतर तक्रारदारांनी दि.12.05.2010 रोजी सामनेवाला क्र.3 कडे प्रस्ताव अर्ज सादर केला. नूकसान भरपाईची मागणी केली. त्यानंतर सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदाराकडे सामनेवाला क्र.3 मार्फत अपूर्ण कागदपत्राची मागणी केली. त्या बाबत स्मरण पत्रे दिलेली आहेत. परंतु तक्रारदाराकडून कागदपत्राची पूर्तता झालेली नाही.त्यामुळे सामनेवाला क्र.2 यांनी अपूर्ण अवस्थेतच सदरचा प्रस्ताव सामनेवाला क्र.1 कडे पाठविला व सामनेवाला क्र.1 यांनी वरील कागदपत्रे न आल्याने तक्रारदाराचा दावा दि.31.12.2010 रोजीच्या पत्रान्वये बंद केलेला आहे.
या संदर्भात तक्रारीतील तक्रारदाराचे विधान पाहता नूकसान भरपाई मिळण्यासाठी तालूका कृषी अधिकारी बीड यांचेकडे दावा अर्ज सादर केला. त्यासोबत कागदपत्र दाखल केल्याचे तक्रारदाराचे विधान नाही तसेच तक्रारदारांनी कागदपत्राची वेळोवेळी पूर्तता केल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे परंतु या संदर्भात सामनेवाला क्र.3 यांचा खुलासा स्वयंस्पष्ट आहे. तक्रारदारांनी कागदपत्राची पूर्तता न केल्याने सदरचा दावा त्यांचे स्तरावर प्रलंबित आहे. वास्तविक सदरचा दावा हा विमा कंपनीने बंद केलेला आहे.ही सर्व वस्तूस्थिती लक्षात घेता तक्रारदारांनी कागदपत्रे सामनेवाला कडे योग्य रितीने व वेळेत दाखल न केल्यामुळे तक्रारदाराचा दावा बंद झालेला आहे. निश्चितपणे सामनेवाला क्र.1 ने अपूर्ण कागदपत्रामुळे दावा बंद केल्याचे पत्र तक्रारदारांनरा दिलेले आहे. यापूर्वी सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांना कागदपत्राची मागणी केलेली आहे. त्यामुळे कूठले कागदपत्रे अपूर्ण होती यांची चौकशी तक्रारदारांनी निश्चितच करणे आवश्यक होते व वेळेत सदरची कागदपत्रे सामनेवाला क्र.3 कडे देणे आवश्यक होते. परंतु तक्रारदारांनी त्यांची पूर्तता केलेली नाही हे सामनेवाला यांचे विधान विचारात घेता सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारांना विम्याची रक्कम न देऊन दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब कूठेही स्पष्ट होत नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सेवेत कसूरीची बाब स्पष्ट न झाल्याने तक्रारदारांना कोणतीही रक्कम देय होत नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अर्ज रदद करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड