निकाल
दिनांक- 07.09.2013
(द्वारा- श्रीमती मंजूषा चितलांगे, सदस्य)
तक्रारदार श्रीमती शेख नौशादबी भ्र.शेख ताजुददीन यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये विमा रक्कम व नुकसान भरपाई मिळावी यासाठी दाखल केलेली आहे.
तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे, तक्रारदार हया मयत शेख ताजोददीन शेख इलीयासोददीन यांची पत्नी आहे. तक्रारदाराच्या पतीचा मृत्यू दि.19.07.2010 रोजी अपघातात झालेला आहे. तक्रारदाराने शेतकरी जनता अपघात विमा योजना क्लेम फॉर्म संबंधित विमा कंपनी यांना संबंधित तालुका कृषी अधिकारी ता.परळी (वैजीनाथ) जि.बीड द्वारे अपघातग्रस्त शेतकरी व वारसदार म्हणून रक्कम रु.1,00,000/- एवढया रकमेच्या अपघात विमा योजनेखाली अर्ज दिलेला होता. व इतर आवश्यक कागदपत्रे दखील सादर केली होती.
सामनेवाला यांच्याकडून शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई रक्कम मिळण्यास तक्रारदारास उशीर होत असल्याकारणाने तक्रारदाराने संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत ब-याच वेळा चौकशी केली व दि.03.09.2011 रोजी मंडळ प्रबंधक, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मर्यादित यांना लेखी स्मरणपत्र देऊन शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ देण्याकरीता संदर्भ पत्र क्रमांक 31.12.2010 व विनंती पत्र दि.01.06.2011 चा आशय स्मरणपत्रात नमुद केला होता. तरी देखील सामनेवाला यांनी विमा रक्कम तक्रारदारास दिली नाही.
असे की, शेवटी सामनेवाला यांनी दि.31.12.2010 रोजी संदर्भ 230200 शेतकरी विमा 2010 या पत्रान्वये तक्रारदारास सदर दावा निरस्त करण्यासंदर्भात पत्र देऊन ‘ड्रायव्हींग लायसन्स नाही/अपघाताच्या वेळी ते वैध नव्हते’ या कारणास्तव नुकसान भरपाई देऊ शकत नाही असे कळवले.
तक्रारदाराने तिचे मयत पतीचे ऑगस्ट 2012 पर्यंत वैध असलेले ड्रायव्हींग लायसन्सची प्रत सामनेवाला यांना पाठवली होती, परंतू तरी देखील सामनेवाला यांनी तक्रारदारास विमा अंतर्गत नुकसान भरपाई देण्यास असमर्थता दाखवली आहे. तसेच आयुक्त, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पूणे यांनी दि.27.06.2011 या पत्राआधारे जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी,बीड यांना लेखी स्वरुपात कळवून दावा नामंजूर केल्याने विमा प्रस्तावाबाबत विमा कंपनीकडे व तत्कालीन विमा सल्लागार कंपनी कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस यांच्याकडे पाठपुरावा करुन तक्रारदार हीस विम्याची देय लाभ मिळण्याबाबत कार्यवाही करावी असे नमुद केले होते यावर ही सामनेवाला यांनी आजपर्यंत नुकसान भरपाई देण्यास असमर्थता दाखवली आहे.
तक्रारदाराने दि.02.02.2012 रोजी सामनेवाला यांना वकीलामार्फत कायदेशिर नोटीस पाठवली. तक्रारदाराचे पतीकडे ड्रायव्हींग लायसन्स असताना दावा नाकारला. तसेच दि.01.06.2011 रोजी दावा नाकारल्यावर विमा बाबत पुनर्विचार करुन तक्रारदाराने नुकसान भरपाईची मागणी केली, तेव्हाही सामनेवाला यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तक्रारदाराने सामनेवाला विमा कंपनीकडे कागदपत्राची रितसर पुर्तता केली असताना देखील सामनेवाला यांनी शेतकरी जनता अपघात विमा नुकसान भरपाई देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सामनेवाला यांच्याकडून तक्रारदारास विमा रक्कम रु.1,00,000/- व मानसिक त्रासापोटी, तसेच सेवेत केलेल्या हलगर्जीपणामुळे रु.50,000/- असे एकून नुकसान भरपाई रु.1,50,000/- मागण्यास पात्र आहे.
सामनेवाला हे मंचात हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे मुदतीत दाखल न केल्यामुळे त्यांचे विरुध्द नो से चा आदेश पारीत करण्यात आला. तदनंतर त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले, ते लेखी म्हणणे ग्राहय धरता येणार नाही.
तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्र यांचे अवलोकन केले. त्यावरुन न्याय निर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर 1) सामनेवाला यांनी अपघाताच्यावेळी मयत हा गाडी चालवित होता, ही बाब सिध्द केली
आहे काय? नाही.
2) तक्रारदार नुकसान भरपाई व इतर दाद मागण्यास
पात्र आहे काय? होय. 3) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 ते 3 ः- तक्रारदारानी पुराव्याकामी आपले शपथपत्र दाखल केले. तसेच क्लेम फॉर्म भाग-1, स्मरणपत्र, विमा कंपनीला दिलेला अर्ज, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना दिलेला अर्ज, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे क्लेम नाकारण्यात आलेले पत्र, वकीलामार्फत पाठविलेली नोटीस, मयताचा वाहन परवाना, मृत्यू प्रमाणपत्र, दोषारोप पत्र, घटनास्थळाचा पंचनामा, गावचा नमुना 8 अ चा उतारा,7/12 चा उतारा, वारसाचे प्रमाणपत्र, हया कागदपत्राच्या छायांकित प्रती दाखल केल्या आहेत.
सामनेवाला हे हजर झाले.त्यांनी आपले लेखी म्हणणे मुदतीत दाखल न केल्यामुळे सामनेवाला यांच्या विरुध्द नो से चा आदेश झालेला आहे. तदनंतर सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले, त्या लेखी म्हणण्याला ग्राहय धरता येणार नाही.
तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्र याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास आले की, मयत याचे नावे सिरसाळा ता.परळी वैजीनाथ येथे शेती होती. तक्रारदार हयाचे पतीदि.19.07.2010 रोजी अपघातात मयत झाले. नियमाप्रमाणे विमा मंजूरीसाठी शेतजमीन शेतक-यांच्या नावे असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाने नियोजित केलेली शेतकरी वैयक्तिक अपघात विमा योजना ही शेतक-यांच्या हितासाठी केलेली आहे. त्याचा लाभ मिळावा म्हणून तक्रारदाराने शेतकरी विमा योजनेअंतर्गत सदर विमा प्रस्ताव सामनेवालाकडे पाठविलेला होता. सामनेवाला हयानी सदर प्रस्ताव मयताचा वाहन परवाना वैधता नाही असे सांगून नाकारला आहे. तक्रारदारानी दाखल केलेला दोषारोप पत्र याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास आले की, मयत व साक्षीदार विष्णू चव्हाण हे मोटर सायकल एम.एच.44 ए-6623 वर बसून जात असताना अपघात झाला, इलाज चालू असतांना तक्रारदाराचे पती मयत झाले. यावरुन मंचाचे असे मत आहे की, अपघाताच्यावेळी सदर मोटर सायकल हे कोण चालवित होते हे स्पष्ट नाही. यावरुन अपघाताच्यावेळी मयत हाच गाडी चालवित होता ही बाब निष्पन्न होत नाही.
सामनेवाला यांनी तक्रारदाराचा प्रस्ताव, मयताचा वाहन परवाना वैधता नाही म्हणून दि.31.12.2010 ला नाकारला आहे. सबब त्याचा वाहन परवाना वैध नाही असे सांगता येणार नाही. तदनंतर तक्रारदार हयांनी सामनेवाला यांच्याकडे नुकसान भरपाईची वेळोवेळी मागणी केली. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या दि.01.06.2011च्या पत्रान्वये असे निदर्शनास येते की तक्रारदार यांनी चुकीने मयताचे जुने वाहन परवाना प्रस्तावासोबत जोडले होते. तदनंतर तक्रारदारानीमयताचे रिनिव्यू केलेला वाहन परवाना सामनेवालाकडे पाठविला होता व प्रस्तावाची मंजूर करुन देण्याची विनंती केली आहे. तदनंतर कृषी आयुक्तालय पूणे यांनी सुध्दा पत्राद्वारे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हयांना सदर प्रस्तावात योग्य कार्यवाही करण्यात यावी असे नमुद केले आहे. तक्रारदार यांनी वारंवार मागणी करुन सुध्दा संबंधित प्रस्तावाबददल विचार करण्यात आला नाही. सबब सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देण्यामध्ये त्रुटी ठेवली आहे.
सामनेवाला यांनी सदर प्रस्ताव हा मयत यांचेकडे वैध वाहन चालक परवाना नाही म्हणून नाकारला आहे. परंतू अपघाताच्यावेळी मयत शेख ताजूददीन हेच मोटर सायकल चालवित होते ही बाब सिध्द केली नाही. दाखल केलेले वाहन परवान्याचे अवलोकन केले असता, सदर वाहन परवानाची ऑगस्ट 2012 पर्यंत वैधता आहे. व मयताचे अपघात हे दि.19.07.2010 रोजी झाले आहे असे निदर्शनास आले. सबब मयत यांचेकडे अपघात झाला तेव्हा वाहन चालविण्याचा परवाना होता हे सिध्द होते.
संपूर्ण कागदपत्राचे अवलोकन केले असता या मंचाचे असे निदर्शनास येते की, मयत ताजूददीन यांचा मृत्यू अपघाताने झाला व त्या दिवशी तोशेतकरी होता व तसेच शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा रक्कम मिळण्यास पात्र आहे. सामनेवाला यांनी ज्या कारणास्तव तक्रारदाराचा दावा नाकारला आहे, त्यासाठी सामनेवाला यांनी कोणतेही असे संयुक्तीक व स्पष्ट पुरावा दाखल केला नाही. म्हणून सामनेवाला यांचा बचाव स्विकारता येणार नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे संपूर्ण कागदपत्र पाठवित असतांनाही व त्यामध्ये कोणतीही त्रुटी नसताना ते नामंजूर करण्यास वाजवी व योग्य कारण नव्हते. सबब सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा प्रस्ताव नामंजूर करुन सेवेत त्रुटी केली आहे. तक्रारदार हया सामनेवाला यांच्याकडून विमा अंतर्गत मिळणारी रक्कम, दाव्याचा खर्च व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. म्हणून मुददा क्र.1 चे उत्तर नकारार्थी व मुददा क्र.2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) सामनेवाला विमा कंपनी यांनी, तक्रारदार यांना शेतकरी व्यक्तिगत
अपघात विमा योजना अंतर्गत विमा रक्कम रुपये 1,00,000/-
(अक्षरी रु. एक लाख) निकाल कळाल्यापासून 30 दिवसाचे आत
द्यावे. 3) वर नमुद केलेली रक्कम मुदतीत दिली नाही तर, त्यावर तक्रार
दाखल झाल्यापासून पूर्ण रक्कम वसूल होईपर्यंत द.सा.द.शे.9
टक्के व्याज द्यावे.
4) सामनेवाला यांनी, तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी
रक्कम रु.3,000/- व तक्रारीचा खर्च रु.1,000/-द्यावे.
5) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील
कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच
तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष