नि. ४२
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र.११७८/२००७
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : २०/१२/२००७
तक्रार दाखल तारीख : २८/१२/२००७
निकाल तारीख : २१/१२/२०११
----------------------------------------------------------------
मे.मयूर फुटवेअर
प्रोप्रा. श्री दिलीप राजाराम चिपळूणकर
व.व.४५, धंदा – व्यापार
रा.गांधी चौक, मेनरोड, बाजार पेठ,
चिपळूण ता.चिपळूण जि.रत्नागिरी ..... तक्रारदारú
विरुध्दù
१. मॅनेजर
दि न्यू इंडिया +ìश्युरन्स कं.लि. शाखा विटा
बिल्बदल, प्रसाद टॉकीजसमोर, विटा सांगली
२. डिव्हीजन मॅनेजर,
दि न्यू इंडिया +ìश्युरन्स कं.लि. शाखा विटा
श्री सिध्दिविनायक कॉम्प्लेक्स, टाटा पेट्रोल
पंपाशेजारी, सांगली-मिरज रोड, सांगली
३. दि विटा मर्चंट्स को-ऑप. बॅंक लि.
शाखा चिपळूण जि. रत्नागिरी .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.एस.डी.सोलांकुरे,
जाबदार क्र.१ व २ तर्फे : +ìb÷. श्रीमती एम.एम.दुबे
जाबदार क्र.३ तर्फे : +ìb÷.श्री एस.एस.मेहता
नि का ल प त्र
द्वारा- मा. अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज आपल्या दुकानातील मालाच्या विमादाव्याबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार यांचे मौजे चिपळूण येथे मयूर फूटवेअर या नावाने दुकान असून तक्रारदार यांनी जाबदार क्र.३ यांचेकडून माल तारण व इमारत तारण असे कर्ज घेतले होते. जाबदार क्र.३ यांनी तक्रारदार यांच्या मालाचा व इमारतीचा विमा उतरुन त्याचा हप्ता तक्रारदार यांच्या खात्यातून जाबदार क्र.१ व २ यांचेकडे जमा केला आहे. मौजे चिपळूण येथे दि.२५ जुलै २००५ रोजी जोराचा पाऊस येवून पूर आला व सदर पुराचे पाणी तक्रारदार यांचे दुकानात घुसले व त्यामुळे तक्रारदार यांचे दुकानातील शिल्लक माल वाहून गेला. त्यामुळे दुकानातील मालाचे, फर्निचरचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. सदरच्या नुकसानीचा रितसर पंचनामा झाला. तक्रारदार यांनी पुराने झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळण्यासाठी योग्य त्या कागदपत्रांसह जाबदार यांचेकडे विमाक्लेम दाखल केला. जाबदार यांनी दि.२१/८/२००६ रोजीच्या पत्राने नुकसान भरपाईची रक्कम रु.३०,५२९/- इतकी ठरविली. सदरची रक्कम पूर्णपणे चुकीची आहे. सर्व्हेअर यांनी प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी न करता प्रत्यक्ष सर्व्हे न करता अंदाजाने रक्कम ठरविली आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज विम्याची नुकसान भरपाई रु.९,६१,९९०/- व्याजासह मिळणेसाठी व इतर तदानुषंगिक मागण्यांसाठी दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.४ चे यादीने २५ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार क्र.३ यांनी नि.७ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये प्रस्तुतच्या तक्रारअर्जामध्ये तक्रारदार यांनी केवळ जाबदार क्र.१ व २ यांचेविरुध्द तक्रार केली आहे. जाबदार क्र.३ यांचा प्रस्तुत तक्रारअर्जाशी कोणताही संबंध नाही. तक्रारदार यांनी जाबदार क्र.३ यांच्याकडून कर्ज घेतल्याचे व जाबदार क्र.३ मार्फत तक्रारदार यांच्या दुकानातील मालाचा विमा उतरविल्याची बाब जाबदार यांनी मान्य केली आहे. जाबदार क्र.३ यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही, त्यामुळे जाबदार क्र.३ विरुध्दची तक्रार फेटाळणेत यावी असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. जाबदार क्र.३ यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.८ ला प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
४. जाबदार क्र.१ व २ यांनी नि.१५ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये पॉलिसीबाबतचा मजकूर मान्य केला आहे. तक्रारदार यांचे दुकानातील मालाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले ही बाब जाबदार यांनी अमान्य केली आहे. नुकसानीबाबत झालेला पंचनामा जाबदार यांनी अमान्य केला आहे. तक्रारदार यांनी जाबदार यांच्याकडे नुकसानीची सूचना दिल्यानंतर जाबदार यांनी सर्व्हेअर म्हणून सच्चिदानंद पुजारी यांची नेमणूक केली होती. सदर सर्व्हेअर यांनी जागेवर जावून सर्व्हे करुन नुकसान भरपाईची रक्कम ठरविली. सर्व्हेअर यांनी ठरविलेल्या नुकसान भरपाईप्रमाणे तक्रारदार यांना नुकसान भरपाई देवू केली होती तथापि सदरची रक्कम तक्रारदार यांनी नाकारली. त्यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. सबब तक्रारदार यांचा तक्रार नामंजूर करण्यात यावा असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. जाबदार क्र.१ व २ यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.१६ ला प्रतिज्ञापत्र व नि.१७ चे यादीने १० कागद दाखल केले आहेत.
५. तक्रारदार यांनी नि.१९ वर शपथपत्र दाखल केले आहे. जाबदार क्र.१ व २ यांनी नि.२० वर लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार यांनी नि.२७ वर लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार यांनी नि.२९ वर दुरुस्तीसाठी अर्ज दाखल केला होता. सदरचा अर्ज मंजूर करण्यात आला व त्याप्रमाणे नि.१ वर दुरुस्ती करण्यात आली. जाबदार क्र.३ यांनी नि.३० वर लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार यांनी नि.३२ वर दुरुस्त अर्जाची प्रत व त्यासोबत नि.३३ ला शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांनी नि.३६ ला शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदारतर्फे नि.३७ च्या यादीने काही निवाडे दाखल करण्यात आले. तक्रारदार व जाबदार क्र.१ व २ यांचे विधिज्ञांचा तोंडी युक्तिवाद ऐकला. जाबदार क्र.३ यांचे विधिज्ञ युक्तिवादाचे दरम्यान गैरहजर राहिले.
६. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे व दाखल कागदपत्रे, लेखी युक्तिवाद व ऐकण्यात आलेला तोंडी युक्तिवाद यावरुन एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे तक्रारदारच्या दुकानातील मालाचा व फर्निचरचा जाबदार यांचेकडे विमा उतरविला होता. सदर विमा पॉलिसीची झेरॉक्सप्रत याकामी नि.४/१ व ४/२ वर दाखल आहे. नि.४/१ वर दाखल असलेली पॉलिसी ही इमारतीसंदर्भाची आहे व नि.४/२ वर दाखल असलेली पॉलिसी ही दुकानात असलेला माल व फर्निचरबाबतची आहे. सदर पॉलिसीचा कालावधी हा दि.२४/५/२००५ ते २३/५/२००६ असा आहे. मौजे चिपळूण येथे दि.२५ जुलै २००५ रोजी पूर येवून तक्रारदार यांचे दुकानातील मालाचे नुकसान झाले आहे. दि.२५/७/२००५ रोजीच्या घटनेबाबत कोणतेही दुमत नाही. त्यामुळे पॉलिसी कालावधीमध्ये तक्रारदार यांच्या दुकानाचे पुरामुळे नुकसान झाले ही बाब स्पष्ट होते.
७. तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये उपस्थित झालेला वादाचा मुद्दा हा सदर पुरामुळे तक्रारदार यांचे दुकानातील मालाचे नेमके किती नुकसान झाले याबाबत आहे. सदरचे नुकसान ठरवित असताना दोन्ही बाजूंनी दाखल करण्यात आलेला पुरावा याठिकाणी विचारात घ्यावा लागेल. तक्रारदारतर्फे नुकसान दर्शविण्यासाठी नि.४/११ वर पंचयादीची प्रत दाखल केली आहे. तसेच खरेदी बिले दाखल केली आहेत व नगरपरिषद चिपळूण यांचा दाखला नि.४/२५ ला दाखल आहे. जाबदारतर्फे नि.१७/१ वर सर्व्हे अहवाल दाखल आहे. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या पुराव्याचा विचार करता तक्रारदार यांनी नि.४/११ वर दाखल केलेली पंचयादी ही केवळ त्रोटक स्वरुपाची आहे. सदर यादीची मूळ प्रत दाखल न करता त्याची झेरॉक्सप्रत दाखल केली आहे. सदरचा पंचनामा नेमका किती तारखेला केला हे या यादीवरुन स्पष्ट होत नाही व सदरची पंचयादी ही शासनाकडून आपादग्रस्त यांना आर्थिक मदत मिळणेसाठी तयार केली असल्याचे दिसून येते. सदर पंचयादीमध्ये कोणताही तपशील न देता फर्निचर नुकसान व लेदर चप्पल बूट नुकसान र.६,५०,०००/- चे झाल्याचे दर्शविण्यात आले आहे. सदरचे नुकसान कशावरुन ठरविले ही बाब स्पष्टपणे मंचासमोर आलेली नाही. तक्रारदार यांनी दुसरा जो याबाबत पुरावा दाखल केला आहे, त्यामध्ये नगरपरिषद चिपळूण यांनी दिलेला दाखला आहे. सदरच्या दाखल्यामध्ये चिपळूण नगरपरिषदेमार्फत खराब मालाची विल्हेवाट लावण्यात आली. सदर मालाचे वर्णनामध्ये रस्त्यावर टाकलेला लेदर चप्पल खराब व नाशवंत माल नुकसान रु.८.२५ लाखात असे नमूद केले आहे. नगरपरिषदेने दिलेला दाखलाही तक्रारदार यांचे नेमके किती नुकसान झाले हे ठरविण्यासाठी पुरेसा नाही. प्रस्तुत प्रकरणी जाबदारतर्फे दाखल असलेले स्टॉक स्टेटमेंट विचारात घेण्यात यावे असे तक्रारदार यांनी नमूद केले. नि.१७ चे यादीसोबत दाखल असलेल्या स्टॉक स्टेटमेंटचे अवलोकन केले असता सदरचे स्टॉक स्टेटमेंट या झेरॉक्सप्रती आहेत व सदर स्टॉक स्टेटमेंटमध्ये तारखांमध्ये खाडाखोड केल्याचे दिसून येते. त्यामुळे सदरचे स्टॉक स्टेटमेंट प्रत्यक्ष किती नुकसान झाले हे ठरविण्यासाठी उपयुक्त ठरणार नाहीत असे या मंचाचे मत आहे. यानंतर जाबदार यांनी दाखल केलेल्या पुराव्याचा विचार करता जाबदार यांनी नि.१७/१ वर सर्व्हेअर यांचा अहवाल दाखल केला आहे. सर्व्हेअर यांनी आपल्या अहवालामध्ये फर्निचरचे नुकसान रु.११,०००/- दर्शविले आहे व दुकानातील मालाचे नुकसान हे रु.३०,५२९/- इतके दर्शविले आहे. सदरील दुकानातील मालाचे नुकसान ठरवित असताना सर्व्हेअर यांनी प्रथमत: एकूण नुकसान रु.६६,९१२/- इतके दर्शविले आहे व त्यामध्ये अंडर इन्शुरन्स क्लॉजप्रमाणे ३९.४३ टक्के वजा केले आहेत व Less excess या सदराखाली रु.१०,०००/- वजा केले आहेत. सदर अंडर इन्शुरन्स ठरवित असताना ३९.४३ टक्के कशाच्या आधारे काढले याबाबत कोणतीही स्पष्टता सर्व्हे अहवालामध्ये नाही. सर्व्हे रिपोर्टचे अवलोकन केले असता सर्व्हेअर यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये तक्रारदार यांचे दुकानात एकूण स्टॉक किती होता, हे स्पष्टपणे नमूद केले नाही. सोबत जोडलेल्या स्टॉक स्टेटमेंटचे अवलोकन करता त्यामध्ये खाडाखोड असल्याचे व सदर झेरॉक्स प्रती असल्याने सदरचे स्टॉक स्टेटमेंट अंडर इन्शुरन्स क्लॉज ठरविण्यासाठी उपयुक्त होणार नाहीत, त्यामुळे अंडर इन्शुरन्स या क्लॉजखाली रक्कम कमी करणे संयुक्तिक वाटत नाही. Less excess या सदराखाली रु.१०,०००/- वजा केले आहेत. सदरचे रु.१०,०००/- कशाच्या आधारे वजा केले याबाबतही कोणताही खुलासा होत नाही. त्यामुळे सर्व्हेअरनी केलेली नुकसान भरपाईची रक्कम रु.६६,९१२/- ही पूर्णपणे जाबदार कंपनीने देणे गरजेचे होते. जाबदार यांनी तक्रारदार यांना केवळ ३०,५२९/- देवू करुन सदोष सेवा दिली आहे असे या मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारदार यांना सर्व्हे रिपोर्टमध्ये नमूद केलेली रक्कम रु.११,०००/- व रु.६६,९१२/- एकूण रु.७७,९१२/- ही रक्कम जाबदार यांच्याकडे विमाक्लेम दाखल तारखेपासून म्हणजे दि.५/८/२००५ पासून द.सा.द.शे.९ टक्के व्याजासह मंजूर करण्यात येत आहे.
८. तक्रारदार यांनी सर्व्हेअर यांच्या अहवालाबाबत आक्षेप घेतला आहे व सर्व्हेअर यांची नेमणूक आय.आर.डी.ए.च्या नियमाप्रमाणे झाली नसल्याचे नमूद केले आहे. परंतु सदर आय.आर.डी.ए. चे नियम काय आहेत हे तक्रारदार यांनी याकामी दाखल केलेले नाही. तक्रारदार यांनी सर्व्हेअर यांना सर्व्हे करण्याचा अधिकार नाही असाही आक्षेप घेतला आहे. परंतु त्याबाबत कोणताही पुरावा तक्रारदार यांनी दाखल केलेला नाही. तक्रारदार यांच्या दुकानातील मालाचे नुकसान ठरविण्यासाठी ग्राहय धरण्यासारखा सर्व्हेअर यांचा अहवाल एवढाच पुरावा मंचासमोर आला आहे. त्यामुळे सर्व्हेअर यांनी अहवालामध्ये नमूद केल्याप्रमाणे नुकसान भरपाई तक्रारदार यांना देणेबाबत आदेश करणे संयुक्तिक ठरेल असे या मंचाचे मत आहे. तक्रारदार यांनी याकामी काही निवाडे दाखल केले आहेत. परंतु सदरचे निवाडयामधील वस्तुस्थिती वेगळी असल्याने ते याकामी लागू होणार नाहीत असे या मंचाचे मत आहे.
९. तक्रारदार यांनी जाबदार क्र.३ यांचेविरुध्दही तक्रारअर्ज दाखल केला आहे. परंतु संपूर्ण तक्रारअर्जामध्ये जाबदार क्र.३ यांनी नेमकी काय सदोष सेवा दिली याबाबत कोणताही ऊहापोह केला नाही. त्यामुळे जाबदार क्र.३ यांचेविरुध्द कोणताही आदेश करण्यात येत नाही.
१०. तक्रारदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांचे विमादाव्याबाबत निर्णय घेताना जाबदार यांनी तक्रारदार यांना अत्यल्प रक्कम देवू केली त्यामुळे तक्रारदार यांना या न्याय मंचात तक्रार अर्ज दाखल करावा लागला ही बाब विचारात घेता सदरची मागणी अंशत: मंजूर करणे योग्य ठरेल असे या मंचाचे मत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
२. तक्रारदार यांना जाबदार नं.१ व २ यांनी विमा दाव्यापोटी रक्कम रुपये ७७,९१२/-(अक्षरी
रुपये सत्त्याहत्तर हजार नऊशे बारा माञ) दि.५/८/२००५ पासून द.सा.द.शे.९% दराने
व्याजासह अदा करावेत असा जाबदार यांना आदेश करण्यात येतो.
३. तक्रारदार यांना जाबदार क्र.१ व २ यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व
तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रुपये ५,०००/- (अक्षरी रुपये पाच हजार माञ) अदा करावेत
असा जाबदार यांना आदेश करण्यात येतो.
४. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार नं.१ व २ यांनी दिनांक ५/२/२०१२ पर्यंत करणेची
आहे.
५. जाबदार नं.१ व २ यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द
ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दिनांकò: २१/१२/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११